चित्रलेखात लिहायला सुरुवात केली त्याला आता जवळपास वर्षं होत आलंय. गेले सहाएक महिने तर जवळपास दर अंकात लिहितोय. त्यातले लेख अजूनपर्यंत कधीच ब्लॉगवर टाकला नाही. अनेकदा अनेक लेख टाकावेसे वाटले. पण फॉण्ट कन्वर्टचा प्रॉब्लेम होता. इतक्यातच बेगम अख्तर आणि अब्दुल कवी दसनवी यांची डूडल पाहिल्यावर एक लेख ब्लॉगवर टाकायला हात सुरसुरले होते. आज नृत्यसम्राज्ञी कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांचं डूडल पाहिल्यावर राहावलंच नाही. थोडा वेळही मोकळा होता आणि प्रयोग करता करता श्रीलिपीच्या एक्स्चेंज युटिलिटीमध्ये लेख कन्वर्ट झालादेखील.
६
फेब्रुवारीच्या चित्रलेखाच्या अंकात मी गुगलच्या डूडलवर लेख लिहिला होता. त्याचा
इण्ट्रो होता, `क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त
दिवसभर गूगलने प्रकाशित केलेलं डूडल गाजलं.
त्यादिवशी पंधरा लाखांहून अधिक जणांनी सावित्रीबाईंविषयी माहिती जाणून
घेण्यासाठी सर्च केलं. फक्त भारतातच नाही तर जगभर ही डूडल चर्चेचा
विषय बनली आहेत.`
नेहमी ब्लॉग वाचणाऱ्यांना माझी या लेखातली शैली कदाचित वेगळी
वाटू शकेल. पण चित्रलेखासारख्या न्यूज मॅगझिनमध्ये लिहिताना वेगळ्या पद्धतीनेच
लिहायला हवं. तिथे लेखकाची वैयक्तिक मतं नाही तर माहिती महत्त्वाची असते. मी
संपादक असताना लेखकाने मला हवं तसं लिहावं असा माझा आग्रह असतो. तसंच मी लेखक
असताना संपादकाला हवं तसं लिहायला हवंच. त्यामुळे चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश
महाराव यांनी ज्या शैलीत चित्रलेखा घडवलाय. त्याच शैलीत लिहिण्यासाठी मी प्रयत्न
करत राहिलो. आता वर्षभरात त्या शैलीचे चांगले वाईट परिणाम माझ्या लिखाणावर झालेत.
पण अशा सगळ्याच टप्प्यांमधलं चांगलं गोळा करत पुढे जायला हवं.
ज्ञानेश महारावांमुळेच मी चित्रलेखात लिहू लागलो. माझ्यावरच्या
प्रेमापोटी त्यांनी मला वर्षभरात अनेकदा सांभाळून घेतलं. माझा प्रॉब्लेम आहे की मी अडचणीत आहे, असं मला कधीच वाटत नाही. ते समजून घेऊन अडचणीच्या काळात त्यांनी
मला लिहितं केलं. त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी असेन. त्यांच्यामुळेच मी खूप
वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलंय. खूप जणांशी नव्याने संपर्क केला. अनेक नव्या
लोकांशी संबंध उभे राहिलेत. एकूण मजा आली. डूडलच्या लेखातही अशीच मजा आली होती.
बघा वाचून लेख कटपेस्ट केलाय.
...
गूगलने
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला आनंदाचा धक्का दिला. भारतातील आधुनिक शिक्षणाचा पाया रचणाऱ्या
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी ३ जानेवारीला त्यांच्या कार्याची
थोरवी सांगणारं चित्र गूगलने आपल्या नावाबरोबर होमपेजवर मांडलं. सावित्रीबाईंच्या कामाला ही अनोखी मानवंदना होती. अशी
चित्रं गूगलवर रोज नसतात. वर्षभर काही विशेष निमित्ताने गूगलच्या
लोगोमध्ये बदल केले जातात, त्याला गूगलचं ‘डूडल’ म्हटलं जातं.
गूगल
हे एक सर्च इंजिन आहे. यात सर्चच्या
रकान्यात आपल्याला हवा तो विषय लिहिला, की जगभरातल्या वेबसाइटमधला
त्याच्याशी संबंधित मजकुराच्या किंवा फोटोंच्या लिंक आपल्यासमोर काही सेकंदांमध्ये
हजर होतात. अशी इतरही सर्च इंजिन असली तरी ती गूगलच्या आसपासदेखील
पोहोचू शकत नाहीत. केवळ एक वेबसाइट म्हणून विचार केला तरी गूगल
ही जगातली सर्वाधिक वापरली जाणारी वेबसाइट आहे. एका सेकंदाला
५८,२७५ जण गूगलचा वापर करत असतात. एका वर्षाला
गूगल वापरणार्यांची संख्या १२,००० कोटी इतकी आहे. इतका प्रचंड वापर होत असल्यामुळे
गूगल म्हणजेच इंटरनेट असा समज अनेकांचा होतो. म्हणूनच गूगलवर सावित्रीबाईंचं
चित्र आल्यामुळे सोशल मीडियावर समाधानाच्या प्रतिक्रिया उमटल्या.
कपाळावर
कुंकवाची चिरी असलेल्या सावित्रीबार्ईंनी आपल्या पदरात शाळा-कॉलेजांत जाणार्या महिलांना सामावून घेतलेलं आहे आणि त्या आपल्या लेकींकडे
मायेने पाहात आहेत, असं या चित्रातून
दाखवलंय. सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाने भारलेला भूतकाळ आणि त्यामुळे
वर्तमानात महिलांची झालेली प्रगती यातून अधोरेखित होते. गूगल
जगभर असलं तरी हे सावित्रीबाईंचं डूडल फक्त भारतातच दिसू शकलं. डूडलमुळे संबंधित विषयाविषयी कुतूहल निर्माण होतं. तसं
ते सावित्रीबाईंच्या डूडलनेही झालं. ती उत्सुकता पूर्ण करण्याचीही
व्यवस्था गूगल करतं. डूडलवर क्लिक केलं की त्याविषयी माहिती देणार्या लिंक आपल्यासमोर सादर होतात. त्यानुसार देशभरातून ३ जानेवारीच्या एका
दिवसात १५ लाखांहून अधिक जणांनी यावर क्लिक करून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न
केला. हा भारतापुरता एक विक्रमच ठरला!
नर्गिसचं डूडल |
महिला
सक्षमीकरण आणि मुलींना शिक्षण यांना उत्तेजन मिळावं, यासाठी हे डूडल बनवण्यात आलं, असा
हेतू गूगलने स्पष्ट केलाय. आयटी आणि सोशल नेटवर्किंगमधील आंतरराष्ट्रीय
प्रशिक्षक प्रसाद शिरगावकर यांनी या डूडलचं स्वागत केलं आहे. ते चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, ‘माझ्यासारखा
आयटीत काम करणारा माणूस दिवसातून ८-१० वेळा तरी गूगलला जातो. ज्या दिवशी डूडल असतं तेव्हा
तितक्या वेळा तो विषय डोळ्यांखालून जातो. उत्सुकतेपोटी त्यावर
क्लिक केलं जातंच. सावित्रीबाईंचं डूडल तर अतिशय सुंदर होतं.
त्यावर विक्रमी संख्येने क्लिक केलं गेलं, तर आश्चर्य वाटायला नको.
यानिमित्ताने भारतातील लाखो जणांपर्यंत सावित्रीबाई पोहोचल्या,
ही आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. यापूर्वी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचंही डूडल गाजलं होतं. तंत्रज्ञानामुळे माध्यमांचं झालेलं लोकशाहीकरण म्हणूनही याकडे पाहता येऊ शकेल.
पूर्वी वर्तमानपत्रांचे संपादक आणि त्यांचं अनुभवविश्व एवढ्यापुरताच
माध्यमांचा वावर असायचा. आता बहुसंख्य लोकांना काय वाटतं,
हे जाणून घेणं माध्यमांना भाग पडतंय. पूर्वग्रह
न ठेवता त्याची माहिती देणारं तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. त्यामुळे
आजवर दडवून ठेवलेल्या अनेक गोष्टी वर येत आहेत. झारीतल्या शुक्राचार्यांची
संख्या आणि त्यांचा प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळे समाजाचा
मूड काय आहे, याचं दर्शन घडवण्याशिवाय यापुढे माध्यमांना गत्यंतर
उरणार नाही.’
मात्र
या डूडलकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहणं ही घाई होईल, असं मत झी चोवीस तासच्या वेबसाइटचे संपादक
प्रशांत जाधव व्यक्त करतात. ते म्हणतात, ‘डूडल ही गूगलसाठी एक व्यावसायिक ऍक्टिव्हिटी आहे. जास्तीत जास्त लोकांना सर्च करायला लावण्याची
ती एक क्लृप्ती आहे, हे विसरता कामा नये. फार प्रसिद्ध नसलेल्या व्यक्तींचा डूडलमध्ये समावेश केला जात असल्याचं यापूर्वी
अनेकदा झालेलं आहे. उदाहरणार्थ, इंदिरा
गांधींवर अजून डूडल करण्यात
आलेलं नाही. मात्र तुलनेने कमी प्रसिद्ध असणार्या ऍनी बेझंट आणि सरोजिनी नायडू यांचं डूडल करण्यात आलंय. भरतनाट्यमचं पुनरुज्जीवन घडवणार्या रुक्मिणीदेवी अरुंडेल किंवा मोठ्या आकड्यांची गणितं तोंडी
सोडवणार्या शकुंतलादेवी यांची डूडल आपल्यासमोर आली की आपण जिज्ञासेपोटी
लगेच क्लिक करतोच. कारण त्यांचं
कर्तृत्व आपल्याला माहीत नसतं. तसंच सावित्रीबाईंचं आहे.
महाराष्ट्रात आपल्याला सावित्रीबाई माहीत असल्या तरी देशभर मात्र तसं
नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी उत्सुकता
दिसून आली.’
डूडल
कोणतं करावं, यासाठी तेव्हाच्या
वातावरणाचा विचार केला जातो, असं सांगून प्रशांत जाधव म्हणाले,
‘म्हारी छोरियां छोरों से कम है क्या, असं विचारणारा दंगलमधला आमीर खान सध्या चर्चेत
आहे. त्या निमित्ताने महिला सक्षमीकरणावर चर्चा आहे. त्या वातावरणाचा विचार करून सावित्रीबाईंचं डूडल बनवल्याची शक्यता आहे.
त्यामुळे या डूडलमुळे सावित्रीबाईंचा सन्मान झालाय, असं मला तरी वाटत नाही. कारण सावित्रीबाई डूडलपेक्षा
खूप मोठ्या आहेत आणि त्यांच्या तुलनेत खूप कमी कर्तृत्व असणार्यांचंही डूडल यापूर्वी बनलंय. मात्र डूडल माध्यमातून सावित्रीबाई लाखो
जणांपर्यंत पोहोचल्या, हा आनंद निश्चित आहे.’
प्रजासत्ताक दिनाचं डूडल |
सावित्रीबाईंचं
डूडल हे आपल्या देशातल्याच कॉम्प्युटरवर दिसलं.
अशी काही डूडल त्या त्या संबंधित देशात दिसतात. न्यू इयरच्या स्वागतासारखी काही डूडल मात्र जगभर सर्वत्र दिसतात. काही डूडल एकापेक्षा जास्त देशांत दिसतात. वर्ल्ड कपमधल्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचसाठीचं डूडल या दोन्ही देशांबरोबरच आणखीही काही क्रिकेटवेड्या
देशांत दिसलं होतं. खास भारतासाठी बनवण्यात येणार्या डूडलची संख्या वाढते आहे. त्यामागची कारणं सांगताना प्रसाद शिरगावकर
म्हणाले, ‘फक्त गूगलच नाही तर आयटी क्षेत्रातल्या सर्वच मल्टिनॅशनल
कंपन्यांचं भारताकडे विशेष लक्ष आहे. पश्चिमेतल्या मार्केटमध्ये नव्या संधी उपलब्ध नाहीत. चीनने स्वतःचं पर्यायी तंत्रज्ञान उभं केलंय. अशावेळेस
भारतासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. सुंदर पिचाई या भारतीय
तरुणाला त्यांनी आपला सीईओ बनवलंय. इथल्या गरजांनुसार तंत्रज्ञान
विकसित करण्यासाठी ते स्थानिक तंत्रज्ञांना सोबत घेत आहेत. देवनागरीसारख्या
भारतीय लिपींसाठी टायपिंगचे टूल्स विकसित केली आहेत. त्यामुळे
भारतातल्या डूडल्सची संख्या यापुढे वाढतच जाईल.’
पहिलं भारतीय डूडल |
भारतीय
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक
दिन यांची डूडल २००८पासून सजत आहेत. शिवाय होळी आणि दिवाळीचीही
डूडल गाजली आहेत. सर्वच धर्माच्या सणांची डूडल बनवताना त्याचं
धार्मिक अंग टाळून केवळ त्यातल्या आनंदोत्सवावर भर देण्याचं धोरण गूगलने स्वीकारलंय.
त्यामुळे गणेशोत्सव, दुर्गापूजा असे सण लोकप्रिय
असले तरी त्याचे डूडल बनलेलं नाहीत. नाताळ ते नवीन वर्ष या काळात अनेक डूडल
बनतात. पण त्यात ख्रिसमस शब्द किंवा येशू ख्रिस्तांची प्रतिमा
येणार नाही, याची काळजी घेण्यात येते.
गूगलचं पहिलं डूडल |
गूगल
वापरणार्यांच्या उत्सवात सामील होण्यासाठीच डूडलची सुरुवात झालेली
आहे. ३० ऑगस्ट १९९८ या दिवशी
पहिलं डूडल बनवण्यात आलं, तेव्हा फार विचार केला गेला नव्हता. अमेरिकेतल्या नेवाडा
राज्यात बर्निंग मॅन फेस्टिवल साजरा होतो. हा उत्सव मुक्त कलात्मक
अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा नव्याने स्थापन झालेल्या
गूगल कंपनीच्या व्यक्तित्वासाठी
हे औचित्य साजेसं होतं. त्यामुळे बर्निंग मॅन फेस्टिवलचं पहिलं
डूडल बनवण्यात आलं. ते बनवताना गूगलच्या लोगोत मोठा बदल करण्यात
आला नव्हता. फक्त गूगलच्या स्पेलिंगमधल्या दुसर्या ‘ओ’च्या मागे फेस्टिवलचं बोधचिन्ह टाकण्यात आलं होतं.
गूगलचे निर्माते - लॅरी पेज, सर्जी ब्रिन |
पहिलं
डूडल आलं तेव्हा गूगल ही कंपनीही नोंदवण्यात आली नव्हती. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे दोघे विद्यार्थी
स्टॅनफर्ट युनिव्हर्सिटीत १९९५ साली भेटले. पुढच्या वर्षी त्यांनी
रिसर्च प्रोजेक्ट म्हणून बॅकरब नावाचं सर्च इंजिन सुरू केलं. त्याच्या पुढच्या वर्षी त्याचं नाव बदलून गूगल ठेवलं. गूगल हा शब्द गूगोल शब्दावरून सुचलाय. एकावर शंभर शून्य
असलेली संख्या म्हणजे गूगोल. डूडल हा शब्द मात्र नव्याने सुचलेला
नाही. सतराव्या शतकापासून हा शब्द इंग्रजीत वापरला जातोय.
त्याचं मूळ जर्मन भाषेत आहे आणि त्याचा मूळ अर्थ वेंधळा किंवा मूर्ख
असा आहे. ह्याच अर्थाने आजही लोकगीतं आणि पॉप गाण्यांमध्ये डूडल हा शब्द वापरला जातो.
गेल्या
तीन शतकांमध्ये डूडलच्या अर्थात अनेक फेरफार झाले.
यातूनच त्याचा सध्याचा अर्थ तयार झालाय. हा अर्थ
आहे, विचार करताना किंवा कंटाळलेलं असताना कागदावर निरर्थक
रेषा, आकार काढणं. या गिरबटण्यातून तयार झालेलं चित्र म्हणजे डूडल! पण फक्त गिरवण्याच्या पलीकडे त्यात एक सूत्र किंवा अर्थ सापडला पाहिजे.
जगभरातली अनेक प्रतिभावंत डूडलसाठी प्रसिद्ध आहेत. महान रशियन साहित्यिक अलेक्झांडर पुश्किन यांच्या वहीतल्या डूडलना कला म्हणून
खूप मान्यता मिळाली होती. थॉमस जेफर्सनपासून रवींद्रनाथ टागोरांपर्यंत
अनेकांनी रेखाटलेली डूडल्स गाजलेली आहेत. यातूनच डूडल्स रेखाटणार्यांना ‘डूडलर’ असं नाव मिळालं. १९३६
साली आलेल्या `मि. डीड्स गोज टू टाऊन` या सिनेमात
हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला.
रवींद्रनाथ टागोर हे प्रसिद्ध डूडलर होते |
गूगल
आणि डूडल यांच्यातलं यमक जुळत असल्यामुळे गूगलच्या लोगोवरील चित्राला हे नाव समर्पक
मानलं गेलं. पहिल्या लोगोच्या
वेळेस त्याचे दोन्ही मालक बर्निंग मॅन फेस्टिवलमध्ये सहभागी झाले होते. ते तिथे असताना सर्व्हर हँग होऊन वेबसाइट चालली नाही, तर आपली अनुपस्थिती कळावी, याची ती खूण होती.
त्यानंतर जाणीवपूर्वक तयार केलेलं पहिलं डूडल दोन वर्षांनंतर आलं.
कंपनीत शिकाऊ चित्रकार म्हणून आलेल्या डेनिस हॉंग याला गूगलच्या मालकांनी
फ्रेंच राष्ट्रीय दिनानिमित्त डूडल काढायला सांगितलं. तो दिवस
होता १४ जुलै २०००. या डूडलला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
त्यामुळे हॉंगच्या नेतृत्वाखाली कंपनीत डूडलसाठी चित्रकार आणि इंजिनीयर
यांची एक टीम बनवण्यात आली. त्यानंतर डूडलना संस्थात्मक रूप मिळालं
आणि त्यांची संख्या वाढत गेली.
सुरुवातीच्या
अनेक डूडलना कोणतीही लिंक जोडलेली नव्हती. ती साधी चित्रं होती. त्यावर क्लिक केलं तर आणखी काही
दिसत नसे. हळूहळू यात मोठे बदल होत गेले. मे २०१० मध्ये पॅकमॅन या लोकप्रिय व्हिडियो गेमच्या तिसाव्या वाढदिवसानिमित्त
पहिलं इंटरऍक्टिव डूडल
तयार झालं. त्याच वर्षी प्रसिद्ध संगीतकार जॉन लेननच्या सत्तराव्या
जन्मदिनानिमित्त ऍनिमेशन असणारं पहिलं डूडल आलं. त्यात त्याच्या
संगीताचा छोटा तुकडा ऐकण्याचीही सोय होती. १५ एप्रिल २०११ रोजी
चार्ली चॅप्लिनचा वाढदिवस होता. त्याच्या डूडलवर क्लिक केलं की यू ट्यूबवरचा एक ब्लॅक अँड
व्हाइट व्हिडियो लागायचा. त्यानंतरही डूडलमध्ये अनेक प्रयोग होत
गेले. लेस पॉल या गिटार वादकाच्या जन्मदिनानिमित्त त्या दिवशीचं
डूडल हे गिटारच बनलं होतं. कर्सरच्या मदतीने कुणीही ते वाजवू
शकत होतं. अमेरिकेतल्या लोकांना तर आपण वाजवलेलं गिटारचं संगीत
रेकॉर्डही करून ठेवता येत होतं.
डूडल
ही आज गूगलची ओळख बनली आहे. पण
ती एक मोठी रिस्क होती. लोगो ही प्रत्येक कंपनीची ओळख असते.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यात बदल करू नयेत. अशी पारंपरिक शिकवण मॅनेजमेंटच्या अभ्यासात दिली जाते. गूगलने मात्र बरोबर त्याच्या विरुद्ध गोष्ट डूडल वापरून केली आणि तेही यशस्वी
करून दाखवलं. त्यामुळे ब्रांडिंगच्या एकूण संकल्पनेत बदल झालेला
दिसतो. अनेक कंपन्या आणि विशेषतः वर्तमानपत्र आपल्या लोगोशी आता
बिनधास्त खेळ करतात. डूडलने घडवलेला हा मोठा बदल आहे.
गूगलचा पहिला डूडलर डेनिस हाँग |
गूगलच्या
कर्मचार्यांना ‘गूगलर’ म्हटलं जातं. अशा निवडक
‘गूगलर’ची एक टीम डूडल ठरवण्यासाठी नेहमी एकमेकांना भेटत
राहाते. कोणती घटना किंवा दिवस डूडल करून साजरा करावा,
यासाठी त्यांच्यात घनघोर चर्चा होतात. गूगलच्या
इतर कर्मचार्यांकडून तसंच गूगल वापरणार्यांकडून त्यासाठी अनेक सूचना येतच असतात. त्या दिवसाचं औचित्य गूगलचं व्यक्तिमत्त्व
आणि नावीन्याची आस याच्याशी किती जुळणारं आहे, याचा विचार करून
त्याची निवड होते. मग ‘डूडलर’
नक्की झालेल्या विषयावर डूडल तयार करतात. डूडल
हे समजण्यासाठी सोपं, स्वच्छ आणि नेमकं असावं, यासाठी आग्रह असतो. त्यातून कोणतीही जाहिरात होणार नाही,
याचीही काळजी घेतली जाते.
जगभर दिसलेलं एकमेव भारतीय डूडल |
या
अभ्यासपूर्ण निर्मितीमुळे काही ‘डूडलर’ हे त्यांच्या डूडलच्या लोकप्रियतेमुळेे सेलिब्रिटीही
बनले आहेत. जेनिफर होम हे त्यापैकीच एक. २ ऑक्टोबर २००९ या महात्मा गांधींच्या जयंतीदिनी त्यांनी काढलेलं पहिलं डूडल
प्रकाशित झालं होतं. त्याविषयीचा अनुभव त्यांनी गूगलच्या वेबसाइटवर
लिहिलेला आहे. त्यातून डूडल रेखाटनाची प्रक्रिया समजते.
जेनिफर होम लिहितात, ‘शांती आणि अहिंसा ही तत्त्व पोहोचवणारा एक महापुरुष
म्हणून मी गांधीजींकडे पाहते. ते स्वतःच एक आयकॉन असल्यामुळे त्यांचा वारसा एका चित्रातून उतरवणं सोपं नव्हतं.
सुरुवातीला बनवलेल्या एका डूडलमध्ये गांधीजी त्यांची प्रसिद्ध काठी घेऊन
वाळवंटातून चालताना दाखवले होते. पण त्यापेक्षाही अधिक चांगल्या
डूडलमधून त्यांचं व्यक्तिमत्त्व चितारण्यासाठी मी अमेरिका आणि भारतातल्या शेकडो गूगल
कर्मचार्यांशी चर्चा केल्या. त्यातून खादीच्या कापडावर साध्या शाईने काढलेला
गांधीजींचा चेहरा डूडल बनून आला.’
बाबासाहेबांच्या डूडलने वेगळी दिशा दाखवली |
गांधीजींचं
हे डूडल भारताशी संबंधित असूनही संपूर्ण जगभर दिसलं होतं. तसं अन्य कोणतंच भारतीय डूडल आजवर ‘इंटरनॅशनल’ ठरलेलं नाही. विशेष
म्हणजे, २०१५च्या भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या डूडलवरही गांधीजींची
छबी दिसली होती. भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांचं डूडलही भारताबरोबरच इंग्लंड, स्वीडन, अर्जेंटिना आणि पोलंड या देशातही दिसलं. नुसरत फतेह अली
खान, मारियो मिरांडा, पं. रवी शंकर, अमृता शेरगील अशा काही आंतरराष्ट्रीय लोकप्रियता
असणार्या कलाकारांची डूडल भारताशिवाय अन्य काही देशांमध्ये
दिसली होती. मात्र तसं स्थान
श्रीनिवास रामानुजन, रवींद्रनाथ टागोर, ऍनी बेझंट, एम. एफ. हुसेन, आर. के. नारायणन, राज कपूर अशा आंतरराष्ट्रीय ओळख असणार्यांना मिळालं नाही.
मंगलयानही डूडलवर |
प्रामुख्याने
भारतामध्ये दिसलेली सुमारे ८३ प्रादेशिक डूडल्स आजवर आलीत. त्यात स्वातंत्र्य दिन १२ वेळा, प्रजासत्ताक दिन ५ वेळा, बालदिन ७ वेळा, होळी ८ वेळा आणि शिक्षक दिन ४ वेळा आलंय. (मूळ लेखाच्या तुलनेत ही
आकडेवारी अपडेट आहे.) शिवाय दिवाळी आणि संक्रांतीचीही डूडल आली आहेत. पारशी नववर्ष असणारं नवरोजही अनेकदा डूडलवर अवतरलंय. ‘आलम आरा’ या देशातील पहिल्या बोलपटाचा तसंच देशात धावलेल्या
पहिल्या ट्रेनचा वर्धापनदिनही डूडलने साजरा केलाय. जगातील सर्वात
मोठी लोकशाही राजवट असणार्या भारतातील लोकसभा निवडणुकाची मतमोजणीही डूडलमध्ये
दिसलीय. तसंच मंगल यानाच्या उड्डाणाला
एक महिना पूर्ण झाला, तेव्हाही विशेष डूडल दिसलं होतं. भारतातील क्रिकेटचं वेड लक्षात घेऊन भारताशी संबंधित वेगवेगळ्या सामन्यांच्या
निमित्तानेही डूडल प्रकाशित
झालीत.
अन्विता तेलंग या पुण्याच्या विद्यार्थिनीने काढलेलं डूडल |
डूडलचे
विषय ठरवण्यात सर्वसामान्य वाचकांचा सहभाग गूगलने मर्यादितच ठेवलाय. मात्र वर्षातून एक दिवस वाचकांकडून आलेलं
डूडल वापरलं जातं. त्यासाठी देशपातळीवर डूडल फॉर गूगल ही स्पर्धा
घेतली जाते. भारतात २००९ पासून विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा
होते. त्यात एक विषय दिला जातो. देशभरातून
आलेल्या डूडलपैकी एक चित्र निवडलं जातं. १४ नोव्हेंबर या बालदिनाला
विजेत्या विद्यार्थ्याने काढलेलं डूडल गूगलच्या होमपेजवर झळकतं. नुकतीच झालेली २०१६ची स्पर्धा अन्विता प्रशांत तेलंग या पुण्याच्या मुलीने
जिंकली.
एम एफ हुसेनचे रंग डूडलवर |
भारतीय
डूडलची संख्या कमी असल्यामुळे ती अजूनही नवलाईची गोष्ट आहे. अमेरिकेत मात्र ती नाही. गेल्या काही वर्षांत डूडलची विषयनिवड तिथे संवेदनशील ठरू लागलीय. त्यामुळे त्यांनी आता डूडल दरवर्षी कोणत्या दिवशी दिसणार, याची यादीच तयार केलीय. रोनाल्ड डल या लेखकाचं डूडल १३ नोव्हेंबर २००७ला प्रकाशित
झालं होतं. त्याच दिवशी ज्यू धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण होता
आणि हा लेखक इस्रायलविरोधी विचारधारेचा होता. त्यामुळे ज्यूंमधून
त्याविरुद्ध प्रक्षोभ उमटला. त्यामुळे दुपारी २ वाजताच गूगलने
हे डूडल मागे घेतलं. गूगलच्या वेबसाइटवर आजवरची सगळी डूडल पाहायला
मिळतात. अपवाद फक्त या डूडलचा. अमेरिकन
मेमोरियल डे, व्हेटरन्स डे या राष्ट्रीय दिवसांना डूडल प्रसिद्ध
न केल्यामुळेही गूगलला निषेधाचा सामना करावा लागला होता. ‘डी डे’ला एका जपानी खेळाडूचं आणि इस्टरच्या दिवशी सीझर
चावेझ या कार्यकर्त्याचं डूडल आल्यामुळेही विरोध झाला होता.
भारत पाकिस्तान वर्ल्ड कप मॅच |
‘स्पार्क मूव्हमेंट’
या अमेरिकेतील महिलांच्या दबावगटाने २०१० ते २०१३ या काळातील डूडल्सचा
अभ्यास केला. या दिवसांत अमेरिकेत डूडलवर दिसलेल्या ४४५ जणांपैकी
श्वेतवर्णीयांची संख्या ६२ टक्के, महिलांची संख्या १७ टक्के आणि
कृष्णवर्णीय महिला अवघ्या ४ टक्के असल्याची माहिती समोर आली. यामुळे एकच खळबळ उडाली. पण गूगलने आपल्याकडील म्हणजे
भारतातील कंपन्यांप्रमाणे दुर्लक्ष न करता ‘स्पार्क
मूव्हमेंट’च्या अभ्यासाचा सकारात्मक विचार केला. त्यानंतर महिला आणि कृष्णवर्णीयांचा डूडलमध्ये
अधिकाधिक समावेश करण्याचा अधिकृत निर्णय झाला. डूडल बनवणार्या टीमने विविध धर्माच्या आणि वर्णाच्या व्यक्तींना जाणीवपूर्वक
स्थान देण्याचं एक धोरण तयार केलं. त्याचाच परिणाम म्हणून भारतीय डूडलमध्येही महिला आणि मुस्लीम व्यक्तींना योग्य
स्थान मिळताना दिसतं.
गूगलने
दाखवलेलं सामाजिक भान असण्याची किंवा ठेच लागल्यावर सुधारण्याची सवय आपल्याकडच्या आयटी
क्षेत्राला आणि एकूणच कॉर्पोरेट जगालाही नाही.
त्यामुळेच सावित्रीबाई फुलेंचं डूडल पाहून आनंद होणारे जसे होते,
तसंच आश्चर्याचा धक्का बसणार्यांची संख्याही कमी नव्हती.
***
तुम्हीही
सुचवा
गूगलला डूडल
वर्गीस कुरियन मोठा माणूस |
एखाद्या
व्यक्तीच्या नावाचा गूगलवर जास्तीत जास्त सर्च केला किंवा अधिकाधिक संख्येने सूचना
करणारे मेल केले, तर संबंधित
व्यक्तीचं डूडल बनू शकतं, असा एक गैरसमज आहे. डूडल कोणतं बनवावं, हा संपूर्णपणे गूगलचा निर्णय असतो.
कोणतं डूडल निवडलं जाईल, यासाठी निश्चित निकष नाहीत.
विषयाचं बंधन नसल्यामुळे कोणत्याही विषयावर डूडल होऊ शकतं. त्यामुळे
आपल्या आवडीच्या निमित्ताने डूडल बनावं, असं जगभर अनेकांना वाटत
असतं. असं वाटणार्या लाखोजणांना
गूगलने डूडलच्या निवडप्रक्रियेत स्थान दिलं आहे.
गूगलने
त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार,
proposals@google.com या पत्त्यावर मेल करून कुणीही आपल्या सूचना गूगलला कळवू शकतं. रोज अशा
हजारो सूचना येत असल्यामुळे आपल्या या सूचनांचं काय झालं, याचा
प्रतिसाद गूगलकडून आपल्याला
मिळत नाही. पण आपल्याकडे येणार्या प्रत्येक सूचनेची दखल आपण घेत असल्याचं आश्वासन गूगलने
दिलंय. त्यामुळे तुम्हीही तुमच्या
आवडीच्या विषयावर डूडल बनवण्याची शिफारस करू शकता.
***
डूडलवर
उमटावी शिवमुद्रा
२६ जानेवारीचे डूडल सर्वात सुंदर |
डूडलचं
महत्त्व लक्षात घेऊन आपल्या प्रेरणास्थानांचं डूडल बनावं यासाठी काही ध्येयवेडे धडपडत
असतात. अमरावती येथे सार्वजनिक
बांधकाम खात्यात सहायक अभियंता १ या पदावर कार्यरत असणारे सचिन चौधरी यापैकीच एक आहेत.
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं डूडल प्रकाशित व्हावं, यासाठी गेल्या वर्षीच्या शिवजयंतीच्या आधी सतत प्रयत्न केले होते. ते सिंदखेडराजा येथील जिजाऊसृष्टीचे सचिवदेखील आहेत. या मोहिमेविषयी ते सांगतात, ‘१४ एप्रिल २०१५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं डूडल पाहून मला खूप
आनंद झाला. त्यातून मला छत्रपती शिवरायाचं डूडल यावं असं वाटू
लागलं. शिवरायांचं कर्तृत्व जगाला माहीत व्हावं, अशी त्यामागची इच्छा होती.’
सचिन
चौधरी यांनी १७ डिसेंबर २०१५ ला शिवरायांच्या डूडलची मागणी करणारा पहिला मेल गूगलला
पाठवला. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी जिजाऊसृष्टीच्या लेटरहेडवर
पत्र लिहून दुसरा मेल पाठवला. यात महाराजांची थोरवी तर समजावून
सांगितलीच, पण गूगलवर शिवाजी राजांच्या नावे लाखोंच्या संख्येने
होणार्या सर्चची आकडेवारीही दिली. तसंच त्यांनी गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या
वैयक्तिक ईमेल ऍड्रेसवरही मेल पाठवून तशी विनंती केली. सुनील
यावलीकर आणि सुरज थोरात या चित्रकारांकडून त्यांनी शिवरायांच्या डूडलचे तीन नमुने तयार
करून घेतले आणि तेही गूगलला पाठवले. या विषयावर चौधरी यांनी फेसबुक
आणि टि्वटरवर मोहीमही चालवली. त्यामुळे शेकडो शिवप्रेमी तरुणांनी
गूगलला तशी सूचना करणारे मेल पाठवले. शिवाय त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिले.
अनेक वर्तमानपत्रं आणि वेबसाइटनी या मोहिमेची दखल घेतली.
सचिन
चौधरी सांगतात, ‘आमच्या मोहिमेत सहभागी असणारे हजारो शिवप्रेमी तरुण १९ फेब्रुवारी
२०१६च्या सकाळी १२ वाजून १ मिनिटांनी कॉम्प्युटरसमोर शिवरायांच्या डूडलची वाट पाहत
बसले होते. पण आमचे हे प्रयत्न
यशस्वी झाले नाहीत. आता सावित्रीबाई फुले यांचं डूडल पाहिल्यावर
आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गूगल याच दिशेने पुढे जात राहिलं,
तर छत्रपती शिवाजीराजांचं डूडल लवकरच येईल, अशी मला खात्री आहे.’
***
डूडलमधली
भारतीय भरारी
सत्यजितेर संसार |
डूडल
सुरू झाल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे ९ मार्च २००१ रोजी पहिलं भारतीय डूडल
आलं. फक्त भारतातच दिसणारं हे
डूडल होळीचं होतं. त्यानंतरच्या काळात भारताशी संबंधित ३५ जणांना
डूडलने मानवंदना दिली. ती अशी झालेल्या तारखेसह.
८
नोव्हेंबर २०१७ सितारादेवी (नृत्यांगना)
१
नोव्हेंबर २०१७ अब्दुल कवी दसनवी (उर्दू समीक्षक)
२१
ऑक्टोबर २०१७ नैनसिंग रावत (एक्प्लोरर)
७
ऑक्टोबर २०१७ बेगर अख्तर (गायिका, संगीतकार)
३०
जून २०१७ सय्यद सदाक्वेन अहमद नक्वी (कॅलिग्राफर)
११ एप्रिल २०१७ जैमिनी रॉय (चित्रकार)
२४ एप्रिल २०१७ राजकुमार (कन्नड अभिनेते)
४ जून २०१७ नूतन (अभिनेत्री)
२१ सप्टेंबर २०१७ नूरजहाँ (गायिका, अभिनेत्री)
२३ सप्टेंबर २०१७ डॉ. असिमान चटर्जी
११ एप्रिल २०१७ जैमिनी रॉय (चित्रकार)
२४ एप्रिल २०१७ राजकुमार (कन्नड अभिनेते)
४ जून २०१७ नूतन (अभिनेत्री)
२१ सप्टेंबर २०१७ नूरजहाँ (गायिका, अभिनेत्री)
२३ सप्टेंबर २०१७ डॉ. असिमान चटर्जी
३
जानेवारी २०१७ सावित्रीबाई फुले
३०
नोव्हेंबर २०१६ जगदीशचंद्र बोस (वैज्ञानिक)
३१
जुलै २०१६ मुन्शी प्रेमचंद (साहित्यिक)
२२
जुलै २०१६ मुकेश (गायक)
२७
जून २०१६ आर. डी. बर्मन (संगीतकार)
२
मे २०१६ मारियो मिरांडा (चित्रकार)
७
एप्रिल २०१६ पं. रवीशंकर
(सतारवादक)
२९
फेब्रुवारी २०१६रुक्मिणीदेवी अरुंडेल (नृत्यांगना)
३०
जानेवारी २०१६ अमृता शेरगिल (चित्रकार)
२६
नोव्हेंबर २०१५ वर्गीस कुरियन (दूधक्रांतीचे प्रणेते)
२४
ऑक्टोबर २०१५ आर. के.
लक्ष्मण (व्यंगचित्रकार)
३
ऑक्टोबर २०१५ नुसरत फतेह अली खान (गायक, संगीतकार)
१
ऑक्टोबर २०१५ ऍनी बेझंट (स्वातंत्र्यसेनानी)
१७
सप्टेंबर २०१५ एम. एफ.
हुसेन (चित्रकार)
१
जून २०१५ नर्गीस (अभिनेत्री)
१४
एप्रिल २०१५ बाबासाहेब आंबेडकर
१४
डिसेंबर २०१४ राज कपूर (सिनेकर्मी)
१०
ऑक्टोबर २०१४ आर. के.
नारायण (साहित्यिक)
४
ऑगस्ट २०१४ किशोर कुमार (गायक)
२९
एप्रिल २०१४ उस्ताद अल्लारखॉं (संगीतकार)
१३
फेब्रुवारी २०१४ सरोजिनी नायडू (स्वातंत्र्यसेनानी)
७
नोव्हेंबर २०१३ सी. व्ही.
रामन (वैज्ञानिक)
४
नोव्हेंबर २०१३ शकुंतला देवी (गणिततज्ज्ञ)
१६
सप्टेंबर २०१३ एम. एस.
सुब्बलक्ष्मी (गायिका)
२
मे २०१३ सत्यजीत रे (सिनेकर्मी)
८
फेब्रुवारी २०१३ जगजीत सिंग (गायक, संगीतकार)
२२
डिसेंबर २०१२ श्रीनिवास रामानुजन (वैज्ञानिक)
१७
सप्टेंबर २०११ अनंत पै (कॉमिक्स
आर्टिस्ट)
२
ऑक्टोबर २००९ महात्मा गांधी
७ मे २००९
रवींद्रनाथ टागोर
(यादी
८ नोव्हेंबर २०१७ पर्यंतची)
Sachin hai quite informative. Many will understand her importance after doodle appears. Otherwise we just talk of savitribais leki. Prashant made a good point. Suhas phadke
ReplyDeleteसोप्या.शब्दात छान माहीती. माझ्या उल्लेखाबाबत धन्यवाद.
ReplyDeleteझुंजार पत्रकार सचिन परब, गुगलचा डुडलवरचा चित्रलेखातील लेख आपणामुळे वाचनात आला.असाच लाभ मिळावा हाच लोभ.sudhir Jadhav.vjti
ReplyDeleteInformative write-up, सचिनजी....!!
ReplyDelete