Friday 27 January 2017

मोर्चा निघावा शूद्रत्वाच्या सन्मानासाठी


मला आलेला मेल. १५ जानेवारीची सकाळ.

परब,
तुमचा लेख वाचला आणि जाणवलं की तुमच्यासारख्या छुपा जातीयवादी माणसाचा जो तर-फडा होत आहे तोच ह्या मोर्चाच्या आयोजनाचा फायदा आहे.
अरे किती दिवस तुम्ही लोक मराठा समाजाला तुमचा गुलाम समजणार?
तो मोदी स्वतः गांधीची जागा घेत आहे तिथे लिहा ना लेख, गोडसेच्या औलादीकडून आम्हांला तत्वज्ञानांची आवश्यकता नाही.
आम्ही दिव्य मराठी पेपर विकत घेवून वाचतो. जरी आज ब्राह्मण पत्रकार 98 टक्के मीडियामध्ये आहे म्हणून आम्ही तुम्हाला फॉलो करणार नाही. जरा व्यावसायिकता जपा आणि लोकांना खोट्या भाकडकथा सांगून पोट भरायचे धंदे बंद करा.
एक मराठा लाख मराठा

मी मेलला रिप्लाय पाठवला. वेळ दुपार.

धन्यवाद मित्रा प्रतिक्रियेबद्दल.
मी लेख लिहिला आहे. मला माहीत आहे, यात मराठा मोर्चाविरुद्ध काही नाही. तरीही मी तो पुन्हा वाचला. मला मराठा मोर्चाविरुद्ध खरंच काही आढळलं नाही.
तुम्ही वाचक आहात. तुम्ही आमचे मायबाप आहात. लेख तुम्हाला समजला नाही, असं मी म्हणणं चुकीचंच आहे. माझ्या लिखाणातच गडबड असावी. तुम्ही ती दाखवून दिलीत तर दुरुस्त करायचा प्रयत्न करेन. फक्त मराठा मोर्चाविषयी तुम्ही सांगता तसंच आणि तुमच्याच शैलीत लिहायचं असेल तर मात्र शक्य नाही.
मी मोदींविरुद्ध लिहिलंय आणि लिहीत राहणार आहे.
बाकी एक विचारायचंय की तुम्हाला माझी जात कोणती आहे असं वाटतंय?
आभार

त्याचा पुन्हा मेल आला. संध्याकाळ.

मी लेख परत एकदा वाचला आणि आता मन शांत झाले आहे! काय करावे आज काल मीडिया म्हणजे सत्ता आणि पैसा (जाहिरात आणि बंद पाकीट) याच्या प्रभावामुळे स्वतःचे स्वतंत्र असल्याचे भान विसरला आहे. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांचे गैरसमज आणि समज हे होणारच!!!


दिव्य मराठीतले लेख छापून आले ते दोन्ही रविवार अशा प्रतिक्रियांचेच होते. फोन. एसेमेस. वॉट्सअप. दोन्ही लेखांना मेलही आले सात आठ. त्यातलीच ही एक मेलामेली. मजा आली. र्हस्व दीर्घ आणि वाक्यरचनेतल्या चुका सुधारून मजकूर जशाच्या तसा ठेवलाय. तिन्ही मेल माझ्या इनबॉक्समधे आहेत.

मराठा मोर्चा सुरू झाल्यापासून लिहिलं नव्हतं. राखीव जागा हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. गरिबीसाठी इतर अनेक योजना आहेत. राखीव जागा या सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी आहेत, असा माझा समज आहे. त्यात मराठा समाजाला कसं बसवायचं, मला कळत नाही. मराठा समाजाचे प्रॉब्लेम आरक्षणाने संपणार नाहीत. ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणात तर त्यांनी वाटा मागूच नये. मराठा संघटनांचा आक्रमकपणा इतरांना माज वाटावा इतपत वाढल्यामुळे मराठ्यांचंच नुकसान झालंय. आरक्षणाच्या मागणीतून किती फायदा झाला आणि किती नुकसान, याचा विचार मराठ्यांनी आता करायला हरकत नाही. मराठ्यांकडे महाराष्ट्राचं स्वाभाविक नेतृत्व आहे. मराठा स्वतःचाच विचार करतो त्यात महाराष्ट्राचं नुकसान आहेच, पण मराठा समाजाचंही आहे. त्याने व्यापक होण्यात महाराष्ट्राचा आणि स्वतःचाही फायदा आहे. त्यामुळे मराठा तरुणांच्या एकूण आक्रोशाकडे केवळ टीकेच्या नजरेतून पाहू नये.

मराठा आरक्षणाशी संबंधित घडामोडी मी माझ्यापरीने समजून घेत होतो. पेपरांमधे चर्चा होण्याआधीपासून लोकांशी बोलत होतो. मराठ्यांचा मोर्चा बघायला मी तुळसीदास भोईटेसोबत अहमदनगरलाही गेलो. मुंबईत मोर्चा आयोजनाची पहिली मीटिंग झाली. तिथंही जाऊन वातावरण पाहिलं. ते होताना माझ्या डोक्यात सुरू असलेलं चक्र मेन ट्रॅकवर चालतच नव्हतं. इतिहासाचा विचार करता बहुसंख्य मराठे शेतकरी म्हणजे शूद्रच आहेत. ते स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेतात. आता ते मागासवर्गीय बनायला तयार आहेत. पण ते स्वतःला शूद्र व्हायला तयार होतील का? आपल्याला ब्राह्मण किंवा क्षत्रिय म्हणवून घेण्यात अनेक शूद्र समाजांनी मोठेपण मानलं आहे. तीच प्रतिष्ठा मानली गेली आहे.

आधुनिकीकरणानंतर वर्णव्यवस्थेचं पेकाट मोडलं. त्यामुळे उच्चवर्णीयांचं धर्माच्या नावावर चालणारं वर्चस्व संपू लागलं. धर्मसुधारकांनी, समाजसुधारकांनी आणि विशेषतः गांधीजींनी त्यावर घणाघात केला. त्यामुळे वर्ण ही गोष्टच निरर्थक होऊ लागली. ज्ञानाची भांडारं उघडी झाल्यामुळे मक्तेदारीला अर्थ उरला नव्हताच. उत्तर पेशवाईत काही समाजांनी स्वतःला ब्राह्मण म्हटलं म्हणून त्यांना प्रायश्चित्त घ्यायला लावलं जाई. प्रबोधनकार ठाकरेंनी या सगळ्या अन्यायाचं डॉक्युमेंटेशन ग्रामण्याचा इतिहास लिहून केलंय. आता तेच उच्चवर्णीय इतरांना संस्कृत शिकवायला तयार झालेत. इतकंच नाही तर जात न पाहता वेद शिकवू लागलेत. गायत्रीमंत्र शिकवू लागलेत. पौरोहित्य शिकवू लागलेत. त्यासाठी ब्राह्मणेतरांचीही मुंज करून त्यांना जानवं घालण्याचंही पुरोगामित्व त्यांनी साजरं केलंय. ब्राह्मण ही जात किंवा वर्ण नसून वृत्ती आहे, असं आता सांगितलं जातं. अर्थात हे करण्याला अधिक कट्टर जातीवादी ब्राह्मणांचा विरोध होता आणि आहेच. शिवाय हे करणारे सगळेच काही वर्णवर्चस्ववादी नव्हते. बहुजनांना ब्राह्मण बनवण्यात समाजाचं भलं आहे अशीही अनेकांची प्रामाणिक समजूत आहे.

लहानपणापासूनच्या धार्मिक संस्कारांमुळे माझीही अशीच धारणा होती. ब्राह्मणी बनण्यात प्रतिष्ठा असते. त्याचं सगळेच कौतूक करत असतात. तसं माझंही होत होतंच. मला वाटतं माझ्यासारख्या कष्टकरी समाजातल्या असूनही लिहिण्यावाचण्याच्या पांढरपेशात घुसू पाहणाऱ्या अनेकांचं असंच झालं असणार. पण हे करताना आपण आपलं स्वतःची मौल्यवान संस्कृती हरवतो आहोत. आपल्यावर इस्त्री फिरते आहे. हे कधीतरी जाणवू लागलं. त्यातून शूद्रत्वाच्या सन्मानाचा विचार पुढे आला असावा, असं वाटतं. मराठा मोर्चाशी याचा काय संबंध आहे, मला माहीत नाही. पण हा लेख मी माझा केलेला पुनर्विचार आहे. माझ्यावरच्या संस्कारांना प्रश्न विचारल्यानंतर मिळालेली ही पुसटशी उत्तरं आहेत. सॉक्रेटिस सांगतो, क्वेश्चन युवर डॉग्माज. माझ्या अस्तित्वाचा दीर्घकाळ आधार असणाऱ्या धारणांना विचारलेले हे प्रश्न आहेत. हे प्रश्न संपलेले नाहीत. सगळीच उत्तरं मिळालेलीही नाहीत. आम्ही पत्रकार जगाला प्रश्न विचारतोच. तीच निमित्तं पकडून स्वतःलाही प्रश्न विचारायला हवेत.

कॉलमच्या मागणीनुसार आठशे नऊशे शब्दांत लेख कोंबणं गरजेचं होतं. काही मुद्दे  अधिक सविस्तर लिहायला हवेत. आमचे कॉम्रेड संपत देसाई मराठा मोर्चाचं डॉक्युमेंटेशन करताहेत. त्यांच्यासाठी हाच लेख सविस्तर लिहायचाय. माझ्या लेखाची वाट बघून ते थकले असावेत. या विषयावर काही मत आहे, असं मला वाटत नव्हतं. आता लेख छापून दहा दिवस उलटून गेले तरी त्याला वाचकांची मनापासून दाद येतेच आहे, त्यामुळे सविस्तर लिहायलाच हवं. कॉम्रेडसाठी नाही, स्वतःसाठी तरी.

नेहमीसारखा जसा छापून आला तसा लेख इथे कॉपी पेस्ट करत नाहीय. मी दिव्य मराठीला पाठवला होता, तसाय हा. शब्दसंख्येनुसार त्यांनी त्यात काही योग्य ते बदल केले होते. मी लेखाला मथळा दिला होता, लहानपण देगा देवा. त्यांनी त्याचं बारसं केलं, मोर्चा निघावा शूद्रत्वाच्या स्वीकारासाठी. छानच. वॉट्सअपवर कदाचित वाचला असेलही. तरीही बघा वाचून पुन्हा एकदा. आता प्रस्तावनेसह.
....

आज ट्रेन असेल तर त्याचं रिझर्वेशन चार महिने आधी सुरु होतं. मुंबईत लांबलांबून येणाऱ्या गाड्यांचं रिझर्वेशन त्याच दिवशी फुल्ल झालेलं असतं. मुंबईतले उद्योगधंदे बाहेर जात आहेत, असं छापून येत असतं. तरीही या गाड्यांमधली गच्च गर्दी काही केल्या कमी होत नाही, लोंढे नव्याने या महानगरीत येतच आहेत. इथल्या इगमगटाचा चुंबक देशभरातून स्ट्रगलरना ओढून आणतोच आहे. या शहरात कुणी भुकेलं झोपत नाही, हे खरं. दम असेल तर कुणीही इथे राज्य करू शकतं, हेही खरंच. आणखीही एक कारण आहे, इथे तुम्हाला कुणी तुमची जात विचारत नाही.

विचारत नसले तरी मुंबईत जात आहेच. जाता जात नाही ती. इथेही सफाई कामगार एकजात दलित असतात. पण सुलभ शौचालयात संडास साफ करणाऱ्या एखाद्याचं जानवं शर्टातून बाहेर लोंबकळतानाही दिसतं इथे. मुंबापुरीच्या बाहेर जात जशी पावलोपावली आडवी येते, तशी ती इथे येत नाही. इथे जातीला वळसा घालून पुढे जाता येतं. म्हणूनच मुंबईत मराठा मोर्चा झाला तर तो कसा होईल, याचं कुतूहल आहे. गर्दी होईलच, याबद्दल वाद नाही. पण मुंबईतले मराठे त्याला येणार का? सरकारी नोकऱ्यांवर अवलंबून नसणारा इथला मराठा तरुण तितक्याच जोरात आरक्षण मागणार का? शेतकरी म्हणून होणाऱ्या अन्यायाशी घेणंदेणं नसणारा मुंबईतला मराठा स्वतःहून ओपनचा बॅकवर्ड क्लास व्हायला तयार आहे का?

प्रश्न आहेत खरे. मोर्चा झाल्याशिवाय त्याची उत्तरंही मिळणार नाहीत. अर्थात आरक्षणाला समर्थन आहे की नाही? या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर देण्यापेक्षा त्याच्या पुढचा विचार करता येऊ शकतो. आरक्षण मिळाल्यानंतरही न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सगळ्यांच्याच मानसिकतेत आहेत. ती बदलायला प्रयत्न करता आला तर बरंय. एक आयडिया आहे. मुंबईत मोर्चा आला की आझाद मैदानात बसवून सगळ्यांना `जाऊ द्या ना बाळासाहेब` दाखवायला पाहिजे.

तसाही कुणी तो सिनेमा पाहिलेला नसणारच. त्यातला हिरो बाळासाहेब माजी आमदाराचा मुलगा आहे. बेवडा आहे, पण मनाने चांगला आहे. त्याच्यासाठी वडिलांनी आमदारकीचं तिकीट आणलंय. त्याची इच्छा नाही. पुण्यात तो चुकून एका नाटकाच्या कार्यशाळेत जातो. तिथे एका मुलीच्या प्रेमात पडतो. चॅलेंज म्हणून गावात नाटक बसवतो. ते करताना त्याला माणूसपण गवसत जातं. साध्या माणसांमधे राहून त्याला त्यांच्या व्यथावेदना उमगत जातात. तो लोकलढ्याचा भाग म्हणून अपक्ष उमेदवार बनून निवडणूक लढवण्यासाठी तयार होतो.

गिरीश कुलकर्णी आणि कंपनी `देऊळ`मधे जिथे गळपटली होती बरोबर तिथेच यातही गळपटलीय. बाळासाहेबासारख्या माणसांत वावरणाऱ्या तरुणाला मातीचं सत्त्व शोधण्याची प्रेरणा पुणेरी शहरी उच्चमध्यमवर्गीय चौकटीत सापडते, हे पटण्यासारखं नाहीच. अजय - अतुल त्या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. त्यांना तरी विचारायचं. त्यांना सापडलेलं मातीतलं गाणं आनंद मोडक आणि सुधीर मोघे कितीही ग्रेट असले तरी त्यांच्या संगीतात सापडलं असतं का? हे जितकं स्पष्ट आहे तितकंच तेही. पण ही एक गोष्ट सोडली तर सिनेमा जबराट आहे. बाळासाहेबाचा सत्तेपासून शूद्र बनवण्यापर्यंतचा प्रवास प्रेमात पाडणाराच आहे.

बाळासाहेबाला झोप येत नसते म्हणून लाइनमन बनलेला भाऊ कदम त्याला काहीबाही वाचून दाखवत असतो. अचानक येणाऱ्या दोन उदाहरणांनी त्याची झोप उडते. गांधीजी भाजी कापत असताना काही वकील येतात. त्यांनाही ते भाजी कापायला लावतात. दुसरं उदाहरण, राजसूय यज्ञात श्रीकृष्ण उष्टं खरकटं उचलतात. सत्तेचा माज दाखवण्यात इतिकर्तव्यता मानणाऱ्या बाळासाहेबासाठी हे नवं असतं. सेवेची थोरवी समजून सांगणाऱ्या अशाच घटना त्याच्या आय़ुष्यात घडत जातात. त्याला त्याच्या जगण्याची लाइन सापडते.

बाळासाहेबाला सापडलेली दिशा ही शूद्रत्वाची आहे. आपल्या देशातल्या कम्युनिकेशन क्रांतीचे खरे प्रणेते सॅम पित्रोदांनी हेच वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. प्लानिंग करणारे ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे अमलबजावणी करणारे शूद्र मात्र तिरस्करणीय, ही मानसिकता वर्णव्यवस्थेमुळे आपल्या डोक्यात फिट्ट बसलीय. त्यामुळे आपल्याकडे श्रमप्रतिष्ठा नाही आणि आपण मागे आहोत. खरंच आहे हे. म्हणूनच आज आऊटडेटेड वाटणाऱ्या वर्णाच्या परिभाषेत बोलणं गरजेचं ठरतं. बुद्धीचं काम करणारे ब्राह्मण. संरक्षण करणारे क्षत्रिय. व्यापार करणारे वैश्य आणि इतर वर्णांची सेवा करणारे शूद्र. ही वाटणी आता राहिलेली नसली तरी त्याची मानसिकता आपल्या सगळ्यांच्या बोकांडी बसलेली आहे. म्हणून आता वेळ आलीय शूद्रवृत्तीचा सन्मान करायची.

खोटं वाटतं तर आपल्या संतांना विचारता येतं. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची महती त्यांनी गायली नाही. त्यांनी सेवाधर्माला सर्वात श्रेष्ठ ठरवलं. सेवा हे शूद्रांचं काम, शूद्रांची ओळखच ती. एकटे रामदास स्वामी ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या धर्माला आवाहन करत होते. बाकीचे वारकरी संत सगळ्यांना शूद्र बनवण्याच्या मागे लागले होते. त्यांनी त्यांच्या लाडक्या पांडुरंगालाही सोडलं नाही. त्या जगनियंत्याने जनाबाईंसोबत धुणीभांडी केली. कबिरांसोबत शेले विणले. एकनाथांच्या घरी पाणी भरलं. सजन कसायांसोबत मांस कापलं आणि चोखोबांसोबत मेलेली गुरंही ओढली. आयुष्यभर शूद्र म्हणून हिणवल्या गेलेल्या भगवान श्रीकृष्णाला शूद्रत्वाचं महात्म्य सांगण्यासाठी कामाला लावणं तर्कालाही धरूनच होतं. भवसागर उतरण्यासाठी संतांनी वर्णअभिमान पायतळी नेण्याचा खेळ वाळवंटी मांडला होता.

शाळेच्या दाखल्यावर ९६ कुळी मराठा असणाऱ्या तुकोबारायांनी `बरे झाले देवा कुणबी ठेलो, नाही तर दंभे असतो मेलो` असं उगीच म्हटलं नाही. गाडगेबाबांनी आपल्याला खराट्याची दीक्षा विनाकारण दिली नाही. संतशिरोमणी नामदेवही हिंदी पदांमध्ये स्वतःला शूद्र म्हणवून घेतात. त्यामुळे महाराष्ट्रातले त्यांचे अभ्यासक बिचकतात. महाराष्ट्रात शिंपी शूद्र नाहीत फक्त उत्तर भारतात तेव्हा होते, असा खटाटोप भले भले अभ्यासक आज करतात. त्यांना आपल्या जातीच्या दर्जाची चिंता वाटते बहुधा. लोकहितवादी वारकऱ्यांना अर्धा ब्राह्मण म्हणतात. त्यांना सन्मानच द्यायचा असतो वारकऱ्यांना. यात कुणाला काही शंका असतील तर कुमार गंधर्वांनी गायलेलं तुकोबांचं `लहानपण देगा देवा` डाऊनलोड करून घ्यावं. शांतपणे ऐकावं. पटलं नाही तर खुद्द तुकोबांनीच पुरुषसुक्ताचा अर्थ उलटापालटा करून ठेवला आहेच. सदानंद मोरे सरांच्या `तुकाराम दर्शन`मध्ये एक प्रकरण आहे त्यावर. वाचून बघा. मस्त चिल मारा.

चार वर्ण कसे तयार झालेत ते पुरुषसुक्तात सांगितलंय. गंमत म्हणजे त्यात क्षत्रिय हा शब्द नाहीच. तिथे शब्द आहे राजन्य म्हणजे राजेरजवाडे. संजय सोनवणी आपल्या एका ब्लॉगमधे लिहितात की राजन्य आणि क्षत्रिय एकच मानून आपण आपली दिशाभूल करून घेतलीय. ल़ॉजिक नवीन असलं तरी इंटरेस्टिंग आहे. राजे, सरदार आणि लढणारे सैनिक एका दर्जाचे नव्हतेच कधी. आमचा एखादा शिवबाच त्याला अपवाद होता. पण आम्हाला वर्षानुवर्षं ते क्षत्रियकुलावतंस आणि गोब्राह्मणप्रतिपालकच वाटत राहिले. ते कूळवाडीभूषण आहेत, हे सांगायला एका महात्म्याला जन्म घ्यावा लागला. तरीही आम्ही शहाणे होत नाही. शिवरायांचा फोटो लावून स्वतःला मुजरा करायला लावणं यापेक्षा त्यांचा अपमान दुसरा नसावा. 

सेवेच्या तुलनेत बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि शौर्य हे थोर्थोर मानले गेलेले गुण क्षुल्लक आहेत. सेवा महत्त्वाची. सेवेतूनच समाज प्रत्यक्ष घडतो. स्वतःला विसरून केलेली सेवाच देशाला पुढे नेते. कोणतंही काम छोटं नाही. गांधीजींनी ब्राह्मणांना मेलेल्या ढोरांची चामडी कमवायला लावलं. गर्भश्रीमंत शेठियांना संडास साफ करायला लावले. पठाणांना खिदमतदार म्हणजे सेवक बनवलं. भंग्याच्या मुलीला पंतप्रधान बनवण्याचं स्वप्नं पाहिलं. हा वर्णधर्म बुडवला म्हणून शत्रूंनी त्यांचा खून केला आणि त्यांच्या क्रांतीला कर्मकांडं बनवून अनुयायांनीही तेच केलं. त्यामुळे सेवेचं विडंबन झालं. देशनिर्मितीमधलं शूद्रत्वाचं अधिष्ठान संपलं. दुसरीकडे आपल्या जातीचं वर्चस्व राहावं म्हणून काहींनी सेवेचा यशोमार्ग वापरला. त्याचे दुष्परिणाम आजही आपण भोगतो आहोत.


आता खरंच काही घडवायचं असेल तर चाकं पुन्हा उलटी फिरवावी लागतील. सगळ्यांना मनापासून शूद्र बनावं लागेल. शूद्र जातीत जन्मलं म्हणून कुणी शूद्र होत नाही. प्रत्येकाला सेवेचा सन्मान करावा लागेल. श्रमाला प्रतिष्ठा मिळावी लागेल. पांढरपेशाचं आकर्षण संपवावं लागेल. सगळ्यांना शूद्र बनवण्यासाठी कुणाला तरी मोर्चा काढावा लागेल.   

1 comment:

  1. छान लिहलं आहे, आपलंच वाटलं..

    ReplyDelete