आपल्या सगळ्यांची
वेबसाईट prabodhankar.com च्या
उद्घाटनाला या शनिवारी प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त एक वर्ष पूर्ण झालं. आपल्या सगळ्यांच्या
मदतीशिवाय डॉक्युमेंटेशनचं हे मोठं काम पूर्ण झालं नसतं. त्यामुळे आता एक वर्ष
पूर्ण होताना आपल्याविषयी कृतज्ञता करायला हवीय.
गेल्या वर्षभरात
आपल्या वेबसाईटला ५३ देशांमधून जवळपास अडीच लाख लोकांनी भेट दिली. त्यात साठ टक्के
लोक पहिल्या महिनाभरात आले होते. इतक्या लोकांपर्यंत प्रबोधनकारांची झलक पोहचवू
शकलो, यात खूपच आनंद आहे. गेल्या वर्षी विशेषतः हर्षल प्रधान यांच्यामुळे
प्रबोधनकारांविषयी विविध वृत्तपत्रांत छापून आले आणि टीव्हीनेदेखील त्याची सविस्तर
दखल घेतली. यातून प्रबोधनकारांची किंवा त्यांच्याविषयी पुस्तक आहे का, अशी विचारणा
आता मुंबई आणि पुण्यातील पुस्तकांच्या दुकानात नव्याने होऊ लागली आहे. ‘गांधर्ववेद प्रकाशना’ने महाराष्ट्र निर्मितीच्या
सुवर्णमहोत्सवानिमित्त अरूण टिकेकर यांच्या संपादकत्वाखाली महाराष्ट्राचे निर्माते
अशी पुस्तकांची सिरीज काढायची घोषणा केली होती. तेव्हा त्यात प्रबोधनकारांवरील
पुस्तकाचा समावेश नव्हता. पण आपल्या वेबसाईटच्या उद्घाटनानंतर त्यांनी घाईगडबडीने
महावीर मुळे (काकडवाडी, सांगली) यांच्याकडून पुस्तक लिहून घेतले आहे. राज्य
सरकारच्या ’लोकराज्य’
या मासिकाच्या वाचन विशेषांकात
आवर्जून प्रबोधनकारांवर लेख समाविष्ट करण्यात आला होता. मनसेने प्रबोधनकारांच्या
नावाने बोरिवलीत ग्रंथालयाचं काम सुरू केलंय.
संधी मिळेल
तेव्हा मीदेखील सातत्याने प्रबोधनकारांवर लिहित आलो. विशेषतः ‘या मारुतीचे बाप प्रबोधनकार’ आणि ‘बाबासाहेब आणि प्रबोधनकार’ या ‘नवशक्ती’तील लेखांची चांगली चर्चा झाली. मला विविध ठिकाणी
व्याख्यानांसाठी बोलावले जाते. त्या प्रत्येक ठिकाणी विषयाशी संबंधित
प्रबोधनकारांचे विचार मांडण्याचा यशाशक्ती प्रयत्न केला. डोंबिवलीत तर फक्त प्रबोधनकार
याच विषयावर माझी भाषण झालं. या सगळ्यातून प्रबोधनकारांचं आकलन होण्याच्या
दृष्टीने मला मदत झाली, असं मला वाटतं. पत्रकार अनंत गुरव यांनी ‘प्रबोधनची पत्रकारिता‘ या विषयावर पुणे विद्यापीठातून डॉक्टरेटसाठी
संशोधन करत आहेत. त्यासाठी त्यांनी वेबसाईटची मदत झाली. प्रबोधनकारांविषयी माहिती
मिळवण्यासाठी मला सातत्याने फोन आणि मेल सुरू असतात.
यावर्षीही
प्रबोधनकारांच्या जयंतीच्या दिवशी कार्यक्रम करावा अशी इच्छा होती. पुण्याचे डॉ.
सदानंद मोरे, औरंगाबादचे डॉ. ब्रम्हानंद देशपांडे या मान्यवर वक्त्यांशी बोलणेही
झाले. पण कामांच्या तसेच तब्येतीच्या अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. तसेच या
वर्षभरात वेबसाईटवर अपेक्षित असलेले अपडलोड्स करण्यात मी अपयशी ठरलो. त्यामुळे
दाखवण्याजोगे कामही माझ्याकडे नव्हते. हेदेखील कार्यक्रम न घेण्याचे एक महत्त्वाचे
कारण आहे.
या दिरंगाईसाठी
मी वेबसाईटशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची माफी मागायला हवी, असंही मला
प्रामाणिकपणे वाटते. मात्र सगळा आळस आणि इतर कामांचा पसारा झटकून मी आता पुन्हा
कामाला लागलो आहे. काम करावे तितके कमीच आहे. पण लवकरात लवकर म्हणजे
प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीपर्यंत, २१ नोव्हेंबरपर्यंत यातले महत्त्वाचे सगळे
अपडेट पूर्ण करून वेबसाईटमधे कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी मी शक्य तितके
प्रयत्न करेन, अशी खात्री देतो. त्यानंतर पुढे त्यातली इंटरऍक्टिविटी वाढवणं, सोशल
नेटवर्किंगच्या माध्यमातून साईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ईबूकच्या
स्वरूपात प्रबोधनकारांचं साहित्य उपलब्ध करून देणं ही नजीकची टार्गेट आहेत.
परवा १७
सप्टेंबरला प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त मी माझ्या नवशक्तितल्या कॉलमात एक
लिहिला होता, ‘महिलांच्या
प्रगतीसाठी झटणारे प्रबोधनकार’. हे त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं असलं तरी दुर्लक्षित आहे. मूळ लेख
जशाच्या तसा कटपेस्ट.
जळगावहून प्रसिद्ध होणारं ‘बातमीदार’ हे साप्ताहिक ब्राह्णणेतर आंदोलनातलं एक महत्त्वाचं
नियतकालिक. पण आडगावातलं असल्यामुळे याचं योगदान दुर्लक्षित राहिलं. संपादक
नेहतेंच्या प्रेमापोटी प्रबोधनकार ठाकरे १९४०-५० च्या दशकात जवळपास नऊ वर्षं यात लिहित
होते. यात प्रबोधनकारांचं एक सदरही चालत असे. ‘वाचकांचे पार्लमेंट’. त्यात वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रबोधनकारांची त्याला
दिलेली खुसखुशीत उत्तरं, अशी ही मेजवानी असायची. त्यातले काही लेख आज उपलब्ध आहेत.
‘वेश्यांनी राष्ट्रगीत म्हणणं हा राष्ट्राचा अपमान नाही का’, असा प्रश्न एका वाचकाने या सदरात प्रबोधनकारांना विचारलाय.
त्यावर त्यांनी उत्तरादाखल प्रश्नच विचारले आहेत. ‘वेश्या भारताच्या नागरिक नाहीत का? आणि असा प्रश्न विचारणं, हा त्यांचा अपमान नाही का? ’ प्रबोधनकारांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन किती उदार होता, याचं
हे उदाहरण.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी
आपल्या नव्वद वर्षांच्या दीर्घ आयुष्यात महाराष्ट्रभर विचारांची पेरणी केली.
पत्रकार, लेखक, संपादक, वक्ते, नाटककार म्हणून त्यांचं कर्तृत्व महाराष्ट्राच्या
वैचारिक जडघडणीत खूपच मोलाचं आहे. प्रबोधनकारांच्या वैचारिक मांडणीत समाजसुधारणा
आणि धर्मसुधारणा यावर भर होताच. पण स्त्रियांनी दास्याची मानसिकता भिरकावून द्यावी
यासाठी असा दृष्टिकोन त्यांनी सातत्याने मांडला. सत्यशोधक चळवळीचा झेंडा अभिमानाने
खांद्यावर घेत जोतिबा आणि सावित्रीबाईंचा हा वारसाही सशक्तपणे चालवला.
या सगळ्याची मूळं प्रबोधनकारांच्या
बालपणात दिसून येतात. प्रबोधनकारांवर प्रभाव होता तो त्यांची आजी बय आणि आई ताई
यांचा. दोघीही जात, धर्म, प्रथा, चालीरिती याविषयी खूपच आधुनिक दृष्टिकोन
असलेल्या. एकदा शाळेतून येताना एका दलिताची सावली छोट्या केशवच्या अंगावर पडली.
तेव्हा ब्राम्हण शाळासोबत्यांनी ठाकरे विटाळला म्हणून हाकाटी केली. तेव्हा बयने
एका ब्राम्हण मुलाला केशवच्या शेजारी उभं केलं. महाराची सावली पडली म्हणून दादा
महार होतो, त्यामुळे आता ब्राह्मणाची सावली पडून तो ब्राह्मण झाला, असं सांगून
मुलांना पिटाळून लावलं. गावातल्या महार सुभेदाराकडे जाऊन चहा पिणा-या शाळकरी
प्रबोधनकारांविषयी ‘ठाक-याचं पोर बिघडलं’ अशी गावात नाराजी होती. ती तक्रार घेऊन घरी आलेल्या प्रतिष्ठित गावक-यांना
बयने असंच उडवून लावलं, ‘माणसानं माणसाच्या घरी
चहा पिण्याने कसा धर्म बुडतो? तुमच्या दारू
ढोसण्यापेक्षा चहा पिण्यात कसलं आलंय पाप? ’
बयने जाती धर्माच्या पलीकडे जाऊन
बाळंतिणींना सोडवण्याचं काम जीवनव्रत म्हणून सांभाळलं. त्याचमुळे बयच्या मुंबईत
झालेल्या अंतिमयात्रेत फक्त अठरापगड हिंदूच नाहीत तर मुस्लिम आणि ख्रिश्चनही खांदा
देण्यासाठी धावपळ करत होते. प्रबोधनकार आपल्या सगळ्या कामाचं श्रेय आईच्या कडक
शिस्तीला आणि संस्कारांना देतात. दिवाळीच्या दिवसात बलिप्रतिपदेच्या दिवशी इडा
पीडा टळो, बळीचं राज्य येवो म्हणत येणा-या दलित स्त्रियांना ठाकरेंच्या घरात
पाटावर बसवून ओवाळून दान दिलं जात असे. शंभरहून अधिक वर्षांपू्र्वी हे निव्वळ
क्रांतिकारकच होतं. प्रबोधनकारांच्या वडिलांना ७५ रुपयांची लॉटरी लागली होती. ही
रक्कम त्या काळात आणि हलाखीची स्थिती असताना खूप मोठी होती. पण कमवायचं तर मेहनत
करून आणि बुद्धी चालवून, असं सांगत लॉटरीचे म्हणजे हरामाचे पैसे आईने घरात आणू
दिले नव्हते. या तत्त्वनिष्ठ ठाकरेंच्या पुण्याईवर आज पदं येताच गलेलठ्ठ कमाई
करणा-या पुढा-यांनी या थोर मातोश्रीची आठवण ठेवायला हवीय.
भाषणशैली आकर्षक कशी असावी आणि माणसं
कशी जाडायची हे आपण बयकडूनच शिकल्याचं प्रबोधनकारांनी लिहून ठेवलेलं आहे. आजवरच्या
सगळ्या ठाकरेंची ताकद याच दोन गोष्टी आहेत, हे नमूद करायला हव. आईमुळेच
प्रबोधनकारांना वाचनाचा नाद लागला. अभ्यासाची आणि वृत्तपत्रांची गोडी लागली.
प्रबोधनकारांनी ‘आई’ नावाची पुस्तिका लिहून या ऋणातून मुक्त होण्याचा
प्रयत्न केलाय. आजही शिवसेनाप्रमुखांच्या देव्हा-यात आई, आजी आणि पणजीच्या प्रतिमा
आहेत.
प्रबोधनकारांना परिसरातल्या
बालविधवांचं दुःख पाहून चीड येत असे. एकदा एका जरठ बाला विवाहात पंगतीत जेवत
असताना दहा बारा वर्षांच्या केशवला श्लोक म्हणण्याचा आग्रह झाला. तेव्हा त्यांनी ‘म्हातारा इतुका न
पाऊणशे वयमान’ हे पद म्हणून सगळा मंडप हादरवला. त्यांची
त्यांच्याच वयाची म्हणजे दहा बारा वर्षांची मैत्रीण मंजू फणसे हीचं पासष्ट
वर्षांच्या म्हाता-याबरोबर लग्न ठरलं. तेव्हा त्यांनी सगळ मंडपच पेटवून दिलं होतं.
स्वतःच्या लग्नात देखील लग्न गरीब घरच्या मुलीशीच करायचा त्यांचा आग्रह होता.
शिवाय मुली पाहण्याच्या पद्धतीलाही त्यांचा विरोध होता. या सगळ्या विषयांवर ते
सातत्याने खूप लिहित आणि व्याख्यानं देत राहिले. त्यांनी लिहिलेलं पंडिता
रमाबाईंचं चरित्र महत्त्वाचं आहे. प्रबोधनकार हिंदू धर्माचे अभिमानी तरीही त्यांनी
ख्रिस्ती धर्म स्वीकारणा-या रमाबाईंचं चरित्र स्त्रियांना आदर्श म्हणून वाचकांसमोर
मांडलं. त्यांच्या नाटकांमधली स्त्री पात्रही लख्खपणे समोर येत. मग त्यात ‘संगीत सीताशुद्धी’तली सीता असो किंवा ‘खरा ब्राम्हण’मधली विठू महाराची सीता नावाची सून. आश्चर्य वाटेल ‘प्रबोधन’मधे कुटुंबनियोजनाची
सविस्तर माहिती देणारे लेखही छापण्यात आले होते.
प्रबोधनकारांनी शक्य होईल तिथे
महिलांमधल्या कर्तृत्वाला व्यासपीठ दिलं. त्यांच्या प्रसिद्ध नवरात्रौत्सवातही
त्यांनी महिलांचे कार्यक्रम मुद्दामून आयोजित केलं. त्यात दलित महिलांसोबतचं
हळदीकुंकू होतं आणि भाजीविकणा-या अशिक्षित महिलेचं प्रवचनही. त्यांनी स्थापन
केलेल्या हुंडा विध्वंसक मंडळाचं कामही खूप महत्त्वाचं आहे. १९२०च्या दशकात हे
मंडळ हुंड्याची खबर मिळताच नोटीस पाठवत असे. हुंडा परत करा नाहीतर परिणामांना तयार
राहा. मग न ऐकणा-यांच्या वरातींमधे गाढवाची बँडबाजासह मिरवणूक निघे. गाढवावर इतके
रुपये हुंडा घेणारा हुंडेबाज गधडा असं लिहिलेलं असे. याचा धसका तेव्हा
हुंडाबाजांनी घेतला होता.
प्रबोधनकारांनी गोवा आणि तळकोकणातल्या
भाविणींचा प्रश्न सोडवण्यात दिलेलं योगदान फारसं कुणाला माहीत नाही. या समाजाला
मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणा-या मराठा गायन समाजाच्या पहिल्या
अधिवेशनाचे अध्यक्ष तेच होते. भाविणींना देवाला वाहण्याच्या नावाखाली
वेश्याव्यवसायात आणणारा शेसविधी कायद्याने बंद पाडावा, अशी मागणी करणारं पहिलं
निवेदनही त्यांच्याच नेतृत्वात गोव्याच्या गवर्नरला देण्यात आलं होतं. प्रबोधननेही
हा प्रश्न लावून धरला. या चळवळीला मोठे यशही मिळाले.
अखेरपर्यंत ते या प्रश्नाशी कटिबद्ध
होते. त्याच्या मृत्यूच्या दोन महिने आधी आत्मचरित्र प्रकाशन समारंभातील शेवटच्या
भाषणातही त्यांनी आपल्या जीवनभरातल्या चळवळींनंतर सर्वात समाधान देणारी गोष्ट
म्हणजे महिलांची सुधारलेली स्थिती असल्याचं आवर्जून सांगितलं आहे. शिवसेनेच्या स्थापनेच्या
सोहळ्यात म्हणजे पहिल्या दसरा मेळाव्यातील भाषणातही त्यांचा स्त्रियांविषयीचा आदर
ठायी ठायी दिसतो. ते आपल्या खास ठाकरी शैलीत सांगतात, ‘महिलांच्याबद्दल
जितका आदर तुम्ही आपल्या अंत:करणामध्ये साठवित जाल, वाढवित
जाल, तितका तो शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होईल!... मी
वर्तमानपत्रात वाचतो, आमच्या पोरीची टिंगल केली गेली. जातिवंत मराठा तिथे एकटा जरी
असला, तरी त्याने जीव त्या पोरीच्या रक्षणासाठी दिला पाहीजे.
धावून मेला पाहिजे... बसमध्ये जाताना एखाद्या महिलेला कुणी धक्का मारला, तर एक फाऽडकन वाजली पाहीजे. इतकी जेव्हा जरब तुम्ही निर्माण कराल, त्याचवेळेला रस्त्यातून, चाळीतून-बिल्डिंगमधून
होणारे गैरप्रकार थांबतील.’ शिवसेना कशासाठी
स्थापन करण्यात आली, हा हेतू प्रबोधनकारांनी या भाषणात सांगितला आहे. आजचे
शिवसैनिक याची दखल घेणार आहेत का ?
प्रबोधनकार फक्त लिहित होते, भाषणं
करत होते किंवा संस्था संघटना बांधत होते, असं नव्हते. तर तेव्हाच्या इंदूर ते
कारवार या महाराष्ट्रात पायाला चक्र बांधून धावत होते. त्यातून त्यांनी अनेक उदार
विचारांचे कार्यकर्ते उभे केले. त्यांच्या घराघरात नवे विचार पेरले. त्यात असंच एक
घऱ होतं, भुसावळ-जळगावच्या दिवाणबहादूर डोंगरसिंग पाटलांचं. त्यांच्या आणि त्यांचे
भाऊ नारायणराव यांच्या घरात प्रबोधनकारांचं नेहमीचं येणंजाणं. प्रबोधनपासून
बातमीदारपर्यंत त्यांचे विचार नेहमी या घरात लिखितही पोहोचत. डोंगरसिंगांचे
निवडणुकांचे जाहिरनामे प्रबोधनकारांनी लिहायचे तर खरा ब्राम्हण सारख्या नाटकांना
सनातन्यांनी विरोध केला की डोंगरसिंगांनी धावून जायचं, असे हे संबंध. पण हे घर
राजपूतांचं. या समाजात पडदा पद्धत. मुलींच्या शिक्षणाची गोष्ट दूरच. पण
प्रबोधनकाराच्या प्रभावात असलेल्या या घरात डोंगरसिंगांची पुतणी मात्र खूप शिकली.
लहानपणापासून पाटलांची बेबी प्रबोधनकारांच्या स्वतंत्र बाण्याच्या विचारांत मोठी
झाली. खूप शिकली, वकील बनली. राजकारणातही गेली. आमदार, खासदार, मंत्री, राज्यपाल
बनत देशाच्या राजकीय व्यवस्थेतील सगळ्यात मोठ्या पदावर पोहोचली. त्यांचं नाव आहे,
आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील.
No comments:
Post a Comment