Thursday 19 October 2017

शूद्रसुक्ताची लढाई

गोव्यात असं कधी होईल, असं वाटलं नव्हतंच. एखाद्या कवितेसाठी कवीवर एफआयआर दाखल व्हावा, इतकं गोव्यातलं सांस्कृतिक वातावरण विषारलं कधी? गोवा वरून इंटरनॅशनल आणि मॉडर्न वाटत असलं तरी ते मनाने एक छोटंसं गाव आहे. खेड्याच्या लोभसपणा त्यात आहे. त्याचबरोबर आपापल्या जातीचे लोक धरून ठेवण्याचा टिपीकल गावठीपणाही त्यात आहे. धार्मिक रूढीपरंपरांमध्ये आणि राजकारणात ही जातीयता अनेकदा उग्र रूप धारण करते. मात्र गोव्याबाहेरच्या लोकांसाठी गोव्याची प्रतिमा कायम सुशेगाद अशीच असते. कवी म्हणून विष्णू सूर्या वाघ यांनी त्या प्रतिमेवर कायम घण घातले.

वाघ भाजपचे आमदार झाले तरी त्यांनी स्पष्ट बोलणं सोडलं नव्हतं. मी संपादक असलेल्या गोवादूत या पेपरात त्यांचा कॉलम काही दिवस चालला होता. त्यात त्यांनी एकदा सनातन संस्थेच्या विश्व हिंदू संमेलनाची हजामत केली होती. त्यामुळे तेव्हा गोवा भाजपच्या प्रभारी असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अस्वस्थ होऊन फोन केले होते. त्यांनी शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे प्रयोग सरकारी खर्चाने ठिकठिकाणी लावले होते. कला अकादमीत १४ एप्रिलला आशा भोसलेंच्या मैफिलीला जागा नाकारून तिथे आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम करणाऱ्यांना जागा दिली होती. आपापल्या कॉलमांत, भाषणांत ते बहुजनवादी भूमिका ठामपणे मांडत राहिले.


चार वर्षांपूर्वी सुदिरसुक्त या त्यांच्या कोकणी काव्यसंग्रहाचं प्रकाशन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्तेच झालं होतं. चार वर्षं उलटली त्याला. त्या वेळच्या भाषणातही त्यांनी ठामपणे आपली मतं मांडली होती. मी गोव्यात गेल्यानंतर अटेंड केलेला तो  पहिला कार्यक्रम होता. तीन वर्षांनी मी मुंबईत परतलो तेव्हा आदल्या रात्री उशिरा लाल दिव्याची गाडी घेऊन ते मला भेटायला घरी आले होते. त्यांच्यात काही दोष नव्हते असंही नाही. त्यांची वैचारिक मांडणीतलं सगळंच मान्य होईल असंही नाही. पण त्या सगळ्याच्या पलीकडे त्यांची कविता आणि त्यातही काव्यसंग्रह सुदिरसुक्त मस्तच आहे. कोकणी भाषेचा आणि बहुजन अस्मितेचा सुंदर अविष्कार त्यात आहे. परंपरेचं बोट धरून केलेला विद्रोह ही त्याची खासियत आहे.

त्यातल्या `फरक` या कवितेमुळे रुग्णशय्येवर असलेल्या वाघांविरुद्ध तक्रार दाखल झालीय. त्याच कवितेच्या अनुवादाने या लेखाची सुरुवात झालीय. ज्या गोष्टींमुळे अपवित्र झाल्याचं सांगण्यात आलं, त्यांची यादी त्यात आहे. इतकी साधी गोष्ट माझ्यासारख्या कविता न कळणाऱ्याला कळते. ते सगळी यंत्रणा हाताशी असलेल्या गोवा सरकारला कळत नाही, यावर विश्वास बसणं शक्य नाही. मतदार हा हुशारच असतो. त्याने गोव्यातल्या भाजपला लागलेलं हे विकृत हुकूमशाही वळण ओळखलं असावं. त्यामुळेच गोव्यातल्या बहुजनसमाजाने त्यांना विधानसभा निवडणुकीत धुडकारलं होतं. काँग्रेसचा मूर्खपणा आणि भाजपची सत्ता यामुळे भाजपचं सरकार सत्तेवर आलंय. पण कवीवरचा दाखल झालेल्या एफआयआरने त्यांच्या गोव्यातील पतनावर शिक्कामोर्तब केलंय. खरं तर गोवा कोकणी अकादमीचे सगळे पुरस्कार रद्द करून सरकारने विषय संपवला होता. आता एफआयआर दाखल करून घेणं हा निव्वळ खोडसाळपणा आहे.  

मूळ लेख ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी दिव्य मराठीत छापून आला होता. आता एफआयआरच्या निमित्ताने विजय चोरमारे यांनी हा लेख त्यांच्या फेसबूक पेजवर शेअर केला होता. त्यासाठी त्यांचे आभार. अधिकाधिक लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा म्हणून तो लेख ब्लॉगवर शेअर करतोय. गोवन वार्ता या पेपरसाठी याच विषयावर आणखी एक लेख तेव्हा लिहिला होता. त्यातलाही काही भाग यात जोडलाय. दोन्ही लेखांचा एकत्र कोलाज इथे कॉपी पेस्ट. 


ते मासे खातात
आम्हीही मासे खातो
...
ते दारू पितात
आम्हीही दारू पितो
...
ते बायकांना भोगतात
आम्हीही बायकांना भोगतो
...
ते न्हातात
आम्हीही न्हातो
...
पण न्हाल्यानंतर
ते पवित्र होतात
आणि आम्ही मात्र
भ्रष्टच उरतो
...
नाहीतर
त्यांनी देवळाच्या गाभाऱ्यात जाऊन
देवाला कसं शिवलं असतं?
आणि आम्ही
बाहेरून दर्शन घेऊन
कशाला सटकलो असतो?
...
फरक आहेच
त्यांच्यात आणि आमच्यात
...

शांत सुशेगाद गोव्यात सध्या या कवितेने धुमाकूळ घातलाय. कवी विष्णू सूर्या वाघ यांच्या `सुदिरसूक्त` या काव्यसंग्रहातली `फरक` ही कविता. मूळ कविता कोंकणीत आहे. त्याचा हा भावानुवाद. बऱ्यापैकी जशाच्या तसा. फक्त भोगतात या शब्दाच्या जागी झंवतात असा शब्द आहे. पेपर, टीव्ही आणि सोशल मीडियावरच्या चर्चांमध्येच नाही, तर चार दिवसांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर लढवत असलेल्या पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतच्या प्रचारातही `सुदिरसूक्त` एक मुद्दा होता.

विष्णू सूर्या वाघ हा पहाडासारखा भरभक्कम माणूस गेल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळ गोव्याच्या राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकरणात वादांच्या केंद्रस्थानी आहे. ते  मराठीतलेही आघाडीचे कवी आहेतच. कोणत्याही कवीसंमेलनात त्यांची कविता कधी पडली नाही. वक्ते म्हणूनही त्यांना गोव्यात तरी तोड नाही. गोव्यात दीर्घकाळ संपादक असणारे ल. त्र्यं. जोशी यांनी केवळ त्यांचं भाषण वैदर्भीयांना ऐकता यावं म्हणून नागपुरात गोवा महोत्सव आयोजित केला होता. मराठी, कोकणी, हिंदी, इंग्रजी या चारही भाषांवर पक्की हुकुमत. त्यांनी पत्रकार म्हणूनही गोवा गाजवला. वयाच्या तिशीच्या आत गोव्यातल्या दोन आघाडीच्या पेपरांचे ते संपादक बनले. ते उत्तम नाटककार आहेत. ते गायक, नट आणि गायकनट आहेत. त्यांची नाटकं महाराष्ट्रातही गाजलीत. ते चित्रकारही आहेत आणि व्यंगचित्रकारही. तत्त्वज्ञान, अध्यात्म हादेखील त्यांच्या आवडीचा विषय. त्यांची रसाळ प्रवचनं ऐकण्यासाठी गर्दी होते. शिवाय ते राजकारणी आहेतच. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ते एकेकाळी तुफानी प्रचारक होते. काँग्रेसमध्येही ते रमले होते. शिवसेनेचे ते प्रवक्ते होते आणि भाजपच्या तिकीटावर ते आमदार बनले होते. पहिल्याच टर्ममध्ये ते गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष बनले होते. कला अकादमीचे अध्यक्ष आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भरवणाऱ्या इंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांचं काम गाजलं.

आता हे सारं वर्तमानकाळात न लिहिता भूतकाळात लिहावं की काय, असं वाटायला लावणारी परिस्थिती आहे. वाघांना जवळपास वर्षभरापूर्वी मागोमाग दोन हार्ट अटॅक आले. डॉक्टरने त्यांना जवळपास मृत घोषितही केलं होतं. त्यांनी केवळ दुर्दम्य जीवनेच्छेच्या जोरावर काळावर मात केलीय. ते अजूनही बेडवर, व्हीलचेअरवर असतात. बोलू शकत नाहीत. ते फक्त बोलू शकत असते, तरी त्यांच्या कवितेकडे बोट दाखवायची कुणाची शामत नव्हती. `तुका अभंग अभंग` या नाटकात पुरोहितांची टोळी संत तुकारामांचा खून करताना दाखवून त्यांनी दोन दशकांपूर्वी वादाला जन्म घातला होता. तो वाद त्यांनी निधड्या छातीने झेलला होता. तसाच `सुदिरसुक्त`चा वादही त्यांनी एकहाती निभावला असता. याच कवितासंग्रहात त्यांची `तुकलो` नावाची कविता आहे. त्यावरून याची कल्पना येऊ शकते.

दुस्वासाच्या खोऱ्यात घालून
त्यांनी तुडवले तुझे अभंग
घातले इंद्रायणीचे पात्रात
त्यांना वाटलं तुला काळाने गिळून टाकलं.
पण त्या दळींदरांना कुठे माहीत?
बहुजनसमाजाच्या ओटीत त्या आधीच
तुझ्या अध्यात्माचे वीर्य साकळलंय!

बहुजनवाद हा विष्णू वाघांच्या कवितेचाच नाही तर व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. गौड सारस्वत ब्राह्मण समाजातल्या सत्ताधाऱ्यांनी गोव्यातल्या बहुजन समाजावर वर्षानुवर्षं अन्याय केल्याचा इतिहास आहे. त्यावर वाघ कायम तुटून पडत आलेले आहेत. `सुदिरसुक्त` या काव्यसंग्रहाचा तर विषयच तो आहे. सुदिरसुक्त म्हणजे शूद्रसुक्त. त्यात जातींचे थेट उल्लेख येणं स्वाभाविक आहे. भाषा कडक आहे. त्यात आक्रमकता नसेल तर त्याला अर्थ नाही. त्यामुळे त्यात अश्लील वाटणारे शब्द येणारच. कृत्रिम नागरी संस्कृतीतल्या लोकांना ते समजून घ्यावंच लागणार. विशेषतः कोंकणी या मातीतल्या भाषेत लैंगिकतेचे संदर्भ येणारच किंबहुना ते कोंकणी साहित्यात येतच असतात. `सूदिरसूक्त` सोबत विष्णू वाघांनी दामोदर मावजोंच्या दर्जेदार कथा `शांततेचे घण` नावाने अनुवादित करून छापल्या होत्या. त्या उदाहरणादाखल पाहता येतील.


वारंवार उदाहरण दिल्या गेलेल्या `फरक` या कवितेतही महिलांचा अपमान करणारं काही नाही. असभ्य काहीच नाही. एखादा शब्द वर्तमानपत्रात छापता येण्याजोगा नसेल पण कवितेच्या पुस्तकात छापता येणार नाही, असं नक्कीच त्यात काही नाही. ज्या गोष्टींना तुम्ही अपवित्र म्हणता, त्या सर्व गोष्टी तुम्ही आपण सगळेच करतो. असं सांगताना स्त्रिया भोगण्याचा संदर्भ येतो. मुळात या कवितेच्या शेवटी विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याचं उत्तर देता येत नाही म्हणून श्लील अश्लीलतेचा वाद घातला जात असावा.

वाघांचा आदर्श असलेल्या संत तुकारामांच्या कवितेलाही आधुनिक समीक्षकांनी शिवराळ म्हणून बाजुला टाकून दिलं होतं. त्यामुळे कुणाला वाघांची कविता शिवराळ वाटली तर त्यात नवल नाही. शिव्या हे त्यांच्या कवितेचं भूषण आणि आभूषणही आहे. कारण त्यामागची भूमिका महत्त्वाची आहे. शिव्या हे बहुजनांचं शस्त्र आहे, असं सांगणारी त्यांची `गाळी` ही कविता वाचायला हवी. 

आम्ही शिकलो
शिकून सभ्य झालो
त्यात भ्रष्टलो
शिव्या विसरलो
...
तेव्हापासून
आमचे दांडे
आम्हीच मोडून घातले
...
आता ते
आम्हाला भीत नाहीत...
कशाला म्हणाल तर
त्यांनी आमची कापाकापी केल्यावरही
आम्ही शिव्या घालत नाही.

गोवा कोकणी अकादमीच्या पूरस्कारांसाठी `सुदिरसुक्त` या काव्यसंग्रहाची निवड होऊ घातली होती. पण तीन परीक्षकांमधील एक संजीव वेरेंकर यांनी आधीच निकाल फोडला. वाघांची कविता समाजात फूट पाडणारी आणि अश्लील असल्याचा आरोप करत त्यांनी या पुरस्काराला विरोध केला. इतर दोन परीक्षकांनी बहुमताच्या जोरावर `सुदिरसुक्त`ची निवड केल्यामुळे त्यांचा नाइलाज झाला. त्यामुळे ते होऊ नये या हेतूने त्यांनी आधीच माध्यमांमध्ये आपली भूमिका मांडली. त्यावरून दोन तट होऊन जोरदार हमरीतुमरी सुरू आहे. 

सर्वात मोठं आश्चर्य उदय भेंब्रेंच्या भूमिकेचं आहे. त्यांच्या सारख्या गोवा कोकणी अकादमीच्या माजी अध्यक्षाला, साहित्य अकादमी मिळवलेल्या ज्येष्ठ साहित्यिकाला, मराठी वाङ्मयाचा उत्तम अभ्यास असणाऱ्या संशोधकाला विष्णू वाघांची कविता कळली नाही, असं होऊ शकत नाही. वाघांनी सूदिरसूक्तच्या प्रस्तावनापर कवितेत मराठी कोकणीविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी मराठीवादी भूमिका कायम स्पष्टपणे मांडलेली आहे. एका मराठीवाद्याची कोकणी कविता कितीही चांगली असली तरी त्याला कोकणी अकादमीचा पुरस्कार मिळता कामा नये, असंही उदय भेंब्रेंसारख्या कोकणीसाठी त्याग केलेल्या आंदोलकाला वाटणं स्वाभाविक आहे. तसं नसेल तर सूदिरसूक्तमधली `सेक्युलर` या कवितेवर भेंब्रेंची भूमिका तपासावी लागेल.


त्यांच्या प्रतिक्रियेसोबत समाजविघातक म्हणून उदाहरण दिलेल्या कवितांमधल्या `स्वामी` या कवितेत काहीच वावगं नाही. मात्र या कवितेतला शेवटचा प्रश्नही अनुत्तरित करणारा आहे. समाजविघातक म्हणून उदाहरण दिलेल्या कवितांमध्ये `स्वामी` ही कविता आहे. गौड सारस्वत ब्राह्मणांमध्ये मोठं प्रस्थ असणाऱ्या पर्तगाळ मठावर त्यात टीका आहे.

त्यांचे स्वामी
त्यांच्याच मठांत बसतात
त्यांच्याच देवळांत जातात
त्यांच्याच लोकांवर
मुद्रा मारतात...
...
त्यांच्या स्वामींचे फोटो
त्यांच्याच पेपरांत
त्यांच्याच लोकांसोबत
छापून येतात
...
त्यांच्या स्वामींच्या नावाने
दिले जाणारे पुरस्कारही
त्यांच्याच माणसांना मिळतात
...
अधूनमधून कधीतरी
हिंदूंचे मेळावे होतात
तिथे करवीर, श्रृंगेरी, उडपीचे
स्वामी येतात.
पण त्यांचे स्वामी येत नाहीत
...
याला आम्ही काय म्हणायचं?
त्यांच्या स्वामींना
हिंदू धर्माचं काहीच पडलं नाहीय,
की त्यांचे स्वामीच
हिंदूंमधले एक नाहीत?

अर्थात विष्णू वाघांना गोवा कोकणी अकादमीच्या पुरस्काराचं फार कौतूक नसावं. त्यांना यापेक्षाही मोठमोठे पुरस्कार मिळालेत. फक्त कुणाच्या तरी बुरसटलेल्या विचारांमुळे `सुदिरसुक्त`ला पुरस्कार नाकारला जाणं योग्य नाही. रुग्णशय्येवर पडलेले वाघ केवळ आपल्या अस्तित्वाने कवितेच्या सन्मानाची लढाई लढत आहेत. गोव्यातल्या केवळ बहुजन समाजातलेच नाही तर गौड सारस्वत ब्राह्मणांमधलेही संवेदनशील लोक त्यांच्या सोबत आहेत. वाघांकडे सत्ता असताना त्याचे फायदे उकळणारे महाराष्ट्रातले त्यांचे कविमित्र मात्र या लढाईत कुठेच दिसत नाहीत. `सुदिरसुक्ता`तून वाघांनी घातलेली साद त्यांना ऐकू येत नाहीय.

नवयुगाची मशाल घेऊन
पुढे गेलेल्या भावांनो,
माझ्यासाठी परत याल
मला सामील कराल
तुमच्या प्रकाशाच्या यात्रेत.
तुमच्या भगभगीत काजव्यांमध्ये
आणखी एकाची भर पडेल.
क्षणाक्षणाला धगधगती
माझ्या आयुष्याची ती चूड आहे.



7 comments:

  1. जळजळीत म्हणणे जरा वेगळं आहे कडक वज्र आहे शिव्या हहा प्राण आहे सांगणे ही कडक खंबीर धाडसी आहे बेदरकार नाही सचिन सर्व स्पष्ट आहे तसेच पारदर्शक ही आहे

    ReplyDelete
  2. उत्तम लेख सचिन मित्रा!

    ReplyDelete
  3. विष्णूचे महाराष्ट्रामधले कविमित्र त्याच्यासोबतच आहेत.त्यानी एफ आर आय चा कडक निषेध केलाय.

    ReplyDelete
    Replies
    1. माफ करा, पण मूळ लेख ऑगस्ट महिन्यात लिहिलाय.

      Delete
  4. संजीव वरेंकर हे नाव पहिल्यांदाच ऐकतो आहे. कोंकणी साहित्य परिचयाचं नाही. पण वाघयांच्या भावना परिचयाच्या आहेत. त्या वरेंकरांना जर ही भाषा अश्लील वाटत असेल तर नामदेव ढसाळ, विजय तेंडुलकर, नेमाडे, भाऊ पाध्ये आणि मंटो बद्दल त्यांचं मत विचारायला हवं. असली बेगडी माणसं साहित्य बिहित्यावर गप्पा मारतात ती खोटारडी वाटतात.

    ReplyDelete
  5. F I R हा आततायीपणाचा कळस वाटतो.कवितेत तरी काहीही अश्लील नाही असं म्हणणं गैर आहे,पण त्यात चुकीचं काय आहे ? कवीने वास्तव उघड केल्याचा द्वेष असल्याचं जाणवतं....निष्कर्ष काय तर आता कवींनी आपली प्रतिभा मर्यादित करायला हवी ....

    ReplyDelete