अचानक ठरवलं आणि परवा चौदा तारखेला
अमरावती एक्स्प्रेस पकडली. पंधराला सकाळी अमरावतीला पोहोचलो. अमरावती, मला आवडलेलं
खूप छान शहर. निमित्त होतं चंदूभाऊंचा, चंद्रकांत वानखडेंचा एकसष्टीनिमित्त सत्कार.
शहरातला सगळ्यात मोठा हॉल तुडुंब भरला होता. अख्ख्या विदर्भातून साधे साधे लोक आले
होते. त्यात कार्यकर्तेच खूप. सगळ्या पक्षांचे, वेगवेगळ्या संघटनांचे. दिवाकर
रावते आणि अनंत दीक्षित यांची भाषण सोडून कार्यक्रम अप्रतिम झाला. मायाताई, अमर
हबीब, बच्चू कडू आणि चंदूभाऊ अशा सगळ्यांनीच छान भाषणं झाली. जीव लावण्याचाच तो
सोहळा होता. समृद्ध करणारा दिवस होता तो.
उद्धव ठाकरे येणार होते. ते येऊ शकले
नाहीत. कारण माहीत नाही. पण बरं झालं ते आले नाहीत ते. नाहीतर तुडूंब गर्दीचं
श्रेय त्यांना गेलं असतं. चंदूभाऊंसाठी अबालवृद्धांची गर्दी हेवा करणारी होती. आज
त्यांच्याकडे रुढार्थाने कोणतंही प्रतिष्ठेचं पद नाही. तरीही लोक आले. लोहचुंबकाने
आकर्षून घ्यावं, तशी लोकांची रीघ होती. चंदूभाऊंच्या कृतार्थ आयुष्याची ती पावती
होती. एका भणंग कार्यकर्त्यासाठी आणि ध्येयनिष्ठ पत्रकाराला आणखी पाहिजे तरी काय?