Saturday, 30 April 2011

आयपीएलनं आपल्याला काय दिलं?


आता आयपीएल सुरू आहे. हळूहळू ते रंगात येतंय. पण पहिल्या दोन आयपीएलची मजा त्यात नाही. तेव्हा आयपीएलचा नशा सगळ्या देशाला चढला होता. तिसरं आयपीएल आपण सगळ्यांनी सचिनसाठी पाहिलं. आता वर्ल्डकप नुकताच झालाय. त्यामुळे आयपीएलचा अजून मजा येत नाहीय. पण म्हणून आयपीएलचं महत्त्व काही कमी होत नाही. कारण ती एक क्रांती आहे.

दुसरं आयपीएल संपलं तेव्हा मी मटामधल्या विंडो सीटमधे आयपीएलवर एक लेख लिहिला होता. मला हा लेख खूप आवडला होता. आज आयपीएलच्या मॅच बघतानाही तो लेख आठवतो. त्या लेखातले अनेक संदर्भ आज जुने झालेत. पण त्यातले मुद्दे महत्त्वाचे आहेत, असं मला वाटतं. आज वेस्ट इंडिज पाकिस्तानविरुद्ध हरतंय आणि त्यांचा मेन प्लेयर केविन पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. क्रिस गेल रॉयल चॅलेंजर्सकडून खेळतोय. वाईस कॅप्टन ब्रावो टेस्ट सिरिज सोडून इथे येऊ घातलाय. मलिंगाने आयपीएल खेळण्यासाठी थेट टेस्ट क्रिकेटमधूनच निवृत्ती स्वीकारलीय. आता यावर टीका करायची की क्रिकेटकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलायचा, हे आपणच आपलं ठरवायचं. 


स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकरांना क्रिकेट किती आवडतं, ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. पण त्यांनी तेव्हा त्यांनी ट्वेंटी २० च्या नावाने नाकं मुरडली होती. ते ऐकून वाचूनच मला हा लेख लिहावासा वाटला होता. त्यामुळे त्याचा इण्ट्रोत ते लिहिलं होतं. पुढे लेखात लतादीदींविषयी काही लिहिलं नव्हतं. मला वाटतं सगळा लेख लतादीदींच्या वक्तव्याला मला सूचलेलं उत्तरच होतं. त्यामुळे लतादीदींचा थेट संदर्भ प्रत्यक्ष लेखात आला नव्हता. त्यामुळे लतादीदींचे फॅन असणारा माझा एक मित्र माझ्यावर थोडा रागवला होता. तो इण्ट्रो असा होताः नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात लता मंगेशकरांनी सांगितलं की त्यांना ट्वेंटी२० बिलकूल आवडत नाही. हे मिडी क्रिकेट त्यांना आवडलं असतं, तरच नवल. कारण हा आमच्या नव्या पिढीचा गेम आहे. आम्हाला लतादीदींची गाणीही आवडतात आणि अवधूत गुप्तेचं रिमिक्सही.

जुना लेख कटपेस्ट केलाय. जुने संदर्भ जुळवून घ्यावे ही विनंती.

कुणी वंदा, कुणी निंदा. आयपीएलचा धंदा जोरात चालला. तो दणक्यात चालणारच होता. जग नव्या पिढीची नस ओळखणा-यांचं आहे. खोटं वाटतं तर ओबामांसमोर आपटलेल्या मॅक्केनना विचारा,  नाहीतर आपल्या अडवाणींना. नव्या पिढीला आपले वाटले नाहीत ते आपटले. आयपीएल नव्या पिढीला आपली वाटतेय. आयपीएल अस्सल तरुण आहे. क्रिकेटमधल्या सगळ्या रूढ कल्पनांना हादरवून टाकणारं, सिस्टिमला काखोटीला मारणारी ही एक क्रांती आहे. त्याच्यावर टीका खूप होते. पण ही क्रांती आपल्याला अनेक धडे शिकवून गेलीय. त्याची ही एक अर्धवट यादी...

यंदाचं आयपीएल भारतात होऊ नये,  म्हणून त्यात भरपूर राजकारण सुरू होतं. वेळापत्रकं बदलूनही काही होत नव्हतं. निवडणुकांमुळे संरक्षण देता येणार नाही, असं देशाचे गृहमंत्रीच सांगत होते. आयपीएल बारगळणार असं वाटत होतं. पण झालं भलतंच. सगळ्या सिस्टिमला उडत जा म्हणत,  आयपीएल दिमाखात भारताबाहेर गेली. इंग्लंड आणि आफ्रिकेनं आवताणं दिली. तिथे दूर आफ्रिकेत भारतीयांना हव्या त्या वेळेनुसार हा इव्हेंट साजरा झाला. हे सगळं अनेक अर्थांनी ग्लोबल होतं. जोहान्सबर्गच्या सामन्यात प्रेक्षकांनी पोस्टर झळकावलं... दरवर्षी भारतात अशाच निवडणुका होवोत.

* * *

जगाच्या दारावर आपण आतापर्यंत कायम घेणेकरी होतो. पण इथे आपले लोक जगभरातल्या क्रिकेटपटूंचा लिलाव करत होते. कालपर्यंत एखादा स्टीव्ह वॉ किंवा गिलख्रिस्ट भारतात येऊन दानधर्म करायचे,  आपण त्यांची कौतुकं करायचो. पण आता हैदराबादचा एखादा पेपर त्याच गिलख्रिस्टला खिशात टाकतो. आतापर्यंत गोरे अन्याय करायचे, आपण वांझोट्या तक्रारी करायचो. आता आपण त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून पाहतो. आपलं क्रिकेट बोर्ड पैशाच्या जोरावर आपलं म्हणणं खरं करते, असा आरोप बकनरपासून सायमंड्सपर्यंत सगळे करतात. आणि भज्जीपासून मोदींपर्यंत सगळे हसतात.
* * *

पण पैसा म्हणजे सगळं नाही, शेवटी गुणवत्ता महत्त्वाची हेदेखील कळलं. सेटिंग बेटिंग होणार आणि अंबानींची मुंबई, नाही तर शाहरूखची कोलकाता जिंकणार, हे गेल्या वर्षी सगळ्यांनाच वाटलं होतं. पण जिंकलं स्वस्तातलं राजस्थान. यंदा पीटर्सन सगळ्यात महागडा होता. पण अभिषेक नायरने त्याला एका ओव्हरमधे तीन सिक्स मारून कायमचा घरी पाठवला. पैसा नाही, तर टीम स्पिरिट आणि लीडरशिप मॅटर्स.

* * *

ट्वेंटी २० हा क्रिकेटमधला नवा प्रकार काही वर्ष इंग्लंड, ऑस्ट्रेलियात चालतो आहे. पण आयपीएलने त्याला धावायला लावलं. आपण यातले पायोनियर ठरलो. आता इंग्लंडसारखे देश अशा लीग घेऊन येताहेत. बाकी सगळ्यांनी खुशाल आपल्यामागे धावावं. त्याच रागातून कुणी बुकानन 'ब्लडी इंडियन्स' म्हणाला असेल. आपण त्याच्या अगतिकतेकडे दुर्लक्ष करायचं. पुढे जायचं.

* * *

नव्या पिढीची मानसिकता या खेळात आरशासारखी लख्ख दिसते. आमचं कल्चर म्हणजे मॅगी कल्चर. बस दो मिनट. वाट बघायला टाइम कोणाकडे आहे. अनिश्चितता हा इथला स्थायीभाव आहे, नव्या पिढीच्या स्पर्धेच्या जगासारखाच. हे बंडच आहे, प्रस्थापितांविरुद्ध. तुम्ही मोठे असाल तर तुमच्या घरी, असं रोकड सांगणारा हा खेळ. पूर्वपुण्याई रेकॉर्डबुकमध्ये. इथे जो बिनधास्त, तो जिंकणार. इथे कोण कुठला दिल्लीचा भाटिया सचिनला बोल्ड काढतो आणि मनीष पांडे हैदराबादच्या कसलेल्या गोलंदाजांची पिसं काढतो. सगळे एका पातळीवर येऊन खेळा, हाच इथला मंत्र आहे. गेल्या वेळेला पहिलं आलेलं राजस्थान आता सेमीफायनलालाही नाही. आणि गेल्यावेळचे शेवटचे हैदराबादवाले अंतिम फेरीत पोचलेत.

* * *

मुनाफ पटेलला इंग्रजी येत नाही. तरीही तो त्याच्या कॅप्टन वॉर्नशी छान 'बोलतो'. देअर देअर बिहाइंड बिहाइंड, या इंग्रजीला वॉर्न हसत नाही. तो त्याला हवी तशी फिल्डिंग लावून देतो. कामरान खानला तर अजिबातच इंग्रजी येत नाही, तरीही तो स्टार बनतो. इंग्रजी येत नाही, म्हणून कपिल ८३च्या वर्ल्ड कपच्या आधी कॅप्टनशिप नाकारण्याच्या विचारात होता,  हे त्यामुळेच खोटं वाटतं. आतापर्यंत आपापल्या विभागाच्या कोट्यांमधे अडकलेले आपले खेळाडू प्रांत, भाषा, जात याच्या पलीकडे जाऊन देशांच्याही सीमा सहज धूसर करत आहेत. मोठे खेळाडू रणजीमध्ये खेळत नाहीत, हे रडगाणं होतं. पण आता जगभरातले सगळे टॉपचे खेळाडू भारतातल्या पोराटोरांबरोबर खेळत असतात. चुटकीसरशी ही समस्या संपलीय. शिवाय देशभरातलं चांगलं टॅलेण्ट समोर आलं. धोनी क्लिक झाल्यामुळे विकेटकीपरची एक पिढी एक्स्पोजरशिवाय राहणार होती. आता आठ-दहा विकेटकीपर लोकांच्या ओळखीचे झालेत. पैशाच्या जोरावर का असेना, हे घडतंय. देशातल्या अनेक समस्यांना या फॉर्म्युल्यातून उत्तर मिळू शकेल, कदाचित. पैसा ऐसा भी बोलता है.

* * *

मी टीव्हीवर पोसलेल्या पिढीचा प्रतिनिधी आहे, असं बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा म्हणाले होते. आता तशी पिढी आपल्याकडे तयार झालीय. आयपीएल आलं ते आयसीएलला उत्तर म्हणून. आयसीएल हे झी मीडिया ग्रुपचं प्रॉडक्ट. मीडियाचा हा प्रभाव. सारेगम सुरू झालं तेव्हा इण्डस्ट्रीत चार गायक होते, आज पन्नास आहेत, तसंच क्रिकेटचंही होईल, असं झीच्या सुभाषचंद गोयलनी आयसीएल सुरू करण्यापूर्वी सांगितलं होतं. ते खरं झालंय. मीडियाने या नव्या क्रांतीचा पाया रचलाय.

* * *

ब-याचशा चिअरगर्ल्स छान नाचतात. पण त्यांच्याकडे बघण्यापेक्षा युसुफ पठाणने मारलेला सिक्स बघण्यात आपल्याला रस असतो. टीव्हीवालेही त्यांना फारसं दाखवत नाहीत. मग चिअरगर्ल्स नाचवणं नैतिक की अनैतिक अशा चर्चेतला वेळ वाया गेला, असंच म्हणावं लागेल. तिथे पंजाबने मॅच जिंकल्यावर प्रिटी झिंटा धावत जाऊन युवराजच्या गळ्यात पडते. त्याचे फोटो छापून येतात. पण कुणाला त्यात वावगं वाटत नाही. कुणी आक्षेपही घेत नाही. त्यांच्यात काहीतरी आहे, अशा चर्चाही कुणी करत नाही.

...आपण सगळे बरेच बदलतोय बहुतेक.

* * *

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. IPL लोकं का बगतात त्याचं कारण http://blogs.espncricinfo.com/iplinbox/archives/2012/05/for_the_love_of_the_game.php

      Delete