Friday 1 April 2011

आमदार झोपा काढत आहेत


पंधरा दिवस एक ईमेल सोडला तर इंटरनेटकडे बघितलंच नव्हतं. त्यामुळे जवळपास पंधरा दिवसांपूर्वी नवशक्तितल्या कॉलमात लिहिलेला कॉलम टाकायचा राहून गेला होता. लेखाचा विषय खरं तर आमदारांच्या झोपेवर होता. अनिल काकोडकरांच्या भाषणात अनेक आमदार डुलक्या काढताना टीव्हीवर बघितलं. त्याच्यावर लिहायला बसलो. हा कार्यक्रम वि. स. पागें अभ्यास केंद्राच्या उद्घाटनाचा होता म्हणून त्यांच्या भाषणांचा संग्रह वाचायला घेतला. रेफरन्ससाठी म्हणून पुस्तक हातात घेतलं पण बरंच पुस्तक वाचून काढलं. त्यातला बराचसा भाग आधीच वाचलेला होता. तो रिफ्रेश झाला. त्यानंतर लिहिलेल्या लेखावर वि. स. पागेच छा गये. मूळ विषय बाजूलाच राहिला. 

लेख नवशक्तित छापून आला. संध्याकाळी एका वयस्कर गृहस्थांचा फोन आला होता. बहुतेक कल्याणचे सामंत. ते पागेंचे दूरचे नातेवाईक. त्यांना पागेंवर कुणीतरी लिहिलं याचा खूप आनंद झाला. मलाही खूप आनंद झाला. पागेंसारखी सगळीच माणसं आपण आपली सगीसोयरीच मानतो.

लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट. 

परवा सोळा तारखेला वि. स. पागेंची पुण्यतिथी गेली. वि. स. म्हणजे विठ्ठल सखाराम पागे. ६० ते ७८ अशी अठरा वर्षं ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते. पण त्याहीपेक्षा रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून महाराष्ट्र पागेंना ओळखतो. रोहयोला अनेक वर्षं पागे योजनाच म्हटलं जात होतं. ही योजना बहात्तरच्या दुष्काळानंतर कायदा बनली पण त्याआधी १९४९ सालीच त्यांनी कामाचा हक्क हा लेख लिहून या योजनेचं सूतोवाच केलं होतं. ग्रामीण महाराष्ट्राला खरा आधार देणारी ही योजना प्रभावीपणे लागू व्हावी, म्हणून ते जन्मभर झटत राहिले. आता तर महाराष्ट्राला आदर्श मानून केद्राने संपूर्ण देशभर ही योजना राबवलीय.

पागे फक्त राजकारणी नव्हते. ते स्वातंत्र्यसंग्रामात लढलेले ध्येयवादी नेते होते. सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातले असूनही त्यांनी विद्वत्तेचा डोंगर उभा केला. मराठीबरोबरच इंग्रजी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली अशा भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. गांधीवादाचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव होता. ते ज्ञानेश्वरीवर, तुकाराम गाथेवर, वेदांवर प्रवचनं करत. त्याच आत्मीयतेनं राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा या विषयावरही भाषणंही करत. त्यांनी डायलॉग विथ डिविनिटीसारखं अध्यात्मावरचं दर्जेदार पुस्तक लिहिलं आणि निवडणुकीचा नारळसारखी नाटकंही लिहिली. देशभरातल्या पीठासीन अधिका-यांनी त्यांना अनेक वर्षं आपल्या समस्या सोडवण्यासाठी समितीचा अध्यक्ष बनवलं. त्याचबरोबर त्यांचा संगीतातला अधिकार इतका होता की सूर सिंगार संसदेने त्यांना अध्यक्ष बनवलं होतं. राज्यात ग्रंथालय चळवळीत त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांनी आपली सगळं वजन अनेक वर्षं स्वातंत्र्यसैनिकांच्या हक्कांसाठीही वापरलं.

३० सालच्या कायदेभंगापासून ते सार्वजनिक जीवनात आघाडीवर होते. ते अखिल भारतीय काँग्रेस समितीतही होते. राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक मोठमोठ्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. ५७ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. वर पाटील, खाली पाटील, असा जातीयवादी प्रचार झाल्याने जातीने ब्राम्हण असलेल्या पागेंना पाडण्यात आलं. पण त्याचं किल्मिष त्यांनी कधीच मनात धरलं नाही. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारमधे समन्वयक म्हणून त्यांनी आपलं योगदान दिलं. अभ्यासू संसदपटू म्हणून राज्य सरकारला लोकहिताच्या अनेक योजना राबवण्यासाठी भाग पाडलं. काँग्रेसमधे त्यांनी कार्यकर्त्यांची फळी घडवलीच. पण पक्षाच्या पलीकडेही जाऊनही अनेकांना मार्गदर्शन केलं. मग ते रा. सू. गवई असोत की अण्णा डांगे. त्यांनी कधी जात पाहिली नाही आणि धर्मही. एवढंच नाही तर त्याकाळी सांगली जिल्ह्याचं आकाशपाताळ व्यापून उरलेल्या दादा – बापू वादापासूनही ते अलिप्त राहू शकले. यशवंतराव चव्हाणांच्या प्रभावळीमुळे जुन्या सातारा जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचं कर्तृत्व झाकोळलं गेलं. त्यात पागेंचं नावही आघाडीवर मानायला हवं. गेल्याच वर्षी त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यानिमित्त महाराष्ट्र विधिमंडळाने त्यांच्या भाषणांचा आणि लेखांचा संग्रह प्रकाशित केला. पोष्टखात्याने त्यांचं तिकीट काढण्याचीही घोषणा केली.

पागेसाहेबांची ही आठवण काढण्याचं कारण हेच की महाराष्ट्र विधिमंडळाने संसदीय प्रशिक्षण केंद्र सुरू केलंय. आणि त्याला वि. स. पागेंचं नाव दिलंय. नेहमी तीच तीच तीन चार नावं सगळीकडे फिरत असताना पागेंसारख्या बावनकशी माणसाचं नाव एका चांगल्या उपक्रमाला दिलं हे उत्तम झालं. बजेटचं अधिवेशन सुरू झालं त्याच्या पहिल्याच दिवशी या केंद्राचं उद्घाटन पार पडलं. जागतिक दर्जाचे अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिक काकोडकर यांनी अणुऊर्जेवर व्याख्यान दिलं. जपानच्या त्सुनामीनंतर अणुप्रकल्पांमधे स्फोट घडत असताना या विषयावर खरं तर जगभर उत्सुकता आहे. अपवाद फक्त आपल्या आमदारांचा. कारण काकोडकरांचं भाषण सुरू असताना अनेक आमदार डुलक्या काढत होते.
दस्तुरखुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण झोपणा-यांमधे आघाडीवर होते. एकदोनदा तर झोप अनावर झाल्यामुळे ते समोर भेलकांडल्यासारखे झाले. भ्रष्ट अधिकारी पी. जे. थॉमस यांची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक करताना आपल्याला अशीच डुलकी लागली होती, हे तर त्यांना झोपा काढून सांगायचे नव्हते. पतंगराव कदम, शिवाजीराव मोघे असे मंत्रीवरही मागे नव्हते. झोपा काढण्यावाचून फारसे काम त्यांना आधीच उरलेले नाही. विरोधी पक्षही मागे नव्हते. भाजपचे पांडुरंग फुंडकर आणि शिवसेनेचे दिवाकर रावतेही गाढ झोपेत असल्याचं टिव्हीवर दिसलं. आम्ही डोळे मिटून चिंतन करत होतो, अशी नेहमीची सारवासारव काही आमदार नंतर पत्रकारांसमोर करत होते. आम्हाला शूटिंग करता आलं, तसं त्यांचा आवाजही रेकॉर्ड करता आला असता, तर आम्ही तुमचं घोरणंही ऐकवलं असतं, असं एका पत्रकाराने त्यावर सांगितलंही.

विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुखांनाही चांगलीच डुलकी लागली होती. ते अधिक धक्कादायक होतं. एखादा आमदार झोपला तर त्याला जाग करण्याचं काम देशमुखांकडे आहे. पण ते स्वतःच जागे नव्हते. देशमुखसाहेब अनुभवी आहेत. अभ्यासू आहेत. फर्डे वक्ते आहेत. उत्तम संघटक आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक आहे. पण असं झोपणं त्यांना बिल्कूल शोभणारं नाहीय. त्यांच्याच जिल्ह्याच्या पागेंच्या नावाने प्रशिक्षण केंद्र सुरू होतंय, याचं तरी त्यांनी भान ठेवायला पाहिजे होतं. शिवाजीरावांना तर पागेंचा सहवास आणि मार्गदर्शनही लाभलं असावं. विधिमंडळाने पागेंवर पुस्तक काढलं तेही शिवाजीरावांच्याच आग्रहामुळे असावं. त्याला त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही लिहिलीय. पागेंची थोरवी माहीत असल्यामुळे शिवाजीरावांचा प्रमाद अधिक क्लेषकारक आहे. वयाच्या अडुसष्ट्याव्या वर्षी विधिमंडळातून निवृत्ती घेणा-या आणि ऐंशीव्या वर्षीपर्यंत समाजकारणात जागतेपणी वावरणा-या पागेंचा आदर्श असताना कुणी आपल्या वयाची लंगडी कारणं सांगू नयेत एवढंच.

शिवाजीरावांची नुकतीच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य म्हणून नेमणूक झाली. सभापतीपदी निष्पक्ष काम अपेक्षित असल्यामुळे पक्षाची पदे घेऊ नयेत, असा लोकशाहीचा संकेत आहे. पण शिवाजीरावांना त्याचं काही उरलेलं दिसत नाही. पागेही शिवाजीरावांप्रमाणेच सभापती होते. त्याच काळात ते काहीकाळ महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्षही होते. या मंडळाचा अहवाल किंवा आणखी काही सभागृहापुढे चर्चेला येई, तेव्हा सदस्यांना टीका करायला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून ते कुणाच्याही लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने उपसभापती किंवा अन्य तलिका सदस्यांना सभापतीपदाच्या खुर्चीवर बसवून बाजुला होत. आता हे सारं शिवाजीरावांना माहीत नाही, असं थोडंच आहे? आमदार म्हणून निवृत्त झाल्यानंतर पागेसाहेबांनी अनेक समित्यांवर काम करून सरकारला मार्गदर्शन केलं. पण त्यासाठी सरकारकडून केवळ नाममात्र एक रुपया वेतन घेतलं. आज भ्रष्टाचाराचे नवे आदर्श निर्माण होत असताना त्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदार असणा-या पुढा-यांनी झोपा काढल्या, हे एकाअर्थी बरंच झालं.

पुढा-यांचं हे वागणं आता नेहमीचंच झालंय. पण त्यामुळे लोकशाही बदनाम होते, हे वाईट. लोकशाही नसल्यामुळे काय होतं ते आपण आता लिबियात पाहत आहोतच. संसदीय लोकशाहीपेक्षा अधिक चांगली व्यवस्था आपल्यासाठी दुसरी नाही, हे वारंवार सिद्ध झालंय. आजही सभागृहांमधे वारंवार उत्तम चर्चा होतात. विरोधी पक्ष लोकांचे प्रश्न उचलून धरतात. अनेक चांगल्या योजनांवर विधिमंडळातच सविस्तर चर्चा होते. पण हे सगळं कधीच लोकांसमोर येत नाही. फक्त टोळीशाही म्हणून लोकशाहीची बदनामी सतत सुरूच असते. त्यांना अशा झोपांमुळे आणि गोंधळांमुळे अधिक बळकटी येते. त्याचा संपूर्ण दोष हा लोकप्रतिनिधींच्याच माथी येतो.

अशा लोकप्रतिनिधींसाठी त्यांच्याच समोर पागेंनी ७८ साली केलेलं भाषण आजही महत्त्वाचं आहे, लोकशाही आणि त्यातल्या त्यात समाजवाद हा एक फार गुळमुळीत शब्द झाला आहे. उद्या एखादा गट भांडवलशाहीला समाजवाद म्हणू लगला तर त्यात आश्चर्य वाटावयास नको. ग्रामीण भागात अशी म्हण आहे की गुळगुळीत पैसे हे जत्रेमध्ये चालवावे. तेव्हा लोकशाहीचा अर्थ, समाजवादाचा अर्थ स्पष्ट झाला नाही, तर आजची राजकीय पद्धत फार काळ टिकेल असे वाटत नाही. कारण जनतेचे प्रश्न या पद्धतीने सुटले नाहीत तर ही पद्धत बदलली गेल्यास लोकांना फारसे वाईट वाटणार नाही. तुम्ही जर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी हवे ते करता, जमेल तशा निष्ठा बदलता तर मग जनतेला आपण दोष देऊ शकणार नाही. हा इशारा दिलेल्यालाही आता बत्तीस वर्षं झालीत. आमदार अजून झोपलेलेच आहेत. 

3 comments:

  1. सुश्रुत2 April 2011 at 22:54

    छान आहे लेख!आता तरी ’त्यांचे’ डोळे उघडतील का ? :(

    ReplyDelete
  2. chan lekh lihilas..awadala..mahiti upyogi padali..manoj bhoyar

    ReplyDelete
  3. namaskar surekhch ahe lekh pan ya lekhawar abhipraya vykat karnaryanchi sankya pahili dukha watla yacha ki apan ata Bhandwalshahi Samajwadache dishene vegane challo ahot . lihinyatun mhane kranti hote ajun tari kahi 1947 nantar ghadleli aikiwat kiwa wachnat nahi ahe

    rahila aple mananiya loak pratinidhinchya zopa cha vishya ti mandali fakt nivadnukachya kalatch 24x7 jagi astat ani pudhil 5 varshe aramshir zoplelich astat nasti tar aplya kadil bahutanshi pani yojana( dharananchi kame )purnatwas jaun atpadi , maan. ya vishye news channel na kahich milale naste trp wadhwayala kiwa aj konta ghotala ugadkis ala yacha breaking news deta ali nasti chala kiman ek tari satkarya tyanche mule ghadte ahe he hi nase thodke

    jai hind mhanu ki jai maharashtra ya madhe gondhal udun gela ahe

    ReplyDelete