Monday 29 August 2011

इथे गांधीजी भेटतात अधूनमधून


अण्णा किती यशस्वी झाले. त्यांचं जनलोकपाल खरंच येणार का. त्यामुळे भ्रष्टाचार खरंच संपेल का. हे सारे प्रश्न माझ्यासाठी तरी फिजूल आहेत. खरं सांगायचं तर मला अण्णांचं कौतुक फारसं नव्हतंच. आताही इतरांइतकं नाही. तरीही मला त्यांचं आंदोलन महत्त्वाचं वाटलं. ज्यांना स्वतःशिवाय काहीच माहीत नव्हतं असे लाखो तरुण वंदे मातरम म्हणत रस्त्यावर उतरले. मला वाटतं सगळं भरून पावलं. मी गेली काही वर्षं राजकारणी, प्रशासनाची यंत्रणा तसा जवळून बघतोय. दिल्लीतही दीडेक वर्षं राहिलोय. तो अनुभव जमेस धरून मला वाटतं या आंदोलनानं खूप काही मिळवलंय. 

त्यामुळेच मी थोडा चक्रावलोयसुद्धा. आपण सगळे ज्याला फारसं महत्त्वही देत नव्हतो, असा एक माणूस देशात एवढी जागृती घडवतो. आपल्या डोळ्यासमोर सगळं घडतं, पण आपल्याला कळतही नाही. हे धक्कादायक होतं आणि आहे. त्यातून मी माझ्यापरीनं अण्णांच्या चमत्काराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा फक्त त्या शोधातला एक छोटासा कोन आहे. पण महत्त्वाचा आहे. मी त्यांच्यातला गांधीजी शोधायचा प्रयत्न केला. तो लेख पुढे कटपेस्ट करतोय. 


या बुधवारीच रामदेव बाबा अण्णांच्या स्टेजवर दिसले. याच रामलीला मैदानावर बाबा स्टेजवरून उडी मारून पळाले होते. टीव्हीवाले हुशार. त्यांनी त्या दिवशी भाषण करणारे आणि स्टेजवरून पळून जाणारे बाबा शेजारी शेजारी चौकटींत दाखवणं सुरू केलं. तेव्हा अण्णा आणि बाबांच्या आंदोलनातली तुलना सहज होत होती.

बाबांचाही मुद्दा भ्रष्टाचाराचाच होता. अण्णांच्याच एप्रिल महिन्यातल्या आंदोलनाने खरंतर रामदेवांसाठी पार्श्वभूमी तयार केली होती. केंद्रीय मंत्र्यांनी महत्त्व देऊन त्यांची हवा तयार केली होती. मीडियाही त्यांच्यासोबत होता. त्यांच्याकडे टीव्हीसारख्या मीडियाचा वापर करायचा दांडगा अनुभवही होता. देशातली एक खूप मोठी यंत्रणा त्यांच्या पाठिशी उभी होती. अनेक वर्षं मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करणारे इवेंट आणि मीडिया मॅनेजमेंटमधले हुशार लोकही त्यांच्यासोबत होते. तरीही पोलिसांच्या एका दट्ट्यांनं बाबांचं टाय टाय फिश्श झालं. बाबांचं उपोषणही फार दिवस चालू शकलं नाही आणि रामलीला मैदानातलं फारसं कुणी हरिद्वारला गेलं नाही. आता तर गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही, अशी त्यांची स्थिती झालीय.

उलट अण्णांना उपोषण करण्याच्या आधीच पोलिसांना उचललं. केंद्र सरकारमधले अनेक मंत्री अण्णांच्या विरोधात बोलत होते. काँग्रेसने तर त्यांच्यावर अश्लाघ्य टीका कऱण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी उपोषण करण्यात अनेक अटी आठकाठी घातल्या होत्या. तरीही उपोषण झालंच. नुसतं झालं नाही तर जबरदस्त यशस्वी झालं. लोकांच्या प्रतिसादामुळे सरकारला झुकावं लागलं. विरोधी पक्षांना झुकावं लागलं. इतकंच नाही तर संसदेलाही झुकावं लागलं.

मग अण्णांकडे असं काय आहे की जे रामदेव बाबांकडे नव्हतं. याचं एक खूप महत्त्वाचं उत्तर आहे महात्मा गांधी.

रामदेव बाबांचे योगाचे कार्यक्रम भगवान पतंजलींच्या अष्टांग योगाच्या नावाने होतात. या अष्टांगांची सुरुवात यम, नियमाने होते. या पहिल्या पाय-या म्हणजे नैतिक साधना होय. यम या पायरीवर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह येतं. तर नियमांमधे शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रधिधान या पाच गोष्टी मोडतात. पण या पहिल्या दोन पाय-या सोडून बाबांनी थेट तिस-या आणि चौथ्या पायरीवर उडी घेतली होती. तिसरी पायरी आहे आसन आणि चौथी प्राणायाम. रामदेव बाबांनी नैतिक पायाचा आग्रहच नाकारला. त्यामुळे ते तब्येत सुधारण्यासाठी सांगत होते, तेवढंच लोकांनी ऐकलं. पुढे जेव्हा त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कुणी गंभीरपणे घेतलं नाही.

अष्टांग योगाची सुरुवात यम आणि त्यातला पहिला यम म्हणजे अहिंसा. पण बाबांना या अहिंसेचंच वावडं होतं. थोडा धक्का बसल्यावर त्यांनी पोलिसांना विरोध करण्यासाठी गावोगाव सशस्त्र दलं उभं कऱण्याची घोषणा करून टाकली. आधी आणि नंतरही त्यांनी जणू काही काँग्रेसला टार्गेटच केलं होतं. आजचा रामदास हा टीव्हीच्या स्क्रीनमधून लोकांच्या घरोघर जाणार आहे, असं भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही लेखकांनी बाबांच्या अगदी सुरुवातीच्या दिवसात केलं होतं, त्याची आठवण करून देणारं त्यांचं वागणं होतं. बाबांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात रामजन्मभूमीच्या मुद्द्यावर हिंदुत्ववादी त्वेषाने भाषणही केलं होतं. शेवटी साध्वी ऋतंभरांना आपल्या स्टेजवर आणण्याचा मोह त्यांना आवरला नाही, तेव्हा त्यांची झाकली मूठ उघडलीच. उपोषण हे गांधीवादी साधन त्यांनी स्वीकारलं होतं. पण ते त्यांना पेलवलं नाही आणि गांधीवाद त्यांना पटलेला नाही, हेदेखील हळूहळू उलगडत गेलं.

गांधीजींना गोळ्या घालून संपवलं तरीही संपत नाही म्हणून हिंदुत्ववादी आजवर नथुराम गोडसेचाच झेंडा खांद्यावर घेऊन नाचत आहेत. पण फक्त हिंदुत्ववादीच कशाला, स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणा-या काँग्रेसला तरी कुठे गांधीजी हवे असतात? गांधीजींचं सरकारीकरण करून संपवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पण परिवर्तनाच्या लढाईत आघाडीवर असणा-या आंबेडकरवाद्यांनाही गांधी शत्रू नंबर एक वाटत आलेत. नाहीतर बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राजघाटावर जाऊन लघवी केल्याची घटना घडलीच नसती. कम्युनिस्टांना तर गांधीजींचा विटाळच आहे. वर्षानुवर्षं गांधीजींची निंदानालस्ती करण्याची संधी कुणीही सोडली नाही. सगळ्या भारतीयांना लहानपणापासून गांधीजींविरुद्ध द्वेष कसा निर्माण होईल, याचा प्रयत्न सगळ्या वाद्यांनी केला. तरीही हा अर्धनग्न फकीर सगळ्यांना पुरुन उरला. त्यामुळे आज या सगळ्या वाद्यांना अण्णांच्या मागचा गांधीजींचा फोटो पाहून किती त्रास होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी.

राजकारण्यांना मुळात गांधीजी नकोच असतात. त्यांना अण्णा तरी कुठे हवे आहेत. संधी मिळाली की ते अण्णांना घेरणार आहेतच. पण अण्णा हजारेंकडे गांधी आहे का? हा प्रश्न आहेच. आपली स्वतःची ओळख ते गांधीवादी म्हणून देतात. स्वामी विवेकानंदांच्या तरुणांना आवाहन या पुस्तकामुळे त्यांच्या विचारांमधे पहिली ठिणगी पडली. पण गांधीसाहित्यातूनच त्यांना आपला जगण्याचा आणि ग्रामसुधारणेचा मार्ग सापडला. त्यांच्या ट्रस्टच्या हिंद स्वराज्य या नावापासून तर उपोषणाविषयीच्या आग्रहापर्यंत त्यांच्यातला गांधीवादाचे तुकडे ठायी ठायी सापडतात. त्यांच्या स्टेजवर गांधीजींचा मोठाला फोटो दिसतो. त्यांच्या भाषणातूनही गांधीजींचा उल्लेख येत असतो. त्यांचा अहिंसेचा आग्रह तर टोकाचा आहे. त्यांनी राजघाटावर जाऊन केलेलं मनन चिंतन तर आहेच. हे सगळं असलं तरी आज त्यांच्या आंदोलनात गांधी आहेत का, याचं उत्तर देण्यास ते पुरेसं नाही.

अण्णा नहीं ये आंधी हैं, ये तो दुसरा गांधी हैं. यातलं पहिलं चरण पटण्याजोगं आहे. कारण आज देशभर जी चेतना निर्माण झालीय, त्याकडे कुणीही काणाडोळा करू शकत नाही. शाळेतल्या मुलांपासून ते वृद्ध स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत, गृहिणींपासून ते कॉर्पोरेटी तरुणांपर्यंत, जम्मूपासून चेन्नईपर्यंत सर्वत्र अण्णांचा बोलबाला आहे. कुठे डबेवाले, कुठे ट्रकवाले, कुठे पोलिसांच्या बायका तर कुठे तृतीयपंथीही, सगळे रस्त्यावर उतरताहेत. दिल्लीतला एक तरुण न्यायाधीशही अण्णांच्या स्टेजवर येऊन न्यायव्यवस्थेतला लोकपालच्या अखत्यारित आणायचं भाषण करून जातो. कोणत्याही आंदोलनाच्या जवळपास कधीच न फिरकणारा एक मोठा वर्ग आज रस्त्यावर उतरलाय. जगभरातले भारतीय अण्णांच्या समर्थनात मेणबत्त्या पेटवताहेत. जगभरातला मीडिया अण्णांवर हेडलायनी बनवत आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानातले एक दुकानदार राजा जहांगीर अख्तर यांनीही अण्णापासून प्रेरणा घेऊन उपोषणाला बसण्याची तयारी सुरू केलीय. एकही राजकीय पक्ष किंवा संघटना पाठिशी नसताना अण्णांनी हे करून दाखवलंय. कुणी कितीही टवाळी करायचं ठरवो किंवा दुर्लक्ष करो, ही आंधी आहेच आहे. तरीही अण्णांना दुसरा गांधी म्हणणं गांधीजी आणि अण्णा दोघांवरही अन्याय करणारं आहे.

आज आपण इतिहासात मागे वळून पाहतो तेव्हा दिसणारा गांधी खूपच मोठा आहे. त्यांनी जगाच्या इतिहासाला वळण लावलंय. तो आजही तितकाच मोठा आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतात आले तेव्हा म्हणाले, गांधी झाले नसते तर माझ्यासारख्या कृष्णवर्णीय कधीच अध्यक्ष बनू शकला नसता. ट्युनिशिया, इजिप्त आणि सगळ्या मध्यपूर्वेत यावर्षाच्या सुरुवातीला ज्या क्रांत्या झाल्या, त्यालाही गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर आधारित फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमोक्रसी हे जेन शार्प यांचं पुस्तक मार्गदर्शक ठरलं होतं. हे गांधींचं मोठेपण पाहता अण्णा त्यासमोर कुठेच उभे राहू शकणार नाहीत. अण्णांचं निस्वार्थी चारित्र्य, अहिंसेचा आग्रह, उपोषणाचा मार्ग, निडरता आणि सर्वसामान्यांविषयीचा विश्वास यातून थोडे थोडे गांधीजी भेटतात. त्यांना सापडलेले गांधीजी ते प्रामाणिकपणे आपल्या आचरणातून आणि आंदोलनांतून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. एक चिरंतन आणि अंतर्बाह्य शुचितेचं प्रतीक म्हणून गांधीजींकडे पाहताना एक टक्का तरी गांधी अण्णांपर्यंत पोहोचले आहेत का, अशी शंका येत राहते.

गांधीजींचे अभ्यासक आणि पणतू तुषार गांधी यांनी तर हे स्पष्टपणे म्हटलंच आहे. गांधीजींची उपोषणं शत्रूलाही मित्र बनवण्यासाठी असायचा आणि अण्णांचा सत्याग्रह एक शत्रू डोळ्यासमोर ठेवून आहे, ही त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. मुळात एका कायद्यासाठी गांधीजींचा आग्रह असता का, इथून चर्चेला सुरुवात होते. ते कायदा नाही, माणूस बदलण्यासाठी धडपडत होते. गांधीजींचे अभ्यासक असे अनेक मु्द्दे शोधू शकतील. तरीही अण्णांना भेटलेला एक टक्का गांधी जग हलवतो आहे. स्वातंत्र्यलढ्यात काय घडलं असेल याची चुणूक दाखवून देतो आहे. हे काय कमी आहे?

एका मराठी माणसाने गांधीजींचा खून केला. तेव्हापासून एकही मराठी नेता संपूर्ण देशाने कधी स्वीकारला नाही. अपवाद थोडासा फक्त विनोबा भावेंच्या भूदान आंदोलनाचा. अशावेळेस अण्णांमागे आज सगळा देश धावतो आहे. तेही त्यांच्यासोबत थोडेफार गांधीजी आहेत म्हणूनच. 

5 comments:

  1. अण्णांना भेटलेला एक टक्का गांधी जग हलवतो आहे. स्वातंत्र्यलढ्यात काय घडलं असेल याची चुणूक दाखवून देतो आहे. हे काय कमी आहे?

    - शतप्रतिशत सहमत. लेख आवडला.
    हा लेख http://www.baliraja.com/ इथे टाकता येईल का? की या लेखाची लिंक देऊ? :)

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लेख...:) पूर्णपणे सहमत आहे!

    ReplyDelete
  3. धन्यवाद,
    http://www.baliraja.com/node/267
    लेख येथे प्रकाशित केलाय.

    ReplyDelete
  4. अगदी सुंदर आमच्या भावना अगदी समर्थपणे मांडल्यात धन्यवाद कुणीतरी विक्रांत फाद्केना वाचायला सांगा हे !

    ReplyDelete
  5. ज्यांना 'गांधी' माहित आहे तेच या आंदोलनचे चांगले विश्लेषण करू शकतात. किवा त्यांनी योग्य प्रकारे केल आहे. गांधीना शिव्या देणारा २ प्रकारचा वर्ग आहे. १ ज्यांना गांधी माहीत आहे. २ रा ज्यांना गांधी माहीतच नाही. अण्णांचे आंदोलनाचे विश्लेषण करताना तू हे नेमके सूत्र घेतल्या मुळे ह्या विचाराची व्याप्ती आणि 'अण्णांना सापडलेला गांधी' हे सूत्र मांडणी मला आवडली. अण्णांना १ले सापडले विवेकानंद. पण कृती साठी आणि व्यवहारा साठी गांधीच उपयोगी राहतो. हे जेंव्हा अण्णांना पटले तेंव्हाच त्यांनी स्वतःला गांधी विचारात भक्कम केले. दुसरा गांधी वगैरे थोतांड आहे. अण्णांना १% गांधी उपयोगी आणता आला त्याला ज्या प्रकारचे लोक ज्या पद्धतीने या आंदोलनात उतरले त्यांच्या वरही गांधींचा १% प्रभाव होता म्हणूनच. मी सेवाग्रामला ४० दिवस होतो. १९८७ च्या मे महिन्यात तेंव्हा जेवढा गांधी कळाला तेवढाच माझ्या कडे आहे. असो. मराठी माणसाला मिळालेला हा भारतीय पातळीवरचा सन्मान केवळ गांधींमुळे मिळाला हे सत्य 'सत्य' आहे. हे कुनही नाकारू नये एवढेच. आभारी आहे तुझा.

    ReplyDelete