Thursday, 7 July 2011

वाचायलाच हवं असं ‘आकलन’

माझे ज्येष्ठ मित्र अमर हबीब यांचं नवं पुस्तक आलंय. आकलन हा त्यांचा लेखसंग्रह आहे. त्याच्याविषयी नवशक्ति तसंच कृषीवल इथल्या दोन्ही कॉलमांमधे लिहिलंय. हे पुस्तक तुमच्यापर्यंत सहज पोहचू शकतं. अमरजींनी त्यांच्या पुस्तकांसाठी एक अफलातून विक्रीतंत्र विकसित केलंय. आपण ९४२२९३१९८६ या मोबाईलवर किंवा habib.amar@gmail.com या ईमेलवर स्वतःचा पत्ता कळवायचा. पुस्तक त्या पत्त्यावर कुरियर केलं जातं. आणि पुस्तक आवडलं तरच पैसे पाठवायचे. असं करणा-यांना डिस्काऊंटही आहे. दीडशे रुपयांचं पुस्तक फक्त शंभर रुपयांत. कृषीवलमधल्या प्रीझम या कॉलमातला लेख इथे कटपेस्ट.


एक अमर हबीब म्हणून आहेत. ते बीड जिल्ह्यात आंबेजोगाई येथे राहतात. ते स्वतःला कार्यकर्ता पत्रकार मानतात. असं असलं तरी आज त्यांची ओळख एक विचारवंत म्हणून आहे. त्यांची आठ नऊ पुस्तकं आलेली आहेत. त्यांची व्याख्यानं ठिकठिकाणी होत असतात. नव्या पिढीच्या धडपडणा-या तरुणांशी त्यांचा संवाद कधीच थांबत नाही. ते कार्यकर्त्यांना सोबत करतात. इंटरनेटसारख्या नव्या तंत्रज्ञानातून देशभरातल्या संवेदनशील लोकांना एकत्र आणतात. त्यामुळे विचारवंताचं लेबल चिटकवलेल्यांपेक्षाही त्यांचे विचार खूपच वेगळे असतात. मातीशी अधिक इमान राखणारे असतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोणतंही बेगड न लावता हे विचार अगदी तुमच्या आमच्या भाषेत समोर येतात. ही सगळी वैशिष्ट्य घेऊन त्यांचं आकलन हे नवं पुस्तक आलंय.

आकलन हा दीडशेहून थोड्या जास्त पानांचा तसा छोटासा लेखसंग्रह. त्यात अवघे चौतीस लेख आहेत. त्यातले बरेसचे चार पानांपेक्षा मोठेही नाहीत. त्यांनी हाताळलेले विषय आपल्या नेहमीच्या परिचयाचे आहेत. पण त्याकडे बघण्याची दृष्टी एकदम नवी आणि स्पष्ट आहे. विविध विषयांवर नेहमीच्या पद्धतीने विचार करणंही ते जाणीवपूर्वक टाळतात. उदाहरणार्थ खासगी वाहतुकीला चोरटी वाहतूक म्हणणं यात कोणालाच चुकीचं वाटत नाही. पण ते त्याला एका वेगळ्याच अंगाने पाहतात. खासगी वाहतुकीचे अनेक लाभ ते आपल्याला पटवून देतात. लेख वाचून संपेपर्यंत हे एकूण समाजाच्या भल्याचं कसं आहे, यावरही आपण त्यांच्याशी सहमत होतो.

लेखकाला प्रश्न वरवर खरवडण्यात स्वारस्यच नाहीय. ते समस्येच्या मुळाशी जातात. स्वतः लोकांमधे जाऊन निरीक्षणं मांडतात. मग त्यांना इतरांना पडत नाहीत असे प्रश्न पडतात. त्याची इतरांना न सापडणारी उत्तरंही सापडतात. ते कधी आमदार करतात तरी काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. कधी आंदोलने का होत नाहीत या इतरांच्या नकारात्मक प्रश्नाचं अत्यंत सकारात्मक उत्तर देतात. कधी त्यांनी नाकारलेल्या ब्राम्हण संमेलनाच्या निमंत्रणाविषयी मोकळेपणाने सांगतात. तर कधी मराठी पत्रकारितेतल्या बदलत्या स्वरूपावर नेमकं बोट ठेवतात.

शेतकरी हा त्यांच्या कळवळ्याचा विषय. शेतक-यांच्या प्रश्नावर व्यक्त होणारी अस्वस्थता या पुस्तकाची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यांनी शेतकरी प्रश्नाचं केलेलं विश्लेषण नवं आहे, म्हणून त्याकडे विशेष लक्ष द्यायला हवंय. आत्महत्या ख-या आणि खोट्या, शेतक-यांचे साहित्य का नाही, मजूर का मिळत नाहीत, शेतीतून बाहेर पडण्यासाठी ही त्यांच्या लेखांची नावंच त्यांचं वेगळेपण दाखवून देतात. सास-यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणा-या विवाहितेच्या आत्महत्येला आपण सहजपणे हुंडाबळी म्हणतो. मग शेतक-यांच्या आत्महत्यांना कर्जबळी किंवा सरकारबळी का म्हणत नाही, हा त्यांचा सवाल आपल्याला निरुत्तर करून जातो.

विशेष म्हणजे हे आकलन उगाच हवेतून आलेलं नाही. अख्खं आयुष्य निरपेक्षपणे  समाजासाठी झोकून देण्यातून हे आलंय. सेवादलातून शाळकरी वयातच सामाजिक कामाला सुरुवात. वसुधाताई धागमवार यांच्यासमवेत अक्कलकुवा येथे आदिवासींसाठी काम. आणीबाणीविरोधात मिसाखाली अटक. १९ महिने तुरुंगवास. जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेल्या छात्र युवा संघर्ष वाहिनीत राष्ट्रीय समन्वयक. बोधगयेतल्या आंदोलनाचं राष्ट्रीय नेतृत्व. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यात पुन्हा तुरुंगवास. पुढे शेतकरी संघटनेत ज्वारी परिषद ते झोनबंदीविरोधी आंदोलनात आघाडीवर. भूमिसेवक, बळीराज्य, शेतकरी संघटक, ग्यानबा अशा शेतक-यांसाठीच्या नियतकालिकांच्या संपादनात सहभाग. संघटनेच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण. दरम्यान मराठवाडा दैनिकाच्या लातूर आवृत्तीचं संपादन. पुढे पत्रकार म्हणून सातत्याने लिखाण. नाते, दुष्काळदेशी, संवाद, कलमा ही पुस्तकांना चोखंदळ वाचकांची पसंती. हा जगण्याचा संघर्ष आकलनला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.

मुळात कार्यकर्ता आणि लेखक हे कॉम्बिनेशनच आपल्याकडे विरळा आहे. असे लेखक एकतर आठवणींना उजळा देत बसतात किंवा आपल्याच विचारधारेच्या झापडांमधे अडकून तरी बसतात. पण हबीबांचं लेखन नव्याच्या शोधात आणि कोणत्याही एकांगीपणापासून दूर आहे. एकाच विचारधारेत सगळं सत्य आहे, हे त्यांनी मुळातच नाकारलेलं आहे. त्यामुळे त्यांचे जगण्याचे अनुभव सगळ्या अंगांनी आलेले दिसतात. हेच अनुभव एकाच वेळेस सामाजिक कामातून आणि लेखनातून सहजपणे व्यक्त होतात. आजवर संधी असूनही त्यांनी वर्षानुवर्षं प्रस्थापितपणा नाकारलाय. त्यातून इतरांसाठी करियरच्या दिशा असणा-या संधी यांच्यासाठी प्रलोभनं बनल्यात. पण त्यातून त्यांचं जगणं अस्सल ठरलंय. त्यांना स्वतःला जात, धर्म, प्रांत, विचारधारा यात कुठेच बसवायचं नाहीय एक माणूस म्हणून जगायचंय. त्यामुळे त्यांचं जगणं वेगळ्या वाटेवरचं आहे आणि त्याच्या हातात हात घालून येणारं लिखाणही. म्हणूनच ज्यांना रसरशीत जगायचंय त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.

हे पुस्तक जसं वेगळं आहे. तसंच यासाठी विक्रीचं उभं केलंलं तंत्रही वेगळं आहे. याआधी संवाद या पुस्तकासाठी त्यांनी ही पद्धत यशस्वीपणे राबवलीही आहे. ज्यांना हे पुस्तक हवंय, त्यांनी ९४२२९३१९८६ या मोबाईलवर किंवा habib.amar@gmail.com या ईमेलवर स्वतःचा पत्ता कळवायचा. पुस्तक त्या पत्त्यावर कुरियर केलं जातं. आणि पुस्तक आवडलं तरच पैसे पाठवायचे.

1 comment:

  1. मी हे पुस्तक वाचलेय. अमरकाका नेहमीच छान, स्पष्ट आणि सडेतोड लिहितात..

    ReplyDelete