Monday, 18 July 2011

गुरुदक्षिणा ऑनलाईन

मलाही आजकाल गुरुपौर्णिमेचे एसेमेस येतात. काहीजण फोन करतात. मी काही वर्ष पत्रकारिता शिकवतोय. त्याचे विद्यार्थी त्यात बहुसंख्येने असतात. पण इतरही काही माझे थोडे ज्युनियर मित्रही असतात. आश्चर्यच वाटतं. थोडा इगो सुखावलाही जातो. पण ते मनावर घेण्याचा काही प्रश्नच नसतो. कारण कोणी आपल्याला गुरू म्हणावं इतके आपण मोठे नाही, हे मला माझ्यासाठी सूर्यप्रकाशाहून क्लिअर आहे.

गुरूकडे बघायचे दोन दृष्टिकोन मला वाटतात. एक जीवनाला दिशा देणारा तो गुरू. उगाच सगळ्यांना गुरू म्हणून नये. पण दुसरीकडे दत्तात्रेयांसारखे चोवीस गुरू असण्याचा उदार दृष्टिकोनही आहेच. मी ज्यांच्याकडून काहीन्काही शिकतो. ते कृतज्ञतापूर्वक माझे गुरूच असतात. कृतज्ञतेत कृपणता कशाला. मला वाटतं दोन्ही दृष्टिकोन महत्त्वाचे वाटतात. वाटल्यास त्यांना मोठे गुरू आणि छोटे गुरू म्हणू. पण ते सगळे गुरूच.

याच गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर पंचवर्गीय भिक्खूंना पहिलं प्रवचन दिलं होतं. तोच धम्मचक्रप्रवर्तनदिन आपण हजारो वर्ष गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतोय. आद्य शंकराचार्यांच्या प्रभावामुळे अनेक बौद्ध परंपरांना वैदिक रूप मिळालं. त्यात ही व्यासपौर्णिमाही होती. आता यावर अनेक मतं मतांतरं असू शकतील. पण मला इथे भांडावसं वाटत नाही. कोळणीच्या घरी जन्माला येऊन वेदांना शिस्त लावणारे महर्षि वेदव्यासही मला पूज्यच. भगवान बुद्धही आणि आद्य शंकराचार्यही. अशा जगाला वळण लावणा-यांची आठवण काढण्याचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करायला हवी. त्याच भूमिकेतून या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साने गुरुजी आणि त्यांच्यावरच्या वेबसाईटवर लिहिलंय. मूळ लेख इथे कटपेस्ट.


काल गुरुपौर्णिमा देशभर साजरी झाली. कोणी उपवास केला होता. कोणी आपल्या गुरूची पाद्यपूजा केली होती. कुणाच्या अंगातच आलं होतं. कोणी घसघशीत गुरुदक्षिणा पेटीत टाकून वर्षभर पुन्हा पापं करायला मोकळं झालं. कुणी नव्या रीतीनं ग्रीटिंग कार्ड पाठवलंय, तर कुणी फुलांचे बुके. कुणी एसेमेसवर समाधान मानून घेतलं असेल. पण हे करताना कुणालाच माहीत नसेल की महाराष्ट्राची खरी गुरुपौर्णिमा आधीच साजरी झालीय. थिंक महाराष्ट्र या ऑनलाईन व्यासपीठाने साने गुरुजींचं समग्र वाङ्मय इंटरनेटवर आणून नव्या महाराष्ट्राच्या ख-या गुरूला बावनकशी गुरूदक्षिणा सगळ्यांच्या आधीच सादर केलीय.

साने गुरूजी. महाराष्ट्राच्या मांगल्याचं प्रतीकच होते ते. त्यांना जाऊन साठ वर्षं झाली तरी त्यांच्या मायेनं महाराष्ट्र आजही ओथंबलेला आहे. श्यामची आईची पंच्याहत्तरी नुकतीच साजरी झाली. पण आजही त्याचं कोणतंही पान वाचावं, ते तेवढंच ताजंतवानं आहे. आज हॅरी पॉटरच्या जगातल्या मुलांना श्यामची आई वाढदिवसाची भेट दिली जाते. आचार्य अत्र्यांच्या श्यामची आई सिनेमाच्या सीडी आजही नियमाने विकल्या जातात. शिन चॅन बघत लहानाची मोठी होणारी पिढीही तो सिनेमा बघून गदगदते. देल्ही बेल्ली बघणा-या आजच्या मुलांनाही साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी आवडतात. लहान मुलांची मराठी पुस्तकं विकली जात नाहीत, अशी तक्रार असतानाही या गोष्टींचे संच हातोहात खपतात. हे अगदी खरं आहे. कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात जाऊन याची खात्री करून घेता येऊ शकते.

बलसागर भारत होवो म्हणताना आजही शाळेतल्या मुलांची छाती अभिमानाने भरून येते. शेतक-यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण हे गाणं गातच आजवर महाराष्ट्रातल्या शेतक-यांचे लढे लढले गेले. शेतकरी आत्महत्या करत असताना तर हे गाणं अधिकच प्रत्ययकारी बनलंय. आजही नवं काहीतरी करून दाखवायची उमेद असणा-या धडपडणा-या तरुणांच्या शिबिरांच्या ओठांवर साने गुरूजींचीच गाणी आहेत. आजही त्यांच्या भारतीय संस्कृतीआणि इस्लामी संस्कृती सारख्या पुस्तकांत वाचणा-याचं डोकं बदलून टाकण्याची ताकद आहे. राज ठाकरेंनी केलेल्या राड्यानंतर त्यांच्या आंतरभारतीचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

हे उगाच होत नाही. इतकी वर्षं कुणी उगाच ताजं राहत नाही. जे जुनं होत नाही, ते चिरंतन असतं. साने गुरूजी असे चिरंतन आहेत. जशी वर्षं उलटत आहेत, तसे महात्मा गांधी अधिकाधिक रिलेवंट बनत चालले आहेत. पण गांधीजींचं आणखी मोठेपण हे की त्यांच्या प्रेरणेमुळे मोठ्या झालेल्यांनाही चिरंतनत्वाचा स्पर्श आहे. मग ते जयप्रकाश नारायण असोत अथवा नेल्सन मंडेला, तुकडोजी महाराज किंवा साने गुरूजी. महाराष्ट्रातल्या एका मोठ्या वर्गाने गांधीजींना शिव्या घालण्यात स्वारस्य मानलं. पण गांधीजींनी महाराष्ट्राच्या काळ्या दगडात जे पेरून ठेवलंय. ते आजही अनेकदा थरारून फुलून येत असतं. यात गांधीजींनी लावलेल्या या रोपट्यांची साने गुरुजींनी केलेली जोपासना महत्त्वाची ठरली, हेही लक्षात ठेवावं लागेल.

साने गुरुजी कोणत्याही एका विचारधारेत अडकलेले नव्हते. प्रत्येक विचारांमधल्या उदात्ततेच्या प्रेमात ते होते. म्हणूनच ते गांधीवादी, नेहरूवादी, समाजवादी, कम्युनिस्ट, इतकंच काय हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसाठीही आदरणीय ठरले. ते काँग्रेसच्या अधिवेशनांमधे आपली छाप पाडत होते. समाजवादी कार्यकर्ते घडवत होते. पण त्याचवेळेस कॉम्रेड डांग्यांच्या समवेत शेतक-यांचं संघटन करण्यासाठी धावत होते. त्यांनी सेवादलाच्या माध्यमांतून विधायक कामांचं मोठेपण त्यांनीच तरुणांमधे रुजवलं. गाणी गात क्रांती होऊ शकते, ते त्यांनीच कलापथकांतून महाराष्ट्राला दाखवून दिलं. जातिधर्माच्या पलीकडे जाऊन खरा महाराष्ट्र त्यांनी घडवला. पंढरपूर विठ्ठल मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहात तर त्यांच्या आत्मशक्तीचं तेज पूर्णपणानं प्रकट झालं होतं. त्यांनी तरुणांना काय विचार करावा त्याची दिशा दिलीच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र प्रज्ञेने विचार कसा करावा ते शिकवलं. आणि त्या ध्येयावर चालण्याची प्रेरणा देत राहिले. म्हणूनच नव्या महाराष्ट्राचे खरे गुरू तेच होते.

पुलंनी त्यांच्या या योगदानाची खूप छान नोंद घेतलीय – झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऐवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती? गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला? मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म.

बेचाळीसच्या लढ्यानंतरची ध्येयवादी तरुणांची पिढी साने गुरुजींच्या पान्ह्यावरच जगली आणि वाढली. महाराष्ट्रात आजही जी धडपडणारी मुलं आहेत, त्यांची एक प्रेरणा गुरुजींची आहेच आहे. गांधीजींनंतर गुरुजी फार जगले नाहीत. पण त्यांच्या दाखवलेल्या दिशांवर हजारो शेकडो पावलं शांतपणे चालली. साने गुरुजींना प्रत्येकातलं चांगलंच दिसलं. ते फक्त चांगल्याविषयीच बोलले आणि चांगलंच जगले. हे खूप महत्त्वाचं होतं. कारण स्वातंत्र्यानंतर फाळणी, फाळणीचे दंगे, एका डरपोक कट्टरवाद्याने केलेला गांधीजींचा खून, स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांचा सत्तेसाठीचा हपापलेपणा यामुळे स्वातत्र्यलढ्यात देशाने पाहिलेली स्वप्नं ध्वस्त होतं होती. अशावेळेस होणा-या अंधारात ध्येयवेड्यांसाठी उदात्तता टिकवणारी एक पणती साने गुरुजींनी लावली होती. त्या प्रकाशवाटेवर त्यांची धडपडणारी मुलं समाधानाने चालली.

त्यांच्या धडपडणा-या मुलांनी या गुरूला आपापल्या परीने गुरुदक्षिणा दिली. आता इंटरनेटच्या आधुनिक काळात saneguruji.net  ही वेबसाईट त्यांना खरी गुरुदक्षिणा आहे. त्यात साने गुरुजींचं समग्र साहित्य ऑनलाईन एकत्र आणलंय. थिंक महाराष्ट्रबरोबरच याचा आर्थिक भार उचलणारे धारप असोसिएट्स आणि वेबसाईट बनवणारे माधव शिरवळकर यांना धन्यवाद द्यायला हवेत. विशेष म्हणजे पुस्तकांची पानं स्कॅन करून टाकण्याचा कंजुषपणा यात केलेला नाही. उलट सगळं साहित्य नव्याने युनिकोडमधे टाईप करून वेबसाईटवर टाकलंय. ते खूप छान सोप्या पद्धतीने मांडण्यात आलंय.

त्यात बालसाहित्य आणि कथा या विभागात धडपडणारी मुलं, दारूबंदीच्या कथा, साक्षरतेच्या कथा, मोरी गाय, कावळे, गोप्या, श्रीशिवराय, मुलांसाठी फुले अशी अनेक पुस्तकं आहेत. शिवाय गोष्टी आणि निबंध या विभागात सोराब नि रुस्तुम, करुणादेवी, बेबी सरोजा या गोड गोष्टी तसेच गोड निबंधांचे तीन भाग आहेत. तसेच चरित्रे या विभागात महात्मा गौतम बुद्ध, शिशिरकुमार घोष, नामदार गोखले, बेन्जामिन फ्रँकलिन पासून ते भगवान श्रीकृष्ण आणि बापूजींच्या गोड गोष्टीही आहेत. श्याम हा विभाग महत्त्वाचा आहेच. त्यात श्यामची आई, श्यामची पत्रे, धडपडणारा श्याम आणि श्याम ही पुस्तके आहेत. पण सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो धर्म आणि संस्कृती यातले वैचारिक लेख. त्यात संस्कृतीचे भवितव्य, राष्ट्रीय हिंदूधर्म, समाजधर्म, भारतीय संस्कृती, इस्लामी संस्कृती ही महत्त्वाची पुस्तकं यात आहेत. इतरही लेखन यात आहे ज्यात नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियाचा गुरुजींनी केलेला अनुवाद आहे. झालेलं काम खूपच महत्त्वाचं आणि मोठं आहे.

आज नवं जग माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरच अवलंबून आहे. पुस्तकं चाळण्यापेक्षा सर्च मारण्यात ते आघाडीवर असतं. म्हणून आपल्याकडे जे काही चिरंतन आहे ते ऑनलाईन आणण्याची गरज आहे. महाराष्ट्र आणि मराठीला जगाच्या पाठीवर अभिमानाने उभं करायचं असेल, तर असेच प्रकल्प त्याचा पाया रचणार आहे. त्यामुळे साने गुरुजींना आज यापेक्षा अधिक चांगली दुसरी गुरुदक्षिणा असू शकत नाही. 

5 comments:

  1. त्या महाभिकार,दळभद्री, बाजारू ‘देल्ही बेल्ली’ची (हे ओंगळवाणे नाव टाईप करताना अत्यंत किळस आली) तुलना पृथ्विमोलाच्या,पवित्र 'श्यामची आई' शी करू नका.भयंकर चीड आली मला हे वाचून.काढून टाका ते वाक्य.'श्यामची आई' वाचणारी मुले असले तुच्छ,फडतूस सिनेमे पाहणार नाहीत.9768746053

    ReplyDelete
  2. तुम्ही ते भिकार वाक्य अजून का नाही काढून टाकलेत?

    ReplyDelete
  3. मित्रा ऋषी, मी दिल्ली बेल्डी बघितला. मला आवडला. मला श्यामची आईही आवडते. दोन्ही आवडतात म्हणजे बहुतेक माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम असावा. काय करू. वाक्य काढायला सांगणं अशा गोष्टी मला श्यामची आई आवडण्यासी विसंगत वाटतात.

    ReplyDelete
  4. मी नेहमीच तेथे असतो..मी आधी पुस्तकात गुरुजीचे अखंड साहित्य वाचलंय..आता परर आँनलाईन वाचले...हफ्त्यात तिनवेळा मी वेबसाईटला भेट देतो....पुन्हां पुन्हां वाचतो..मराठीमनावर फार उपकार झालेला आहे.पू.गुरुजींचं साहित्य आँनलाईन करुन...खुप खुप आभार..

    ReplyDelete
  5. http://lekhansangrah.blogspot.in/2017/08/blog-post_30.html

    ReplyDelete