Sunday, 24 July 2011

आयडियल इंटरनॅशनल २०११


शिकागो बीएमएम कन्वेंशन विशेषांक

भारताबाहेर पसरलेली मराठी माणसं सध्या शिकागोत जमलीत. २१ ते २३ जुलैदरम्यान तिथे बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन म्हणजे बीएमएम कन्वेंशन सुरू आहे. जगभरातल्या मराठी कर्तृत्वाचे आजच्या बदलणा-या महाराष्ट्राशी सूर जुळावेत या हेतूने दादरच्या आयडियल पुस्तक त्रिवेणीच्या मंदार नेरूरकर यांनी आयडियल इंटरनॅशनल २०११ या विशेषांकाची निर्मिती केलीय. मी त्याची सगळी संपादकीय जबाबदारी घेतली होती.

भारताबाहेरच्या मराठी माणसांपर्यंत शक्यतो न पोहोचणारे विषय,  माणसं आणि लेखक यात आहेत. अंक खूप चांगला झालाय. तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी अपेक्षा आहे. शिकागो कन्वेशनमधे ग्रंथालीच्या स्टॉलवर हा अंक विनामूल्य उपलब्ध आहे. त्यातल्या लेखांची ही यादी.


शिकागो, महाराष्ट्र आणि विवेकानंद
स्वामीजींना धर्मप्रसारार्थ परदेशात जाण्याची सूचना करणारा पहिला माणूस मराठी होता... संदीप सिद्धये यांचा अभ्यासपूर्ण लेख. शिवाय विवेकांनंदांवर तीन कादंबरी लिहिणारे चंद्रकांत खोत यांच्याविषयी, हम जिंदा हैं

कसला सुवर्णमहोत्सव?
सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या विकासाची चिरफाड केलीय शेतकरी संघटनेचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ शरद जोशी यांनी. तसंच शरद जोशींचं साहित्य उपलब्ध करून देणा-या जनशक्ती वाचक चळवळीविषयी, शरद जोशी इथे वाचता येतील

महाराष्ट्रः सायकोअॅनालिसिस
एक एकदम वेगळा विषय. आजचा महाराष्ट्र जो विचार करतो, व्यक्त होतो, त्याचा पराग पाटील  यांनी घेतलेला शोध.

चळवळींनी घडवलेला महाराष्ट्र
आज महाराष्ट्राने ग्लोबल भरारी घेतलीय. पण त्या पंखांतलं बळ आहे ते चळवळींचंच, सांगताहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत अमर हबीब

धडपडणारा महाराष्ट्र
थ्री इडियट्सफक्त सिनेमातच नसतात. नव्या महाराष्ट्रासाठी खूप चांगलं काम करणा-या संस्था आणि माणस, ज्यांच्याविषयी आजवर फारकाही लिहून आलेलं नाही. 

आपलं पर्यावरणाचं कर्ज तो फेडतोय... विदर्भातल्या पर्यावरणासाठी उत्तम पगाराची स्थिर नोकरी सोडून आलेला जागतिक दर्जाचा पर्यावरणतज्ज्ञ प्रवीण मोते यांच्याविषयी प्रमोद चुंचूवार

तो त्यांचा आई बाप बनलाय... लातूरजवळच्या एका खेड्यात एचआयव्हीबाधित मुलांसाठी जगणारा रवी बापटलेचं सेवालय शब्दांतून मांडलंय महारुद्र मंगनाळे यांनी

सूर्य का उगवतो?... परभणी जिल्ह्यात सायन्स सेंटर उभारणारा अजिंक्य कुलकर्णी आणि त्याची स्वप्नभूमी यांची ओळख करून दिलीय दिनकर गांगल यांनी

चैत्रपालवी... शेतीच्या प्रयोगांतून धुळे जिल्ह्यातल्या आदिवासी गावात नंदनवन फुलवणारा चैत्राम पवार शोधलाय जगदीश मोरे यांनी

आमची चळवळ नाटकांची... जाणते प्रेक्षक आणि परीक्षक तयार करणा-या कुडाळच्या बाबा वर्दम थिएटरविषयी आनंद वैद्य 

फोर्थ आय... फोटोग्राफीला सामाजिक बांधिलकीची नवी दृष्टी देणा-या नीतिन सोनावणेंविषयी सिद्धेश सावंत

पासवर्ड की फँटसी?
बराक ओबामा हा एक फिनोमेना. त्याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव काय आहे, संजय आवटे यांचा एक अफलातून लेख

खरे अत्रे कुठे आहेत?
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचं नेतृत्व केलं ते आचार्यांनी. त्यांच्या बंडखोरीचा श्रीरंग गायकवाड यांनी घेतलेला धांडोळा

मराठी व्हावी तंत्रयोगी
भाषा वाढते ती टेक्नॉलॉजीच्या सोबतीनेच. मग मराठीतल्या टेक्नॉलॉजीची स्थिती काय? सांगताहेत  रवि आमले. शिवाय संतसाहित्य इंटरनेटवर आणणा-या सांगलीच्या विश्वास भिडेंची गोष्ट ज्ञानेश्वरी इंटरनेटवरी

आयडियल शिफारस
अमिता दरेकर आणि पृथ्वीराज तौर यांनी निवडलेत गेल्या दोन वर्षातील बेस्ट मराठी. पाच सिनेमे, पाच नाटकं, पाच गाणी, पाच टीवी कार्यक्रम, पाच पुस्तकं, पाच कविता आणि पाच वेबसाईट्स

काळोख विझवणारा कलावंत
गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या षष्ठ्यब्दीनिमित्त महाराष्ट्र फाऊंडेशनचे सर्वेसर्वा सुनील देशमुख यांचा लेख. तसंच भीमरावांच्या स्वप्नाविषयी, एक गुरुकुल गझलचंही पाहिजे

गावचं तेरवं
गावं मरायला टेकलीत. त्याचं तेरावं घालायचं ते राहिलंय. एक ललित श्याम पेठकर यांच्या संवेदनशील लेखणीतून आलेलं.

इगतपुरीचा पाऊस
पाऊस अनुभवायचा असेल तर इगतपुरीला पर्याय नाही. सांगताहेत ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रकार प्रकाश बाळ जोशी

पुन्हा सांगतोय. अंक कन्वेंशनमधे ग्रंथालीच्या स्टॉलवर उपलब्ध आहे. काही अडचण असल्यास तुम्ही मला ssparab@gmail.com वर मेल करू शकता.

धन्यवाद,

सचिन परब
संपादक, आयडियल इंटरनॅशनल २०११
ssparab@gmail.com
9920839805

No comments:

Post a Comment