Saturday, 3 September 2011

बाप्पा बदलले, आपण कधी बदलणार?


आठवड्याचा कॉलम गणपतीबाप्पावर लिहायचं हे नक्कीच होतं. कारण आसपासच्या वातावरणाला टाळून काही लिहावं असं मला नाही वाटत. गणपती हा आदर्श नेत्याचं प्रतीक कसा आहे, हे लोकपालच्या पार्श्वभूमीवर लिहायला बसलो होतो. पण लिहिता लिहिता भलतच लिहिलं. सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी थोडा सामाजिक अंगाने मांडणी करायचा प्रयत्न केलाय. पण तो तोकडा आहे. कारण ती फक्त वरवरची निरीक्षणं आहेत. त्याहीपेक्षा अधिक अभ्यासाने याकडे पाहायला हवंय. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या ऋषितुल्य विद्वानाने देवतांमधले बदल कसे घडले हे सर्वसामान्य मराठी माणसाला समजावून सांगितलं. ते इतिहासात जसं शोधता येतं. तसं काही वर्तमानात शोध करता येऊ शकेल का, या अंगाने हा प्रयत्न झालाय. मला वाटतं बाप्पा बदलताहेत. पण त्याचे भक्त आपण बदलतोय का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.


नवशक्तित आजच छापून आलेला लेख कटपेस्ट केलाय.

हा आठवडा मस्तच आहे. फूल सेलिब्रेशनचा. गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच रमजानचा महिना सुरू होता. चांद दिसला आणि सगळ्यात मोठ्या ईदची इफ्तारीही उत्साहात साजरी झाली. सर्वशक्तिमान ईश्वराला धन्यवाद देण्याचा हा दिवस जगभर साजरा होतो. रमजान बरोबरच जैनांचं पर्यूषण पर्वही साजरं होतं होतं. तिथेही उपवास हाच साधनेचा मार्ग. फक्त पर्वाचा शेवट होतो तो धन्यवादासोबत माफी मागण्याने. मिच्छामि दुक्कडम म्हणजे जाणता अजाणता कधी काही चुका झाल्या असतील, कुणाला दुखावलं असेल तर त्याविषयी माफी मागण्याचं हा दिवस असतो.

थँक्स आणि सॉरी म्हणताना आज आपण इतके सरावलोय की अनेकदा तो उपचार बनतो. या शब्दांमागे भावनांचा ओलावाच नसतो. त्यामुळे यातल्या कृतज्ञतेला किंवा पश्चात्तापाचा अनुभव आपल्याला मिळतच नाही. अशावेळेस मग रमजान किंवा पर्यूषण यांच्यासारखे उत्सव आपल्याला आठवण करून देतात की ही फक्त औपचारिकता नाही. थँक्स आणि सॉरी म्हणण्यातच माणूसपण आहे. ते जाणीवपूर्वक केलं तर आपण अधिक चांगले माणूस बनू शकतो.

प्रत्येक सण असंच काहीतरी सांगत असतो. आपण आता साजरे करत असलेल्या गणपतीबाप्पाकडे असंच सांगण्यासारखं बरंच काही आहे. खरं तर सोवळ्या ओवळ्यातली कडक देवता असलेला गणपती कधीच माय फ्रेण्ड गणेशा बनलाय. माझा आवडता देव म्हटल्यावर शाळेतल्या मुलांपासून सेलिब्रेटींपर्यंत सगळेच गणपतीचं नाव घेतात. इतर देवांकडे पोहोचण्यासाठी देवळांमधे जावं लागतं. इथे बाप्पा आपला पाहुणा बनून आपल्या घरी येतात. आपल्या गल्लीत येतात. आपल्यासारखे बनून राहतात. मग तो कुणाचा आवडता होणार नाही?

आस्तिक असेल अथवा नास्तिक, गणपती बाप्पांच्या जादूपासून दूर राहणं इथे कोणालाच शक्य झालेलं नाही. त्याचं मुळातलं चित्रविचित्र, वक्रतुंड, अक्राळविक्राळ रूप आपल्याला कधीचच गोंडस वाटू लागलंय. देवताशास्त्राचे अभ्यासक सांगतातही की बाप्पा मूळचा विघ्नकर्ता, पण तो आता विघ्नहर्ता बनलाय. तो आपल्या जगण्याच्या प्रत्येक ठिकाणी तो घुसलाय. घराच्या उंबरठ्यापासून कम्प्युटरच्या वॉलपेपरांपर्यंत त्याचा सर्वत्र सहज विहार असतो. गणपती आला नि नाचून गेला म्हणत तो कोकणातल्या दशावतारात घुसतो. तर त्याला पुजल्याशिवाय नाटक सोडा तमाशाही सुरू होत नाही. हे सगळं कमी म्हणून चंद्रपूर गडचिरोलीच्या झाडीपट्टीत तो आजूबाजूच्या परिस्थितीचं विडंबन करण्यासाठी मस्क-या किंवा अख्खरपोख्या गणपती बनूनही येतो. जळी स्थळी काष्ठी पाषाणी तो सगळ्यांच्या पार पोहोचलाय.

टिळकांनी माजवलेलं स्तोम म्हणून प्रबोधनकार ठाकरेंनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा विरोध केला होता. ब्राम्हणांचा देव किंवा पेशव्यांचा देव म्हणून सत्यशोधकांनी त्यावर टीका केली. त्यात सोवळ्या आवळ्याच्या नावाखाली केल्या जाणा-या अपमानाची चीड होती. सार्वजनिक गणेशोत्सवात त्याकाळी असलेला एकाच जातीचा पगडा होता. अन्य जातीच्या लोकांना ना मंडळांमधल्या पदाधिका-यांमधे जागा असायची ना सांस्कृतिक कार्यक्रमांत. त्याविरुद्ध जवळपास अर्ध शतक ब्राम्हणेतर आंदोलनाने लढा दिला. त्यातल्या अनेक चळवळ्यांनी आपापल्या घरातले परंपरागत गणपती बंड करून बंद पाडले. या चळवळ्यांचं नाव कधी सत्यशोधक होतं, कधी ब्राम्हणेतर, कधी आर्यसमाजी, कधी कम्युनिस्ट, कधी आंबेडकरवादी. प्रबोधनकारांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा पर्याय उपलब्ध करून दिला. पण सर्वसामान्यांनी हा लढा वेगळ्याच मार्गाने पुढे नेला. त्यांनी जनांचा प्रवाह नेऊन गणपतीचं सोवळं संपवलं. त्याला त्याच्या वडिलांसारखं म्हणजे महादेवासारखं सगळ्यांचं आणि साधंसुधं बनवलं. त्यावरचा ब्राम्हणी कर्मकांडांचा पगडा काढून टाकला. गणपती रस्त्यावरच्या साध्या कार्यकर्त्याची सुखदुःख वाटणारी देवता बनला. हा बदल इतका जबरदस्त होता की गणेशोत्सवाला विरोध कऱणा-या प्रबोधनकारांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी याच गणेशोत्सवाचा वापर करून घेतला.

हे सगळं स्थित्यंतर महाराष्ट्रात अजूनही घडताना दिसत आहे. कासे पठारावरची फ्लॉवर वॅली किंवा माळशेज घाटासारखं एखाद्या पर्यटन स्थळाला आधी फक्त निवडक निसर्गप्रेमी किंवा साहसी ट्रेकर जात असतात. ते मग या ठिकाणांचा प्रसार करतात. त्यावर लेख लिहितात. जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवतात. मग तिथे हजारो लोक जाऊ लागतात. तिथल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतात. आनंदी होतात. त्यामुळे त्या ठिकाणाचं विशेष महत्त्व संपत जातं. त्याचा प्रवास खासपासून आमपर्यंत होत जातो. मग तेच जुने निसर्गप्रेमी आणि ट्रेकरमंडळी बोंबा मारायला सुरुवात करतात. तिथल्या सौंदर्याचा सन्मान होत नाही, धुडगूस घातला जातो, वारशाचं नुकसान होतंय असा गळा काढू लागतात. गणपतीचं तसंच काहीसं होतंय. मूठभरांचं असलेलं हे दैवत लोकमान्यांमुळे सर्वसामान्यांचं झालं. हा उत्सव क्रांतीचा वाहक बनला. पण त्यावरचा मूठभरांचं नियंत्रण संपल्यावर उत्सवाचं पावित्र्य संपल्याची बोंबाबोंब सुरू झाली.

जिथे गीतरामायण ऐकू यायचं, तिथे नवीन पोपट वाजणं हा सांस्कृतिक धक्काच होता. पण गणपतीच्या मंडपांमधे मालवून टाक दीप असेल किंवा रुपेरी वाळूत माडाच्या बनात वाजत नव्हतं का? या गाण्यांमधे तसंच शास्त्रीय रागदारीतल्या अनेक चीजांमधल्या अर्थांमधे आणि बिलान्शी नागिन निघाली यात काय फरक होता? वेगळे संस्कार असणा-यांची एकच भावना व्यक्त करण्याचे ते निरनिराळे प्रकार होते एवढंच. तरीही त्यातलं काही सुसंस्कृत ठरलं, काही असंस्कृत. मंडपांमधे आता देवाची गाणी लागत नव्हती असं नाही पण ती प्रल्हाद शिंदेंची भक्तिगीतं होती किंवा डबल बारीची भजनं. सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर गणपतीची गाणी होऊ नयेत यासाठी मोहीम राबवली गेली. ती यशस्वीही झाली. पण सिनेमाच्या चालींचा विटाळ कशासाठी? त्यात काय वाईट आहे? देहविक्रयाचा धंदा व्हायच्या त्या कोठ्यांचीच परंपरा असलेल्या अनेक निमशास्त्रीय गायनप्रकारांच्या चाली भक्तिगीतांना लावण्यात आल्या नाहीत का? काय सुसंस्कृत आणि कोणतं असंस्कृत, हे ठरवायचं कोणी?

गणपतीच्या वर्गणीच्या जबरदस्तीवर टीका होते. ती व्हायलाच हवी. पण अगदी लोकमान्य टिळक असतानापासून यावर टीका होतेय. तेव्हाच्या कार्यकर्त्यांनाही फंडाचे गुंड म्हणत अग्रलेख लिहिले जातच होते. आणि तेव्हाच्या कार्यकर्त्यांच्या सांस्कृतिक दंडेली तर आताच्या दादागिरीपेक्षाही कितीतरी पटींनी धोकादायक होती. लोकमान्यांच्याच गायकवाड वाड्यात श्रीधरपंत आणि रामभाऊ टिळक या लोकमान्यपुत्रांनीच अस्पृश्यांचा मेळा गाणी गाण्यास आणला. तेव्हा तिथल्या धुरिणांनी लोकमान्यांचा गणपती पिंजरा लावून कडीकुलपांत बंद केला होता, हेदेखील इतिहासात नमूद आहे. हा इतिहास फारसा जुना नाही. आणि सांस्कृतिक दडपशाहीचं हे एकच उदाहरण पुरेसं बोलकंही आहे. कोणत्याही चळवळीत इतकं मोठं स्थित्यंतर होत असताना असे संघर्ष होतच राहणार. जुन्यातलं काही टिकणार, नव्यातलं काही येणार. त्यावर टीका करत राहायचं की व्यापक दृष्टिकोनातून त्याकडे बघायचं हे आपण ठरवायला पाहिजे.

गणेशोत्सवात हे स्थित्यंतर घडलं. आणि आजही घडतंय. आता तर देशभरातले सर्वभाषक लोक गणपती साजरा करतात. त्यामुळे नवे बदल नव्याने घडत आहेत. त्यावरचा मराठी माणसाचा पगडाही कदाचित उद्या संपू शकेल. बनवण्यास कठीण असलेला उकडीचा मोदक उद्या नऊवारी आणि नथीसारखा विरळा बनला तर आश्चर्य वाटायला नको? ‘सुखकर्ता दुखहर्ताची जागा जय गणेश देवा ने घेण्यास तर हळूहळू सुरुवातही झालीय. आपल्या बाप्पाला अमराठी टीवी चॅनलांनी कधीच बप्पा बनवून टाकलाय. पुजेतल्या भटजीबुवांची कमतरता लेक्षात घेता ऑडियो आणि विडियो सीडी त्यांची जागा घेताहेत. महिला पुरोहित तर आहेतच. पण उद्या सर्व जातींत गणपती बसवणारे पुरोहित निर्माणही होऊ शकतील. तसे काही प्रयत्न ही सुरू झालेत. पूजाविधीत तर कितीतरी बदल झालेत. प्रत्येकाने आपापल्या परंपरेनुसार ती बदलवली आहे. आपल्या बाप्पाला त्याचा खेद ना खंत. तो तर त्याच्यापलीकडचा भाव बघत असतो.

पण आपण बाप्पाकडे कसं बघतो हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. कारण बाप्पाकडून घेण्यासारखं खूप काही आहे. पार्वतीची आंघोळ सुरू होती. तिने आपल्या मळापासून गणपती बनवला. त्याने महादेव शंकराला विरोध केला. त्यांनी गणपतीचं डोकं उडवलं. त्याजागी हत्तीचं डोकं लावलं. अशी पौराणिक कथा आपल्याला माहितीच आहे. पण या नुसत्या कथाच आहेत. त्यामागचा अर्थ समजून घ्यायला हवा. कारण डोकं ठिकाणावर ठेवून ही गोष्ट वाचली तर पटत नाहीच. मळापासून एवढा मोठा गणपती बनवला तर पार्वतीमातेने किती दिवस आंघोळ केली नव्हती? इथपासून महादेवांनी बाप्पाचे ओरिजिनल डोकंच का नाही चिटकवलं? इथपर्यंत. म्हणून अशा कथांकडे फारसं लक्ष द्यायचं कारण नाही. बाप्पा या कथेच्या पलीकडे आहे. कारण बाप्पाचं रूप अनेक प्रतीकांचा समुदाय आहे. ती प्रतीकं आजच्या मॅनेजमेण्ट आणि कॉपोर्रेटच्या जमान्यातही तितकीच रिलेव्हण्ट आहेत. विशेषत: लीडरशिपच्या  नेतृत्वाच्या संदर्भात.

गणपती म्हणजे लोकनेता. गण म्हणजे लोकांचा समूह. पती म्हणजे नेता. आज आपण लोकपालची चर्चा करत असताना आणि आधुनिक अर्थपूर्ण लोकशाहीसाठी लढा सुरू असताना बाप्पामधला लीडरशिपचा आदर्श डोळ्यासमोर आणायला हवा. त्यामुळे मास लीडरला किंवा साध्या ऑफिसातल्या टीम लीडरही बाप्पाकडून प्रेरणा घेऊ शकतो. त्याचं रूप आपल्याला चांगला लीडर बनण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात ते सांगत असतं. थोडक्यात नेतृत्वगुण समजून घ्यायचे असतील तर दर्शन करताना बाप्पाकडे नुसतं निरखूनही पाहिलं तरी पुरे.

3 comments:

  1. मुकेश माचकर3 September 2011 at 16:16

    मित्रा, इतक्या सगळ्या वाईट गोष्टी सांगून, त्या असतातच किंवा आधी होत्याच म्हणून मान्य करायच्या आणि नंतर एवढा डोंगर पोखरून लीडरशिपचा उंदीर काढायचा, हा खेळ काही पटला नाही बाबा. आणि हा अभिजनांनी हायजॅक केलेला मूळ अनार्य देव. प्रबोधनकार जास्त बरोबर होते.

    ReplyDelete
  2. >>>>
    मळापासून एवढा मोठा गणपती बनवला तर पार्वतीमातेने किती दिवस आंघोळ केली नव्हती? इथपासून महादेवांनी बाप्पाचे ओरिजिनल डोकंच का नाही चिटकवलं? इथपर्यंत.
    >>>>
    आपल्या धर्मात अभ्यंग स्नान करतात तेव्हा आंघोळी आधी तेलाने स्नेहान करतात. मग अंगाला उटी लावतात.
    आंघोळी आधी ती उटी काढतात. ज्याला मळ असेच म्हणतात. पार्वतीने त्याचा उटीचा पुतळा बनवला. कितीदिवस आंघोळ न करायला पार्वतीमाता काय साधी मनुष्य नव्हती.

    >>>>>
    म्हणून अशा कथांकडे फारसं लक्ष द्यायचं कारण नाही. बाप्पा या कथेच्या पलीकडे आहे. कारण बाप्पाचं रूप अनेक प्रतीकांचा समुदाय आहे. ती प्रतीकं आजच्या मॅनेजमेण्ट आणि कॉपोर्रेटच्या जमान्यातही तितकीच रिलेव्हण्ट आहेत. विशेषत: लीडरशिपच्या नेतृत्वाच्या संदर्भात.
    >>>>>
    कथेकडे डोळस नजरेमधून पाहिले तर उत्तरे निश्चित मिळतात. तर्कट आणि संशयी बुद्धी वापरली कि मनुष्य confuse होतो. बाप्पा या कथेत भरून राहिला आहे. कथेपलीकडे तर तो आहेच..पण या कथा म्हणजे काही बाष्कळ गप्पा नव्हेत.

    ReplyDelete
  3. प्रश्न ब्राह्मणी कर्मकांडाचा नाही तर ब्राह्मणी विचारसरणीचा आहे. गणपती किंवा कोणत्यातरी अमानवी शक्तीला शरण गेल्याशिवाय आपले काही भले होऊ शकत नाही ह्याच विचाराला मुळात प्रबोधनकारांचा विरोध होता. मग तिथे कर्मकांड आणि भिक्षुकशाही ब्राह्मणांची असली काय आणि ब्राह्मणेतर असली काय त्याने विशेष फरक पडत नाही. म्हणूनच ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मण शंकराचार्यांना पर्याय म्हणून क्षत्रिय मराठा जगद्गुरूची स्थापना केली तेव्हा त्या गोष्टीला सुद्धा प्रबोधनकार यांनी विरोधच केला होता. हिंदू धर्मांधता हा जसा मुस्लीम धर्मांधतेला पर्याय होऊ शकत नाही तसेच ब्राह्मणेतर कर्मकांड हा ब्राह्मणी कर्मकांडाला पर्याय होऊ शकत नाही.

    ReplyDelete