Friday, 6 January 2017

१ जानेवारी १८१८

श्रीरंगजी म्हणतात पत्रकारितेतले अनेकजण मधूनच कोमात जातात. म्हणजे ते मेन स्ट्रीममधे दिसत नाहीत. आर्थिक गणित बिघडलेलं असतं. समोर दिशा कळत नाही. कुछ जमता नही. सप्टेंबरच्या आसपास रिंगणचं काम संपल्यानंतर मीपण तसा कोमातच जमा होतो.

माझं श्रीरंगजींना म्हणणं असतं आपण अधूनमधून कोमात असणारच. तेव्हाही आपण नाचतच राहायला हवं, शुद्धीवर असताना नाचतो तसेच. सगळं सुरळीत असताना कोमा स्वतःहून ओढावून घ्यायची खाज असेल तर असं पॉझिटिव राहण्याशिवाय गत्यंतरही नसतं. तरीही कधीतरी निराशा येऊनच जाते. १६च्या शेवटचे चारपाच दिवस तसे होते. पण नव्या वर्षात सगळी जळमटं फेकली गेली. हॅपी न्यू इयर.

दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत माझा कॉलम सुरू झाला. थँक्स टू प्रशांत पवार, शेखर देशमुख आणि प्रमोद चुंचूवार. लिहित राहायला हवं, म्हणून मुद्दामून तो मागून घेतलाय. पहिला १ जानेवारीचा लेख आठ-दहा दिवस आधी पाठवायचा होता. इतक्या लांबचं काय लिहायचं, हा प्रश्न होता. अचानक भीमा कोरेगाव आठवलं. गेली सहा सात वर्षं तरी १ जानेवारीला तिथे जाण्याचा प्लान करत होतो. अजूनही तो दिवस गाठणं शक्य झालेलं नाही. पण लेख लिहायचा म्हणून तिथे जाऊन आलो. श्रीरंगजी सोबत होतेच.

लेख इतिहास सांगण्यासाठी लिहायचा नव्हताच. देशभक्ती म्हणजे काय, याविषयीचे प्रश्न त्यानिमित्ताने शोधायचे होते. उत्तरं तयार नसतातच. ती मिळतही नाहीत. तरीही प्रश्न पडायलाच हवेत. आपण सर्व प्रश्नांच्या उत्तरांची दिशा एकच असते. त्या दिशेने आपली वाटचाल थांबायला नको. लेख लिहिताना मात्र प्रश्नांची चर्चा करताच आली नाही. भीमा कोरेगाव हे आहे तरी काय, हे समजावून सांगतानाच शब्दसंख्या संपत आली. पुन्हा पुन्हा एडिट करून ती कमी केली आणि शेवटच्या दोन पॅरेग्राफमधे गुंडाळलं जेवढं जमलं तेवढं. समाधान झालं नाही. थोडा नाराजच होतो.

नव्या वर्षाला सकाळी आठ- साडेआठला साखरझोपेत असताना पहिला फोन वाजला. अमरावतीहून आमच्या प्रदीपभाऊ पाटलांचा. तो ठेवत नाही तर दुसरा, तिसरा, सुरूच राहिलं. आज सहा तारीख. अजून फोन एसेमेस येत आहेत. अकोला, माजलगाव, अहमदनगर, भुसावळ, सोलापूर, औरंगाबाद असे कुठून कुठून फोन सुरूच राहिले. एकूण साठ सत्तर तरी फोन आले असतील. बिलकूल अतिशयोक्ती नाही. सगळे इतकं भरभरून बोलत होते की प्रत्येक फोनगणिक बळ मिळत होतं. खोटं वाटेल, पण कान इतके दुखायला लागले की डॉक्टरला विचारून कानात ड्रॉप्स टाकावे लागले.

शिवाय आठदहा मेल आले असतील. प्रशांतजींनी व्हॉट्सअप आणि फेसबूकवरही लेख शेअर केला. व्हॉट्सअपवर प्रचंड पसरला. व्हॉट्सअप आल्यापासून म्हणजे गेली तीनचार वर्षं मी जे काही लिहिलं ते गोव्यात. या निमित्ताने व्हॉट्सअपची जादू काय आहे, ते अनुभवता आलं. भीमा कोरेगाव शौर्यदिनाचा फ्लेक्स लावला म्हणून कोल्हापुरातल्या इंगळी गावात राडा झाला. तिथेही हे खूप वायरल झालं म्हणे. तिथून दोन्ही बाजूंचे तीन फोन आले. आपल्या मस्तानीचे थोरले बाजीराव वेगळे आणि शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव वेगळा हे अनेकांना माहीत नव्हतं. आश्चर्य वाटलं.

संजय सोनवणींची एक कादंबरी आहे, `आणि पानिपत`. मराठीतली सबाल्टर्न हिस्ट्रीच्या अंगाने जाणारी एक महत्त्वाची कादंबरी आहे. शिवशाही ते पेशवाई या काळात महार समाजाचा प्रवास कसा झाला असेल, याचीं इतिहासावर आधारित कथा त्यात आहे. शिवरायांच्या काळात महारांना मिळणारा सन्मान ते पेशवाईतील मानहानी वाचताना आपण हादरत जातो. पेशवाईच्या काळातही मराठी समाजाचं शौर्य कमी नव्हतंच, उलट दिल्लीचं तख्त राखून ताकद वाढलीच होती. असं असताना झालेल्या अधःपतनाचं कारण सामाजिक शोषणात शोधावं लागतं. त्यादृष्टीने भीमा कोरेगावच्या लढाईकडे पाहायला हवं. शिवाय संजय क्षीरसागरचा पेशवाईवरचा ब्लॉग आहे. अफलातून तटस्थतेने हा दलित तरुण इतिहासाकडे पाहतो, ते वाचून त्याला सलाम करावा लागतो.

सोशल मीडियावर गेली चारपाच वर्षं तसा अक्टिव नव्हतो. बोळा निघाला. आता ब्लॉगवरही लेख लिहायला हवाय, या कर्तव्यभावनेने लेख लिहिलाय. लवकरच आणखी एक लेख टाकतोय. वाचा. सांगा कसा वाटला तो.
....

पुण्याहून अहमदनगरच्या दिशेने लागलं की एकामागून एक गावं लागतच राहतात. हायवेच्या शेजारामुळे ती आता धड गावं उरली नाहीत, पण ती अजून शहराचा भागही झालेली नाहीत. भीमा कोरेगाव त्यातलंच एक. गाव लागण्याआधी भीमा नदीवरचा मोठा पूल लागतो. त्याआधी असलेल्या रस्त्याने थोडंसं खाली उतरलं की आपली मान आपोआप वर जाते. हायवेवरून दिसतो त्याच्याहीपेक्षा हा दगडी स्तंभ खूप उंच असतो. दहा बारा माणसांच्या उंचीएवढा तरी. चौथऱ्यावर चढलं की संगमरवरी लादीवर मराठी आणि इंग्रजीत लिहिलेली माहिती वाचता येते.

इंग्रजांनी या स्मारकाला मराठीत `जयस्तंभ` असं म्हटलंय. १८१८ च्या १ जानेवारीला इथे घनघोर लढाई झाली. इस्ट इंडिया कंपनी विरुद्ध पेशव्यांच्या फौजेत. कॅप्टन स्टॉण्टनच्या नेतृत्वात इंग्रजांचं सैन्य होतं अवघं ८३४ जणांचं. त्यात बॉम्बे नेटिव रेजिमेण्टचं ५०० सैनिकांचं पायदळ. पूना ऑक्झिलरी हॉर्सेसचे ३०० घोडेस्वार आणि मद्रास आर्टिलरी या तोफखान्याचे २४ जण. विरोधात दुसऱ्या बाजीराव पेशव्याचं २८ हजारांचं सैन्य होतं. बापू गोखले आणि त्रिंबकजी डेंगळे यांनी गोळा केलेल्या सैन्यात  २० हजार अरबी घोडेस्वार, गोसावी, मराठे मिळून संख्या २८ हजारांपर्यंत गेली होती. आता पेशव्यांचं सगळं सैन्य या लढाईत लढलं की त्यातले काही रावबाजीला घेऊन आधीच पुढे गेलं होतं, याविषयी निश्चितपणे सांगता येत नाही. पण एवढं नक्की की इंग्रजांच्या तुलनेत पेशव्यांचं सैन्य मोठं होतं, कदाचित अनेकपट मोठं.

पुण्यातून परागंदा झालेला पेशवा फूलगावरून बहुधा साताऱ्याच्या दिशेने चालला होता. स्टॉण्टनचं सैन्य शिरूरहून पुण्याच्या दिशेने निघालेलं होतं. रात्रभर प्रवास करून दमलं होतं आणि कोरेगावापर्यंत पोहोचलं होतं. तेवढ्यात पेशवा सैन्यातल्या अरब घोडेस्वारांनी त्यांना वेढा दिला. त्याला इंग्रजांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. ही लढाई लगेच निर्णायक ठरण्याची शक्यता नव्हतीच. कारण पेशव्यांनाही इंग्रजांपासून शक्य तितकं लांब पळायचं होतं. पेशव्यांच्या मागे लागून त्यांना संपवण्याइतकं बळ आणि त्राण इंग्रज सैन्याकडे नव्हते. इंग्रजांच्या तोकड्या सैन्यानं पेशव्यांच्या सैन्याला मर्मभेदी तडाखा दिला, हे नक्की. त्यानंतर पन्नास दिवसांनी झालेल्या आष्ट्याच्या लढाईत त्याचं प्रत्यंतर आलं. त्यात बापू गोखलेंना वीरमरण आलं आणि इंग्रजांनी पेशव्यावर मोठा निर्णायक विजय मिळवला. आणखी साडेतीन महिन्यांनी दुसरा बाजीराव इंग्रजांना शरण आला. १८१८च्या जून महिन्यात खऱ्या अर्थाने शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.

इंग्रजांनी दिलेल्या आकडेवारीनुसार त्यांचे २७५ सैनिक एकतर मारले गेले, जखमी किंवा बेपत्ता झाले. त्यांच्या मते पेशव्यांच्या बाजूच्या अशा सैनिकांचा संख्या ५०० ते ६०० होती. इंग्रज पायदळाचे ५० सैनिक मारले गेले आणि तोफखान्यातले १२. तिसऱ्या इंग्रज मराठे युद्धातली एक अनिर्णित तरीही निर्णायक महत्त्वाची लढाई म्हणून भीमा कोरेगावच्या लढाईची नोंद इतिहासात आहे. रियासतकार सरदेसाईंसह मराठी इतिहासकारांनी त्याचं पारडं मराठ्यांच्या दिशेने झुकवलंय, पण तेही किंचितसंच. इंग्रज दस्तावेजांत मात्र याचं विजय म्हणूनच वर्णन आहे. आवर्जून स्मारक बांधावं, इतका हा विजय त्यांना महत्त्वाचा वाटलाय. `One of the proudest triomphs of the British army in the east` असं या विजयाचं वर्णन त्यांनी स्मारकावरच्या शिलालेखात केलंय.

इंग्रज विरुद्ध पेशवा यांच्यातल्या इतर लढायांतली एक असं याला मानता येत नाही. याला एक वेगळा कोन जोडलेला आहे तो तेव्हा अस्पृश्य मानल्या गेलेल्या महार जातीतील सैनिकांच्या शौर्याचा. इंग्रजांच्या पायदळात बहुसंख्य सैनिक हे महार होते. त्यातल्या धारातीर्थी पडलेल्या ५० जणांपैकी २२ जणांच्या नावापुढे `नाक` ही तेव्हा महारांच्या नावापुढे लावली जाणारी जोड वाचता येते. छत्रपती शिवरायांनी या लढवय्या जातीला दिलेला सन्मान उत्तर पेशवाईत जाणीवपूर्वक संपवला होता. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंग कीर्तनात वापरले म्हणून श्रीवर्धनच्या ब्राह्मण कीर्तनकाराला शिक्षा देणाऱ्या दुसऱ्या बाजीरावाने महारांच्या स्वाभिमानाचं खच्चीकरण किती केलं असेल, याची कल्पनाही करवत नाही. पुणे परिसरात ब्राह्मण दिसला की त्यांच्यावर सावली पडू नये म्हणून महारांना खाली बसावं लागे. विहिरी जवळ आल्या की जमिनीवरून खरडवत जावं लागे. पायाचे ठसे राहू नयेत म्हणून कमरेला मागे खराटा आणि थुंकीने जमीन भ्रष्ट होऊ नये म्हणून गळ्यात मडकं बांधणं सक्तीचं केलं होतं. रावबाजीने केलेल्या या अन्यायाला उत्तर देण्याची संधी महार सैनिकांना कोरेगावात मिळाली. त्यात त्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा करून पेशव्याची पळता भुई थोडी केली.

या पराक्रमाच्या स्मृतिदिनी जगभर सुरू असलेला न्यू इयरचा जल्लोष सोडून लाख दीड लाख लोक महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशच्या गावांशहरांतून दरवर्षी भीमा कोरेगावच्या स्मारकाला आवर्जून येतात. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर उत्साह असतो, तसाच तो इथेही दरवर्षी पाहता येतो. याचा इतिहास शोधत आपल्याला या विषयाचे अभ्यासक सुधाकर खांबेंकडे जावं लागतं. ते सांगतात, `स्मारक बांधल्यानंतर पुण्यातले अनेक महार सैनिक दरवर्षी १ जानेवारीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमा होत असत. १९२७ साली याच दिवशी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी स्मारकाला भेट दिली होती. तेव्हाचे दोन फोटो उपलब्ध आहेत. तिथल्या भाषणाचं सार धनंजय कीरांनी लिहिलेल्या चरित्रात आहे. काही जण सांगतात की बाबासाहेब दरवर्षी तिथे जायचे. पण तसे काहीच पुरावे नाहीत.`
   
बाबासाहेबांनी भेट दिल्यामुळे हे स्थान त्यांच्या अनुयायांसाठी तीर्थक्षेत्र बनलं आहे. भीमेकाठचं कोरेगाव आता भीमाचं कोरेगाव बनलं आहे. आजच्या नवबौद्धांसाठी हे ठिकाण आपल्या महार पूर्वजांच्या शौर्याचं स्मारक बनलं आहे. त्यावर पुस्तकं लिहिली जात आहेत. ब्लॉग लिहिले जात आहेत. आदर्श शिंदेसारखा आजचा आघाडीचा गायक शौर्यगाथा गाणारी लोकगीतं गातो आहे. `५०० बॅटल ऑफ कोरेगाव` नावाचा बिग बजेट सिनेमाही यावर तयार होतोय. सोशल नेटवर्किंगवर त्याची अभिमानाने चर्चा होते. मराठ्यांच्या इतिहासातल्या इतर कोणत्याच लढाईला इतक्या लोकप्रियतेचं भाग्य लाभलेलं नाही, लाभताना दिसत नाही.

पण दुसरीकडे परकीय इंग्रज सैन्याने भारतीय पेशव्याच्या सैन्यावर मिळवलेला विजय इतक्या आनंदात साजरा झाल्यामुळे कुणाला देशभक्तीचा उमाळा येऊ शकेल. उघडपणे याला `देशद्रोही` ठरवण्याची हिंमत कुणाची झालेली नाही. सोशल नेटवर्किंगवर याची खदखद क्वचित जाणवते तेवढीच. बँकांच्या रांगांत, सिनेमा थिएटरात उभं राहून आणि व्हॉट्सअप, फेसबूकवर मॅसेज फॉरवर्ड करण्याइतपत आपली देशभक्ती स्वस्त झाली आहे. कुणाच्या देशभक्ती आणि देशद्रोहाच्या तागडया घेऊन बसण्याच्या लायकीचे आम्ही उरलेलो नाही. आम्ही नकाशाला देश मानू लागलो आहोत. देश म्हणजे काय तेही आम्हाला कळत नाही. देशाच्या व्याख्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात खूप सापडतील. पण महात्मा जोतिबा फुलेंची व्याख्या सर्वात आपली आहे. ते म्हणतात, एकमय लोक म्हणजे राष्ट्र. ती खरी मानली तर राजकारभाराचं धोरण म्हणून आपल्याच देशबांधवांना जनावरापेक्षा हीन वागणूक देणारा दुसरा बाजीराव कसा देसभक्तांच्या पाळ्यात धरता येईल? आणि त्यांना संपवण्यासाठी सरसावणारी आपली माणसं देशभक्तच मानायला हवीत ना?

या प्रश्नांची उत्तरं वाटतात तितकी सोपी नाहीत. निष्कर्षाला पोहोचण्याआधी ती एकदा तपासून पाहायला हवीत सर्वच बाजूंनी. त्यासाठी भीमा कोरेगावला जायला हवं. आज १ जानेवारी आहे. पुढच्या वर्षी या लढाईला २०० वर्षं पूर्ण होतील. म्हणजेच यंदा त्याचं दुसरं शताब्दीवर्षं सुरू झालंय. वर्षभरात उत्तर मिळूही शकेल. तोपर्यंत देशभक्तीच्या नावाने खूप काही होणारही आहे.

1 comment:

  1. भविष्य वेध ,विषयाची निवड भारी.मग ती फेमस होईल का व पचेल का याचा विचार न करता केलेली मांडणी.

    ReplyDelete