Tuesday 16 February 2016

पुन्हा आदरणीय कॉम्रेड

१६ फेब्रुवारी २०१५. भल्या सकाळीच एसेमेस आला कॉम्रेड गोविंद पानसरेंवर हल्ला झाला. पण त्याची भीषणता कळली नव्हती. कणकवलीहून अंकुश कदमचा फोन आला. तो हादरलेला होता. त्याने सांगितलं तेव्हा टीव्ही बघायला घेतला. चारही बाजूंनी माहिती मिळत होती. पण समजून घेण्याची क्षमताच संपल्यासारखं बधीर झालो होतो. त्याला आज एक वर्षं झालं.


वाटलं होतं कॉम्रेड बरे होतील. कोल्हापुरातून तसे मॅसेज येत होते. का कोण जाणे मुंबईत हलवण्याचा निर्णय झाला. तेव्हाच काळजात चर्रर्र झालं होतं. मुंबईला हलवताच २० तारखेला रात्री उशिरा नको ती बातमी आली. कॉम्रेड गेले. त्या चार पाच दिवसांची अस्वस्थता पिळवटून टाकणारी होती. त्यानंतर वेळ गेला तशी ती ओसरत गेली. थोडं लिहिलं. थोडं बोललो. फेसबूकवर एका मित्राला नको नको ते बोललो. वाफ निघून गेली.

तरीही असा हादरा त्याआधी कधी बसलेला नव्हता. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला एक स्वतंत्र घटना म्हणून पाहिलं होतं. तेव्हा धक्का बसला होता. पण कॉम्रेडच्या जाण्याने त्या दोन्ही हत्यांचा एकत्र मोठा हादरा बसला होता. आता लढाई सुरू झाली आहे, हे जाणवलं. आतून जाणवलं. लढाईसाठी तयारीला लागायचं तेव्हाच ठरलं.

अर्थात ती तयारी हवी तशी होत नाही. सध्या महाराष्ट्रापासून लांब गोव्यात आहे, करत असलेल्या नोकरीच्याही सगळीकडे असतात तशाच मर्यादाही आहेत, घरसंसाराची नेहमीची कामं आहेत. प्रयत्न सुरू नाहीत असं नाही. पण सगळंच तोकडं आहे. दुसरीकडे गेल्या वर्षभरात परिस्थिती अधिक बिघडते आहे. डॉ. कलबुर्गींचाही खून झाला आहे. आणखी हादरलो आहोत.

तयारी करायचीय. स्वतःला तयार कऱणं सर्वाधिक महत्त्वाचं. गेल्या वर्षभरात स्वतःत जाणवण्यासारखे बदल होत आहेत. भाषणांमध्ये धार आली आहे. हे कसं होतंय तेच कळत नाही. लिखाणाच्या बाबतीत गांभीर्य आलेलं आहे. संधी मिळेल तिथे वेळ काढून आपले तोडकेमोडके विचार मांडायचा आग्रह वाटू लागला आहे. आधी तसं नव्हतं. उगाच प्रतिक्रियात्मक वागावं असं वाटत नाही. उगाच काहीतरी उथळ करून मोकळं व्हावं असंही वाटत नाही. थोडा जास्त शांत होतो आहे.

तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलंय. एक शिपाई विचारतो, हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल, मग लढू कोणत्या हातांनी. ढाली तलवारी खूप आहेत. लढण्यासाठी तयार हात अजून तयार नाहीत. वे मुतमईन हैं पत्थर पिघल नहीं सकते, मैं बेकरार हूं आवाज में असर के लिए. दुष्यन्त म्हणतो, ते निश्चिंत आहेत हे दगड विरघळणार नाहीत म्हणून, मात्र मी माझ्या आवाजातल्या प्रभावासाठी आतुर झालोय. आपल्या विवेकानेच खडक विरघळणार आहेत. माझा सक्रिय विवेक महत्त्वाचा. तो जागता ठेवायला हवा. काम करता राहायला हवा. द्वेषामुळे विवेक संपतो. त्यामुळे द्वेष नकोच कुणाचा. मग तो शत्रू कुणीही असो. त्याला प्रेमानेच जिंकता येऊच शकतं. विवेकानेच जिंकता येऊच शकतं. विचारांनीच जिंकता येऊच शकतं.

शिरस्त्याप्रमाणे काहीतरी सोबत जोडायला हवं. `रिंगण` २०१५च्या संत जनाबाई विशेषांकाचं संपादकीय सोबत जोडतोय. अनेकांना ते आवडलं होतं. आज सकाळीच पुन्हा एकदा वाचून काढलं.

आदरणीय कॉम्रेड

कॉ. गोविंदराव पानसरे,

हे `रिंगण` तुम्हाला अर्पण करतो आहोत. तुमच्या हौतात्म्याला समर्पित. त्यानिमित्ताने तुमच्यातला विवेकाचा निखारा आमच्यात जळत राहावा म्हणून.

आधी डॉ. दाभोलकरांचा खून झाला. नंतर तुमचा. त्याला आता पाच महिने होत आलेत.  तेव्हा आम्ही सगळे हादरलो, रागावलो, चरफडलो, अस्वस्थ झालो. आता आपापल्या कामात बुडालो आहोत. कधीतरी आठवलं की वैताग होतो तेवढाच. हे असं चालायला नको, आम्ही शांत बसायला नको, हे माहीत आहे. कळतं, जळतं पण वळत नाही. तुम्ही आमच्यासाठी शहीद झालात, पण आमचं सगलं छान शांत मस्त सुरू आहे.

संत जनाबाईंचं हे `रिंगण` तुमचंच आहे. तुम्ही देव मानत नसाल, पण जनाईला मानत होतात, हे आम्हाल पक्कं माहीत आहे. जनाबाईंचीच विवेकाची पताका तुम्ही जन्मभर खांद्यावर घेतली होती. त्यामुळेच तुम्हाला संपवण्यात आलं. जनाबाईंसाठी चंद्रभागेच्या वाळवंटात बडव्यांनी उभारलेल्या सुळाचं पाणी झालं होतं. तेच बडवे तुम्हाला छत्रपती शाहूंच्या कोल्हापुरात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून गेले. डॉक्टरांनाही मारणारे तेच होते. सूळ आता साडेसातशे वर्षांपूर्वी होते तसे पातळ उरलेले नाहीत. पाणी आलं, ते आमच्या डोळ्यांत. फक्त दोनचार दिवसांसाठीच. आता सुकलंय सगळं.

कॉम्रेड, पुढच्या वर्षीचं `रिंगण` कुणाला अर्पण कुणाला अर्पण करावं लागेल, त्याची तयारी अविवेकाच्या मंडपात सुरू असेल. इथे विवेकाच्या मंडपात त्याचं कुणाला काहीच दिसत नाही. फक्त अहंकाराचे आणि आळसाचे टेंभे भकाभका जळत आहेत. तरीही एक सांगायचंय, तुमच्या खांद्यावरची विवेकाची पताका खाली पडू देणार नाही. ते निशाण फडकत ठेवण्यासाठी आम्हा तरुणांची लढाई सुरूच राहील. विवेकाची दिवाळी साजरी होणारच, जनाबाईंच्या साक्षीने शब्द देतो आहोत तुम्हाला.


1 comment: