Tuesday 23 February 2016

यंदा संत निवृत्तीनाथ

त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांची समाधी
कालच पुणे विद्यापीठातल्या संत नामदेव अध्यासनातून दत्तोपासक सरांचा व्हॉट्सअप मेसेज आला होता. आज संत निवृत्तीनाथांची जयंती आहे. घरच्यांचेच वाढदिवस लक्षात असतात ते नशीब. निवृत्तीनाथांची जयंती लक्षात राहणं कठीणच. त्यामुळे दत्तोपासक सरांना थँक्स म्हणायलाच हवं.

यंदा निवृत्तीनाथांची जयंती विसरून कसं चालेल. २०१६चा रिंगणचा अंक निवृत्तीनाथांवर करायचा, हे गेल्या वर्षीच्या रिंगणमध्येच ठरलंय.
निवृत्तीनाथांवर अंक कसा होणार? त्यापेक्षा निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाईंवर एक कॉमन अंक करा. असा प्रेमाचा सल्ला सर्वच जण देत होते. कारण ज्ञानेश्वर माऊलींशिवाय निवृत्तीनाथांचा वेगळा विचार झालेलाच नाही. शिष्याच्या प्रभावात या गुरूने अंधारात राहणंच पसंत केलंय. पण माऊलींपासून निळोबांपर्यंत सगळेच संत निवृत्तीनाथांसमोर इतके नतमस्तक होताना दिसतात, की बस रे बस. माऊलींच्या अभंगगाथेत निवृत्तीनाथांचे साडेतीनशेपेक्षा थोडे जास्त अभंग सापडतात. पण त्यापलीकडे निवृत्तीनाथांवर खास असं काही सापडत नाही. दर्जाचं सोडाच पण आकाराने ज्यांना पुस्तकं म्हणावं अशाही त्यांच्यावरच्या पुस्तकांची संख्या दोन-तीनच्या वर जात नाही.

अशावेळेस पत्रकार असण्याचा फायदा होतो. त्यामुळे काही फारसं हातात नसलं तरी निवृत्तीनाथांच्या कृपेने अंकाचा आराखडा डोक्यात तयार होताच. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेने लवकर कामालाही लागलो आहोत. निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो. तिथे नाथसमाधीपाशी अंकाचा संकल्प सोडला. आता आराखडा तयार झालाय. लेखकांशी संपर्क साधतो आहोत. अंक आकाराला येऊ लागला आहे. जाहिरातपत्रकही छपाईला जाण्याच्या तयारीत आहे. यापुढचे संत अधिकच दुर्लक्षित असणार बहुदा आणि दरवर्षी हे काम अधिकाधिक कठीण होत जाणार, असं आताच दिसू लागलंय.

दुसरीकडे दरवर्षी प्रतिसादही वाढू लागलाय. यंदा पाच हजार अंक छापायचेच असं ठरवलंय. त्यामुळे खर्च वाढणार आहे. आजवरचे अंक खर्चाची कशीबशी हातमिळवणी करून झालेत. दरवर्षी तहान लागली की नव्याने विहीर खोदावी लागते. जाहिरातींसाठी यंदा जास्त जोमाने कामाला लागायचं आहे. थोडे पैसे उरवून ठेवायचे आहेत. त्यातून वर्षभर कार्यक्रम करता यायला हवेत. पुस्तकं करता यावीत. ती वाचकांपर्यंत पोहचवता यावीत. चोखोबांच्या अंकाचं पुस्तक तयार आहे. प्रकाशित करायचंय. आजऱ्याच्या अक्षर प्रकाशनचे सुभाष विभुते जनाबाईंचा अंक काढत आहेत. अत्यंत कमी किमतीत पुस्तक देण्याची त्यांची योजना आहे. त्यांची तयारी झालीय. पण आम्हीच कमी पडतो आहोत वेळ पाळण्यामधे.

अडचणी नाहीत असं नाही. पण सगळं सुरळीत होणारच, खात्री आहे. कारण त्यात मजा आहे. आनंद आहे. आम्ही हे सारं आमच्या आनंदासाठी करतो आहोत. एका संताच्या विचारसानिध्यात काही महिने तरी राहायला मिळावेत, यापेक्षा आनंदाचा दुसरा सोहळा नाही. निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरहून इतर पालखी सोहळ्याच्या खूप अगोदर निघते. त्यामुळे अंक जवळपास पंधरवडाभर लवकर काढावा लागणार आहे. पुस्तकांची जुळवाजुळव आहेच. प्रकाशन एखाद्या मोठ्या कार्यक्रमात करता येईल का, याची तयारी सुरू आहे. शिवाय आणखी एक कार्यक्रम लवकरच हाती घेत आहोत. हे सगळं जुळून यायला हवं.

स्वतः सद्गुरू निवृत्तीनाथांनीच आमच्या हातून सगळं करून घ्यायचंय, अशी नम्र भावना आहे.

बोला पुंडलिका वरदे हारि विठ्ठल...

No comments:

Post a Comment