आपल्या सगळ्यांची
वेबसाईट prabodhankar.com च्या
उद्घाटनाला या शनिवारी प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त एक वर्ष पूर्ण झालं. आपल्या सगळ्यांच्या
मदतीशिवाय डॉक्युमेंटेशनचं हे मोठं काम पूर्ण झालं नसतं. त्यामुळे आता एक वर्ष
पूर्ण होताना आपल्याविषयी कृतज्ञता करायला हवीय.
गेल्या वर्षभरात
आपल्या वेबसाईटला ५३ देशांमधून जवळपास अडीच लाख लोकांनी भेट दिली. त्यात साठ टक्के
लोक पहिल्या महिनाभरात आले होते. इतक्या लोकांपर्यंत प्रबोधनकारांची झलक पोहचवू
शकलो, यात खूपच आनंद आहे. गेल्या वर्षी विशेषतः हर्षल प्रधान यांच्यामुळे
प्रबोधनकारांविषयी विविध वृत्तपत्रांत छापून आले आणि टीव्हीनेदेखील त्याची सविस्तर
दखल घेतली. यातून प्रबोधनकारांची किंवा त्यांच्याविषयी पुस्तक आहे का, अशी विचारणा
आता मुंबई आणि पुण्यातील पुस्तकांच्या दुकानात नव्याने होऊ लागली आहे. ‘गांधर्ववेद प्रकाशना’ने महाराष्ट्र निर्मितीच्या
सुवर्णमहोत्सवानिमित्त अरूण टिकेकर यांच्या संपादकत्वाखाली महाराष्ट्राचे निर्माते
अशी पुस्तकांची सिरीज काढायची घोषणा केली होती. तेव्हा त्यात प्रबोधनकारांवरील
पुस्तकाचा समावेश नव्हता. पण आपल्या वेबसाईटच्या उद्घाटनानंतर त्यांनी घाईगडबडीने
महावीर मुळे (काकडवाडी, सांगली) यांच्याकडून पुस्तक लिहून घेतले आहे. राज्य
सरकारच्या ’लोकराज्य’
या मासिकाच्या वाचन विशेषांकात
आवर्जून प्रबोधनकारांवर लेख समाविष्ट करण्यात आला होता. मनसेने प्रबोधनकारांच्या
नावाने बोरिवलीत ग्रंथालयाचं काम सुरू केलंय.