माझे सध्या दोन पेपरांत
कॉलम सुरू आहेत. एक आठवडा दिव्य मराठीत आणि दुसऱ्या आठवड्यात गोवन वार्ता. काही
महत्त्वाचा विषय असला की दोन्हीकडे एकाच विषयावर लिहितो. दोन्हीकडचे वाचक वेगळे
आहेत. त्यामुळे त्यानुसार बदल करावे लागतात. त्यामुळे विषय एकच असला तरी दोन
वेगवेगळे लेख होतात. त्याच्या प्रेक्षकांचा प्रतिक्रियेचा पॅटर्नही वेगळा आहे. गोव्यातल्या
लेखांवर व्हॉट्सअपवर चर्चा जास्त होते. तर दिव्य मराठीतल्या लेखावर महाराष्ट्राच्या
कानाकोपऱ्यातून दिवसभर फोन येतात.
दिव्य मराठीतल्या
लेखावर फोन आले नाहीत, असं कधीच झालेलं नाही. किमान २० -२५ फोन तरी येतातच. ईमेल
मेसेज वेगळे. ८ ऑक्टोबरचा रविवार मात्र त्याला अपवाद ठरला. टीवी नाइनने २३
सप्टेंबरला जगबुडीची जत्रा भरवली होती, त्यावर लिहिलं होतं. टीवी नाइनचं नाव
लेखात दिव्य मराठीने काढल्यामुळे कदाचित त्याचा संदर्भ वाचकांना कळला नसावा.
प्रेक्षकसंख्येची आकडेवारी येण्यासाठी एक आठवडा थांबावंच लांगणार होतं. त्यामुळे
उशीरही झाला असावा. टीव्ही पत्रकारिता हा विषय लोकांना फार सिरियस घेणं सोडलं
असावं. लेखही चांगला उतरला नसावा. पण कधीच फोन न करणाऱ्या पाच सहा जणांनी आवर्जून
केला होता. त्यात स्वाभाविकपणे पत्रकार होते. माझा मित्र अविनाश दुधेही होता.
लोकांना प्रतिक्रिया
द्यावीशी वाटो अथवा न वाटो, मला कायम वाटत आलंय की आपण पत्रकारितेविषयी लिहीत
राहायला हवं. मी तसं लिहीत बोलत आलोयही. आम्ही पत्रकार जगाविषयी लिहितो, पण आपल्याविषयी
लिहीत नाही. त्यामुळे संवादाच्या या धंद्याविषयी कोणताही संवाद होत नाही. आता सोशल
मीडियामुळे थोडाफार संवाद होतो. पण तोही तुटकच.
अशा टीआरपीच्या
खेळांचा खूप वाईट परिणाम चॅनलांमधे काम करणाऱ्या पत्रकारांवर होत असतो. वरवर
त्याचं समर्थन करावंच लागतं. पण मुळात पत्रकार म्हणून घडलेल्या मनोभूमिकेच्या
विरोधात असतं सगळं. मन खात राहतं. इतर अनेक स्ट्रेस असतातच. पण हा स्ट्रेसही कमी
नाही. तरुण वयात अकाली निधन झालेल्या आमच्या अनेक मित्रांचा बळी या स्ट्रेसने
घेतलाय. त्याची पत्रकारितेतल्या धुरिणांनी चर्चा करायला हवी.
खरं तर टीव्ही नाईन
हे माझं सुरुवातीपासूनच आवडतं चॅनल आहे. चंद्रमोहन पुप्पालांनी बनवलेल्या त्याच्या
फॉरमॅटची गंमत अजूनही संपलेली नाही. ते इनपूटचं चॅनल आहे. खूप बातम्या दाखवणारं. त्या
चॅनलने टीआरपीचे फंडे याआधी केले नाहीत असं नाही. पण त्यांनी अनेक इश्यू आग्रहाने
ऐरणीवर आणलेत. आधी आघाडी आणि आता भाजप सरकारच्या विरोधात त्यांनी अनेकदा आक्रमक
भूमिका घेतलीय. त्यामुळे त्यांची जगबुडी अधिक बोचणारी होती.
बाकी, जयराज
साळगावकर मला माझ्या अगाऊपणासाठी माफ करतील याची खात्री आहे.
लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट...
लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट...
....
पृथ्वीच्या मृत्यूचा
दिवस जवळ येतोय? प्रलय प्रकोप प्रचंड येतोय. जिवंत राहण्याचे
सगळे मार्ग खुंटणार? माणूस कुठे जाणार? कसा
वाचवणार जीव? माणसं जनावरं सगळ्यांचा मृत्यू अटळ? संपूर्ण पृथ्वी बेचिराख होणार? जगण्यासाठी उरलेत फक्त ३६ तास? २३ सप्टेंबरला पृथ्वीचा सर्वनाश?
ही वाक्यं २१ आणि २२
सप्टेंबर हे दोन दिवस सतत टीवीवर आदळत होती. चॅनल होतं, टीवी नाईन मराठी.
इमारती कोसळताहेत, प्रलय आलाय, माणसं सैरावैरा पळताहेत, असं दाखवणारी कुठल्यातरी
इंग्रजी सिनेमातली विज्युअल्स. सोबत तितकीच भयंकर ग्राफिक्स.
अमेरिकेतल्या कुणा
तरी डेविड मिडे नावाच्या लेखकाने एक पुस्तक लिहलंय. `द प्लॅनेट एक्सः २०१७ अरायवल` नावाचं. बायबलमधले संदर्भ, खगोलशास्त्राची
निरीक्षणं, गणिताची आकडेमोड करून त्याने असा निष्कर्ष काढला होता की निबिरू नावाचा
एक कुठलातरी ग्रह २३ सप्टेंबरला पृथ्वीवर आदळेल. त्यामुळे पृथ्वीच्या विनाशाला
सुरुवात होईल. त्यावर नासाने खुलासा केला होता की असं काहीच होणार नाही. असा
कोणताही ग्रह अस्तित्वात नाही.
पण टीवी नाईन
मराठीला खऱ्याशी काही घेणंदेणं नव्हतंच. त्यांनाही माहीत होतं आपण दाखवतोय ते
खोटंय. पण एकदा कमरेचं सोडून डोक्याला बांधायचं ठरवलं की खऱ्याखोट्याला काही अर्थच
उरत नाही. त्यांनी लोकांना घाबरवलं. आपण कसे घाबरलो आहोत, हे गावोगावचे लोक
टीवीवर येऊन सांगत होते. कुणी कुडमुड्या ज्योतिषी युगांची प्राचीन गणितं मांडत
प्रलयाचे मुहूर्त सांगत होता. कुणी सेलिब्रेटी न्युमरॉलॉजिस्ट बाई येऊन चांगल्या
लोकांच्या पुण्यामुळे अशा दुर्घटना पुढे ढकलल्या जातात, असं सांगत होत्या. कुणी
खगोलशास्त्रज्ञ आणखी काही सांगत होते. जयराज साळगावकरांसारखे अभ्यासकही या खुळ्या
खेळात पंचागकर्ते म्हणून चर्चा करण्यासाठी पोहोचले. गणपतीपासून संक्रांतीपर्यंत
बोलावतील तिथे जायला हवं, ही कालनिर्णयची जुनी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. पण
देशातली पहिली वेबसाइट सुरू करणाऱ्या जयराज साळगावकरांनी `जगाचा अंत तुम्हा आम्हाला कधीही न कळता होणार आहे` असं सांगून लोकांना आणखी घाबरवलंच.
जगबुडीची जत्रा
टीवी नाईनमध्ये तुफान चालली. फक्त लोकांनी टीव्ही बघायला हवा. एवढंच हवं असेल तर
मग सगळा विवेक बाजुला ठेवावा लागतोच. आपण पत्रकार आहोत.
आपण बातम्या सांगतो. लोकांचा आपल्यावर विश्वास आहे. या मूळ जबाबदारीवर आदर्शवादाचा
शिक्का मारला की चर्चाच थांबते. मग व्यवहाराच्या नावाने कुठल्याही थराला जाता
येतं. त्याचं कोणत्याही पातळीवर जाऊन सहज समर्थन करता येतं. जे लोणचं ताटात असेल
जेवणाची लज्जत वाढवतं. दोन दिवस तेच लोणचं पूर्ण जेवण म्हणून टीव्ही नाईनने खाल्लं
आणि यशाचा ढेकरही दिला.
आता टीवी चॅनलच्या
प्रेक्षकसंख्येची आकडेवारी दर आठवड्याला सांगणाऱ्या `टीआरपी`ची जागा `बार्क`च्या रेटिंगने
घेतलीय. जगबुडीच्या आठवड्यात या `बार्क`च्या आकड्यांमध्ये टीवी नाईनने मुसंडी मारली.
त्यांची प्रेक्षकसंख्या १९.९ वरून २३.२ टक्क्यांवर पोहोचली. हा फरक साडेतीन
टक्क्यांचाही नव्हता. तरीही कुठेच कमी नव्हता. जगबुडीचा शॉर्टकटशिवाय ही उडी
मारायला खूप मेहनत करावी लागली असती. यामुळे टीवी नाईनने त्या आठवड्यात एबीपी
माझाचा प्रेक्षक ओढून घेतला. त्यामुळे आदल्या आठवड्यात नंबर एकवर असणारं एबीपी माझा
झी २४ तासच्या खाली घसरलं. त्या आठवड्याच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या
कार्यक्रमांत टीव्ही नाईनची जगबुडी होती. पण त्यामुळे टीवी नाईन दुसऱ्या नंबरवर
पोहोचू शकलं नाही. ते आधीही तिसऱ्या नंबरवर होतं, आताही तिसऱ्या नंबरवर राहिलं. `विनोद कापरी स्कूल ऑफ जर्नालिझम`ने हिंदीत जशी क्रांती केली होती, तसं काही
मराठीत झालं नाही.
२००४ साली स्टार
न्यूजने (आता एबीपी न्यूज) एका पळून आलेल्या जोडप्याचं स्टुडियोत लग्न लावलं होतं. तीन दिवस सतत
हा हंगामा या चॅनलवर सुरू होता. त्याच सुमारास आलेलं रजत शर्मांचं ‘इंडिया टीवी’ हे चॅनल आदर्शवत म्हणावं असं सुरू होतं. चांगल्या
बातम्या, गावोगावच्या समस्या, चांगले शो, उत्तम चर्चा. पण त्याला प्रेक्षक नव्हता.
तेव्हा इंडिया टीवीने अमिताभच्या
अँग्री यंग मॅनसारखी पलटी मारली. ‘जाओ, पहले उसकी साईन लेके आओ’, असं सांगत त्याने व्यवस्थेवर सूड
उगवायला सुरूवात केली. स्टारने सुरू केलेल्या भलत्या बातमीदारीच्या उरल्यासुरल्या
सगळ्या मर्यादाही त्याने फेकून दिल्या. शक्ती कपूरचं कास्टिंग काऊच आणि बिहारच्या
आमदार निवासातलं सेक्स स्कँडल यांचं स्टिंग ऑपरेशन ही सुरुवात होती. मग भूतंखेतं, नागनागिण, अश्वत्थामा छोट्या पडद्यावर बातम्या
होऊन अवतरले. त्याच्या वाढत्या टीआरपीने सगळ्यांना दणके दिले. मग जवळपास सगळे चॅनल
या भयानक स्पर्धेत उतरले. यात मग न्यूज चॅनलमधे न्यूजलाच जागा कमी उरली. हे जवळपास
सात-आठ वर्षं चाललं.
( या विषयावरचा माझा आणखी एक लेख आहे, पोर्टर की रिपोर्टर http://parabsachin.blogspot.in/2011/06/blog-post.html )
स्टुडियोतल्या
लग्नापासून `दुनिया में पहिली बार` पर्यंत साऱ्या बदलांचे एक महत्त्वाचे नायक आणि खलनायक होते,
विनोद कापरी. ते मुळात संवेदनशील कथालेखक आहेत. त्यांनी हागणदारीच्या समस्येवर `काण्ट टेक धिस शिट एनिमोअर` ही डॉक्युमेंट्री आणि `मिस तनकपूर हाजिर हो` सारखा सरस सिनेमा बनवलाय. पण तरीही त्यांची ओळख
भयंकर बातम्यांचा बाप अशीच मानावी लागते. आपल्या मित्राला मदत करण्यासाठी त्यांनी
टीव्ही नाईन मराठीची जबाबदारी उचललीय. गेले काही महिने टीवी नाईन मराठीला कुणी
संपादक नाही. कापरीच गेले दोनेक महिने ते सांभाळत आहेत. त्यांनी केलेले बदल मोठं
यश मिळवू शकलेले नाहीत. निखिल वागळेंचा शो बंद झाल्याने त्यांच्यावर टीका झालीय.
त्यांनी आणलेले लोक चॅनल सोडून गेलेत.
विनोद कापरींचा विकिपीडियावरचा फोटो |
त्यामुळे हताश होऊन
डाव जिंकण्यासाठी विनोद कापरींनी आपले हिंदीतले पत्ते टाकण्याची सुरुवात केलीय. पण
ते काही काळ लोकांना मूर्ख बनवू शकतील. असे शो बघणारे प्रेक्षक असतातच. आकड्यांतलं
त्याचं यश स्वाभाविक आहे. पण ते कायमस्वरूपी नाही. पुढच्याच आठवड्यात एलफिन्स्टन
पूल अपघात झाल्यामुळे टीवी नाईनला फटका बसला असणारच. हा लेख
लिहीपर्यंत या आठवड्याच्या प्रेक्षकसंख्येचे आकडे आलेले नाहीत. पण ते येतील. त्यात
टीवी नाईन मागे पडलं असेलच आणि विश्वासार्हता हाच पत्रकारितेचा मूळ पाया आहे, हे
पुन्हा एकदा अधोरेखित होईल.
विनोदजी, टीवी माध्यमावर तुमची जी हुकूमत आहे, त्याचा माझ्यासारखा पत्रकार आदरच करतो. तुमच्या प्रवाही
हिंदी भाषेवर संवादाच्या धंद्यातला कुणीही फिदा होईलच. तुम्ही प्रेक्षकांशी संवाद
साधण्याची नवी परिभाषा बनवलीय. पण हिंदीतली जगबुडी मराठीत नका आणू, हीच विनंती.
टीवीवरच्या मराठी पत्रकारितेत फार ग्रेट काही चाललं नसेलही. त्यात काही चांगलं
करता येत नसेल, तर निदान वाईट तरी नका करू.
तुम्ही फिल्ममेकर
आहात. तुमच्याच पिढीतल्या एका सिनेमात, `रॉकेट सिंगः सेल्समन
ऑफ द इयर` मध्ये शेवटी एक डायलॉग आहे, तो बहुधा तुमच्या
बाबतीत लागू होत असावा. `पुरी साहब, एक दिन था जब आपके तरिकों ने इस
बिझनेस की जिओग्राफी बदल दी थी. बुरा मत मानना पर आपके बिझनेस करने के तरिके अब
हिस्ट्री हो चुके हैं.`
भारीच����
ReplyDeleteMast
ReplyDeleteस्पष्ट आणि परखड.
ReplyDeleteमाध्यमे आता व्यवसायिक दृष्टीने चालवली जातात. नफा मिळवणे हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे.सामाजिक जबाबदारी आणि कर्त्यव याचा किंवा नैतिकतेचा आता प्रश्नच उरत नाही हेच खरे.
तुमच्या अभ्यासपूर्ण आणि माहितीपूरक लेखामुळे किमान यावर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.
kaanaakhaaaliii.......sarallllll
ReplyDeleteAgadi marmik ani khde bol
ReplyDeleteVery nice
ReplyDelete