Friday, 27 January 2017

मजबुरी का नाम नरेंद्र मोदी


गोव्यातली तीन वर्षं मजेतच गेली. नवे मित्र भेटले. खूप नवं समजून घेता आलं. खूप नवं शिकता आलं. तिथल्यासाठी लिहिताना शैलीही मुळातून बदलावी लागली होती. एकतर आक्रमकता आवरायला लागली. तसा गोव्याचा स्वभावच नाही. मी ज्या पेपरचा संपादक होतो, त्या गोवादूतचा स्वभावही माझ्या आजवरच्या लिखाणापेक्षा वेगळा होता. मुंबईत लिहिताना वाचक अगदी ओळखीचा होता. गोव्यात तसं नव्हतं. विषय समजावून सांगण्यातच लेखाची शब्दसंख्या संपून जायची. भूमिका कशीबशी शेवटच्या पॅराग्राफमधे मांडावी लागायची. शिवाय नियमित अग्रलेख लिहिणं थकवणारंच होतं. आमचे कार्यकारी संपादक सुनील डोळे यांनी त्याचा भार फार येऊ दिला नाही. तरीही अनेकदा माहीत नसलेल्या विषयांवरही लिहावं लागायचं. पर्याय नव्हता.


असं असलं तरी शक्य तितक्या मनापासून लिहित राहिलो. वाचकांनी त्यावर तितकंच मनापासून प्रेम केलं. गोव्यात आजही लोक अग्रलेख वाचतात. कुठे भेटले की कुठला अग्रलेख वाचला ते सांगतात. तीन वर्षांनी आता मुंबईत आल्यानंतरही गोव्याच्या वाचकांशी संपर्क राहावा असं वाटत होतंच. डिसेंबरच्या मध्यावर दैनिक गोवन वार्ताचे संपादक संजय ढवळीकरांचा फोन आला. त्यांच्या सज्जनपणा लोभस आहे. त्यांनी कॉलमचं विचारल्यावर नाही म्हणता आलं नाही. दोन आठवड्यातून एकदा लिहायचं असल्यामुळे जमणार होतं. मी कॉलम लिहावा, ही माझा मित्र किशोर गावकरची कल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. संजय ढवळीकर आणि किशोर गावकर, दोघांचेही खूप आभार.

लेखांचा सूर हा प्रस्थापितविरोधी असावा, अशी गोवन वार्ताच्या संपादकांची इच्छा आहे. नेकी और पुछ पुछ. मोदींचा चरख्यावरचा फोटो आला आणि विषयच मिळाला. चंद्रकांत वानखडे यांच्या गांधीजींवरच्या चिंतनाचा प्रभाव या लेखावर आहे. त्यांची वाक्यच्या वाक्यच या लेखात सापडतील. त्यामुळे यात काही चांगलं वाटलं तर ते चंदूभाऊंचं मानून चालावं. काही चुकीचं वाटलं तर ते अर्थात माझंच.

लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट केलाय.
...

पंतप्रधान नरेंद्र मोदी चरखा चालवत खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या डायरी, कॅलेंडरवर आरूढ झाले आणि एकच गदारोळ झाला. गेले दोन महिने सुरू असलेली नोटाबंदीवरची चर्चा अचानक थांबली. राजकीय पुढारी कोणत्याही पक्षाचे असोत, ते असे खेळ खेळत असतात. त्यांना ते खेळावे लागतातच. आपण सर्वसामान्य माणसं त्या खेळातल्या सोंगट्या बनून पटावर धावत राहतो.

मोदींना खादीबदद्ल आकर्षण तर आहेच. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते दरवर्षी गांधी जयंतीच्या दिवशी खादी विकत घेण्यासाठी स्वतः खादी ग्रामोद्योगच्या दुकानात जात असत. गांधीजींचं जन्मगाव पोरबंदरमध्ये त्यांनी खादीवरचं भव्यदिव्य प्रदर्शन भरवलं होतं. गुजरातमध्ये आज खादीची चळवळ जिवंत नसली तरी खादी व्यवसाय म्हणून जिवंत आहे. फक्त सौराष्ट्रातच तीन लाख लोकांना थेट खादीचं कापड बनवून रोजगार मिळतो. त्यामुळे तिथे खादीवरच्या मोदींच्या प्रेमाला मतांचं कारण होतं. पण पंतप्रधान बनल्यानंतर ते कमी झालं नाही. त्यांनी चीनच्या अध्यक्षांना साबरमती आश्रमात नेलं. खादीच्या गुंड्या देऊन त्यांचं स्वागत केलं. `मन की बात`मधूनही खादीचं गुणगान केलं. आता तर ते थेट मॉडेल बनून खादीच्या कॅलेंडरवरच अवतरले आहेत.

मोदींनी कुठे मॉडेल बनावं हा त्यांचा प्रश्न आहे. अखेर राज्य त्यांचंच आहे. मुकेश अंबानींनी जिओ मोबाइल लॉन्च केला. तेव्हाही मोदींची छबी अशीच पेपर, टीव्ही आणि पोस्टरांवर मॉडेल म्हणून अवतरली होती. पंतप्रधानांना मॉडेल बनवलं म्हणून अंबानींना पाचशे रूपये दंडही झाला. त्यातून देशाच्या पंतप्रधानाची किंमत ठरली. वाईट झालं. अंबानींच्या जिओचं मॉडेल बनण्यापेक्षा खादीचं म़ॉडेल बनणं केव्हाही चांगलंच. तरीही त्यावर टीका झाली. तसं होणं स्वाभाविकच होतं. कारण अनेकांच्या मते ते खादीमागच्या उदात्त मूल्यांचं अवमूल्यन होतं.

खादी म्हणजे नुसतं कापड नाही. स्वातंत्र्य चळवळीतलं ते एक यशस्वी शस्त्र होतं. कोणतीही दळवळणाची साधनं नसताना केवळ महात्मा गांधींच्या शब्दाखातर देशभरातल्या लाखो लोकांनी खादीला आपल्या जगण्याचा भाग बनवला. लेंगे स्वराज्य लेंगे, चरखा चला चला के, असा त्यांचा नारा होता. लाखो लोक स्वतः चरख्यावर सूत कातत आणि त्याचेच कपडे घालत. मोदी आज ज्यांचा उंचचउंच पुतळा बनवत आहेत, ते सरदार वल्लभभाई पटेलही त्यापैकीच एक. स्वातंत्र्यसंग्रामापासून दूर राहणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना चरख्याचं हे महत्त्व कळलंच नाही. त्यामुळे ते चरख्याला हिणवत राहिले. चरखा फिरवून स्वातंत्र्य मिळवता येतं का, असे कुजकट प्रश्न विचारण्यात त्यांना वैचारिक धन्यता वाटत असे. हिंदुत्ववाद्यांकडून होणाऱ्या अशाच हेटाळणीची परिणती म्हणून त्यांच्यातल्या एका अतिरेक्याने गांधीजींचा खून केला.

हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा जीव घेतला. गांधीवाद्यांनी त्यांना आध्यात्मिक बुवाच बनवलं आणि त्यांच्या क्रांतीला कर्मकांड. काँग्रेसने त्यांना सरकारी बनवून संपवलं. मुसलमानांसाठी ते कट्टर हिंदू होते. कम्युनिस्टांसाठी भांडवलदारांचे हस्तक. आंबेडकरवाद्यांसाठी मनुवादी. सगळ्यांनी वारंवार मारूनही गांधीजी मेले नाहीत. उलट ते जगभर पसरत गेले. प्रबळ सत्तेविरोधात सर्वसामान्य माणूस जिथे लढत होता, तिथे तिथे जगाच्या कानाकोपऱ्यात गांधीजी संघर्षाचा साथीदार बनून उभे ठाकले. ते भारताच्या गुणसूत्रांमध्येच शिरले होते. ते काढणं कुणालाच काही केल्या जमलं नाही.

मारूनही संपत नाही म्हणून हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींना हरप्रकारे बदनाम केलं. वर्षानुवर्षं शाळा कॉलेजांत त्यांच्यातल्या शिक्षकांनी टकल्या म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष पेरला. त्यांच्यामुळे फाळणी झाल्याचं खोटंच सांगितलं गेलं. ते सरदार भगतसिंग आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा शत्रू असल्याचं ठसवलं गेलं. एकीकडे प्रार्थनेत त्यांचं नाव घेताना दुसरीकडे त्यांना लिंगपिसाट ठरवण्यापर्यंत मजल गेली. त्यांच्या खुन्यांचं उदात्तीकरण केलं. गोडसेवर कीर्तनं केली. नाटकं सादर झाली. `एबीसीडी इएफजी त्यातून निघाले गांधीजी`, अशी गाणी खेळांच्या नावाने एकत्र आणलेल्या मुलांना शिकवण्यात आली. त्याच सुरात एक म्हण तयार केली, `मजबुरी का नाम महात्मा गांधी`.

गोव्यात फार प्रचलित नसलं तरी देशभर `मजबुरी का नाम महात्मा गांधी` हे वाक्य सर्रास वापरलं जातं. एक गाल पुढे केला की दुसरा गाल पुढे करायला सांगणारा म्हातारा अशी बापूंची बापुडवाणी प्रतिमा तयार करण्यात आली. प्रत्यक्षात तेजाचं आणि त्यागाचं धगधगतं संघर्षकुंड म्हणजे गांधीजी. पण त्यांना नेभळट ठरवण्यात आलं. त्यातून अगतिकते तुझं दुसरं नाव गांधी, असं सांगणारी ही म्हण रूढ झाली.

कधीतरी अचानक रिचर्ड अटनबरो आले, त्यांनी `गांधी` सिनेमा बनवून या म्हणीला धक्का दिला. जगाने डोक्यावर घेतलेले नेल्सन मंडेला, आँग स्यान स्यू की, दलाई लामा या सगळ्यांनी तेच केलं. `लगे रहो मुन्नाभाई`नेही या मानसिकतेला हादरवून टाकलं. बराक ओबामांनी तर आपल्या ऑफिसातल्या भिंतीवर गांधीजींचा फोटो लावला. हे कमी होतं म्हणून भारतात येऊन त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेचा अध्यक्ष बनलो त्याचं कारण महात्मा गांधी. वारंवार अशा धडका बसल्यामुळे हादरलेल्या हिंदुत्ववाद्यांनी मोदी बहुमताने पंतप्रधान बनल्यावर समाधानाचा सुस्कारा सोडला. मोदींमुळे गांधी खरंच मजबुरी का नाम बनतील, अशी त्यांना खात्रीच होती. हिंदुत्ववाद्यांच्या सोशल साइट्सवरच्या पोस्टमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलं होतं.

पण झालं भलतंच. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी सर्वात आधी गांधीजींच्या समाधीवर म्हणजे राजघाटाला गेले. आपल्या ऑफिसात गांधीजींचा फोटो लावून त्याला नमस्कार करत असतानाचे फोटो छापून आणले. त्यांनी स्वच्छ भारत मोहीम आणली. त्याला महात्मा गांधींचं नाव दिलं. त्या मोहिमेच्या लोगोतही गांधीजींचा चष्मा घेतला. काँग्रेसच्या काळात योजनांना दिलेली गांधी, नेहरूंची नावं कायमची संपणार अशी स्वप्न बघणाऱ्यांना हा धक्काच होता. मोदी जगभर जिथे कुठे गेले, तिथे प्रत्येक भाषणात त्यांनी गांधीजींचं नाव घेतलं. मी बुद्ध आणि गांधीच्या देशातून आलोय, हे पालुपद त्यांनी परदेशातल्या प्रत्येक भाषणात सांगितलं. आता फक्त हेडगेवार, गोळवलकर, सावरकर यांचंच नाव मोदींच्या तोंडून ऐकू येणार, या अपेक्षा पूर्ण झाल्याच नाहीत. जगाच्या पाठीवर सांगता येतील, अशी सन्माननीय नावं मोदींच्या पक्षाकडे आणि मातृसंस्थेकडे नव्हतीच. त्यांना गांधीजींशिवाय पर्याय नव्हता.

मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही स्वतःमध्ये गोळवलकर ते देवरस असं स्थित्यंतर घडवलं ते गांधीजींचीच कॉपी करत. आदिवासी आश्रमांपासून गोसेवेपर्यंत, स्वदेशीपासून निसर्गोपचारापर्यंत आणि मातृभाषेतून शिक्षणापासून एकात्म मानवतावादापर्यंत, गांधीप्रेरणेतून उभ्या राहिलेल्या प्रयोगांच्या पॅटर्नच्या झेरॉक्स कॉप्या काढत संघाने सेवाकार्याचं जाळं देशभर पसरवलं. ज्यांचा खून झाल्यावर पेढे वाटले होते, त्यांनाचा प्रातःस्मरणात स्वीकारण्याची पाळी संघावर आली.

संघाच्याच मुशीत तयार झालेल्या मोदींना गांधींविषयी खरंच आदर आहे की अगतिकता की गांधी हायजॅक करण्याचं कारस्थान? या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्याने शोधावं. तरीही मोदींना गांधी सोडता येत नाहीत, हे खरंय. चरखा कसा चालवतात हे त्यांना माहीत नाही. कारण मोदींच्या फोटोत दिसलाय, तसा तो एका हाताने चालवता येत नाही. तरीही त्यांना चरख्यासमोर पोझ देऊन झळकावं लागतं. यात मजबुरी कोणाची आहे? गांधीजींची मजबुरी कधीच नव्हती. गांधीजी तर मजबुतीचं प्रतीक आहे. मजबुरी असली तर ती मोदींची आहे. मजबुरी का नाम महात्मा गांधी नाही. मजबुरी का नाम नरेंद्र मोदी आहे.

7 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. मस्त झालाय लेख. 'खादी ग्रामोद्योग आणि मोदी' या गेल्या काही दिवसात चर्चेत आलेल्या विषयावरील वन ऑफ द बेस्ट लेख झालाय. कारण, गांधींची कशी हेटाळणी केली गेली आणि कसं जाणीवपूर्वक याआधीही गांधींबद्दल द्वेष पसरवला गेला, हे या लेखात आलंय. ते महत्त्वाचं आहे.

    बाकी नेहमीप्रमाणे तुमची शैली आहे. छोटं वाक्य आणि साधे-सोपे शब्द. शैलीबद्दल फार बोलणार नाही. लेखनात ज्यांचा आदर्श ठेवतो, त्यांच्या लेखनाची स्तुती करायला शब्द नसतात

    आणि हो, ब्लॉग लिहियाला पुन्हा सुरुवात केलीत, हे बरं झालं. नियमित वाचक म्हणून आनंद वाटला.

    - नामदेव अंजना

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. vada pav khanar ka?

    ReplyDelete
  5. Good article.

    Surpised how could you have been an Editor in a Newspaper like GOVADOOT, which is not really, a so.

    ReplyDelete