Monday, 4 July 2011

उद्धवस्त ढिगा-याखाली


परवा सुनील पवार भेटायला ऑफिसात आला होता. आम्ही एकमेकांना ओळखतो त्याला बारा तरी वर्षं झाली. तेव्हा तो सी न्यूजमधे आमच्या बरोबर कॅमेरा अटेण्डण्ट होता. पुढे ई टीव्हीतही एकत्र होतो. आता तो आयबीएन लोकमतमधे कॅमेरामन बनलाय. सुनील एवढुसा. त्यात बारीक. आवाजही तसाच बारका. पण जीवाला जीव लावणारा जिवाभावाचा दोस्त. वर्ष वर्ष भेटत नसू पण जिव्हाळा तसाच.

सुनीलशी भरपूर गप्पा झाल्या. सी न्यूजमधे व्हीएचएस म्हणजे लग्नाचा कॅमेरा घेऊन लोकल ट्रेनमधून केलेलं अपडाऊन आठवलं. इतक्या वर्षातले कुठले कुठले मित्र आठवले आणि गुजरातचा भूकंप आठवला. तिथे आम्ही एकत्र होतो. भूकंप होऊन गेला होता. पण भूकंपाचे धक्के अधूनमधून सुरूच असायचे. विध्वंसाच्या भयानक कथा, प्रेतं, उद्धस्त शहरं यातून आमच्या सगळ्यांच्या नकळत भीती मनाच्या कोप-यात जाऊन बसली होती.

सुनील आमच्यात सगळ्यात लहान आणि थोडा घाबराही. मी, मारुती मालेप किंवा भरतभाई चौहान यापैकी कुणीतीरी त्याला सोबत लागायचंच. रात्री झोपतानाही दोन जणांच्या मधे येऊन झोपायचा. त्याच्यामुळेच त्या दिवशी हॉटेलातल्या कॉटवर चौघे झालो होतो. मी, सुनील, मारुती आणि आणखी उदय म्हणून एक कॅमेरामन. गर्दी झाली म्हणून सुनील झोपल्यावर मी वरच्या मजल्यावर दुस-या रूममधे झोपायला गेलो. तिथे रणधीर कांबळे आणि भरतभाई होते. रणधीर आणि मारुती पहाटे उठून लांब शूटला जाणार होते.

रणधीर भल्या पहाटे उठला. मारुतीच्या रूमवर जाऊन दरवाजा वाजवला. आत जाग नव्हती म्हणून बराच वेळ दरवाजा वाजवावा लागला. तरीही जाग नाही. दरवाजा जोरजोरात वाजवला. कंटाळून परत निघाला. बहुतेक दारावरच्या शेवटच्या ठोक्याने  मारुतीला जाग आली. त्याची झोप अचानक उघडली. धावतच तो दरवाजा उघडायला गेला. नेमका तेव्हाच सुनील उठला. मी शेजारी नाही. मारुती धावत दरवाजा उघडायला जातोय. हे बघून त्याला वाटलं, भूकंपच आलाय. तो जोरजोरात बोंबटतच उठला. मारूतीने थोड्याश्या उघडलेल्या दरवाजातूनच तो तसाच ओरडत सुसाट धावत सुटला. अरे, काय झालं, असं विचारत मारुती त्याच्यामागे धावतोय. इथे रूममधला तिसरा माणूस म्हणजे उदयही उठला. हा अंगापिंडाने भरदार हा साऊथ इंडियन माणूस सिनेमात शोभणाराही हबकलेलाच होता. काय करावं ते त्याला कळतच नव्हतं. तो तसाच बेडवर उभा राहून बोंबा मारू लागला.

सुनील ओरडत आणि धावत खाली उतरत होता. मागून मारुतीही तसाच धावत. उदयच्या बोंबाही ऐकू येत होत्या. त्यांचा सगळा मजला त्यांच्यामागून धावत खाली जायला निघाला. सगळ्या रूम झटकन रिकाम्या झाल्या. सशाच्या पाठीवर आभाळ कोसळलं होतं. खाली रिसेप्शनवरच्या माणसानं सुनीलला थांबवलं. तो भानावर आला. कशाला धावतोयस, हॉटेलवाल्यानं विचारलं. त्याला काय सांगावं कळेना. त्याने मागे धावणा-या मारुतीकडे बोट दाखवलं. अख्खं हॉटेल मारुतीकडे वैतागून पाहत होतं. मारुती बिचारा शांत उभा राहण्याशिवाय काही करू शकत नव्हता.

वरच्या मजल्यावरच्या आम्हाला हे काहीच माहीत नव्हतं. आम्हाला कळलं तेव्हा हसून हसून मुरकुंडी उडाली. मग निदान वर्षभर आम्ही जो भेटेल त्याला ही कहाणी रंगवून रंगवून सागंत असायचो. साली ब्लॅक कॉमेडी.

भूकंपाची आठवण नंबर दोनः
अमदाबादमधे भूकंपामुळे आम्हाला हॉटेलच मिळत नव्हती. एक शहराबाहेरचं हायवेवरचं हॉटेल मिळालं. ते रंडीबाजीसाठी फेमस होतं, हे नंतर कळलं. पण करणार काय? दुसरी हॉटेलच नव्हती. तिथे अचानक कधी एखादी गणिका आपल्या गि-हायकाबरोबर भांडत रूममधून बाहेर येईल याचा नेम नसायचा. हॉटेलच्या तळाला रेस्टॉरंट होतं. तिथे सकाळी न्याहरीला गेलं किंवा रात्री जेवायला, दोन तीन नटलेल्या बायका आणि त्यांचा दल्ला बसलेला असायचाच. आणखी एक वैशिष्ट्य़ म्हणजे संत कबीरांच्या दोह्यांची एकच कॅसेट तिथल्या गल्ल्यावर दिवसरात्र जोरजोरात लावलेली असायची. मग खाता खाता कानावर मस्त फ्युजन येत राहायचं...

पोथी पढ पढ जग मुवा...
नहीं रे, उस XXX को भाभीटाइप माल चाहिए...
पोथी पढ पढ जग मुवा...
एक नंबर का XXX हैं वो...
पंडित भया न कोय...
बोल ना कितना देगा...
पंडित भया न कोय...
इतने कम में कैसे चलेगा, XXX समझा हैं क्या...
ढाई आखर प्रेम के...
रातभर XXX के जैसे लगा रहेगा और...
ढाई आखर प्रेम के...
XXX, तेरे जैसे बहुत देख रे...
पढे तो पंडित होय, कबिरा पढे तो पंडित होय

भूकंपाची आठवण नंबर तीनः
अमदाबादहून कच्छकडे जायचं होतं. पण गाडी आणि ड्रायवर मिळतच नव्हता. शेवटी एक सुमो आणि त्याचा जवळपास सत्तरीचा एक मुसलमान ड्रायवर आला. चाचा इतक्या हळू गाडी चालवायचे की स्पीडब्रेकरवर टायचा पुढचा भाग आता चढतोय, मागचा भाग आता चढतोय, हेही नीट कळायचं. त्यांना बहुतेक पुढचं स्पष्ट दिसत नसावं. त्यांच्या या स्लो मोशन गाडीतून आम्ही पाळण्यात झोपावं तसं शांतपणे झोपलो होतो. रात्र कधी गेली ते कळलंच नाही. जाग आली. आमची गाडी थांबली होती. चाचा तोंड धूत होता. नुकतंच तांबडं फुटलं होतं. अजूनही ते दृश्य डोळ्यासमोर दिसतंय. लांबवर जिथे पाहावं तिथे प्रत्येक अन प्रत्येक घर तुटलेलं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं होतं. एकही भिंत एका फुटापेक्षाही अधिक कुठेच दिसत नव्हती. मधेच मुटकुळं करून माणसं झोपली होती. आरपार उद्ध्वस्त शहराच्या मधोमध आम्ही उभे होतो. अंजार नावाचं शहर होतं ते.

रात्री झोपून सकाळी उठतो तेव्हा आपल्याला आपल्या आसपास किमान अस्तित्वाच्या काही खुणा हव्या असतात. अशावेळेस हे उद्धवस्त गाव पाहून डोकं सन्नं झालं. आपण सकाळी उठलोच नाही तर, या भीतीने एका कवीला झोप येत नसे. त्यातच तो मेलाही. पहिल्या फटक्यात तेच आठवलं. पण आम्ही धावपळ करून एवढे दमायचो की मोकळ्या वेळात झोप यायचीच. असेच एका दुपारी झाडाखाली सावली बघून सुमोत सगळे झोपलो होतो. तेवढ्यात एका माणसाने येऊन उठवलं. जवळच एक बिल्डिंग पूर्णपणे कोसळलेली होती. लष्करी जवान ढिगारा उपसत होते. बिल्डिंग पडलेल्याला साठ तासांहून अधिक काळ लोटला होता. तरीही त्या ढिगा-यातून एका माणसाचा आवाज येत होता. अजूनही तो ढिगा-यात घुमणारा अस्वस्थ आवाज माझ्या कानात आहे. खूप खटपट करत तरीही संयमाने सैनिक काम करत होते. एक एक तुटक्या भिंतीचे तुकडे, तुटकं सामान बाजूला केलं जात होतं. आतल्या आवाजाला धीर दिला जात होता. त्या ढिगा-यातून लुकलुकणा-या डोळ्यांचा चेहरा दिसू लागला. पन्नाशीच्या एका माणसाला बाहेर काढण्यात आलं. मारूती ते पूर्ण ऑपरेशन शूट करत होता. त्याचे नातेवाईक प्रेताची वाट बघत होते. तर प्रेताच्या जागी जिवंत माणूसच बाहेर आला. त्या माणसाला कुठे साधं खरचटलंही नव्हतं. साठ तासांहून अधिक तास तो ढिगा-याखाली एका कोप-यात उभा होता.

भूकंपाची आठवण नंबर चारः
जितका अचानक सकाळी सुनील भेटला. तितक्याच अचानक त्याच दिवशी रात्री उशिरा एक लेख हाती लागला. तो माझ्या जी मेलच्या सेण्टबॉक्समधे सर्वात तळाला होता. भूकंपावर मी काही लिहिलंय हे लक्षातही नव्हतं. २००७ साली श्रीदीपलक्ष्मीच्या दिवाळी अंकासाठी तो पाठवला होता. दोन पानी आठवण लिहून पाठवा म्हणून दीपलक्ष्मीच्या रायकरांनी फोन केला होता. खूप घाईगडबडीत लिहिलं होता. तो लेख इथे कटपेस्ट करतोय.

२६ जानेवारी २००१. सकाळ आली तीच गुजरातमधल्या भूकंपाच्या बातम्या घेऊन. मोठीच बातमी होती. मी तेव्हा ईटीवीत कामाला होतो. मुंबईतून काही बातम्या मिळवता येतील का, यासाठी आमचं, म्हणजे ईटीवीचं मुंबईतलं ऑफिस कामाला लागलं होतं. भूकंपाचा भयानकपणा हळुहळू कळू लागला होता. पण आता फक्त गुजरातमधल्या बातम्याच चॅनलवर लागणार, आपल्याला फारसं काम नाही, अशी दुपारपर्यंत खात्री झाली होती. तेवढ्यात तातडीने अमदाबादला जाण्याचे आदेश थेट आमचं हेडऑफिस असणा-या हैदराबादेतून आले.

माझं अशाप्रकारचं हे पहिलंच मोठं आउटडोअर शूट होतं. ध्यानीमनी नसताना घाईगडबडीने बॅगा गुंडाळून मी अमदाबादचं विमान पकडण्यासाठी धावलो. माझ्यासोबत कॅंमेरामन म्हणून मारुती मालेप होता. मूळ तेलुगू. पण गिरणगावात पिढ्यानपिढ्या राहून पुरा मराठी झालेला. गेली जवळपास दोनेक वर्ष एकत्र काम केलेलं, त्यामुळे एकमेकांना जवळून ओळखणारे. निघालो. विमानतळावर मीडियातले अनेक ओळखीचे चेहरे दिसले. विशेषतः फोटोग्राफर बरेच होते. विमान लेट होतं. त्याची अपेक्षा होतीच. पण अपेक्षेपेक्षाही जास्तच उशीर झाला. तिथे पोहोचेपर्यंत रात्र होणार असं दिसत होतं.

आम्ही दोघेही पहिल्यांदाच विमानात बसलो. प्रवासातच कामाचं प्लानिंग सुरु होतं. टीवीवरच्या बातम्या आठवत होत्या. कोसळलेल्या इमारती. उद्ध्वस्त माणसं. तुटलेले पूल आणि उखडलेले रस्ते. दुपारपर्यंत विशेषतः अमदाबादमधलीच दृश्य पाहायला मिळाली होती. पूर्ण अमदाबादच उद्ध्वस्त झालं असेल, असं वाटलं होतं. त्यामुळे अहमदावादचं विमानतळ तरी नीट उभं असेल ना. तिथून शहरात जाण्यासाठी रस्ते उरले असतील का, असे प्रश्न पडत होते. लाइट, फोन सगळंच बंद असल्याचं कळलं होतं. पण अमदाबाद विमानातून दिसू लागलं. म्हणजे शहरातले दिवे लुकलुकताना दिसू लागले. चला, लाइट तरी आहे. हुश्श. विमान उतरलं. थोडी धावपळ अधिक होती, पण विमानतळ व्यवस्थित होतं. बाहेर पडल्यावर एकाच वेळेस भरपूर रिक्षावाले अंगावर आले. म्हणजे सगळं अपेक्षेपेक्षा बरंच बर असल्याची खात्री पटली.

त्यातलाच एक रिक्षावाला पकडला. एखादं हॉटेल शोधून सामान टाकावं आणि नंतर बातमीदारीसाठी बाहेर पडावं, असा बेत होता. पडलेल्या इमारतींजवळ जाता येईल असं एखादं हॉटेल दाखवायला सांगितलं होतं. रिक्षावाला आम्हाला शहराच्या मध्यवर्ती भागात घेऊन आला. कुठे इमारतीचं नुकसान झालंय, म्हणून हॉटेल बंद. हॉटेलातले लोक सांगायचे, पुन्हा भूकंप झाला तर आमच्या हॉटेलमधे लोक मेले, अशी बदनामी नको. एखादं हॉटेल उघडं असेल, तर बेघर झालेली माणसं तिथे राहायला आली होती. काही हॉटेलांमधे हॉटेलवाल्यांचीच नातेवाईक मंडळीच राहात होती. बरीच शोधाशोध केल्यावर एक हॉटेल सापडलं. तिथे राहायची व्यवस्था झाली खरी, पण जास्त पैसे भरावे लागले. वर आम्ही आमच्या जबाबदारीवर राहायला आल्याचं लिहून द्यावं लागलं.

हॉटेल अगदीच टपराट होतं. पण तिथे राहायचं होतं कुणाला. हातपाय धुवून कॅमेरा घेऊन निघालो. जमा केलेल्या माहितीवर रात्रीच्या बुलेटिनसाठी एक फोन इन मारला. तोच रिक्षावाला ठरवून आम्ही शहर फिरायचं ठरवलं. एवढ्या रात्री भाड्याची गाडी मिळणं अवघड होतं आणि तेवढा वेळही नव्हता. रिक्षावाला बोलबचन होता. मला गुजराती येत असल्यामुळे आमचं उत्तम जमलं. शहराच्या पालिका आयुक्ताला जेवढं शहर माहित असतं, त्यापेक्षा कितीतरी अधिक शहर रिक्षावाल्याला माहित असतं. हा माझा आतापर्यंतचा अनुभव खरा ठरला. आम्ही कोसळलेल्या इमारतींमधे जायचो. थोडं विज्युअल घ्यायचो. एखादा बाइट घ्यायचो. लोक वैतागलेले होते. थोडं वेडंवाकडं बोलायचेही. तिथे असलेल्या मीडियावाल्यांकडून माहिती घेऊन पुढची बिल्डिंग. कुठे रस्ता उखडलेला दिसायचा. कुठे पूल तुटलेला. थांबायचो. निघायचो. आम्ही जिथे थांबायचो तिथे बरीच लोकं जमा व्हायची. बरंच काही विचारायची. हळूहळु ही माणसं आपापल्या स्कूटर-बाइकवरून आमच्या रिक्षामागून यायला लागली. आम्ही पुढे आणि दहा बारा वाहनं मागे अशी आमची वरात रात्रभर सुरू होती. गणपती बघायला मुंबई-पुण्यात रात्रभर फिरतात, तशी ही माणसं भूकंपाचे देखावे बघत फिरत होती.

रात्री ३-४च्या दरम्यान काम आटपून आम्ही शूट केलेल्या टेप पहाटेच्या पहिल्या विमानाने मुंबईला पाठवण्यासाठी निघालो. तेव्हा ईटीवीकडे ओबी वॅन नव्हत्या. पण कॉर्गोने टेप पाठवण्यासाठी विमानाच्या वेळेआधी यावं लागतं, हे ठावूक नव्हतं. त्यामुळे उशीर झाला होता. आता आपण रात्रभर केलेली सगळी मेहनत बेकार जाणार. टेप पोहोचायला आणखी उशीर होणार, असं म्हणत आम्ही चहा प्यायला उभे राहिलो.  तेवढ्यात एक ओळखीचा चेहरा दिसला. ते खैरनार होते. गो. रा. खैरनार. चहा तसाच टाकून धावत सुटलो. ते थांबले. त्यांना सांगितलं, तुम्ही कॅसेट घेऊन जा. आमचे मुंबईचे मित्र ती तुमच्याकडून ताब्यात घेतील. खैरनार आत गेले. ऑफिसला फोन करून सांगितलं. टेन्शन संपलं होतं. थोडा आराम करायला ह़ॉटेलवर पोहोचलो. हॉटेलचा मालक सकाळी आला होता, त्याने आता हॉटेल खाली करा, अशी भूणभूण चालवली होती. काय करावं कळत नव्हतं. माझा एक जवळचा मित्र अमदाबादला राहत होता. धवल पटेल. त्याला फोन केला. त्याच्या घरी पोहोचलो.

थोडं खाऊन पिऊन पुन्हा निघालो. धवल म्हणाला, मलापण यायचंय. मी म्हटलं, भाड्यानं गाडी बघू. फोन करून प्रयत्नही केले. पण कुणी तयार नव्हतं. प्रत्येकाचं काही ना काही कुठेतरी झालं होतं. धवल म्हणाला, माझी गाडी काढतो. त्याची गाडी म्हणजे बजाज चेतक. पुढे तो, मधे मारुती त्याच्या हातात कॅमेरा, मागे मी, माझ्या हातात स्टँड. आम्ही निघालो. एक शाळा पूर्ण कोसळली होती. तिथे गेलो. पुलावरून जमीनदोस्त झालेली शाळा बघून काळजात धस्स झालं. कालच्या दिवसभरात तीसहून अधिक चिमुकले मृतदेह ढिगा-यातून काढले गेले होते. लष्करी जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. त्यांनी वाचवलेल्या मुलांच्या कथा ऐकवल्या जात होत्या. हौश्या नवश्यांची एकच गर्दी होती. त्यात कोप-यात उभे असणारे विमनस्क चेह-याचे अजून ढिगा-याखाली असणा-या मृतदेहांचे आई बाबा, आजी आजोबा सहज ओळखू येत होते. तिथल्या दोनचार बोलघेवड्यांचे बाइट घेऊन ठेवले. मारुती डेडबॉडी शोधत होता. कालपासून एवढं फिरून एकही डेडबॉडी त्याला टिपायला मिळाली नव्हती. खरं विज्युअल तेच, असं त्याला वाटत होतं. मलाही ते पटलं होतं. बराच वेळ वाट बघितल्यावर इवलीशी डेडबॉडी मिळाली. लष्करी हातांनी ती फारशी दुखापत न होऊ देता बाहेर काढली होती. आम्हाला हवं ते विज्युअल मिळालं. आमची फत्ते झाली आणि त्या डेडबॉडीच्या नातेवाईकांनी एकच आकांत केला. आम्ही नव्या डेडबॉडी शोधायला बाहेर पडलो.

मग उद्धस्त टॉवर, मुद्दामहून पाडल्या जाणा-या कलंडलेल्या इमारती, बिल्डरांचा दोष, पडलेल्या इमारतीत सोळाव्या मजल्यावर असणारा स्विमिंग पूल, हॉस्पिटलमधली धावाधाव असे अप्रतिम कलात्मक विज्युअल घेत आम्ही फिरलो. संध्याकाळपर्यंत जनजीवन हळुहळू पूर्ववत असल्याची बातमीही लवकर करून ठेवली. आणि स्मशानात निघालो. स्मशानात लाकडांचा तुटवडा अशी फंटास्टिक स्टोरी माझ्या डोक्यात शिजत होती. साबरमतीच्या किना-यावरच्या स्मशानात पोहोचलो. हवी ती बातमी नेमकी मिळाली. बरीच प्रेतं जळत होती. लोक क्यूमधे होते. व्वा! क्या स्टोरी है.
मला एखाद्या प्रेताच्या नातेवाईकाचा बाइट हवा होता. मी जमलेल्यांमधे चाचपडून पाहात होतो. एखादा दूरचा नातेवाईक किंवा शेजारी पाजारी चालला असता. मी एका उत्साही कार्यकर्त्याला सांगितलं. तो आणखी एकाला घेऊन आला. त्याने बाईट दिला. कशी लाकडं नाहीत, किती वाट बघावी लागते, वगैरे. मी मनातल्या मनात खूष. बाईट देण-याच्या सुतकी मुखवट्यामधले डोळे चमकले. कोणतं चॅनल, किती वाजता दिसेल, त्यानं विचारलं. त्याचं नाव आणि प्रेताशी असलेलं नातं आम्हाला हवं होतं. आम्ही त्याला घेऊन येणा-याला विचारल. त्यानं सांगितलं, बाईट देणा-याच्या भावाचं सहा जणांचं अख्ख कुटुंब खलास झालंय. एवढं दुःखात असूनही त्याला आपण टीवीवर कधी दिसणार याची पडली होती. आम्ही बाहेर पडतो तोच स्कूटरवर येणा-या एकानं सांगितलं, मागून नऊ डेडबॉडींची  एकत्र प्रेतयात्रा येत आहे. मी मारुतीला लगेच पिटाळलं. एका रांगेत नऊ प्रेतांच्या यात्रेचं विज्युअल मिस करून चालणारच नव्हतं. लोक मरत होते, आम्ही खूष होत होतो.

मारुती विज्युअलसाठी धावत होता. मी थोडा बाजुला उभा राहून थोडक्यात स्क्रिप्ट लिहण्याच्या प्रयत्नात होतो. तेवढ्यात साबरमतीच्या काठावर एक ट्रक आला. पडलेल्या इमारतींच्या ढिगा-याचं राबिट भरून आणलेला ट्रक होता तो. ट्रक रिकामा झाला. आणि जवळपास शंभर दीडशे फाटक्या लोकांची झुंबड त्या ढिगा-यावर आली. बघता बघता त्यांनी तो ढिगारा पिंजून काढला. कुणाला त्यातून सोनं मिळालं होतं, कुणाला भांडीकुंडी. पुन्हा एक फंटास्टिक स्टोरी समोर दिसत होती. त्या माणसांनी आम्हाला सांगितलं, आम्ही गरीब लोक. छोटीमोठी मोलमजुरी करतो नाहीतर भीक मागतो. आता अख्खं अमदाबाद उद्ध्वस्त झालंय. आम्हाला कोण काम देणार? आम्हाला कोण भीक देणार? त्यांचं म्हणणं सहज पटण्यासारखं होतं. पण आमचं काय?  आम्ही त्यांच्यापेक्षा काही वेगळं करत होतं. मी उद्ध्वस्त ढिगा-यांतून बातम्या शोधत होतो. कुणाच्या दुःखाचा, वेदनांचा विचार न करता. निदान त्यांच्याकडे त्यांचं स्पष्टीकरण होतं. माझ्याकडे..?

2 comments:

  1. madhye fantastic story vagaire vachun tumacha vivek par mela ahe asa vatal pan shevat perfect kelat, to jivat ahe fakt bhukampat jashi pret gadali jatat tashi vyabsaik bhukampat hoti gadala gela ahe ani bachava sathi sad deto ahe. far pramanik lekh avadala.

    ReplyDelete
  2. Pustak kadach ek...Ebook Sarkh kahitari...

    ReplyDelete