या
लेखालाही आता बरेच दिवस झालेत. फेब्रुवारी महिन्यातला हा लेख. निवडणुका नुकत्याच
आटोपल्या होत्या, तेव्हा हा लेख लिहिला होता. विषय माझा नेहमीचा आवडीचा, राज
ठाकरे, मनसे. ज्येष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांची एक फेसबूकवरची पोस्ट वाचली आणि
धक्का बसला. त्यांना राज यांच्या पत्रकार परिषदेत आलेला अनुभव त्यात लिहिलाय. असला
अनुभव काही नवीन नाही, पण त्याला अभिजीतने तोंड फोडलं. मला वाटलं अभिजीतचा पेपर
लोकसत्ता त्याची दखल घेईलच. पण तसं काही दिसलं नाही. म्हणून म्हटलं आपण लिहुयाच.
या
लेखाचा इण्ट्रो होता, ‘या लेखात
माझं काहीच नाही. ज्येष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी फेसबूकवर लिहिलेली एक पोस्ट
आणि त्यावरच्या प्रतिक्रिया. आपलं राजकारण, लोकशाही, पत्रकारिता आणि एकूणच मराठी समाज याविषयी खूप काही
सांगणारं हे सगळं.’ लेखाच्या शैलीविषयी मला खूपच कौतुकाचे फोन
आले.
लेख छापून आल्यावर पुढच्याच आठवड्यात भाजपच्या एका नेत्याशी
मी फोनवर बोलत होतो. कशाला नेहमी राजसाहेबांच्या विरोधात लिहिता, तो म्हणाला. यात
जाब विचारणं नव्हतं तर एक जवळचा मित्र म्हणून सहज प्रेमाने केलेली चौकशी होती. काही
चुकीचं लिहिलंय का, मी माझ्यापरीनं उत्तर दिलं. एखाद्या समाजाविरुद्ध द्वेष
निर्माण करण्याला इतर कुणी विरोध करत नाही, म्हणून मी करतो, वगैरे वगैरे. उत्तर
देताना मला मजा आली. गंमत वाटली. लेख पुढे कटपेस्ट.
अभिजीत घोरपडे. पर्यावरण, हवामान अशा वेगळ्या विषयांवर जाणकारीनं लिहिणारा एक
अभ्यासू पत्रकार. पुणे लोकसत्तेत वरिष्ठ सहसंपादक. मुंबई आयआयटीतलं शिक्षण सोडून
जाणीवपूर्वक मराठी पत्रकारितेचा वसा घेतला. विशेषतः राज्यातील नामशेष होणा-या
नद्यांचा प्रश्न ऐरणीवर आणला. त्या विषयावर खूप लिहिलं. भाषणं दिली. स्लाईड शो
केले. पुस्तक लिहिलं. त्यांनी दहा फेब्रुवारीला फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट टाकलीय.
त्याचं शीर्षक आहे, `आता तरी
शेपूट घालायला नको…’ ही पोस्ट
त्यांच्याच शब्दात, पण
थोडक्यात अशी -
“बरोब्बर
दोन दिवस उलटून गेले, प्रतिक्रिया द्यायला कोणताही
उतावीळपणा केलेला नाही. तरीही वाटतंय- हे लिहावं, म्हणूनच हा उपद्व्याप…
गेल्या
बुधवारी पुण्यात श्री. राज ठाकरे यांच्या घरी ही पत्रकार परिषद झाली. आमंत्रण आले
म्हणून मीही गेलो. भरपूर गर्दी होती. पुणे पालिकेच्या निवडणुका आहेत. त्यासाठीच
श्री. ठाकरे पुण्यात आले होते. ते नेहमी महाराष्ट्राच्या `ब्लू प्रिंट’ बद्दल बोलत असतात.
मी प्रश्न केला- `पुण्यासाठी
अशी ब्लू प्रिंट तयार आहे का?’ त्यावर ते चिडून म्हणाले, `तुमचा आय.क्यू. कमी आहे की तुम्हाला ऐकू कमी येतं की कमी
दिसतं?… मी सांगत
आलोय २०१४ सालच्या
निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रासाठी ब्लू प्रिंट तयार असेल, त्यात पुणेपण असेल, मग आत्ता त्याचा
प्रश्न येतो कुठे?’ पुण्याच्या
निवडणुका आहेत म्हणून? असा
प्रतिप्रश्न केल्यावर ते बोलले, त्यासाठी ब्लू प्रिंट कशाला, माझं थोबाड आहे…
हे उत्तर आणि आय.क्यू.ची तपासणी चमत्कारिक होती, पण धक्कादायक मुळीच नव्हती.
त्यांच्या उत्तराने मी दुखावून जाण्याचं कारण नव्हतं- कारण त्यामुळे माझा ‘आय.क्यू.’ कमी होणार नव्हता
किंवा वाढणारही नव्हता. आणि ते `अभिजित घोरपडे’
म्हणून
मला बोलले नव्हते. कारण ते मला व्यक्तीशः ओळखतील इतका माझा त्यांच्याशी संपर्क
नाही. इतर कोणी त्यांना नको असलेला प्रश्न विचारला असता तरीही असंच उत्तर आलं
असतं. म्हणजे ते उत्तर मीडियासाठी होतं.
मित्रांनो, म्हणूनच मला ते अधिक गंभीर वाटतं. त्यांचे शब्द सभ्य नव्हतेच
आणि भाषासुद्धा उद्दाम होती- आत्मसन्मान असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दुखावेल
अशीच. त्यावेळी त्या गोंधळात त्यांचा निषेध करणं झालं नाही, पण आता मन शांत बसू
देत नव्हतं. म्हणून हे व्यासपीठ वापरलं. या निमित्ताने काही मित्रांशी (विशेषतः
मीडियामधल्या) बोलावं, असाही
उद्देश होता. श्री. ठाकरे यांच्या अनेक पत्रकार परिषदा पहिल्या. ते पत्रकारांवर
खेकसतात, अवघडीतले प्रश्न विचारले की त्यांची
अक्कल काढतात. त्यांच्या म्हणण्याने आपली अक्कल कमी होत नसली, तरी आपण किती दिवस
ही भाषा ऐकणार? आणि दुस-या
सहका-यावर कोटी केली की फिदीफिदी हसणार? आता तरी शेपटय़ा घालणं बंद करूया. याचा अर्थ आपणही तशी
प्रतिक्रिया द्यावी, असं अजिबात
नाही. `खळळ खटय़ाक’ च्या भाषेत आपण फार
बोलू शकणार नाही आणि त्याची गरजही नाही, पण त्याचा निषेध नक्कीच नोंदवू शकतो- निदान तोंडातून, लिखाणातून एखादा
शब्द तरी उच्चारु या.
एरवी एखाद्या कार्यक्रमात दखल घेतली नाही, गैरसोय झाली तर
आम्ही मारे बहिष्कार घालण्याची भाषा करतो. मग इथे उद्दाम उत्तरं आणि मर्यादा
सोडलेलं वक्तव्य कितीही वेळा ऐकूनही शेपटय़ा का घालायच्या? आपण खरंच इतके
लाचार आहोत का?… ”
फेसबूकवर शंभराहून अधिक जणांनी ही पोस्ट आवडल्यांचं नोंदवलंय.
सत्तरहून अधिक जणांनी ही लिंक शेअर केलीय. त्या शेअरवर पुन्हा शंभराहून अधिक लाइक
आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाच्या आहेत कमेंट. अभिजीतची पोस्ट आणि त्यावरच्या कमेंट
पुरेशा स्पष्ट आहेत. त्यावर कोणतंही भाष्य करायची गरजच नाही. म्हणून पुढे काही
निवडक कमेंट. फक्त एकेरी उल्लेख,
असभ्यपणा
आणि पुनरुक्ती कापलीय.
प्रशांत विश्वासरावः राज यांच्या एकूण
कर्तृत्वाबद्दल शंका घेण्याजोग्या असंख्य गोष्टी आहेत. हळू हळू निवडणुकांत आपलं
पितळ उघडं पडणार याचीच खात्री पटल्यामुळे त्यांचा वारंवार भडका उडत असावा.
मुंजाली नेव्हाळः तुमचे सुसंस्कृत आणि संयमी विचार खूप
भावले. राज यांचा चाहता असूनही मी या निषेधात सामील आहे. ब्लू प्रिंटविषयी तुमचे
विचारणे साहजिक आणि सकारण होते.
गणेश मोरेः राज आणि अशा महाराष्ट्रातल्या अनेक
नेत्यांच्या टिंगलखोरीमुळे प्रश्न विचारायला अनेकजण घाबरतात. पण लवकरच हे मोडीत
निघेल हळूहळू. जेव्हा अतिरेक होतो तेव्हा माणूस प्रतिकार करायला लागतो. हॅट्स ऑफ
टू यू.
विजय मोहितेः मीडियानेच राजना मोठं बनवलं आहे. राजमुळेच
टीआरपी, अशा
गणितामुळेच हे शेफारले आहेत. मीडियानेच दाखवले पाहिजे, आमच्याशिवाय तुम्ही
काहीच नाही. त्यांच्या सर्व सभा मुलाखती कॅन्सल करा. बघा ताटाखालचं मांजर नाही
झालं तर.
सौरभ महाडिकः राज ही बाळासाहेबांची भ्रष्ट नक्कल आहे.
त्यांना मी फेरीवालाच मानतो. एका फूटपाथवरून हाकललं की दुस-या फूटपाथवर बसून धंदा
लावायचा.
सुहास यादवः अडचणीचा प्रश्न आला की भंपकसारखे काहीतरी
बोलायचे ही ठाकरे कंपनीची जुनी सवय आहे. पत्रकारांवर हल्ले करणे आणि अडचणीचे
प्रश्न विचारल्यावर दुस-याचा आयक्यू काढणे यात फारसा फरक नाही. दुस-याचा आयक्यू
किती हे विचारण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा आयक्यू जाहीर केला तर बरे होईल. कोहिनूर
मिल खरेदीसाठी कोटय़वधी रुपये कसे जमवले याचा मंत्र यांनी मराठी तरुणांना दिला तरी
पुरे.
टेकचंद सोनावणेः विसरा हे. अपेक्षा `सुसंस्कृत’ नि `सभ्य’ माणसांकडून
ठेवायच्या असतात.
श्रीनिवास वैद्यः बाळासाहेबांनी राजना उत्तराधिकारी न
निवडता उद्धवना का निवडलं,
याचं हे उत्तर आहे. शिवसेना जबाबदार पक्ष
म्हणून वाढवायचा असेल तर राज चालणार नाही, असे त्यांनाही वाटत असेल.
मंदार मोरोनेः अमरावतीच्या एका प्रेस कॉन्फरन्समधे
एकाने राजना त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर दिले. तेव्हा त्यांना नमते घ्यावे
लागले होते.
योगेश मेहेंदळेः राज पूर्णपणे विचारपूर्वक असं
वागतात, असं मला
वाटतं. गुलामी मनोवृत्तीच्या भारतीयांन, त्यातही विशेषतः मराठी जनतेला आक्रमक शैलीतलं बोलणं
भावतं. लोकांच्या या मानसिकतेचा अचूक अभ्यास करून राज किंवा अजित पवारांसारखे
राजकारणी आपलं व्यक्तिमत्त्व जाणीवपूर्वक असं बनवतात. साहेब काय भारी आहेत, पत्रकारांनाही सोडत
नाहीत, असा आदर(?) पाठिराख्यांमधे
पसरतो.
चिंतामणी भिडेः ठाकरेंनी नेहमीच इतरांचा उपमर्द
करण्यात, थट्टा
करण्यात, नकला
करण्यात धन्यता मानली. एवढय़ाच बळावर एक घराणं चाळीस वर्षं जनतेला झुलवते हे जनतेच्या
आयक्यूवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
सीमा चोरडियाः हायकोर्टावर ताशेरे ओढत राजनी
लोकशाहीच्या तिस-या खांबाला भीक घातली नाही. आता चौथ्या खांबाचाही मुलाहिजा बाळगला
नाही. लोकशाहीलाच आव्हान देणा-या मनसेच्या हातात कोणत्या आधारावर सत्ता द्यावी? राज असं बोलले
त्याच वेळी परिषदेत कोणी आक्षेप कसा घेतला नाही? परिषदेवर आणि पुण्यातील सभेवर बहिष्कार
टाकायला हवा होता. दुर्दैवाने यातले काही घडले नाही.
जयंत जाधवः पुणे श्रमिक पत्रकार संघाने काय केले, हाही प्रश्न आहे.
सुहास नडगौडाः मला तर खूप हसू येतंय… बाळासाहेबांनीच
काल एका म्हटलं कुठल्या तरी च्यानेलच्या मुलाखतीमधे, की राज ठाकरेंच्या देहबोलीत बघा प्रचंड
अहंगंड, अहंकार
आहे. एक व्यंगचित्रकार हे बोलतोय. अहंगंड, अहंकार हे एक व्यंगच आहे. बाळासाहेबांनी ते अचूक टिपलंय.
आम्ही मीडियाने टीआरपीसाठी उभा केलेला ‘घाशीराम’ आहे हा. घाशीराम काय करतो हे महाराष्ट्राला सांगायची गरज
नाही, झेला आता.
अमेय गिरोल्लाः अभिजीत यांनी म्हटल्याप्रमाणे हे
वैयक्तिक नाही, तर सर्व
पत्रकारासांठी होतं. सध्या पत्रकारांचं (अर्थात सगळे नाही) जे काही चाललंय ना, त्यातून हे असं
घडणं यात अजिबात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये. याचं सर्वात मोठ्ठं उदाहरण
म्हणजे आत्ता याक्षणी आयबीएन लोकमतवर बाळासाहेब ठाकरेंची सुरू असलेली मुलाखत.
एखादा संपादक स्वतःला किती प्रमाणापर्यंत ग्लोरिफाय करू शकतो, याच्या सर्व
मर्यादा ओलांडल्या आहेत. वरकरणी या दोन गोष्टींचा काही संबंध वाटणार नाही. पण
एकंदर पत्रकारांच्या वर्तनावरून कोणी असं काही म्हटलं, तर इतकं आश्चर्य
वाटण्याचं काहीच कारण नाही.
ता. क. फेसबूकवरच्या या वादावादीनंतर राज यांनी
अभिजीत यांची फोन करून माफी मागितली आहे. पण त्याने विषय खरंच संपला आहे का? महाराष्ट्राचा
आयक्यू म्हणजे बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी राजसाहेबांनी वेगळी ब्लू प्रिंट काढायला
नको का?
सचिन परब साहेब, राजकारण हि भारतातील सर्वात जास्त चर्चेची बाब आपण मेडीयानेच केली आहे..लोकशाही राजकारण्यांनी विकून खाल्ली आहे.....गेल्या २५ वर्षाच्या पत्रकारितेत मी जरी राजकारणाव्यतिरिक्त लिहिण्याचा प्रयत्न केल्यावर वृत्तपत्राकडूनच स्थानिक राजकारण्याच्या बातम्या द्या आणि जाहिराती घ्या, अश्या सुचना वाढू लागल्या. ग्रामीण भागात राजकार्ण्यानविरुध्द लिहिले की हल्ले होतात..सुहास नाडगौडा यांचा घाशीराम शब्द अचूक आहे...सीमा चोरडीयांची प्रतिक्रियाही खरी आहे. पण वाचकांची अभिरुची बदलण्याची क्षमता असूनही आपण हे सारे का सहन करीत आहोत?
ReplyDeleteअभिजित घोरपडे आणि सचिन परब यांचं अभिनंदन!
ReplyDeleteमेधा कुळकर्णी
Manapasun Aavdle sir! Rajkarnyachya major vruttila rokhnyasathi ek patrakar ya natyane aapnch jamel tase praytna karayala havet! mag te baramatiche tage asot ki Thackeray asot!
ReplyDeleteफेसबुकवर याविषयी जाहीरपणे लेखन केल्याबद्दल प्रथम अभिजित घोरपडे यांचे कौतुक करावेसे वाटते. त्यानंतर सदर विषय ब्लॉगवर मांडल्याबद्दल सचिन परब यांचे अभिनंदन !
ReplyDeleteआता मूळ लेखाकडे वळून थोडेसे लिहितो, माझ्या मते राज ठाकरेने आय क्यू विषयी विचारून काही चुकीचे केले असे अजिबात वाटत नाही. याचे कारण म्हणजे, अशा कित्येक झंझावती आणि वादळी व्यक्तिमत्त्वांना जनतेने स्वप्रतीनिधी म्हणून स्वीकारल्यावर, अशा नेत्यांनी विरोधकांची अक्कल काढायची नाही तर कोणाची ? आता परब यांनी मूळ लेखाच्या खाली ताजा कलम या सदरामध्ये परिच्छेदामध्ये राज ठाकरेने घोरपडेंची फोनवरून माफी मागितल्याचा उल्लेख केलेला आहेचं. बाकी हि एक चांगली पद्धत आहे, अपमान करावा जाहीरपणे आणि माफी मागावी खासगीमध्ये !
अभिजित घोरपडे आणि सचिन परब यांचं अभिनंदन!
ReplyDeleteDhuri Express 9224524892
dx9224524892@facebook.com