Thursday 29 March 2012

आपला अखिलेश कुठेय?


हा लेख लिहून तसे बरेच दिवस झाले. आता अखिलेश यादव यूपीचे सीएम बनून स्थिरस्थावर झालाही असेल. जेव्हा तो सीएम बनलाही नव्हता तेव्हा लिहिलेला हा लेख. म्हणजे नुकताच यूपीचा निकाल लागला होता. मुलायम स्वतः मुख्यमंत्री बनणार की अखिलेशला बनवणार, यावर चर्चा सुरू होत्या. लेखाचा इण्ट्रो होता, अखिलेश यादवांना अवाढव्य यूपीने खणखणीत बहुमत दिलं. पण सगळा महाराष्ट्र विश्वास ठेवू शकेल, असा एकही अखिलेश आपल्याकडे मात्र नाही. बुटकबैगणांनाच आपण दिग्गज मानत आले, त्याचा तर हा परिणाम नाही?’

लेखाला अपेक्षेपेक्षा खूप चांगला रिस्पॉन्स आला. तीनेक दिवस वाचक कुठून कुठून फोन करत होते. मजा आली. लेखातलं नेमकं काय अपिल होतंय, ते कळत नव्हतं. काहींना महाराष्ट्र आणि यूपीची तुलना आवडली असावी. कुणाला ठाकरे आणि पवारांची केलेलं मूल्यमापन आवडलं असावं. धारणांना थोडा धक्का बसला की लेख आवडतात बहुतेक. मलाही आपल्या धारणा तपासून घ्यावात असं वाटतं नेहमी. पण ते क्वचितच जमतं. यूपी, पवार, ठाकरे, मराठी माणूस या सगळ्यांच्याविषयी असलेल्या माझ्या धारणाही या निमित्ताने थोड्या साफसूफ झाल्या. लेख पुढे आहेच.


उत्तर प्रदेशाविषयी फारसं चांगलं बोलण्याची आपल्याकडे पद्धत नाही. भले इंग्रजी माध्यमाच्या हव्यासामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची अविकसित समज तिथल्या मुलांपेक्षा कमी असल्याचं केंद्र सरकारच्या अभ्यासातच स्पष्ट झालं आहे. तरीही आपला मराठी बाणा ते मान्य करणार नाही. आपल्यापेक्षा पटींनी आयएएस, आयपीएसच नाही तर आयआयटीयन्सही तिथून तयार होतात. तरीही आपण त्यांच्याविषयी चांगलं बोलणार नाही. आंदोलनं करूनही शेतक-यांच्या नावाने मळवट भरलेलं महाराष्ट्र सरकार ऊसाच्या दरासाठी कद्रूपणा करतं. अशावेळेस `गरीबउत्तर प्रदेशचं सरकार दरवर्षी ऊसाला चांगला हमीभाव घोषित करतं. तरीही आम्ही त्यांच्यापेक्षा पुढारलेले असणार. आमच्याकडे एका छोटय़ाशा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी शेकडो गावं जाळली जातात,  निराधारांचा जीव जातो,  हजारो तुरुंगात खितपत पडतात. उत्तर प्रदेशात बाबासाहेबांचं नाव दोन दोन जिल्ह्यांना दिलं जातं. त्याहीपुढे जाऊन महात्मा फुले, छत्रपती शाहू या महाराष्ट्रातल्या महापुरुषांची नावंही तिथल्या जिल्ह्यांना दिली जातात. या परिवर्तनाविषयी `जातिवादीम्हणवल्या जाणा-या उत्तर प्रदेशात एकही विपरित प्रतिक्रिया उमटत नाही. तरीही आम्हीच त्यांच्यापेक्षाही पुरोगामी ठरणार. महाराष्ट्रात आजवर कुणीही महिला मुख्यमंत्री झालेल्या नाहीत. कुणी होईल असं जवळच्या भविष्यात दिसतही नाही. दलित महिलेला मुख्यमंत्री झाल्याचा तर आपण विचारही करू शकत नाही. यूपीत पन्नास वर्षांपूर्वीच सुचेता कृपलानी मुख्यमंत्री बनल्या. मायावती तर दलित असूनही पाच वर्ष पूर्ण करणा-या एकमेव मुख्यमंत्री ठरल्या. तरीही आपण स्त्रीमुक्तीचा वारसा सांगणार. उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचं मूळ घराणं महाराष्ट्रातलं. सुचेता कृपलानी तर बंगाली, जन्म हरियाणातला आणि लग्नानंतर सिंधी तरीही उत्तर प्रदेशाने त्यांना स्वीकारलं. आपल्याकडे कुणी अन्यभाषक राज्यमंत्री झाला तरी आपल्याला ते सहन होत नाही. तरीही आपली परंपरा सर्वसमावेशक म्हणून मिरवणार.

हे सगळं आजकालचं आहे. यूपीचा इतिहास तर खूपच वैभवशाली. लाखो वर्षांचे संस्कार घेऊन गंगामाईने तिथे इतिहास घडवलेला आहे. एखाद्या प्रदेशाचा इतिहास थोर आणि दुस-याचा छोटा, असं काहीच नसतं. तरीही इतिहास फक्त महाराष्ट्रालाच, असं आपण उच्चरवानं सांगणार. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांशी पहिला लढा दिला तोही उत्तर प्रदेशानेच. या पहिल्या समराचं रणशिंग फुंकणारा मंगल पांडे भय्याच ना! राणी लक्ष्मीबाई नेवाळकरांची इतिहासप्रसिद्ध झाशी आणि श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचं बिठूर युपीतलच नाही का? रामचंद्र पांडुरंग भट उपाख्य तात्या टोपे यांनी मराठीत नाही, तर अवधी भाषेत प्रेरणादायी गाणी गात युद्धाचं अग्निकुंड पेटतं ठेवत होते. त्या संगरात उत्तर प्रदेश वीरश्रीने धगधगून उठला होता आणि पुण्याच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्र साहेबाच्या राज्याचे पवाडे गात होता. त्याचं बक्षिस इंग्रजांनी आपल्याला विकासाच्या रूपाने दिलं आणि फिरंग्यांनी यूपी-बिहारची एक कर्ती पिढी कापून तर काढली. शिवाय तिथे पुन्हा बंडाचा विचारदेखील येऊ नये यासाठी अख्खा प्रांत कायमचा भकास करून टाकला.

चार दोन टारगटांवरचा राग म्हणून एखाद्या राज्याविषयी द्वेष बाळगण्याआधी हा इतिहास समजून घ्यायला हवा. कुणी तरी आपल्या स्वार्थी राजकारणासाठी आपल्याला फसवतं आणि आपण आपल्या वर्षानुवर्षांच्या घरोब्याचा विचार न करता द्वेष करू लागतो, याचा विचार नको का करायला? नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानेही आपल्याला विचार करायला लावला आहे. एकीकडे महाराष्ट्र जातींच्या गणितात पुन्हा अडकत आहे. सगळी सत्तास्थानं बळकवलेल्या जातीही भयगंडातून संमेलनं भरवत आहेत किंवा आरक्षणं तरी मागत आहेत. अशावेळेस मागास आणि जातीने तुकडे पडलेल्या उत्तर प्रदेशासारख्या राज्यात एक पस्तिशीचा तरुण उभा राहतो. जातीच्या नाही, तर विकासाच्या गोष्टी करतो. सगळा उत्तर प्रदेश त्याच्यामागे मजबूत आघाडी देऊन एकदिलाने उभा राहतो, हे कौतुकास्पदच आहे. अखिलेश मुलायम यादव आज उत्तर प्रदेशाचा नवा नेता बनला आहे. जाळपोळ करणा-या आपल्याच पक्षातल्या गुंडांना तो दमात घेतो आहे. मायावतींचे पुतळे तोडणार नाही, पण मोकळ्या मैदानांमधे हॉस्पिटलं बांधू, असं सांगतो आहे. प्रश्न एवढाच आहे, की आपला अखिलेश कुठे आहे?

उत्तर प्रदेश अवाढव्य आहे. तो एक देश असता तर लोकसंख्येच्या बाबतीत जगातला पाचवा देश असता. उत्तराखंड वेगळा झाल्यानंतरही त्याचं अडीच लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ उरलेलंच आहे. त्यातही प्रचंड वैविध्य. एकीकडे मेरठचे जाट, तर दुसरीकडे जौनपूरचे पुरबिये, एका टोकावर काशीचे पंडित तर दुसरीकडे बुंदेलखंडचे गुज्जर, कुठे मथुरेचे व्रजवासी तर कुठे लखनौचे नवाब. जात, धर्म, भाषा, चालीरिती, जगणं, वागणं सगळंच निराळं. कुठेच एक नाहीत. तरीही सगळे अखिलेख यादवांना समर्थन देण्यास एक झाले. यूपीत हा चमत्कार होतो. मग आपल्या पुरोगामी, विकसित, पुढारलेल्या महाराष्ट्रात असा एकही नेता होत नाही, ज्याच्यावर अख्ख्या राज्याने पूर्ण विश्वास टाकावा? जुन्या पिढीतही नाही आणि नव्या पिढीत तर नाहीच नाही. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरसारखी शहरंही त्यांच्या नेत्यांवर एकहाती विश्वास ठेवत नाहीत. मग कुणी महाराष्ट्रावर एकछत्री राज्य करण्याची बातच सोडा.

इंदिरा गांधींच्या निधनानंतर 1985 साली महाराष्ट्रात काँग्रेसला विधानसभेत खणखणीत बहुमत मिळालं. त्याला आता तब्बल सत्तावीस वर्षं उलटली. त्यानंतर हे एकदाही घडलेलं नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे महानेते. पण महाराष्ट्राने एकदाही त्यांना एकहाती सत्ता दिलेली नाही. पवारांना मराठी माणसाने मनातल्या मनात कधीच पंतप्रधान बनवलं. पण ते मनाचे मांडेच ठरले. जीवतोड मेहनत करून, साम दाम दंड भेद वापरूनही महाराष्ट्रातलाच एक मोठा वर्ग पवारांना परकंच मानत राहिला. मेजॉरिटी ऑफ द मायनॉरिटी आपल्यासोबत कधीच नव्हते, असं स्वतः बाळासाहेब अनेकदा म्हणत. पण मेजॉरिटी ऑफ द मेजॉरिटी तरी त्यांच्यासोबत कधी होते? द्रमुक, अण्णाद्रमुक, तेलुगू देसम, राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, जनता दल युनायटेड, नॅशनल कॉन्फरन्स, बिजू जनता दल, तृणमूल काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष अशा कित्येक एका राज्यापुरत्या मर्यादित पक्षांना स्वबळावर सत्ता किंवा सत्तेच्या अगदी जवळ जाण्यात एकदातरी यश मिळवलंय. पण शिवसेना एकटी कधीच सत्तेच्या जवळपासही भरकटली नाही. एवढंच नाही विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष बनण्यातही त्यांना एकदाही यश मिळालं नाही.

मग अजित पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, नीतिन गडकरी, पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे या आजच्या नेत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र एकहाती जिंकण्याचा विचार करायलाच नको. सगळ्याच्या सगळ्या पक्षांनी एकहाती सत्तेसाठी प्रयत्न केलेत. पण कुणालाच ते जमलेलं नाही. महाराष्ट्रभर करिष्मा असलेलं नवं नेतृत्वच आपल्याकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्यपातळीवर महत्त्वाच्या पदांवर काम करणारे नेतेही एका जिल्ह्यापुरते किंवा शहरापुरते उरले आहेत. एखाद्या विभागावर प्रभाव असणाराही क्वचित एखाददुसरा. कुणाकडे पक्षबांधणीची क्षमता आहे, तर विचारांचा व्यापकपणा नाही. कुणाकडे लोकप्रियतेचा जलवा आहे, तर जमिनीवर मेहनत करायची तयारी नाही. सगळीच गडबड आहे. असं संकुचित आणि तोकडं नेतृत्वच आपल्याकडे का निर्माण होतं, याचा आपण विचार करणार आहोत की नाही? एकहाती सत्ता द्या, बघा कसा महाराष्ट्र घडवतो ते, अशी पोपटपंची करणं सोपं असतं. पण आधी महाराष्ट्राने स्वीकारावं असं स्वतःला घडवण्याची तयारी कुणाची आहे? ही तयारी नाही, तोवर अंधार आहे. 

आपण फक्त बुटकबैंगणांना दिग्गज म्हणत राहण्यात समाधान मानायचं. गोष्टीतल्यासारखा राजा नागडा आहे. आणि प्रजा त्याच्या पोषाखाचे गोडवे गात आहे. अनेक वर्षं आपण महाराष्ट्रात यापेक्षा काही वेगळं करतच नाही आहोत. यूपीतल्या निकालांनी हेच दाखवून दिलंय.

2 comments:

  1. Digambar marathe29 March 2012 at 17:26

    khup chhan..

    ReplyDelete
  2. hamaka ooo ka kehat hai marathi mai...............ji yaad aaya................zakkasssssssssssssssssssssssssss.... hua aapka ye jo bhi likhavat huyi hai na... hamre mann mai kono shanka nahi hai ke abhi aap bade ho gaye ho...

    ReplyDelete