Monday, 6 November 2017

एका कॉम्रेडची धर्मांधांना भीती का वाटते?

कॉ. संपत देसाई संपर्क - ९९७५०९८५१४
कॉम्रेड संपत देसाईंविषयी लिहावं तितकं कमीच आहे. ते कॉम्रेड आहेत, विद्रोही आहेत, त्यांचा व्यासंगही दणकट आहे, तरीही ते दिलखुलास हसत असतात. कायम आपल्या माणसांमध्ये राहतात. गेल्या आठवड्यात त्यांना धमकी देणारं पत्र आलं. त्यात कॉम्रेडने आजरेकर फडाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम घेतला, त्याचा प्रामुख्याने उल्लेख आहे. एखादा कॉम्रेड विवेकाची मशाल घेऊन अध्यात्माच्या क्षेत्रात शिरतो, तेव्हा धर्मांध त्याला घाबरतात आणि घाणेरड्या शिव्या देणारी, धमक्या देणारी पत्रं लिहितात. म्हणून या धमक्या महत्त्वाच्या आहेत. धर्मांधांना विरोध करणाऱ्यांनी कोणत्या ट्रॅकवर काम करायला हवं, याची दिशा देणारी ही घटना आहे. मंगळवारी ७ नोव्हेंबरला आजऱ्यात निषेध रॅली आणि सभा आहे. राज्यभरातून मान्यवर येत आहेत. 




माफ करा कॉम्रेड, मला यायला जमणार नाही. पण मी मनाने तुमच्यासोबत आहेच. दिव्य मराठीत छापून आलेला लेख ब्लॉगवर शेअर करतोय.
...  

आंबोली घाटाच्या मार्गे कोकणात उतरण्याआधी आजरा लागतं. प्रेमात पडावं असं घाटमाथ्यावरचं लाल मातीतलं सुबक शहर. तिथून डोंगराच्या दिशेने आणखी पाच किलोमीटर आत गेलं की पेरणोली गाव येतं. आणखी लाल मातीतलं आणखी हिरवंगार गाव. गावाच्या वेशीवरच कॉम्रेड संपत देसाईंचं घर आहे. आपल्यासाठी धावणाऱ्या, लढणाऱ्या कार्यकर्त्याला घर हवं, म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या चार पाच तालुक्यांतल्या लोकांनी वर्गणी काढून त्यांना हे घर बांधून दिलंय. या घरात गुरुवारी २६ ऑक्टोबरला पोस्टाने एक पत्र पोचलं. फुलस्केपच्या तीन पानांवर हाताने लिहिलेल्या या पत्रातली अक्षरं धमक्यांनी रक्ताळलेली होती. `जय श्रीराम, जय हनुमान, जय शिवराय` अशी पत्राची सुरुवात करणाऱ्या आराध्यांच्या शिकवणुकीशी बेइमानी करणारा मजकूर पुढे होता. पत्र लिहिणाऱ्याने स्वतःला `कट्टर हिंदुत्ववादी` असं म्हणवून घेतलंय. 

`हरामखोर कॉ. संपत देसाई यांस,
गेलं अनेक वर्षं आजरा तालुका व इतर ठिकाणी नालायक, मा**** कम्युनिस्टांच्या, लांडक्यांच्या व विद्रोह्यांच्या नादास लागून तुझं अति नाटकं चाल्यात. आईभनीची वळक नसणाऱ्या कम्युनिस्टांनी आणि विद्रोह्यांनी आमाला शिकवू नये. तुमच्या विद्रोह्यांस्नी कुत्रबी भीक घालीत न्हाइं म्हणून आजरेकर फडाला हाताशी धरायचा व स्वतःची टीमकी वाजवायची हे आमच्या लक्षात आलंय. मागं तू आजरेकर फडाचा कार्यक्रम घेतलास व फडावर लेख बी लिहलास. पण लक्षात ठेव, त्यात तू लिहलास की आजरेकर फड व वारकरी संप्रदाय यांच्याशी काहीबी संबध नसलेल्ये वारकऱ्यांत घुसू लागलेत. पण हरामखोरा लक्षात ठेव जे वारकरी संप्रदायाशी जवळ येत आहेत, ते खरे हिंदू आहेत...

फो**च्या, तुझ्या गावात तरी तुला कुत्रं ईचारतय काय? लक्षात ठेव तुला हिसका दाखवाय वेळ लागणार नाई. आजऱ्याच्या दंगलीपासून (डिसेंबर २००८) आठवतंय काय रांडच्या? तू आता डोचक्यात बसलाईस. तवा मर्यादेत वाग. न्हाईतर लांडक्यांच्या आदी तुलाच हिसका दाकवू...`

आजरेकर फड कृतज्ञता सोहळा   
दक्षिण महाराष्ट्रात कॉम्रेड संपत देसाईंना वेगळ्या परिचयाची गरज नाही. डॉ. भारत पाटणकरांच्या श्रमिक मुक्ती दलाचे संघटक म्हणून ते काम करतात. पण ते सगळ्याच पुरोगामी चळवळींशी, विचारांशी स्वतःला जोडून आहेत. धरणग्रस्तांच्या प्रश्नावर त्यांनी केलेलं काम महत्त्वाचं आहे. विशेषतः चित्री धरणाच्या लढ्याचं त्यांनी केलेलं नेतृत्व. सगळ्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन झाल्यानंतरच धरणात पाणी सोडायला लावणारं ते राज्यातलं पहिलं धरण आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी कायद्यात बदल घडवून आणण्यातही त्यांचा पुढाकार होता. 

 पहिल्या विद्रोही संमेलनाच्या आयोजनापासून ते विद्रोही चळवळीत सक्रीय आहेत. पण ते फक्त मंचावर भाषणं करणारे आणि लोकांना न कळणारं लिहिणारे विचारवंत नाहीत. ते कायम आपल्या लोकांत राहिले. दक्षिण कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी लढे दिले. कधी अपंगांचा मोर्चा काढला, कधी धनगरांवरचा अन्याय दूर करून घेतला. कोणावरही अन्याय झाला की त्याने हक्काने कॉम्रेडना हाक मारावी आणि कॉम्रेडही त्याच्यासाठी धावून जावेत, हे रोजच घडतं. त्यांच्या जनसंपर्कामुळे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदापासून मोठ्या पक्षांच्या आमदारकीच्या तिकीटापर्यंत अनेक मान त्यांच्यापर्यंत चालत आले. पण ती प्रलोभन सोडून फाटकं राहणंच त्यांनी पसंत केलं. त्यामुळे आज दर महिन्याला कोणतीही निश्चित आर्थिक आवक नसतानाही लोकांच्या आधारावर कॉम्रेडचं घर चालू आहे. लोकांनी त्यांना फक्त घरच बांधून दिलं नाही तर वर्गणी काढून लग्नाचा खर्चही उचलला. कॉम्रेड दिवसरात्र पायाला भिंगरी बांधून फिरतात, म्हणून त्यांच्या एका वाढदिवशी त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना गाडीही घेऊन दिलीय. त्यांच्यापैकीच कुणीतरी त्यांना पेट्रोल भरून देतं. त्यामुळे आज बँकेचं अकाऊंट रिकामं असलं तरी कॉम्रेड दिलखुलास हसत जगतात. त्यांचं हे काम बघून त्यांना कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यभर बोलावलं जातं. 


धमकीचं पत्र पान १
असंच फिरता फिरता कॉम्रेड कधीतरी `रिंगण`च्या संपर्कात आले. `रिंगण` हा  महाराष्ट्रातल्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारा वार्षिक अंक आहे. तिथे त्यांना आजरेकर फडाविषयी कळलं. डॉ. सदानंद मोरे यांनी `तुकाराम दर्शन` या महाग्रंथात वारकरी परंपरेतल्या आजरेकर फडाविषयी महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलीत. मूळ आजऱ्याचे असलेल्या बाबासाहेब आजरेकरांनी १८३२ साली हा फड सुरू केला. वारकरी विचारांना दर्शन म्हणून मांडताना माऊली बाबासाहेब आजरेकरांनी भक्तीचं मोल नव्याने सांगितलं. त्यासाठी बंडखोरीही केली. आम्ही फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीलाच भजणार असं सांगत अध्यात्माच्या नावाने चालणाऱ्या इतर कचऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजरेकर फडाच्या हरिमंदिरांमध्ये दीर्घकाळ कोणत्याही मूर्तीएेवजी फक्त ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत आणि तुकोबारायांची गाथा या ग्रंथांच्या हस्तलिखित पोथ्या असायच्या. अक्षरांना आणि विचारांना नमस्कार करण्याचं महत्त्वाचा दृष्टीकोन त्यातून दिसतो. इतर फडांमध्ये वारसाहक्काने फडाचे प्रमुख ठरतात. पण इथे लोकशाही पद्धतीने मिळून पुढचा प्रमुख ठरवला जातो. त्यामुळे बाबासाहेब आजरेकर या सारस्वत ब्राह्मण समाजातल्या मूळपुरुषानंतर या फडात माळी, मराठा अशा विविध जातींतील प्रमुख झालेत. या फडाने तुकाराम महाराजांचे सरकारी गाथेत नसलेले अनेक बंडखोर अभंग सांभाळून ठेवलेत. तसंच परंपरागत चालीत ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग गाण्याची वेगळा वारसाही यात आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्यावर प्रार्थना समाज सुरू करताना या फडाचा प्रभाव असल्याचे दाखलेही शोधता येतात. या फडाने साने गुरुजींच्या दलित मंदिरप्रवेशाच्या आंदोलनाला समर्थन दिलं.  


धमकीचं पत्र पान २
हे कळल्यावर कॉम्रेड संपत देसाईंना चुलते आठवले. ते जिवंत असेपर्यंत त्यांनी कधी पांडुरंगाखेरीज दुसऱ्या कोणत्या देवाला नमस्कार केला नाही. घरी सत्यनारायण घालू दिला नाही. लग्नात पुरोहिताला बोलावू दिलं नाही. ते तुकोबांच्या विचारांशी आजन्म एकनिष्ठ राहिले. कॉम्रेडने चौकशी केल्यावर कळलं की ते आजरेकर फडाच्या एका दिंडीचे विणेकरी होते. त्यांच्या माहीत असलेल्या सगळ्याच पिढ्या वारकरी होत्या. आपला हा वारसा समजून घेण्यासाठी कॉम्रेडनी `रिंगण`च्या सोबतीने आजऱ्यातच  ९ एप्रिल २०१६ ला `आजरेकर फड कृतज्ञता सोहळा` आयोजित केला. त्यासाठी आजरेकर फडाच्या तिन्ही शाखांचे प्रतिनिधी पहिल्यांदाच एकत्र आले. लांबून लांबून फडाचे वारकरी मोठ्या संख्येने आले. सदानंद मोरेंनी त्यांना आजरेकर फडाचं महत्त्व सांगितलं. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे नियंत्रक राजाभाऊ चोपदार आवर्जून आले. आजरा शहराचा विस्मृतीत गेलेला एक वारसा या कार्यक्रमामुळे उजळून निघाला. 

कॉम्रेडने आधीही त्यांच्या पेरणोली गावात वारकरी परिषद आयोजित केली होती. गावातल्या भजनांना, सप्ताहांना ते आवर्जून असतातच. कारण आपला विद्रोह आपल्या मातीशी जोडलेला आहे, याचं त्यांना उत्तम भान आहे. एका विद्रोही पुरोगाम्याने अध्यात्माच्या क्षेत्रात घुसणं धर्मांधांना खटकणं स्वाभाविक आहे. तुम्ही कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, शोषितांच्या, दलित-आदिवासींच्या, स्त्रियांच्या, अल्पसंख्यांकांच्या प्रश्नावर हवं तितकं बोला, काम करा, पण आम्ही घुसखोरी केलेल्या अध्यात्माच्या क्षेत्रात विवेकाला घेऊन शिरलात तर याद राखा, अशी त्यांची भूमिका असते. तो राग या पत्रातून व्यक्त झालाय. 


धमकीचं पत्र पान ३
दक्षिण महाराष्ट्रातला कृष्णाकाठ कायम परंपरेशी नातं टिकवून पुरोगामित्वाची पताका खांद्यावर घेऊन चालत आला आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी कृष्णाकाठ समृद्ध आहे. पण गेल्या काही वर्षांत धर्मद्वेषाने या पवित्र मातीत विष पेरलंय. त्याचे धक्कादायक परिणाम आता दिसू लागले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनांमध्ये प्रामुख्याने इथल्याच माथेफिरू तरुणांची नावं आरोपी म्हणून नोंदवली गेलीत. कॉम्रेडना आलेलं पत्रंही त्यांच्याच या परिसरातल्या मडिलगे या गावातून आलेलं आहे. पत्र लिहिणारा वारकरी नाही हे त्याच्या भाषेवरून स्पष्टच आहे. तो हिंदुत्ववादीही नाही, कारण इथल्या परंपरेतले हिंदुत्ववादी कार्यकर्तेही सर्वांशी मिळून मिसळून राहताना दिसतात. हे पत्र लिहिणारा धर्मांध, अतिरेकी आहे. हिंदू धर्मही त्याला कळलेला नाही, मग संतांचे विचार तर दूरच राहिले. त्या माथेफिरूचं गाव पोलिसांना माहीत आहे. त्याचं हस्ताक्षर समोर आहे. तरीही त्याचा साधा शोधही पोलिसांना घेता आलेला नाही, याचं आश्चर्य आहे.

पण कॉम्रेड संपत देसाईंच्या सोबतचे लोक शांत बसलेले नाहीत. निषेधाच्या सभा सुरू आहेत. निरनिराळ्या संघटना प्रशासनाला निवेदनं देत आहेत. आता ७ नोव्हेंबरला आजऱ्याच्या भाजी मंडईत निर्धार रॅली आहे. त्याला राज्यभरातून भालचंद्र कानगो, भारत पाटणकर, श्रीपतराव शिंदे, किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी, प्रमोद मुजुमदार, हुमायून मुसरूल, धनाजी गुरव, गौतमीपुत्र कांबळे, भीमराव बनसोड, उदय नारकर, अंकुश कदम असे आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने कृष्णाकाठचं विष संपवण्याचा निर्धार व्हायला हवा. 

9 comments:

  1. धर्मांधांची कीड वेळीच ठेचायला हवी. उत्तम लेख. कोल्हापुरात असे प्रकार वाढीस लागले आहेत.

    ReplyDelete
  2. व्वा सचिन परब उत्तम सडेतोड !

    ReplyDelete
  3. व्वा सचिन परब उत्तम सडेतोड !

    ReplyDelete
  4. सर... आज ही मोठी गरज आहे कृष्णाकाठच विष संपवण्याची मी आहे. अनेक जण येतील.

    ReplyDelete
  5. सर, लेख छान झाला आहे...मस्तच

    ReplyDelete
  6. Uttam Lekh ahe. Navyanech kahi goshti kalalya ahet. Comrade Sampat Desai yanchya karyabaddal mahiti navhate ani Ajarekar fadachya deergha paramparevishayi dekhil. Tyavishayi thodkyat pan mahattvachi mahiti milali ahe. Hindutva vadateel vibhinna chhattanbaddal aapan sajag ahat yabbadal aaple manapasoon Abhinandan. Me matra sarvach chhatancha virodhak ahe aaplya pramane. Dhanyavad.

    ReplyDelete
  7. मला या सगळ्या गोष्टी थोड्या नविनच आहेत परंतु तुम्ही लिहिलेलं मनापासून पटलं.एक मेट्रोपॉलिटन आयुष्य जगणारा हिंदु युवक आहे पण गेल्या अनेक वर्षात माझ्या आजूबाजूला घडलेले सामाजिक बदल बघून मला ही गोष्टी जाणवत आहेत.उदाहरण : शिवाजी महाराजांचे नाव वापरून मुस्लिम द्वेष पसरवणे हा प्रकार खूप वाढला आहे. हे थांबलेच पाहिजे. खेळाच्या नावाने वेगळ्याच 'शाखा' भरवल्या जायच्या असे मला लहानपणीच जाणवले होते. जेव्हा मी चिपळूण मध्ये प्रथमच 'एकदाच' खेळायला म्हणून गेलो आणि बाकीचे ताकदीने कमी पडून हरल्याने मला खेळायला घ्येयचेच बंद झाले.आजकाल ढोलताशा पथकांच्या नावाने मुलं-मुली गोळा केले जात आहेत.हळूहळू या गोष्टी लक्षात येत आहेत.
    दाभोलकर,पानसरे, कलबूर्गी,लंकेश कोण व त्यांनी काय काम केलंय हे माझ्या दूर्दैवाने मला नंतर कळले पण खरंच खूप त्रास होतो जेव्हा पुण्यातील त्या ओंकारेश्वरच्या पुलावरून जायची वेळ आली की,ज्या ठिकाणी दाभोलकरांची हत्या झाली. हत्येचं कधीच समर्थन होऊ शकत नाही.
    गांधींच्या हत्येनंतर पाहिजेत तसे प्रयत्न झालेले मला तरी दिसत नाहीत.उलट मात्र हत्येचं समर्थन कसं करता येईल यासाठी खूप प्रयत्न केले गेलेत आणि ते आज पण बर्याच प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहेत हे मला या देशासाठी धोकादायक वाटतं. मला खात्री आहे कोणीही कितीही प्रयत्न केले तरी हा देश कट्टरवादी कधीच होऊ शकणार नाही. खासकरून Demography मुळे. पण म्हणून आपण असं म्हणून प्रयत्न न करणे हत्येचं समर्थन केल्यासारखे होईल.
    सचिन परब यांचे आभार मला अधिक गोष्टींची माहिती वाचायला मिळाल्याबद्दल.
    जय हिंद !

    ReplyDelete