Tuesday, 3 May 2011

हुतात्म्यांच्या नावानं चांगभलं


साधारण गेल्या नोव्हेंबर २००९ ची गोष्ट आहे. माझ्या एका मित्राने मला निरोप दिला. उद्धव ठाकरेंना मला भेटायचं होतं. भेटीचे दोन संदर्भ होते. एक मटात असताना हल्ला आणि पराभव  नावाचं आर्टिकल लिहिलं होतं. शिवसेनेनं वागळेंसाठी आयबीएन लोकमतच्या ऑफिसावर हल्ला केला होता. त्यावर मी टीका केली होती. त्याविषयी आमची चांगली चर्चा झाली. त्यापूर्वी अनेक वर्षं कार्यक्रम आणि प्रेस कॉन्फरन्सेसमधून आम्ही भेटलो असू. पण वन टू वन पहिल्यांदाच भेटलो होतो.

दुसरा संदर्भ हा की मी तेव्हा मटाचा राजीनामा दिला होता. नोटीस पीरियड चालला होता. पुढे मी मराठीत नोकरी धरली, पण तेव्हा पुन्हा नोकरी करायची इच्छा नव्हती. मी प्रबोधनकारांवर काम करायची इच्छा बोलून दाखवली. मी प्रबोधनकारांवर खूप खूप बोलत होतो. काय करता येईल, ते सांगत गेलो. त्यांनी पॉझिटिव रिस्पॉन्स दिला. त्यातून पुढे प्रबोधनकार डॉट कॉमचं काम उभं राहिलं.


दुसरं काम त्यांच्याकडून आलं. ते खूप आनंद देणारं होतं. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई महानगरपालिका एक कायमस्वरूपी प्रदर्शन उभारणार होती. त्यासाठी पंढरीनाथ सावंत, कुमार कदम, श्याम देशमुख अशी जाणकार माणसं काम करत होती. शिवाय कदम आंदोलनातल्या लढवय्यांवर डॉक्युमेंट्री करत होते. मी त्यांच्यासोबत काम करावं, असं उद्धव ठाकरेंनी सूचवलं. मला खूप आनंद झाला. मी खूप प्रयत्न केला, पण दरवेळी काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा आणि दुर्दैवाने मी त्यात कधीच जोडलो गेलो नाही. पण यानिमित्ताने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावर जितका होईल तितका अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यावर माझी मतं तयार होण्याइतपत त्यावर ब-यापैकी वाचन झालं. 

पुढे एक मे जवळ आला. संयुक्त महाराष्ट्र साजरा करण्यासाठी सगळे सरसावले. पण मी खूप अस्वस्थ होतो. हुतात्म्यांचा हवा तसा सन्मान होत नव्हता, असं मला वाटत होतं. म्हणूनच सुवर्ण जयंतीच्या कोणत्याही कार्यक्रमात मी कधीच गेलो नाही. मला जावसंच वाटलं नाही. तीच तिडीक होती. त्यातच हा लेख लिहिलाय. एक मे च्या आदल्या आठवड्यात हा लेख नवशक्तितल्या समकालीनमधे छापून आला होता. तो नेहमीप्रमाणे कटपेस्ट केलाय.

आता सगळेच पन्नासावा महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी उतावीळ झालेत. अर्थातच राजकारणी त्यात आहेतच. काँग्रेसने सरकारी खर्चाने लेझर शो वगैरे कार्यक्रम घेतलाय. शिवसेनेने रेकॉर्डब्रेक रक्तदान केलंच. शिवाय लता मंगेशकरांच्या गाण्यांचा लाइव कार्यक्रम आहेच. राष्ट्रवादीने तर अमराठी हुतात्म्यांचा वारशांना सन्मानित करायचं ठरवलंय. तिथे मनसेने मराठी खाद्यमहोत्सव आयोजित केलाय.

आता सगळयांना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची आठवण येतेय. पण गेली पन्नास वर्षं कुणाला त्याच्याशी काहीही घेणंदेणं नव्हतं. फोर्टमधली एखादा पत्ता सांगताना सांगावी लागणारी ओळखीची खूण यापलीकडे हुतात्मा स्मारकाशीही कुणाला घेणंदेणं नव्हतं. पण आता अचानक त्याचं चित्र जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र दिसू लागलंय. हे सारं होतंय त्याचा आनंद आहेच. निदान पन्नासावा का होईना महाराष्ट्राचा वाढदिवस मोठया उत्साहाने साजरा होतोय. याचा आनंद कोणाला होणार नाही. पण त्यामुळेच गेले एकोणपन्नास वर्षं महाराष्ट्राच्या मातीतल्या १०६ अमर हुतात्म्यांच्या हौतात्म्याकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष अगदी लख्ख समोर येतंय. आजच्या सोहळयांचा आनंद साजरा करतानाच गेल्या एकोणपन्नास वर्षांच्या वनवासाचं दु:खही लक्षात ठेवायला हवं. कारण एक मे नंतर चार दोन दिवसच हा उत्सव सुरू राहणार आहे. आणि नंतर पुन्हा तोच वनवास, तोच अंधार कायम राहणार आहे.

फ्लोरा फाऊंटनशेजारच्या हुतात्मा स्मारकावर काळया दगडातलं एक लयदार शिल्प आहे. एक शेतकरी आणि एक कामगार एकत्र येऊन एक ज्योत पेटवून पुढे झेपावत आहेत, असं हे अतिपरिचित शिल्प आज महाराष्ट्राची ओळख बनली आहे. त्या शिल्पावर एकशे सहा जणांची नांव आहेत. ही माणसातला कुणीही नेता नाही. एकही नाव आपण इतर कुठे वाचलं असल्याची शक्यता नाही. तरीही आधुनिक महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही नावापेक्षा ही नावं मोठी आहेत. ही सर्वसामान्य माणसानं इतिहासावर कोरलेली नावं आहेत. हे १०६ जण महाराष्ट्रभरात काँग्रेस सरकारच्या पाशवी अत्याचाराचे १९५६ ते ६० या काळातले महाराष्ट्रभरातले बळी होते. ते लढत होते. कारण त्यांना फक्त आपल्या माणसांचं, आपल्या भाषेचं, आपल्या संस्कृतीचं राज्य हवं होतं. आणि गांधीजींच्या अहिंसेचा वारसा सांगणारं आपलं सरकार त्यांना टिपून टिपून मारत होतं. आश्चर्य म्हणजे त्या सरकारांच्या नेतृत्वात शांतिदूत जवाहरलाल नेहरू आणि भारतरत्न मोरारजी देसाई अशी इंग्रजांच्या विरुध्द स्वातंत्र्यलढयात अग्रणी असलेली माणसं होती.

बाकी सगळयांना आपापली राज्य मिळाली होती. बंगाल्यांना बंगाल, मद्राश्यांना मद्रास, राजस्थान्यांना राजस्थान मिळालं होतं. आंदोलनं केल्यानंतर कन्नडिगांना कर्नाटक आणि तेलुगूंना आंध्रही मिळाला. पण मराठी माणसांना महाराष्ट्र मिळत नव्हता. कारण काय तर दार कमिशनपासून फाझलअलींच्या अध्यक्षतेतल्या राज्य पुनर्रचना आयोगापर्यंत कुणीच सगळा महाराष्ट्र एकत्र होऊ देत नव्हतं. हे सगळे आयोग, समित्या धनदांडग्यांच्या
इशा-यावर नाचत होत्या. पण आपल्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी मराठी माणसाला दुषणं देत होती. प्रत्येकजण म्हणत होता की आडमुठी आक्रमक मराठी माणसं देशाची आर्थिक राजधानी मुंबई सांभाळण्याच्या लायकीची नाहीत. मराठी माणूस राष्ट्रीय नसल्याचं आडून सुचवलं जातं होतं.

आजपर्यंत देशासाठी आहुती देण्यात सदैव आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने हे सगळं का सहन करायला हवं होतं. तो पेटून उठला. खरं तर त्याने काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास ठेवून अनेक दिवस वाट पाहिली. पण शंकरराव देव, भाऊसाहेब हिरे, मामा देवगिरीकर, काकासाहेब गाडगीळ, यशवंतराव चव्हाण असं दिग्गज नेतृत्व त्यासाठी काम करत होतं. पण हायकमांडसमोर या सगळयांनी आपल्या शेपटया मागे टाकल्या. हा तर कडेलोट होता.
मग मुंबई शांत राहिली नाही.

त्याआधी २१ नोव्हेंबर ५६ ला विधानसभेवर मुंबईतल्या कामगारांनी पांढरपेशांनी मोर्चा निघाला होता. अशावेळेस अंधाधुंद गोळीबार झाला. १५ जणांनी आपले प्राण गमावले. ही सगळी साधी माणसं होती. कारण मोर्चा साध्या माणसांचाच होता. पुढे द्वैभाषिकाचा तोडगा स्वीकारल्यानंतरही नेहरूंनीच मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली. १६ जानेवारीला रात्री साडेआठ वाजता नेहरूंनी रेडियोवरून ही घोषणा केली. मुंबई रस्त्यावर आली. ट्राम, बस जाळल्या गेल्या. अशावेळेस पुन्हा अंधाधुंद गोळीबार झाला. रस्त्यावरून बेफाम गोळया झाडत पोलिसांच्या गाडया जात होत्या. तेव्हा वीस वर्षांचा मॅट्रिकच्या परीक्षेला बसलेला गिरगावात राहणारा बंडू गोखले रात्रशाळेतून परतत होता. त्याच्या उजव्या छातीत गोळी लागली. दोन लहान भावंडांची जबाबदारी असलेला हा मुलाचे दुस-या दिवशी हॉस्पिटलमधे निधन झाल्याचे घोषित करण्यात आले. दुस-या दिवशी निवृत्ती मोरे हा सिंम्प्लेक्स गिरणीतला तरुण असाच पोलिसांच्या गोळीला हकनाक बळी पडला. त्याचं नुकतंच लग्न झालं होतं.

तिथे बेळगावात मारुती बेन्नाळकरने पोलिसांच्या रोखलेल्या बंदुकीच्या नळीवर छाती लावली आणि म्हटलं चालवा गोळी. २४ वर्षाचा मारुतीच्या छातीतून गोळी आरपार गेली. तेव्हा त्याची मुलगी तीन वर्षांची होती. हे ऐकून अंगात मराठी रक्त असणारा कोण शांत बसला असता. त्यामुळे गोळया झाडत राहिल्या. आपल्या तान्हुल्या मुलांना हातात घेऊन गिरणगावातल्या आया रस्त्यावर उतरल्या. आम्हाला मारून संयुक्त महाराष्ट्र मिळणार असेल तर आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत, असं म्हणाल्या. अमानुष पोलिसांच्या काळजांनाही घरं पडली. हे शौर्य, हे त्याग बावनकशी होतं. पण या सांडलेल्या रक्ताला सन्मान नाही मिळाला कधी.  

आज सरकारी गोळीबारात एकजण जरी गेला तरी त्याची चौकशी होते. इंग्रजी राजवटीतही हे होत असे. पण इतक्या विषण्ण करणा-या गोळीबाराची चौकशी झाली नाही. पंचशील सांगत चिन्यांना भाऊ बनवायला निघालेल्या नेहरूंना ही मरणारी माणसं आपली वाटत नव्हती. या साध्या माणसांची सविस्तर माहितीही कधी पुढे येऊ शकली नाही. सरकारने याची माहिती आजतागायत लपवून ठेवलीय. विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे तोही मार्ग बंद होता. फक्त शेडयुल्ड क्लास फेडरेशनचे आमदार बी. सी. कांबळे सभागृहात होते. त्यांनी मोठा लढा दिला. त्यातून काही माहिती समोर आली. ती अंगावर काटा आणणारी आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्र (सातवा खंड) या य. दि. फडके यांच्या ग्रंथात ही माहिती आहे.

बी. सी. कांबळेच्या शब्दांत सांगायचे तर मुंबईत मोरारजींच्या सरकारने एखूण ४६१ वेळा गोळीबार केला. २७४२ गोळया झाडल्या. सरकारी आकडयाप्रमाणे ८० लोक ठार व ३८१ जबर जखमी झाले. म्हणजे १६ जानेवारीपासून सरासरीने रोज ५४४ गोळया मुंबई शहरात झाडल्या गेल्या. दोन मिनिटाला एक असे रात्रंदिवस गोळीबाराचे प्रमाण पडते. झालेल्या जखमा क्रूरपणाचा कळस करणा-या होत्या. २४ लोकांच्या कवटीतून गोळया गेलेल्या होत्या. १६ लोकांच्या छातीतून गोळया आरपार घुसल्या होत्या. दोन माणसांच्या बुबुळातून नेमबाजी झाली होती. १७ जणांच्या पोटातून आतडी लोळवण्यात आली होतीतर दोन माणसांच्या ढुंगणातून गोळया झाडण्याचे सैतानी कृत्य करण्यात आले होते. जागच्या जागी तात्काळ ठार झालेल्यांची मुंबई शहरातील संख्या ३२ असून त्यात १८ वर्षांच्या आतील कोवळया विद्यार्थ्यांची संख्या आठ आहे. गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या भगिनी १५ आहेत. तर तीन महिन्यांची अर्भकेही पोलिसी अत्याचारांच्या थैमानातून सुटली नाहीत.

या आंदोलनाचं नेतृत्व सामान्य माणसांनी केलं. त्यांनी नेते घडवले. एरवी एकमेकांच्या उरावर बसणा-यांना एकत्र आणलं. सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी. श्रीपाद अमृत डांगे, भाई माधवराव बागल अशी मोठमोठी माणसं या लढयासाठी सारे मतभेद टाकून एकत्र आली. देशाच्या आर्थिक आधाराचा पाया घालणारे देशाचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुखांनी नेहरूंच्या तोंडावर मंत्रिपदाचा राजीनामा फेकला. त्यांनीही इतरांसारखंच ताटाखालचं मांजर व्हायचं ठरवलं असतं, तर देशभर त्यांच्या नावच्या किमान दहाबारा केंद्रीय संस्था असत्या. किमान पद्मविभूषण तरी नावावर असतंच. पण आज त्यांनी केलेल्या त्यागाची जाण आपण मराठी माणसाने तरी कुठे ठेवलीय. त्यांच्यासोबतच्या कुणालाही त्याचं श्रेय कधीच मिळालं नाही. ज्यांच्या हट्टामुळे या मातीत १०६ हुतात्म्यांचं रक्त सांडलं, त्या नेहरूंच्या हाताने द्वैभाषकाचे मुख्यमंत्रीपद सुखेनैव सांभाळणा-या यशवंतराव चव्हाणांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश सोपवण्यात आला. हा मोठा विरोधाभास होता.

पण काँग्रेसच्या मुशीत वाढलेल्या महाराष्ट्राने सगळं विसरून काँग्रेसला सदैव साथ दिली. महाराष्ट्र मोठा की नेहरू, यात नेहरूंच्या बाजुने दान टाकणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे भाग्यविधाते, जाणते राजे बनले. आणि फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या वाडयात हे उद्गार काढताना यशवंतरावांसोबत असणा-या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक नेतृत्व केलं. मग कोण कशाला संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना लक्षात ठेवतं? ही ज्योत तेवत ठेवण्याची जबाबदारी असणारे बुध्दिजीवी यशवंतरावांच्या रमण्यात मश्गुल झाले होते. हुतात्म्यांना गुंड मवाली ठरवलं जात होतं. आज त्यांच्या वारशांपर्यंत पोहचता येईल इतकीही माहिती कुणाला नाही. त्यांचा सन्मान नाही. सरकारने त्याचं डॉक्युमेंटेशन दूरच, पण साधी माहितीही अजून कुणाला उघड केलेली नाही. कारण एवढंच होतं की संयुक्त महाराष्ट्र हा साध्या माणसांने काँग्रेसशी लढून मिळवलेला हा विजय होता.

अजुनही महाराष्ट्रातल्या साध्या माणसांच्या आंदोलनाला संपवण्यासाठी केलेलं तेव्हाच्या सरकारचं पाप समोर आलेलं नाही. कधी येणार त्याचं उत्तरही कुणाकडे नाही. कोंबडं झाकून ठेवलेलं आहे. सूर्य उगवण्याची वाट पाहत उभा आहे.

12 comments:

  1. सचिन, तु जे लिहीलं आहेस ते बिनतोड आहे. एकावन्न वर्षांपूर्वीचं जळजळतं वास्तव आहे. काँग्रेसला याचं पूर्वीही काही वाटलं नाही आणि तर शक्यच नाही. १मे ला हुतात्मा चौकात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत स्मारकावर पुष्पचक्र वाहण्यासाठी माणिकराव आणि बाकीच्या काहींची जी धडपड होती ती लाजीरवाणी होती.असो. झाकलेलं केंव्हाना केंव्हा बाहेर येतच. ते लवकरच येईल.

    ReplyDelete
  2. लेख आवडला.खूप तळमळी ने लिहिलेला अन अभ्यासपूर्ण लेख.

    ReplyDelete
  3. khup chan marathi mansachya shant swbhawacha sagalayanich fayda ghetala ahe khup chan lekh

    ReplyDelete
  4. satay kadhi cha lapun rahat nahi te kadhi na kadhi tari ughad hotach

    ReplyDelete
  5. Congress rajyakartyana laaj vatali pahije maharashtra che netrutva karatana

    ReplyDelete
  6. Mala tar kahich vatle nahi karan ha lekh mi radhach vachla aahe tayamule


    tasatar patrakar lok mala khup aavadtata mahanun

    pan je kay lihala aahe te agadi manapasun


    best of luck

    ReplyDelete
  7. एखाद्या प्रकल्पासाठी काम करताना एक नवा अभ्यास झाला. त्या निमित्ताने एक चांगला लेख वाचला मिळाला. साक्षात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा इतिहासच उभा केलात. लेख आवडला.

    ReplyDelete
  8. Sachinji, kharokharch satyanveshi lekh aahe tumacha, tumache sarvach lekh vachaniya asatat kharetar he sanganyachi avashyakatach naahi karan tumhi kunachihi bheed bhaad na balagata lekhan karat asata aani te nehamich kaaljaparyant jaaun bhidate , pan prashna asaa aahe ki swatah maahiti ghene tar durach parantu tumachyasarkhyanche likhan vachnyachi tasadi dekhil phar lok ghet naahit changalwadachya vilkhyat adaklelya aamhasarkhyanche dole kadhi ughadnaar kunas thaauk, hech tar havay aajachya rajkaarni lokana congres tar phakt nimitamatra baaki sagale saarkhech, hyat jeva badal hoil tevaach jhakalela kombade aarvel toparyant asech .tumachya upakramala shubhechha dhanyawad. "Anil Vishnu Kute"

    ReplyDelete
  9. sachin barober hai tuze kuhp chan lehalya hai

    ReplyDelete
  10. khupach chhan lekh

    ReplyDelete