आज लक्ष्मीपूजन. दिवाळीतला हा दिवस मला लहानपणापासून रिकामा
रिकामा वाटत राहिला. म्हणजे नरकचतुर्दशीला कारटं फोडणं. पहिली आंघोळ. पाडव्याला
साल मुबारक. भाऊबीजेला ओवाळणं ओवाळणी. पण लक्ष्मीपूजनाला आमच्या घरात काही घडत
नसायचं. घरात लश्र्मीची पूजा झालेली मला तरी आठवत नाही. कदाचित घरात पुजण्याइतकी
लक्ष्मी नसल्यामुळे असेलही कदाचित. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या काही आठवणी
माझ्याकडे तरी नाहीत.
आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला भलतीच गोष्ट आठवली. एक जाहिरात.
आयएनजी लाईफ इन्शुरन्सची. 'पैसा सिर्फ पैसा नही हैं.' या जाहिरातीशी माझ्या एका
कॉलमाच्या आठवणीही जोडलेल्या आहेत. मुंबई टाइम्समधे मीच माझा एक कॉलम सुरू केला
होता. 'अॅड्यात्म' नावाचा. नव्या पानांमधे काहीतरी मोटिवेशनल मजकूर हवा होता. म्हटलं
आपणच लिहूया. ही कल्पना बरेच दिवस डोक्यात होती. सारंग दर्शने फार पूर्वी काही
दिवस मुंटामधेच काही दिवस ताओ ताऊ या टोपणनावाने छोटे छोटे तुकडे लिहायचे. ते
डोक्यात होतं. पण हे स्पिकिंग ट्री पेक्षाही वेगळं हवं होतं. अॅड्यात्मला पर्याय
नव्हता.
कधीतरी असाच अध्यात्म या शब्दाशी अध्यातमध्यात... अर्ध्यात्म... असं
मनातल्या मनात खेळता खेळता अॅड्यात्म या शब्दापर्यंत आलो. नवा शब्द भेटला. मजाच
आली. नागडं होऊन युरेका युरेका म्हणत नाचणंच बाकी होतं. टीव्हीवरच्या जाहिरातींनी
आजवर आपल्याला खूप काही दिलंय. नवे विचार. वेगळ्या मांडण्या. बरंच काही.
टीव्हीवरच्या बातम्या कार्यक्रमांपेक्षा जाहिरातीच आवडीने बघत आलोय. अशा
जाहिरातींविषयी, त्याच्या टॅगलाईन
पंचलाईनींविषयी सांगताना अध्यात्म मांडता येईल का? हे शोधायचं होतं. म्हटलं
मजा येईल. करून तर बघुया. लोकांचा रिस्पॉन्स नाही आला तर करू बंद. त्यात काय.