Wednesday, 12 February 2014

आपल्या जननायकांसाठीचं युद्ध

क्रांतिवीर दीपाजी राणेंचं हे रेखाचित्र 
गोव्यात येऊन आता मला दहा महिने होऊन गेलेत. मी बराच गोंयकार झालोय. फिरतोय, लोकांना भेटतोय, वाचतोय. जमेल तेवढा गोवा समजून घेतोय. मजा येतेय. सगळ्यात आधी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वाचला. त्यात सत्तरीच्या राण्यांचं बंड सापडलं. गोव्यात गेल्यावर सगळ्यात आधी साखळीच्या विठ्ठलमंदिरात गेलो होतो. राणे घराण्याचा कुणीतरी पूर्वज याच पांडुरंगाला घेऊन गोव्यात स्थायिक झाला होता. त्या विठ्ठलानं सत्तरीतल्या वाळवंटी नदीच्या पाण्यात चंद्रभागेतल्या `पाईकां`चे जीन्स मिसळले असावेत बहुदा.
पोर्तुगिजांनी सत्तरी तालुका ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून म्हणजे अठराव्या शतकाच्या मध्यापासून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत राणे अखंड त्यांच्याशी लढत होते. त्यातले क्रांतिवीर दीपाजी राणे आणि खूप नंतरचं दादा राणेंचं स्वातंत्र्यसंगर सर्वात आकर्षक आहे. दीपाजींच्या स्मृती जागवण्यासाठी २६ जानेवारीला नाणूसच्या किल्ल्यावर तरुण एकत्र झाले होते. दीपाजींचं कर्तृत्व मोठं असूनही त्यांच्या नावानं कुठेच काही नाही. शाळेत धडे नाहीत, फार चांगली पुस्तकं नाहीत, स्मारक वगैरेही नाही.त्यांच्याविषयी चांगलं बोलायला आजही काही लोकांची तयारी नाही, हे फेसबुकावरच्या चर्चेत दिसतंय. त्यावर गोवा पुढारीचे कार्यकारी संपादक प्रभाकर ढगेंनी दीपाजींवर पुस्तक लिहायचा संकल्प फेसबुकावर सोडलाय. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!
मी लागोपाठच्या गेल्या दोन शनिवारी दोन लेख लिहिले. पहिला लेख दीपाजींच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्यात एकूणच लोकनायकांचं कर्तृत्व लोकांसमोर आणण्यासाठी कसे प्रयत्न सुरू असतात, त्यावर लिहिलंय. दोन्ही लेख इथेच पाठोपाठ टाकलेत.

आपला ब्लॉग नेहमी वाचणाऱ्यांना मुंबईत असतानाचं माझं लिहिणं आणि आताचं लिहिणं थोडं वेगळं वाटू शकेल. कारण इथले वाचक थोडे वेगळे आहेत. त्यांना अजून समजून घेणंच सुरू आहे. त्यांच्यासाठी लिहिताना थोडा फरक पडतोय. भाषाही थोडी वेगळी वाटू शकेल. बघा काय ते?
२६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. तो यंदा रविवारी आल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. हक्काची सुटी गेली. त्या दुःखात पार्ट्या झाल्या. कुटुंबाबरोबर हॉटेलिंग झालं. नाहीतर रविवारी घरी लोळत राहण्याचा जन्मसिद्ध हक्क बजावण्यात आपला प्रजासत्ताक दिन छान साजरा झाला.
पण हे सगळं सोडून आपल्यासारखेच दीडशे जण त्याच दिवशी नाणूसच्या किल्ल्यावर जमा झाले होते. २६ जानेवारी १८५२ साली क्रांतिवीर दीपाजी राणे यांनी स्वातंत्र्ययुद्धाचा बिगुल वाजवला होता. त्याचा जागर म्हणून ही तरुण मंडळी एकत्र आली होती. दीपाजींच्या स्मृती जागवण्यासाठी काही वर्षांपूर्वी असे प्रयत्न सुरू होते. ते थांबलेले प्रयत्न पुन्हा सुरू करण्यासाठी  सत्तरी इतिहास संशोधन मंडळाच्या ऍड. शिवाजी देसाईंनी पुन्हा एकदा चिरा रचता येतो का, पुन्हा एकदा पणती पेटवता येते का, यासाठी चाचपणी केली. सत्तरीवासियांना खरंच दीपाजींविषयी काही वाटतं का, हे समजून घेणं हाच या कार्यक्रमाचा हेतू होता. त्याला अनपेक्षित प्रतिसाद लाभला. ज्यांच्यापर्यंत निमंत्रण पोहोचलं, त्यांच्यातले बरेचसे कार्यक्रमाला आलेच. आम्ही गोंयकार दीपाजींना अजून विसरलेलो नाही, आम्हाला त्यांच्या आठवणी जपण्यासाठी काहीतरी करायचंय, वरवर वाटतो तितके काही आम्ही कृतघ्न झालेलो नाही, असं या कार्यक्रमानं अधोरेखित केलं.
दीपाजी राणेंचं स्वातंत्र्ययुद्ध हे गोव्याच्या इतिहासातलं बहुदा सर्वात तेजस्वी पर्व आहे. कदाचित सर्वाधिक दुर्लक्षितही. गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल झाल्यापासून ते गोवामुक्तीपर्यंतच्या इतिहासात सतत साडेतीन वर्षांहून अधिक काळ गोव्याचा एक मोठा भाग स्वतंत्र केल्याचं हे एकमेव उदाहरण आहे. पोर्तुगिजांनी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करूनही दीपाजींचा एकदाही पराभव झाल्याची नोंद नाही. पोर्तुगिजांनी त्यांना तुरुंगात टाकणं तर दूरच त्यांच्यावर खटला भरण्याचीही हिंमत करता आलेली नाही. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरामुळेही इतका काळ एखादा प्रदेश स्वतंत्र राहिलेला नाही. आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांना उचित सन्मान मिळतो, त्या वासुदेव बळवंत फडकेंच्या युद्धालाही इतकं यश मिळालेलं नाही. मध्य भारतातील जननायक तंट्या भिल्ल यांचंही कर्तृत्व फार मोठं आहे. पण त्यांच्या तुलनेतही दीपाजींचं स्वातंत्र्ययुद्ध अधिक यशस्वी आहे. आदिवासींमध्ये अवतार मानल्या गेलेल्या बिरसा मुंडांचा प्रभाव निश्‍चितच अधिक प्रदेशावर होता. आजही आहे. पण दीपाजींसारखं स्वातंत्र्य त्यांना उपभोगता आलेलं नाही. यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही. कारण डोळे उघडे ठेवून इतिहासावर एक साधी नजर जरी टाकली तरी हे दिसून येते.
मनोहर सरदेसाईलिखित `स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास` या ग्रंथात दीपाजींच्या शौर्यांचे काही संदर्भ एकत्र वाचता येतात. सत्तरीच्या राण्यांनी पोर्तुगिजांना कधीच स्वस्थ बसू दिलेलं नाही. या तालुक्यात पोर्तुगिजांना कधीच धार्मिक अत्याचार करता आले नाहीत. १७५५ ते १९१२ असे राण्यांचे स्वातंत्र्यासाठीचे लढे सातत्याने सुरूच होते. त्यातला दीपाजी राणेंचा स्वातंत्र्यलढा सर्वात तेजस्वी आहे.
१८५१ साली दीपाजींचं संस्थानवजा जमिनदारीचे हक्क (मोकासा) खालसा करण्यासाठी तत्कालीन विरजेईनं प्रयत्न केला. त्या भागात पँट आणि चोळीची सक्ती करण्यात आली. त्याच्या अमलबजावणीसाठी पोर्तुगीज सैनिकांनी बलात्कार, अत्याचार केले. त्याविरोधात दीपाजींनी २६ जानेवारी १७५२ साली म्हादई नदीकाठचा नाणूसचा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं. पोर्तुगिजांना सत्तरीतून हाकलवून लावलं. त्यांना हरवण्यासाठीचे पोर्तुगिजांनी वारंवार प्रयत्न केले. पण त्यात एकदाही यश मिळालं नाही. दीपाजींच्या सैन्यानं केपे, काणकोण, सांगे, हेमाडबार्से, भतग्राम इतक्या मोठ्या भागातून काही काळासाठी का होईना पण पोर्तुगिजांना हाकलून लावलं होतं. पोर्तुगीजधार्जिण्या धनिकांनाही त्यांनी चाप लावला. २६ मे रोजी कुंभारजुव्यावर हल्ला करून तिथल्या श्रीमंतांकडून खंडणी वसूल केली. त्यांनी गरिबांना कधीच त्रास दिला नाही. सैन्यातल्या लोकांच्या कुटुंबाचं उत्तम पालनपोषणही केलं. एकदाही त्यांच्याविरोधात कुणी फितुरी केलेली आढळत नाही.
दीपाजींना समेटासाठी पणजीला बोलवून त्यांना संपवण्याचा विरजईनं (गव्हर्नरनं) कट केला. त्यासाठी दीपाजी विजेत्याच्या थाटात पणजीला आलेदेखील. तेव्हाच त्यांनी दगाफटका होऊ नये यासाठी तीन पोर्तुगीज अधिकाऱ्यांना गांजे येथे पकडून ठेवलं होतं. त्यामुळे चिडून विरजेईनी दीपाजींची भेटही घेतली नाही. दीपाजींशी सतत सुरू असलेल्या युद्धात पोर्तुगिजांचा खजिना रिकामा झाला होता. दीपाजींकडची साधनसंपत्तीही मर्यांदित होती. त्यामुळे दोघांनीही तहाचा मार्ग स्वीकारला. ते राजाच्या थाटात दीर्घायुष्य जगले असावेत, असे इतिहासातल्या काही नोंदींवरून वाटते.
पण इतिहासात दीपाजींविषयीच्या नोंदी फारच थोड्या आहेत. पोर्तुगीजांनी दीपाजींचं गुणगान करण्याचा प्रश्‍नच नव्हता. दीपाजी पोर्तुगीजधार्जिण्यांचेही शत्रू होते. त्यामुळे या शहरी सुशिक्षितांसाठी दीपाजी लुटारूच राहिले. आज आपल्याकडे विलायती चित्रकारानं काढलेलं दीपाजींचं उत्तम रेखाचित्र आहे. पण त्यांचा जन्म आणि मृत्यू कधी झाला, याची साधी तारीखदेखील नाही. दीपाजी ब्रिटिशविरोधी स्वातंत्र्यलढ्याच्या मुख्य प्रवाहाचा भाग नसल्याने देशभरातल्या इतिहासकारांची नजर त्यांच्याकडे गेली नाही, हे समजता येऊ शकतं. पण गोमंतकीय इतिहासकारांनीही त्यांच्याविषयी हवं तसं संशोधन केल्याचं आढळत नाही. सर्वसामान्यांच्या लोकगीतांत आणि पोवाड्यांत मात्र दीपाजींना मानाचं स्थान आहे,
साठ सत्तर गावांमधी कोण वीरबळी
राण्यांच्या कुळी तो दिपुराणा बळी...
पणजीचे पाखले झाले भयभीत
पळाले सांखळे जीव घालती तारवांत
दीपाजींचा लढा हा गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी नव्हता तर स्वतःचे संस्थानिक किंवा जमीनदार म्हणून असणारे हक्क वाचवण्यासाठी होता, असा दावा काही इतिहासकारांनी केला आहे. पण त्यांना आजच्या नाही तर त्यांच्या काळाच्या संदर्भात पाहायला हवं. हाच निकष लावायचा झाला तर १८५७चा सगळा स्वातंत्र्यसंग्राम शिपायांचं आणि संस्थानिकांचं बंड बनून उरतं. दीपाजींना स्वातंत्र्यसेनानी मानायचं नाही तर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, रंगो बापूजी, वासुदेव बळवंत फडके अशा सगळ्यांच्या नावावर फुली मारावी लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीची धार मिळाली म्हणून १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतरही अनेक इतिहासकारांनी त्यात आपलं योगदान दिलं. तेव्हा कुठे या स्वातंत्र्यसंग्रामाला इतिहासात मानाचं स्थान मिळालं. महाश्‍वेता देवींचा परिसस्पर्श लाभला म्हणून बिरसा मुंडा हे आज झारखंडचे अस्मितापुरुष बनले आहेत. बिरसांच्या नावानं युनिवर्सिटींपासून विमानतळंदेखील आहेत. मराठी लेखक, प्रकाशक बाबा भांडांनी तंट्या भिल्लांचं मोठेपण शोधून काढलं म्हणून आज मध्य प्रदेश सरकारला त्यांच्या नावानं योजना सुरू कराव्या लागत आहेत.
सर्वसामान्यांमधून आलेल्या शूरवीर आणि महापुरुषांना त्यांचं श्रेय सहज मिळत नाही, हे स्वाभाविक आहे. फक्त कर्तृत्व असून चालत नाही. ते इतिहासाची आधुनिक साधनं वापरून शोधून मांडावं लागतं. त्यासाठी अभ्यासकांना, कार्यकर्त्यांना आपली आयुष्यंच्या आयुष्यं झोकून द्यावी लागतात. त्यासाठी आपल्यापैकी कुणाची तयारी आहे का? तसं कुणी असेल तर दीपाजींच्या नावाने पर्वती सचिवालय परिसरातच काय संसदेच्या आवारातही स्मारक उभं राहील. नाहीतर उगाच स्वप्नं पाहण्यात अर्थ नाही. आपण आपलं दरवर्षी नाणूसच्या किल्ल्यावर जमा होत राहुया.

....

स्वामी विवेकानंदांचं दीडशेवं जन्मशताब्दी वर्षं आपण नुकतंच साजरं केलं. पूर्ण देशभर छोट्यामोठ्या कार्यक्रमांची रेलचेल उडाली होती. त्रिखंड गाजवणाऱ्या संन्याशी योद्ध्याची अखेर अत्यंत तारुण्यात झाली. हा मृत्यू खूप दुःखद होता. ते दीर्घायुषी असते तर आपल्या देशाच्या इतिहासाला नवी कलाटणी मिळाली असती. याचाच अर्थ विवेकानंदांचा मृत्यू एकूण काळाच्या संदर्भात महत्त्वाचा होता. म्हणजेच ही एक मोठी बातमी होती. तरीही स्वामी विवेकानंदांच्या मृत्यूच्या दुस-या दिवशी एकाही वर्तमानपत्रात त्याविषयी एक अवाक्षरदेखील छापून आले नाही.
आज आपल्याला हे खोटं वाटेल, पण असं झालंय खरं. मणिशंकर मुखोपाध्याय म्हणजेच शंकर या ज्येष्ठ बंगाली संशोधक लेखकाने लिहिलेल्या `अज्ञात विवेकानंद` या पुस्तकात हे आलंय. विवेकानंदांच निधन इतक्या हलाखीच्या स्थितीत झालं की त्यांच्या मृत्यूचा दाखलाही आज उपलब्ध नाही. त्यांच्या शोकसभेचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी हायकोर्टाच्या दोन न्यायाधीशांनी नकार दिला होता. विवेकानंदांच्या समाधिस्थळावर छोटं देऊळ बांधायची त्यांच्या सहका-यांची इच्छा होती. पण पैसे नव्हते. त्याचं काम सुरू व्हायला पाच वर्ष उलटावी लागली आणि पूर्ण व्हायला आणखी सतरा वर्ष लागली. हे धक्कादायक वास्तव मांडल्यावर लेखक शंकर सांगतात ते महत्त्वाचं आहे, एके काळी ज्यांनी जगाला हादरवून, थरारून टाकले, त्यांचा स्वीकार करायला आम्ही फार वेळ घेतला. युगनायक विवेकानंदांना भारतात वंदनीय स्थानापर्यंत पोहोचवण्यात विवेकानंदांनी स्थापन केलेल्या मठ-मिशनचे योगदान फार मोठे आहे. मठ-मिशनच्या संन्याशांनी मठ-मिशनला कार्यरत ठेवले नसते तर आज आपल्याला स्वीमीजी जसे स्मरणीय वाटतात तसे वाटले असते का, ह्याबद्दल शंकाच वाटते.
याचा अर्थ बिलकुल नाही की विवेकानंदांचं बावनकशी कर्तृत्व कुठे कमी होतं. तरीही शंकर सांगतात त्यात एका पैशाचंही खोटं नाही. लाखो निरपेक्ष कार्यकर्ते आणि शेकडो निष्ठावान अभ्यासक आपल्यासाठी विवेकानंदांइतकेच वंदनीय आहेत. ते नसते तर विवेकानंदांची थोरवी आपल्यापर्यंत पोहोचलीच नसती. लक्ष वेधून घेणारं एक चमकदार व्यक्तिमत्त्व एवढ्यापुरतीच त्यांची नोंद जाडजूड पुस्तकातल्या जंत्र्यांमध्ये गुदमरून गेली असती. आज त्यांच्या विचारांचा होणारा प्रत्यक्ष प्रभाव निव्वळ अशक्य होता. मग दीडशेव्या जयंतीचे सोहळे तर खूपच दूर.
महापुरूष थोरच असतात. त्यांचं जीवन, कर्तृत्व, विचारदेखील. पण ते जिवंत असताना त्यांच्या मोठेपणाच श्रेय क्वचितच त्यांच्या पदरात पडतं. आधुनिक भारताच्या इतिहासात तर असे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच महापुरुष. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, गुरूदेव टागोर, नेताजी सुभाषचंद्र. जाणकार यात आणखीही चारदोन नावांची भर घालू शकतील. बाकी देश जोडणाऱ्या सरदार पटेलांसारख्या लोहपुरूषाची जयंती पुण्यतिथी कधी आली कधी गेली, हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना कळायचंदेखील नाही. यंदा त्यांच्या पुण्यतिथीला `मोदीमॅनिया` पावला. चांगलं झालं.
मोठ्यांचं मोठेपण नुसतं असून चालत नाही. ते लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. पोहोचवावं लागतं. इतर कुणाची बातच सोडा, महापुरुषांचे महामेरू म्हणायला हवेत असे छत्रपती शिवाजी महाराजही याला अपवाद नव्हते. सगळ्या महाराष्ट्रदेशाच्या अस्तित्वाचा आधार असलेल्या शिवरायांची रायगडावरची समाधी कशी आहे, याची खबर महाराष्ट्राला एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर नव्हती. महात्मा जोतिराव फुले तिथे गेले. तिथे त्यांनी स्वच्छता करून शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम केला. त्यांनीच शिवाजी महाराजांवर पोवाडा रचला. दुसरीकडे राजारामशास्त्री भागवतांनी आधुनिक मराठीतलं शिवरायाचं पहिलं चरित्र साधारण याच काळात लिहिलं. न्या. महादेव रानडेंच्या `राईज ऑफ मराठा प़ॉवर` या ग्रंथानं शिवचरित्राला आधुनिक इतिहासाचं परिमाण मिळवून दिलं. महाकवी माधवराव कुंटेंनी शिवरायांवर अस्सल मराठीतून तीन खंडांचं महाकाव्य रचलं. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सार्वजनिक उत्सव बनवला. त्यानंतर महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांवर कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्र लिहिण्यात, सांगण्यात काही पिढ्या गेल्या, तेव्हा कुठे आज शिवरायांचं महाराष्ट्राच्या इतिहासातलं आजचं स्थान निर्माण झालंय. पण अजूनही त्यांच्या थोरवीला साजेसं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थान काही उभं राहिलेलं नाही. ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. सदानंद मोरे यांचं `गर्जा महाराष्ट्र` हे नवं पुस्तक आलंय. त्यात त्यांनी मराठी अस्मितेचा शोध घेतला यातले अनेक तपशील छान उलगडवले आहेत. ते मुळातून वाचायलाच हवेत.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आदिवासी स्वतंत्र्यसेनानी तंट्या भिल्ल यांनी मध्य भारतात इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. लेखक बाबा भांड यांनी लहानपणी तंट्याच्या कहाण्या लोकगीतांतून ऐकल्या होत्या. पण इतिहासात हे नाव कुठे नव्हतंच. भांड यांनी अत्यंत परिश्रम घेऊन त्यांच कर्तृत्व जगासमोर आणलं. वाळवी लागलेल्या दफ्तरखान्यांपासून लोकरंगभूमीवरच्या नाटुकल्यांपर्यंत एकेक अवयव जोडत त्यांनी हा जननायक उभा केला. त्यांच्यावर मराठी, हिंदी, इंग्रजीत चरित्रं लिहिली. `एका जननायकाच्या शोधाची कहाणी` या पुस्तकात त्यांनी हा सारा संघर्ष लिहूनही ठेवलाय.
क्रांतिवीर दीपाजी राणे यांचं स्मारक उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या संशोधकांनी एकदा हे पुस्तक चाळायला हवं. पण आज सेंट्रल लायब्ररीत किंवा गोवा विद्यापिठाच्या ग्रंथालयातही हे छोटंसं नाही. दीपाजी राणे काही एकटे नाहीत.  कुंकळ्ळीचा लढा, पिंटोचे बंड यांच्यापासून विश्वनाथ लवंदे, पीटर अल्वारीस यांच्यापर्यंत किती जननायक आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकलोय? इतिहासलेखनपद्धतीत सबाल्टर्न स्टडीज् ना मोठं महत्त्व प्राप्त झालंय. राजांच्या नाही तर सर्वसामान्यांतून उभ्या राहिलेल्या लढ्यांच्या इतिहासाला प्राधान्य मिळू लागलंय. त्यांच्याकडे तुच्छतेनं पाहण्याचे दिवस संपलेत. उलट त्यांच्या अभ्यासाचं शास्त्र उभं राहिलं आहे. थोडी निष्ठा असेल तर साधनं हात जोडून उभी आहेत.
पद्म पुरस्कारांच्या निमित्ताने आपल्या गोव्यातून आजवर कोणाकोणाला पद्मपुरस्कार मिळाले याची यादी आपण नुकतीच वाचलीय. त्या सगळ्यांचं कर्तृत्व आहेच. त्याबद्दल वाद नाही. पण या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाने किती वाट पाहायची? प्रभाकर सिनारींपासून भय्या देसाईंपर्यंत मुक्तिलढ्यातले क्रांतिकारक आजही आपल्यासोबत आहेत. ताम्रपत्र वाटून आपली जबाबदारी संपत नाही. उद्याचे तरुण याच जननायकांचा शोध घेणार आहेत. जननायकांचा शोध म्हणजे फक्त इतिहासाचा अभ्यास आणि पूर्वजांविषयीची कृतज्ञताच नसते, तर आपल्या मुळांचा आणि आज घडवण्याच्या प्रेरणांचाही तो शोध असतो. तिथे श्रेय देण्यात कंजुषी केली तर कसदार समाज उभा राहू शकत नाही. त्याचे दुष्परिणाम आपण आज भोगत नाही आहोत का? तरीही त्यातून शिकण्याची आपली तयारी का होत नाही?  

No comments:

Post a Comment