Thursday, 23 February 2012

शिवाजी आमुचा बाणा


रविवारी शिवजयंतीच्या दिवशी हा लेख आमच्या नवशक्तित छापून आला. मला दिवसभर लेख आवडल्याचे एसेमेस येत होते. दुस-या दिवशी आमच्या ऑफिसात कुणा पुरोहित नावाच्या माणसाच्या फोन आला होता. तो काहितरी ब्राम्हण जातीच्यांची संघटना चालवतो म्हणे. माझा मोबाइल नंबर लेखाखाली असूनही त्याने मला फोन केला नाही. काही पत्रंही पाठवलं नाही. तो मला भेटायलाही येणार होता. पण आला मात्र नाही. त्याचं म्हणणं असं की हा लेख ब्राम्हणविरोधी आहे. तसंच संत नामदेवांवर लिहिलेला लेखही ब्राम्हणविरोधी आहे. त्या लेखाचं पेपरात छापून आलेलं हेडिंग तर 'नामा म्हणे' होतं. मला हसूच आलं. मी अस्वस्थही झालो. तुम्हीच सांगा हे लेख ब्राम्हणविरोधी आहेत का. लेख जशाच्या तशा कटपेस्ट केलाय. 


आज तारखेनुसार शिवजयंती आहे. पुढच्या महिन्यात दहा तारखेला तिथीनुसार शिवजयंती आहे. भांडणारे त्यावर भांडत राहतात. मोठमोठी लोकं आहेत ती. त्यांना भांडू द्यावं. भांडण्यामागे त्यांचीही कारणं असतीलच. त्याची योग्य आणि अयोग्य अशी चिकित्सा केली जातेही. पण आपल्यासारख्या लहानसहान माणसांनी त्यात काही पडू नये. आज आपल्या भारतीय असण्याला आणि मराठी असण्यालाही ज्यांच्यामुळे अर्थ मिळालाय त्या महान छत्रपती शिवरायांना आठवण्यासाठी आपल्याला दोन संधी मिळतात, यात आपण आनंदी असावं. पण शिवरायांची आठवण काढण्यासाठी खरंच संधी शोधायला हवी का? शिवरायांची आठवण तर उठता बसता, चालता फिरता, लिहिता वाचता यायलाच हवी.


पातंजल योगसूत्रात `वीतराग विषयं वा चित्तम्` असं एक सूत्र आहे. महापुरुषांना आपल्या चिंतनाचा विषय बनवा, असा मन घडवण्यासाठीचा एक मार्ग योगशास्त्राने  सांगितला आहे. आजकालचे योगी फक्त पोट कमी कसं कराल आणि श्वासोच्छवास कसे कराल, हे सांगत असतात. ते असं काही कशाला सांगतील? पण विचारांपासून तोडून अध्यात्म तरी कसं चालेल? या योगसूत्रानुसार जगणं समृद्ध करण्यासाठी महापुरुष शोधायचा झाला तर आज आपल्यासारख्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कोणता आदर्श आहे का?


पिढय़ानपिढय़ा इथली महाराष्ट्रातली माणसं पाठीचा ताठ कणा विसरून गेली होती. आपण माणसं आहोत याचाच विसर पडला होता. कुणीही येऊन हाकत होतं. कुणीही येऊन लुटत होतं. हताश, निराश होऊन आलेला दिवस लाचारपणे ढकलणं हेच जीवन उरलं होतं. अशावेळेस काळोखाला स्वप्न पडावं तसे शिवराय आले. त्यांनी तुमच्याआमच्यासारख्या साध्या माणसांना हात दिला. त्यांना स्वातंत्र्याचं, स्वाभिमानाचं गाणं शिकवलं. जगण्याला अर्थ मिळवून दिला. कुणी विद्वान कुठलं तरी कलिवर्ज्य प्रकरण दाखवून सांगत होता आता ब्राम्हण आणि क्षत्रिय हे दोनच वर्ण उरलेत. त्यामुळे आता आपल्यावर यवनांचंच राज्य असणार. कुठल्या तरी हेमाडपंताने चतुर्वर्ग चिंतामणीत लिहून ठेवलेली लाखो व्रतं आणि उपासतपास दाखवून हाच धर्म आहे, असा दावा स्वार्थी भूदेव करत होते. अशावेळेस वारकरी संतांच्या अभंगांतला विद्रोह जगण्यात उतरवण्याची संथा शिवरायांनी दिली. अन्यायाविरुद्ध पेटून उठणं हाच आपला धर्म, हेच आपलं कर्तव्य हे सांगत त्यांनी ख-या धर्माची कवाडं दीनदुबळ्यांसाठी उघडून दिली.


शिवरायांच्या या धर्मात जातिवर्णाचा कोणताही भेद नव्हता. अस्पृश्य म्हणून वेठबिगारी करणा-या आणि वेसकर म्हणवून वेशीबाहेर ठेवलेल्या अस्पृश्यांना त्यांनीच पहिल्यांदा ब्राम्हण, प्रभू, देशमुखांच्या खांद्याला खांदा लावून उभं केलं. त्यांना शेकडोंच्या संख्येने किल्लेदार बनवलं. कुणब्याच्या नांगरालाही त्यांनीच तलवारीची धार मिळवून दिली. आगरी, कोळ्यांना जिवाला जीव लावून लढायला त्यांनीच शिकवलं. मराठय़ांच्या पराक्रमाला त्यांनीच साद घातली. वरच्या खालच्या सगळ्या जाती भेदाभेद मिटवून स्वातंत्र्यासाठी हातात हात घालून लढू लागल्या. महाराजांनी अन्याय करणारा कोण आहे, स्वकीय की परकीय, मराठी की परप्रांतीय, ब्राम्हण की मराठा, याची पर्वा न करता त्याला उभा चिरला. स्वराज्यासाठी गरज पडली तेव्हा समुद्रबंदी आणि ब्रम्हहत्येसारखी `पातकं’ही अभिमानाने केली. कुणा याचकाने त्यांना कुठल्या पत्रात `गोब्राम्हणप्रतिपालक’ म्हटलं म्हणून कुणी हे बिरूद त्यांच्यापाठीशी कायमचं चिटकवून दिलं. कुणी त्यांना `क्षत्रियकुलवंतस’ म्हणत आपलीच पाठ थोपटून घेतली. पण ते या सगळ्याच्या पलीकडचे `कुलवाडीभूषण’ म्हणजे शेतक-यांचे राजे होते. म्हणून तर आज साध्यासाध्या माणसांनी त्याला आपल्या हृदयात जागा दिली. किती राजे आले आणि गेलेही, मनामनात उरला फक्त एकच, राजा शिवाजी.


कुणी महाराजांना हिंदूपतपादशाह ठरवलं. हिंदू नृसिंह म्हणून गायलं. कट्टर हिंदुत्ववादी मानलं. पण त्यांना अशा धर्माच्या खुराडय़ात अडकवून ठेवण्यात कसला आलाय शहाणपणा? ते सगळ्यांचे होते. त्यांनी सगळ्या धर्मांच्या तीर्थस्थळांचा, धर्मग्रंथांचा सन्मान राखला. केळशीच्या याकूतबाबांसह अनेक मुस्लिम संतांचाही आदर केला. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणा-या मालोजीराजे भोसलेंनी आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शेरीफजी ठेवली, ती एका मुस्लिम सुफी संताच्या नावावरून. तो वारसा चालवणारे शिवराय होते. एक मुसलमान पोरगा मदारी मेहतर आग्र्याच्या कैदेत महाराजांच्या जागी झोपून आपला जीव धोक्यात घालतो आणि आपण त्याच महाराजांना धर्माच्या संकुचितपणात अडकवून ठेवतो. बहलोलखानाला हरवणारा सिद्दी हिलाल, फोंडय़ाचा किल्ला जिंकणारा महाराजांचा विश्वासू अंगरक्षक सिद्दी इब्राहीम, सरनोबत नूरखान बेग, स्वराज्याच्या तोफखान्याचे प्रमुख इब्राहीम खान, दौलत खान, दाऊत खान असे आरमारातील वरिष्ठ अधिकारी अशी शिवरायांवर जीव ओवाळून टाकणा-या मुस्लिमांची यादी कितीतरी मोठी. तरीही आपण `जय शिवाजी’ म्हणत हिंदू मुस्लिम दंगे करतो.


शिवरायांनी आपल्या राज्यात वेठबिगारी बंद केली. गुलामांची खरेदीविक्री हा त्याकाळात राजरोस चालणारा धंदा बंद केला. जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या `लांडय़ा’ बजाजी नाईकाला आपली पोटची मुलगी दिली, जावई करून घेतलं. जमिनी मोजून शेतक-यांच्या टॅक्सला नियमात बसवलं. गावं वसवली. तलाव, विहिरी खोदल्या. कारखाने खोलून उद्योजकांना प्रोत्साहन दिले. राजकारभाराची भाषा मराठी बनवली. लुटालूट होऊ नये म्हणून सैनिकांना पगार दिले. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये अशी सैन्याला ताकीद दिली. झाडं जगवण्याचे संदेश आपल्या अधिका-यांना दिले. असा जाणता राजा दुसरा कुणी झाला का?


म्हणूनच साधा माणूस स्वराज्यासाठी लढला. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर कोणतंही नेतृत्व नव्हतं. राजाराम महाराजांना दूर तामिळनाडूत जिंजीत राहावं लागलं होतं. कारण अफगाणिस्तानापासून ब्रम्हदेशापर्यंतचं साम्राज्य सोबत घेऊन आलमगीर औरंगजेब बादशहा शिवरायाचं स्वराज्य बुडवण्यासाठी महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता. अशावेळेस इथला महाराष्ट्रातला साधा माणूस प्राणपणानं लढला. त्याला कोणतंही इनाम मिळणार नव्हतं की कोणतं ताम्रपत्र. तरीही तो जिवाची पर्वा न करता दोन दशकांहून अधिक काळ लढला. आणि त्यात तो साधा माणूस जिंकला आणि निराश झालेला आलमगीर महाराष्ट्राच्या भूमीतच खुरडत खुरडत मेला.


आपण शिवजयंती साजरी करतो आहोत, तर आपल्याही असंच लढावं लागणार आहे. तीनशे वर्षांपूर्वी शिवरायांचा पराक्रम रिलेवंट होताच. पण आजही शिवरायाचं चरित्र तितकंच आदर्श आहे. आपल्या आजूबाजूस आजही निर्नायकी आहे. आजही मावळा वेठबिगारीने संपतो आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे. रांझ्याचा पाटील लेकीबाळींची अब्रू लुटतो आहे. सगळेच शिवरायांचं नाव घेत आहेत पण विचार वेशीवर टांगतात. कुणी ब्राम्हण म्हणून, कुणी बहुजन म्हणून शिवरायांच्या इतिहासाची बदनामी करतो आहे. नाहीतर त्यांना देव बनवून देवळात बांधतो आहे. जबाबदारी आपली आहे. शिवरायांच्या साध्या मावळ्यांची आहे.

11 comments:

  1. श्री.परबसाहेब,
    फारच अप्रतिम लिहिलंय तुम्ही. वर्णन करायला शब्दच नाहीत. मेनस्ट्रिम पत्रकारितेत राजांविषयी एवढा परखड लेख पहिल्यांदाच वाचायला मिळाला. सगळ्यांच्याच डोळ्यांत तुम्ही झणझणीत अंजन घातलंत. अशा लेखांची प्रतीक्षा राहील. ती आपण पूर्ण कराल, अशी खात्रीही आहे.

    ReplyDelete
  2. सचिन सर अप्रतिम लिहीले आपण ,खरोखरच आपले आणि नवशक्तीचे धन्यवाद
    आपली व्यथा हि सबंध शिव-प्रेमींची आहेच परंतु या येथील नाडलेल्या शेतकर्याची सुधा आहे ,"गर्व से कहो हम हिंदू हे "हे म्हणण्यार्यांची सुधा ती आहे .जर का कोणी याला ब्राम्हण विरोधी म्हणत असेल तर तो त्यांच्या बुद्धीचा गंभीर प्रश्न-वजा समस्या आहे. माझ्या राज्याची आज जयंती आहे असे म्हणणारे आहेत पण कृतीत आणणारे सुधा आज हवे आहेत.
    आम्ही हि पत्रकार रायगडावर तारीख-तिथी तर अन्य वेळी राज्याभिषेक सोहळा अनेकदा कव्हर करतो .करायला हरकत नाही पण माझा राजा हा सर्वांचा आहे ...
    जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  3. Hi Sachin, Ur article is very nice as literature. But As a Bramhin m really get hurt. Yes its true Bramhin was become selfish some time in past. But u ppl again and again Remind that facts.. and trying to keep the wall alive between some casts.. just think about it.

    ReplyDelete
  4. नमस्कार सचिन,

    मला वाटतं तुम्ही या तथाकथित जातीय संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांना फार महत्त्वच देऊ नये. आपला लेख अजिबात ब्राह्मणविरोधी वाटला नाही. ब्राह्मणांविरुद्ध गरळ ओकणारे लेखही मी या दिवसात बरेच वाचले आहेत म्हणून खात्रीने सांगू शकतो. तुमचा लेख मला खूप बॅलन्स्ड वाटला. तुमचा दृष्टीकोनही पुरोगामी आहे. लिहित रहा!

    ReplyDelete
  5. "आजही मावळा वेठबिगारीने संपतो आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे. रांझ्याचा पाटील लेकीबाळींची अब्रू लुटतो आहे. सगळेच शिवरायांचं नाव घेत आहेत पण विचार वेशीवर टांगतात. कुणी ब्राम्हण म्हणून, कुणी बहुजन म्हणून शिवरायांच्या इतिहासाची बदनामी करतो आहे. नाहीतर त्यांना देव बनवून देवळात बांधतो आहे. जबाबदारी आपली आहे. शिवरायांच्या साध्या मावळ्यांची आहे."...अप्रतिम.समकालीन वास्तव आणि शिवरायांचे प्रस्तुतत्व अचुक टिपले आहे.मार्मिक विवेचन. लेख भावला.अभिनंदन. ज्यांना यातही कुणाचा तरी द्वेष दिसतो ते ’धन्य’ होत.या मंडळींचे लाड करण्याची गरज नाही.त्यांना ’मानसोपचाराची’ गरज आहे.येरवडा किंवा ठाणे येथे त्यांची व्यवस्था करण्यासाठी नवशक्तीतर्फे प्रयत्न करावेत ही विनंती.

    ReplyDelete
  6. Etke sagle lihle ahe tumhi paan tumhi sudha bakinchyan pramane chatrapati shivaji maharaj hyana ........shivaji asa ekeri ulhek karun sambhodle maag tumhi kontya sanskara madhun ghadlaat he paan sangaaaa

    ReplyDelete
  7. Etke sagle lihle ahe tumhi paan tumhi sudha bakinchyan pramane chatrapati shivaji maharaj hyana ........shivaji asa ekeri ulhek karun sambhodle maag tumhi kontya sanskara madhun ghadlaat he paan sangaaaa

    ReplyDelete
  8. सचिन साहेब,
    आपला 'शिवाजी आपुला बाणा ' हा लेख अतिशय आवडला. माझ्या सातवीत असणाऱ्या मुलीस मी वाचावयास लावलाय. तीलाही
    तो खूप आवडलाय. आपला धन्यवाद.

    ReplyDelete
  9. खूपच उत्कृष्ट लेख आहे.

    ReplyDelete