Tuesday 26 July 2011

दिवस वाढदिवसांचे


वसुंधराराजे शिंदे राजस्थानच्या मुख्यमंत्री असताना एका देवीच्या चेह-यात त्यांचा चेहरा टाकून पूजा झाली होती. त्यावरून मोठं वादळ उठलं होतं. त्याला टाइम्स ऑफ इंडियाने एक मस्त शब्द वापरला होता. फोटोशॉप पॉलिटिक्स. हे फोटोशॉप पॉलिटिक्स खरं तर आपल्या नाक्यानाक्यावर आहे. होर्डिंग आणि पोस्टरच्या रुपानं. सध्या मुंबईत महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. पोस्टर बघून कोणत्या वॉर्डात कोण इच्छुक आहेत, याचा अंदाज मिळू शकतो. 

तसंच वाढदिवसांचंही. वाढदिवसांचा धुरळा बघून कोणत्या नेत्याची चलती आहे, याचा अंदाज येतो. उद्या उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि चार दिवसांपूर्वी. यावर्षी बॉम्बस्फोटांमुळे होर्डिंग पोस्टर लागले नाहीत. पण गेल्यावर्षी अजितदादांच्या वाढदिवसाचा मोठा दणका उडाला होता. तेव्हा ही उपमुख्यमंत्रीपदाची तयारी असल्याचा लेख मी नवशक्तीत लिहिला होता. ते काही महिन्यांतच खरं ठरलं. आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांची विकेट पडली. पृथ्वीराज आले आणि त्यांच्याबरोबर अजितदादाही. जवळपास वर्षापूर्वी लिहिलेला लेख इथे कटपेस्ट करतोय. 


विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच दरवर्षी १२ डिसेंबर येतो. १२ डिसेंबर म्हणजे शरद पवार साहेबांचा वाढदिवस. त्याच दिवशी गोपीनाथ मुंडे साहेबांचाही वाढदिवस असतो. महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या पक्षांच्या सगळ्यात मोठ्या साहेबांचे वाढदिवस म्हणजे कार्यकर्ते राज्यभर दणका उडवून देतात. त्याच्याच तीन दिवस आधी म्हणजे ९ डिसेंबरला सोनिया गांधींचा वाढदिवस होतो. तेव्हा तर देशभरच धूम असते. त्यामुळे हे वाढदिवस लक्षात राहतात.

पण यंदा २२ आणि २७ असे पाठोपाठ येणारे दोन वाढदिवसही लक्षात राहिले. २२ जुलै म्हणजे अजितदादा पवारांचा वाढदिवस तर २७ जुलै हा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेवरचा एकछत्री अमल आता सगळ्यांनीच मान्य केलाय. तिथे निदान महाराष्ट्र पातळीवर तरी पक्षावर अजितदादांची पकड जाणवण्याइतपत आहे. दादा बोले आणि दळ हाले, अशी स्थिती पक्षात आहे. शरद पवारांपाठोपाठ शब्द चालतो तो अजित पवारांचाच.

दोन्ही पक्षातल्या मोठ्या साहेबांचा राज्यातल्या राजकारणावरचा दबदबा मोठा आहे. पण त्यांचे हे दोन्ही छोटे साहेबही आता पन्नाशीत आले आहेत. अजित पवारांचा यंदा एक्कावन्नावा वाढदिवस होता. तर उद्धव पन्नास वर्षांचे झालेत. बाकीच्या करियर्समधे पन्नास हे वय निवृत्तीचं वय मानलं जातं. पण राजकारणात हे खरं नाही.

गेली विधानसभा निवडणूक दोघांसाठीही मोठा धक्का होता. शिवसेनेने ही निवडणूक थेट उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात लढवली होती. तर राष्ट्रवादीतही उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत सगळी सूत्रं अजितदादाकडेच होती. सत्तेची स्वप्नं पाहणा-या शिवसेनेचं तर पार पानिपत झालंच. तर दुसरीकडे राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ही राष्ट्रवादीची गुर्मीही मतदारांनी संपवली. सत्तरच्या घरातून आमदारांची संख्या साठात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं अंतरही प्रचंड वाढलं. त्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वावरही अनेक प्रश्न उभे करण्यात आले. त्यात मुख्यमंत्री बनण्याची तयारी करणा-या अजितदादा उपमुख्यमंत्रीही बनू शकले नाहीत.

असं असलं तरी अजित पवारांनी आपली पक्ष तसंच सरकारमधली मांड सुटू दिली नाही. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील या त्यांच्या पक्षांतर्गत स्पर्धकांची गाडी तर पार सायडिंगला टाकण्यात आली. आर. आर. पाटील यांची हवा काढून घेण्यात आली. ग्रॅज्युएशनही पुरं न करू शकलेल्या सुनील तटकरेंकडे अर्थखातं आलं, ते फक्त अजितदादांचे समर्थक म्हणूनच. आज अजितदादांच्या समर्थकांची तटबंदी पक्ष आणि मंत्रिमंडळात भक्कम आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. गेल्या निवडणुकीतील अपयश झाकून टाकण्याचा तो एक प्रयत्न होताच. पण त्याहीपुढे जात अजितदादांना नव्याने प्रस्थापित करण्याचाही तो एक भाग मानायला हवा.  

गेले काही वर्षं अजितदादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतोच आहे. पण यावर्षी तो खूपच मोठ्या प्रमाणात साजरा झाला. विधानभवन परिसरापासून गावांच्या चावड्यांपर्यंत अजितदादांच्या समर्थकांनी पोस्टर लावले होते. प्रत्येक शहरातल्या प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी अजितदादांची हसरी छबी दिसत होती. मुंबईत गिरगाव चौपाटीसमोरून जाणारा फूटओव्हर ब्रिजवर जाहिरात लावणं देशात सर्वाधिक खर्चिक मानलं जातं. पण तिथेही यंदा अजितदादांना शुभेच्छा देणारा राज्यमंत्री भास्कर जाधवांचा भलामोठा फ्लेक्स झळकत होता. राज्यभर निरनिराळे कार्यक्रम पार पडले. त्यात दादांच्या नावाने पुरस्कारही देण्यात आले. जवळपास सगळ्याच वृत्तपत्रांत जाहिराती आणि लेखांचे रकानेच्या रकाने भरून वाहिले. न्यूज चॅनल्सवरही त्यांचा जयजयकार दिसत होता.

गेल्या एखाद दशकापासून वाढदिवस हा राजकीय कार्यक्रमाचा एक भाग बनला आहे. छोट्यात छोट्या तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्याच्याही वाढदिवसाचे पोस्टर लावले जातात. ते त्याचं शक्तिप्रदर्शन असतं. तोही आपल्या नेत्याचे वाढदिवस साजरा करतंच असतो. ते त्याचं निष्ठा व्यक्त करण्याचं साधन असतं. पूर्वी फक्त मेलेल्या नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरा व्हायच्या. पण व्यक्तिस्तोमाच्या नव्या राजकारणात असं होणं स्वाभाविक होतं. नव्या फोटोश़ॉप पॉलिटिक्सच्या गदारोळात आपण सगळ्यांनी हे सारं स्वीकारलंही आहे. म्हणून राजकारणातचा एका भाग म्हणून वाढदिवासाचा विचार व्हायला हवा. विशेषतः अजितदादांच्या वाढदिवसाचा धुरळा खूपच महत्त्वाचा आहे.

अजितदादांचं राजकारण आता खूप महत्त्वाच्या वळणावर य़ेऊन उभं आहे. मोठ्या सेलिब्रेशनमागची कारणं आणि शक्यता शोधाव्या लागणार आहेत. एकतर खरंच पक्षाचे कार्यकर्ते वाढदिवसामुळे आनंदाने बेहोष झाले, अशीही एक शक्यता आहे. पण सध्याच्या इव्हेटं मॅनेजमेंटच्या जमान्यात आणि निष्ठांचे बाजार मांडणा-या राजकारणात असं बेहिशेबी प्रेम उफाळून येण्याची शक्यता कमीच. त्यामुळे यामागे निश्चित राजकीय गणितंच शोधायला हवीत.

यामागे अजितदादांची उपमुख्यमंत्रीपदासाठीची तयारी असल्याचं मानलं जातंय. अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा कधीच लपून राहिलेली नाही. पण महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री आजपर्यंत कधीच मुख्यमंत्री बनू शकलेले नाहीत, त्यामुळे यापूर्वी संधी असूनही ते उपमुख्यमंत्री बनले नव्हते. पण आता त्यांनी तडजोड केलेली दिसते. छगन भुजबळांना दिल्लीच्या राजकारणात नेऊन महाराष्ट्र अजित पवारांकडे सोपवावा, अशी तयारी असल्याचं सांगितलं जातंय. आपल्यावरील भार कमी करावा, अशी शरद पवारांनी काही खाती सोडण्याची पंतप्रधानांकडे केलेली मागणी याच पार्श्वभूमीवर पाहिली जातेय.
पण त्यासाठी भुजबळ किंवा मुख्यमंत्री अशोक चव्हाण किती उत्सुक असतील, हेही पाहायला हवे. कारण अजितदादांचा आक्रमक स्वभाव आणि नोकरशहांवरची पकड पाहता, त्यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांचा प्रभाव फिका पडण्याची शक्यता आहेच.

अनेक अडचणी असल्या तरी अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची फिल्डिंग चांगलीच लावलेली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांचं जाळं चांगलंच विणलंय. आपल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क तर आहेच. पण त्यांना उभं करण्यातही ते हात मोकळा सोडत आहेत. आपल्या पाठिराख्यांना पक्षात आणि सरकारात मोक्याच्या जागा मिळतील, याचीही त्यांनी चोख व्यवस्था केली आहे. पक्षाच्या राज्य मुख्यालयातही त्यांचं वर्चस्व स्पष्टपणे पाहण्यास मिळू शकतं. शिवाय काही मराठा संघटना पोसून त्यांनी मराठा तरुण आपल्याकडे खेचण्यात ताकद लावलेली आहेच. आज राज्याच्या कानाकोप-यातल्या मराठा तरुण त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघतोय, हे वास्तव आहे. आणि ही त्यांची सर्वात मोठी ताकदही मानायला हवी. पण यामुळे त्यांच्या नेतृत्वाला मर्यादाही आल्या आहेत.

काही राजकीय विश्लेषक अजितदादांच्या या वाढत्या शक्तिप्रदर्शनाकडे संशयाच्या चष्म्यातूनही पाहत आहेत. ते वेगळा पक्ष काढणार अशा वावड्या कायम उठत असतात. यंदा त्यांच्या पोस्टरवर शरद पवारांना फारशी जागा दिसली नाही. प्रत्येक नेता पक्षातून बाहेर पडताना आपला प्रभाव वाढवतो, नेमके तसेच प्रयत्न दादा करत असल्याचं दिसत आहे. पण केंद्रात सुप्रिया आणि राज्यात अजितदादा अशी नीट वाटणी करण्यात शरद पवारांना यश मिळाल्याचं आजघडीला तरी दिसून आलंय. पण जर अजितदादा बाहेर पडल्यावर ते एकटे नसतील. त्यांचे स्वाभाविक मित्र असतील ते राज ठाकरे. गेल्या पुणे महापालिका निवडणुकीत अजितदादांनी दिलेला मराठीचा नारा विसरता येण्याजोगा नाही. या समीकरणाकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाहीय. तसे काही संकेतही या दोघांनी दिलेले नाहीत. पण जर असं झालंच तर ते मोठं विस्फोटक मिश्रण बनू शकेल.

ही उद्धव ठाकरेंसाठी काळजीची गोष्ट आहे खरी. पण ही फक्त शक्यताच आहे. यंदा अजितदादांच्या तुलनेत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाची धामधूम कमी होती. पण ते याची कसर पुढच्या वर्षी भरून काढतील. कारण तेव्हा मुंबई महापालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्या असतील आणि त्यांचं सर्वस्व पणाला लागलेलं असेल. 

No comments:

Post a Comment