Friday 14 February 2014

मला भेटलेले लोकनाथ

दिल्लीत असताना प्रमोद चुंचूवारच्या पुस्तकांच्या कपाटात पहिल्यांदा लोकनाथ यशवंत भेटले. त्या कवितेनं हादरवून टाकलं. तेव्हापासून लोकनाथ मनाचा एक भाग झालेत. पुढे आम्ही भेटलो. मित्र झालो. वर्षभरापूर्वी मी त्यांच्यावरचा हा लेख लिहिला. त्यांच्या कवितांवरच्या समीक्षालेखांचा संग्रह आला. `लोकनाथच्या यशवंत कविता` नावाचा. त्यासाठी हा लेख लिहिला होता. मला भेटलेले लोकनाथ असं या लेखाचं स्वरूप होतं. लोकनाथजींना लेख आवडला. बरं वाटलं. मूळ लेखाचं नाव एकदम कडक असं होतं. तो लेख ब्लॉगवर टाकतोय.

लोकनाथजी परवा मुंबईला आले होते. म्हणाले, लवकरच नोकरीतून रिटायर्ड होणार आहे. म्हणजे आता ते साठीच्या जवळ आलेत. आता तेच म्हणताहेत म्हणून यावर विश्वास ठेवायचा. नाहीतर ही विश्वास ठेवायची गोष्ट नाही. रिटायरमेंट ही लोकनाथजींच्या जवळदेखील जाणारी गोष्ट नाही. मला विचाराल तर ते माझ्यापेक्षाही खूप खूप तरुण आहेत. त्यांचं वय माझ्यापेक्षा पंचवीसेक वर्षं जास्त भरत असलं तरी.  
हे वाटणं फक्त आजचं नाही. लोकनाथ यशवंत हे टोपण असल्यासारखं नाव वीसेक वर्षांचा असताना पहिल्यांदा वाचलं असेल. तेव्हापासून हे असंच वाटतंय. आता होऊन जाऊ द्या आणि आणि शेवटी काय झाले?’ च्या वेगवेगळ्या आडव्या उभ्या आकारातल्या तीन चार आवृत्त्या आजवर पाहिल्यात. पण ती जाड पुठ्ठ्याच्या कव्हरच्या पहिली ब्लॅकँडव्हाइट आवृत्ती अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. आकार नेहमीपेक्षा वेगळा आणि कविता तर खूपच वेगळी. एकामागून एक पानं उलटत गेलो. लोकनाथ नावाचं एक झाडच डोक्यावर उगवलं. त्याची मुळं डोक्यातून खोल खोल अख्ख्या शरीरात रूतत चालली आहेत, असं वाटत होतं. आतबाहेर सगळं ढवळून काढणारी कविता. हादरवून टाकणारी कविता.
माझ्यासारख्या बातम्यांच्या गद्यात रमणाऱ्याला कविता समजून घेणं एरवी अवघड जातं. हे माझंच नाही. कवितांचे संस्कार नसणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांचं हे असंच आहे. सांगायचं एक, बोलायचं दुसरंच, असं कशाला? काय मांडायचं ते सरळ मांडावं, असं आमच्यासारख्या अनाड्यांना वाटतं. पण लोकनाथजींच्या कविता असूनही तशा नाहीत. त्यांच्या कविता माझ्यासारख्याचाही दोन चार पानांतच ठाव घेतात. गोळी कशी बंदुकीतून निघून थेट निशाण्यावर लागते. थेट बोलणारे लोकनाथ आपले वाटतात. पुढे एक. मागे एक, असं इथे काही नाही. मांडलं ते आरपार एकच. शब्दांचे खेळ नाहीत. कवितासंग्रहाची नावंही कशी, आता होऊन दाऊ द्या. आणि शेवटी काय झालं?’, ’पुन्हा चाल करु या चारच शब्द. अगदी थेट. चार शब्दांत आगीचा जाळ.
या कविता काव्यात्म नाहीत, असं कुणी समीक्षक वगैरे म्हणतात. त्यांना तसं म्हणू द्यावं. तुम्हा आम्हा साध्या माणसांशी घेणंदेणं नसणाऱ्या गोष्टींवरच त्यांची पोटं भरत असतात. त्यांची काव्यात्मकता इथे नाही, हे बरंच आहे. विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी ही कविता बोलते. मग आणखी काय पायजे? तरुणांना आवडावं म्हणून मुद्दामून या कवितेत थातूरमातूर फोडणी दिलेली नाही, उलट इथे हात जाळणारा निखारा आहे. तरीही आमच्या एसेमेसी पिढीला ही कविता आपली वाटते. समीक्षकांच्या पुस्तकातली काव्यात्मकता लांब ठेवली की जवळ येणारी जिंदगी इथे कवितांतून गळाभेट घेते. वाचताना दुसरं काय हवं असतं? आपल्या भूमिका तळहाताइतक्या स्पष्ट असल्याशिवाय असं थेट नाही लिहिता येत. गोल गोल लिहिणारे बरेच आहेच. कारण त्यांचं जगणंच गोल गोल आहे. उपमा उत्प्रेक्षांचे थोरथोर जादूगार बरेच आहेत. इथे त्याची गरजच नाही. आजूबाजूचं जगणंच इतकं प्रत्ययकारी आहे. ते तसंच्या तसं मांडलं की कविता होऊन जाते. आणि पाच सात ओळींतही कविता पुरी होते.
लोकनाथजींच्या कवितेत अस्सल तारुण्य भेटतं. तारुण्य म्हणजे बिनधास्तपणा. तो इथे पानापानांवर भेटतो. कोणाला काय वाटेल, याची भीडभाड नाही. बेरजा वजाबाक्या नाहीत. गणिताचं उत्तर सापडल्यावर उगाच ताळा करत बसणं नाही. गोलपीठातल्या लोकांनी मांडलेली समष्टीची समीकरणं नाहीत. फुले शाहू आंबेडकरांची नावं लिपस्टिकीसारखी ओठांवर लावून बांधिलकीला विकणारेही त्यातलेच आणि सत्ता येताच हिंदुत्व मागच्या पानावर टाकून देणारे हिंदुत्ववादीही तसेच. मग ते राजकारणी असोत, समाजकारणी, विचारवंत, साहित्यिक किंवा पत्रकार. या सगळ्यांना जवळून पाहणं हे पत्रकार म्हणून एक कामच. दोन चार अपवाद सोडले तर इथे कुणीच तरुण सापडत नाही, सगळ्यांच्याच लाल, भगव्या, निळ्या, तिरंगी आयाळी कधीच म्हातरपांढ-या झालेल्या आहेत. त्यांच्या नख्यांची लॉकेटं कुणाकुणाच्या गळ्यात टांगलेली आहेत. तडजोडी करतो तो तरुण कसा काय?  वाटतं ते करून आणि बोलून मोकळा होतो, तो तरुण. गमवायची त्याला भीती नसते. कारण आज आणि उद्या त्याचाच असतो. तरुण कोणाचा इतिहास बघत नाही. तो वर्तमानाविषयीचे जाब विचारत असतो. लोकनाथजींच्या कवितांत ही रशरशीत तरुणाई पानापानावर भेटत होती.

तुला छप्पनदा मायबोलीत
समजावून सांगितलं
क्रांतीचं नाव कसेही, कुठेही, केव्हाही
घेऊ नकोस म्हणून.
...
हिजड्यांना मिशा शोभत नाहीत रे!

सालं किती सोपं. तरीही बिलकूल उथळ नाही. वर खूप महत्त्वाचं आणि परिणाम करणारं. कुणाही दुकानदाराचं गालफड लाल करणारे शब्द. माझ्या मुंबईच्या भाषेत बोलायचं तर ही कविता एकदम कडक आहे. रसरशीत.
आपण उसने अनुभव घेत नाही, असं लोकनाथजी एका मनोगतात म्हणतात. ही खूपच मोठी गोष्ट आहे. तरुण अनुभव घेण्यासाठी बेकरार असतो. पडायची, ढोपर फुटायची चिंता तो करत नाही. मग छोटेछोटे रोजचे अनुभवही आयुष्य जगण्यासाठीची नवी ऊर्मी बनून येतात. जगण्याचा प्रत्येक घोट कसा मस्तीत एन्जॉय केला पाहिजे, ते ही कविता सांगत येते.

आमच्या सगळ्यात मोठ्ठ्या साहेबांशी
त्यांच्याच दालनात मनसोक्त गप्पा मारल्या.
मार्क्स... लेनिन... माओ... स्टॅलिन... चार्वाक...
सगळे पालथे घातले.
धुव्वाधार चर्चा झाल्यावर
साहेब अधिका-यांच्या मूत्रीघरात गेले
आणि
आम्ही कामगारांच्या.

हा पुस्तकांतल्या फिलॉसॉफ्यांचा फोलपणा त्यांच्या अनेक कवितांतून भेटत जातो. जगणं महत्त्वाचं. त्यासाठी पोथ्यांमधून बाहेर पडायलाच पाहिजे. पण क्रांतीचे नारेच आपल्याला पोथ्यांमधे अडकवून ठेवतात आणि पोथ्यांत अडकल्यामुळे क्रांत्या कधी होतच नाहीत. हे विषचक्र आपल्याला कळतच नाही. त्यासाठी स्वतःच्या सगळ्या ओळखी बाजुला ठेवून स्वतःकडे आत वळून पाहण्याची गरज असते. ते लोकनाथजी वारंवार अधोरेखित करून सांगतात. हे असं आत वळून बघणं सोपं नसतं. स्वतःवरचे मुखवटे काढून स्वतःला तपासणं सोपं नसतं. कारण हेच मुखवटे आपलं अस्तित्व बनलेले असतात. जातीचा, धर्माचा, कामाचा, भाषेचा, देशाचा असा कुठला तरी मुखवटा आपल्याला लागतोच लागतो. तो मुखवटा नसेल तर पायाखालची फरशी हरवते. मग स्वतःच्या पायावर उभं राहायला खूप धडपडावं लागलं. हा संघर्ष, ही स्वतःची परीक्षा या कवितांत आहे. आणि हे फक्त हवेचे बुडबुडे नाहीत. स्वतःचा अस्सल अनुभव आहे. ही कविता स्वतः तावून सुलाखून उभी आहे.

आणि सरतेशेवटी काय झाले?
सारे आतल्या तुरुंगातून
बाहेरच्या तुरुंगात आले!

ही तीन ओळींची कविता म्हणजे या संघर्षाचं उत्तम उदाहरण आहे. या कवितेचं नाव धर्मान्तर आहे, हे कळल्यावर याला वेगळंच परिमाण मिळतं. बाबासाहेबांच्या धर्मांतर या एका महान आंदोलनानं गावकुसाबाहेरच्यांना खरं बळ मिळालं. जगण्याचं नवं कारण सापडलं. माणूसपणच त्यांच्याकडे चालत आलं. ही इतकी मोठी गोष्ट आहे की तिच्यातून निर्माण झालेल्या अंकुराला तिच्याकडे तटस्थपणे नाही पाहता येत. आईच्या मायेची मीमांसा नाही करता येत. तरीही लोकनाथजी हे धाडस करतात. कोणताही आव न आणता ते करून दाखवतात. त्यांची सहजता हेच त्याचं मोठेपण आहे. माणूस म्हणून स्वतःचा शोध घेणाऱ्याला आतल्या तुरुंगातून बाहेरच्या तुरुंगात जाणं, हा नेहमीचाच अनुभव असतो. त्यामुळे ही कविता जगण्याचा एक मोठा अनुभव कवेत घेते. स्वतःच्या संस्कारांना प्रश्न विचारणं म्हणजे जात तोडणं. ते इथे पाहता येतं. या तीन ओळीतला एकेक शब्द वाचताना अंगावर काटा उभा राहतो. असं लिहिणं ही वाटती तितकी साधी गोष्ट नाही.
असे प्रश्न विचारायला फार मोठी हिंमत लागते. ती हिंमत तरुणाकडेच असते. तरुण असाल तरच असं आक्रित करता येतं. व्यवस्थेचा भाग बनायचं नाकारणं कठीण असतं. पण प्रस्थापित व्यवस्थेचा भाग बनायचं नाकारताना स्वतःच नवी प्रस्थापित व्यवस्था न बनवणं त्यापेक्षा कठीण असतं. कुणी आपल्याला कितीही प्रस्थापित करायचा प्रयत्न करत असलं, तरी ते हसत हसत झटकायचं आणि आपण भणंगपणे जगत राहायचं, हे अधिकच कठीण. व्यवस्थेने आपला लडिवाळ हात आपल्या खांद्यावर ठेवू नये, यासाठी लोकनाथजी सजग असतात. आज त्यांची पुस्तकं युनिवर्सिट्यांमधून लागली आहेत हे बरं झालं. पण ते प्राध्यापक झाले नाहीत हे त्यापेक्षाही बरं झालं. प्राध्यापकपण भल्याभल्यांचं माणूसपण संपवून टाकताना आपण आजूबाजूला बघत असतो. सरकारी नोकरीविषयीही हेच. लोकनाथजी नेहमीचे सरकारी बाबू न बनता वीज मंडळातले कर्मचारी बनले हे या सगळ्यात बरं झालं. त्यामुळे त्यांच्या विद्रोहाला काही केल्या कांजी झाली नाही.

माझा मुलगा सकाळी मी उठण्या अगोदरच
बाहेरच्या स्वच्छ हवेतून फिरून आलेला असतो.
..
काल तो माझ्या कार्यालयात आला-
म्हणालाः पप्पा! तुम्ही ठेंगू लोकांना साहेब कसे म्हणता हो?
मी बोलण्यापूर्वीच
त्याने माझ्या ओठांवर हात ठेवला.
..
जातांना पुन्हा बोलला,
तुम्ही या मेलेल्या लोकांत कसे इतके दिवस काढलेत?
मी नोकरी करणार नाही!
तृतीयपंथी आयुष्य करणार नाही!
लाथ मारीन तिथून पेट्रोल काढीन.
..
बेटा...
आमचे कधी काही खरे नव्हते
तुझे भविष्य उज्ज्वल आहे.

खरं सागां, असं कोण सरकारी कर्मचारी लिहू शकेल. नोकरी हे आपलं सर्वस्व नाही, हे ठणकावून सांगणं सोपं नाही. वीज मंडळात कामाला असतानाही ते फक्त कवितांमधूनच नाही तर जाहीर भाषणांमधून मंत्र्यांविरुद्ध, राज्यकर्त्या पक्षांच्या नेत्यांविरुद्ध, सरकारी धोरणांविरुद्ध बिनधास्त बोलतात. या प्रेमात पाडणाऱ्या मस्तीमुळेच ते इतरांपेक्षा खूप वेगळे होऊन जातात. एनजीओकरणामुळे सामाजिक आंदोलनांचं कायमस्वरूपी नुकसान झालं. तसंच सरकारी नोकरांनी दलित चळवळींचं नुकसान केलं आहे. वर्षानुवर्षं दलित चळवळीची मुख्य रसद रस्त्यावरच्या कष्टकरी कार्यकर्त्याच्या तळमळ हीच होती. आता सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक आधार ही तिची मुख्य रसद बनली आहे. त्यामुळे व्यवस्था उध्वस्त करण्याचे तिचे मनसुबे गलितगात्र झाले आहेत. मुळात प्रस्थापित व्यवस्थेच्या आधारे उभी राहणारी चळवळ कशी काय व्यवस्थेला धक्के देणार? त्यामुळे इथे गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून दिली की तो बंड करून उठत नाही तर नवी योजना कोणती आहे, असं विचारतो. या पार्श्वभूमीवर लोकनाथजींचं वेगळेपण आणि मोठेपण नजरेत भरतं. राखेच्या डोंगरात आग भडकवणारा हा निखारा. म्हणून त्याचं मोल मोठं आहे.

तुम्ही नोकरीतून रिटायर्ड काय झाले
तुमची दुनियाच संपून गेली.
बरे झाले, पिचलेल्या बांधवांच्या अपेक्षांचा अंत झाला.
बिचारे नुसतीच आशा लावून होते तुमच्याकडून
बुद्धाच्या करुणेने.
तुम्ही मात्र निमगांडू.
...
बाबांनी स्वप्नं दिलीत.
संपूर्ण समाजच स्वप्ने बघू लागला
तुम्ही स्वप्नाच्या गाडीत चढले अन् अदृश्य झाले.
वेळेची महिमा! दुसरं काय?
तुमचे तर व्यवस्थित पार पडले
आता शरीरावर चढलेले चरबीयुक्त मांस
आणि ढेरपोट घेऊन तुम्ही
सपत्नीक विपश्यना करता – चांगलं करता!
यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही.

दलित नेत्यांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांनी दलित चळवळीचं केलेलं नुकसान जास्त मोठं आहे. नेत्यांना शिव्या देणं सोपं आहे. पँथर्सनी रिपब्लिकन नेत्यांना शिव्या दिल्या. पण दुसऱ्यांच्या ज्या चुका दाखवल्या त्याच त्याच स्वतः पुन्हा पुन्हा केल्या. आता त्यांना कोण जाब विचारणार होतं? या महत्त्वाच्या वळणावर लोकनाथजींच्या कविता आल्या. त्यामुळे फक्त आवेश इथे नाही. विद्रोहाचा एक मुक्त तरीही संयमित अविष्कार इथे आहे. सरकारांच्या कारभाराचा लेखाजोखा करणारा कॅग रिपोर्ट दरवर्षी येतो. आम्हा पत्रकारांना त्यात भरपूर बातम्या सापडतात. सरकारी व्यवस्थेचाच एक भाग बनून सरकारच्या व्यवहारांतल्या चुका त्यात दाखवलेल्या असतात. लोकनाथजींची कविता मला तशी वाटते. या कवितेने चळवळीत राहूनच चळवळीत जागल्या बनण्याचं कर्तव्य पार पाडलंय.

वारसाहक्क सांगणारी अनौरसांची माळ
जगते आहे-
जयंत्या-पुण्यतिथ्यांतून
..
त्यातला तो थोर!
ज्याचे भिकेचे भांडे मोठे.

लोकनाथजींच्या कवितेत प्रचंड आत्मपरीक्षा आहे. प्रचंड अस्वस्थतेतून याचा जन्म आहे. त्यामुळे या कविता थोड्याबहुत संवेदनशील माणसालाही अस्वस्थ करून जातात. मान आत वळवायला भाग पाडतात. स्वतःची समीक्षा करायला लावतात. आपल्यातला भीमराव मेश्राम तपासून बघायला सांगतात. आपल्यात कुठे सुनील खांडेकर आहे का याची आठवण करून देतात. आपल्याला माधुरी अग्निहोत्री मी तुझ्यावर प्रेम करते, असं म्हणू लागली आहे का, ही आपल्यातल्या खऱ्या खोट्याची लिटमस टेस्टच समोर ठेवतात. आणि हे करत असताना त्यात अनेकदा छान मिश्किलपणा येतो. याचं कारण हे सगळं स्वतः अनुभवून आलेलं आहे, म्हणून आपल्याला आपलं वाटतं. या कवितांची संख्या तुलनेने कमी आहे. ते स्वाभाविक आहे. आता त्याच्या पुढे जाऊन ते आपली समानधर्मा कविता शोधून तितक्यात ताकदीने मराठीत आणत आहेत. जेरबंद आलं. पण तितक्याच तोलामोलाचे अनेक अनुवाद अद्याप पुस्तक म्हणून अप्रकाशित आहेत. आम्ही त्याची वाट पाहतो आहे. आम्हाला अधिक समृद्ध व्हायचं आहे.
जाता जाता एक छोटी रूखरूख. लोकनाथजींच्या विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत. मातीच्या पोटातून आयुष्य जन्माला घालणाऱ्यांना मरणाला आपलंसं करावंसं वाटत आहे. कुठेतरी त्यांची वेदना लोकनाथजींनी मांडायला हवी होती, असं वाटतं. बैल या कवितेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा उल्लेख येतो. कविता म्हणून ती उत्तम आहेच. पण त्याला शेतक-यांच्या उपहासाची झालर आहे. जोतिबांनी दलित आणि शेतकरी यांच्या वेदनेला एकाच वेळी स्वर दिला. पण दुर्देवाने पुढे दोन्ही सूर वेगवेगळेच राहिले. आतल्या बाहेरच्या तुरुंगांच्या पलीकडे पाहायची क्षमता असणाऱ्या लोकनाथजींकडे हे दूर असलेले सूर एकत्र आणण्याची क्षमता निर्विवाद आहे.
शेवटी माझी सगळ्यात आवडीची कविता, जागृती. लोकनाथजींविषयी लिहिताना ती कुणीच कधी मुद्दामून कोट केल्याचं मला माहीत नाही. कुणी तिच्याविषयी कधी काही बोलतही नाही. तरीही तिला तोड नाही. सोशल नेटवर्किंगच्या नव्या जगात तर ती मला अधिकच महत्त्वाची वाटू लागली आहे. ती त्यांच्या इतर कवितांपेक्षा महत्त्वाची आहे की नाही, हे मला माहीत नाही. मला फक्त इतकंच माहीत आहे की इथे तिथे थोडंबहुत लिहिताना या कवितेने मला बळ दिलंय...

अंधार झाल्यावर आमची टोळी
शहरात जिथेजिथे पत्रके चिकटवायला लागली
आम्ही डोळ्यात तेल ओतून
चिकी आणि पत्रके संपविली.
...
उद्या नेमके काहीतरी होणार या उत्साहात
आमच्या निजेल्या शरीरात नवचैतन्य.
...
भिंती बोलू लागल्या
रस्तेही बोलू लागलेत सकाळ झाल्यावर.
...
शहर मात्र नेहमीसारखे शान्त
आमचा उत्साह निस्तेज
लोक आपआपल्या कामात.
...
हप्ता झाला तरी कुठे काहीही नाही,
काही काहीच नाही,
सगळे पूर्वीसारखे गुपचूप.
...
काल संथ शहरात फेरफटका मारल्यावर
एक जाणवले
लोक आता समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालूनच पुढचे बोलतात.



4 comments:

  1. बापरे किती विद्रोही लिहलंय. जिगर लागतं असं लिहायला.

    ReplyDelete
  2. सचिन परब,

    हा घ्या निमगांडूपणाचा अस्सल नमुना :
    आरक्षणाचा अभिमान बाळगा (http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/devyani-khobragade/articleshow/30690090.cms)

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  3. Shailendra Khopkar27 July 2014 at 20:44

    कठीण कठीण कठीण किती

    ReplyDelete
  4. लोकनाथ यशवंत.... अप्रतिम लिहिलंय सर...

    ReplyDelete