Saturday, 6 August 2011

माझे वडील भारताचा द्वेष का करतात?


आंतरराष्ट्रीय वगैरे विषयांवर मी फारसं लिहित नाही. मला त्यातलं काही कळतही नाही. राष्ट्रीय विषयांच्या भानगडीतही फारसा पडत नाही. आपल्या आसपासच्या विषयांवर आपण जमिनीवरचं वास्तव स्वतः पडताळून पाहू शकतो. तसं आंतरराष्ट्रीय विषयांवर करता येत नाही. रोजच्या पेपरांतल्या बातम्या वाचल्या तरी बहुदा त्याची एकच बाजू आपल्यासमोर येत असते. पण भारत पाकिस्तान विषयावर मी बहुदा पहिल्यांदाच लिहिलं. त्याचं कारण होतं आतिश तासिर. मी त्याच्याविषयी पूर्वीही वाचलं होतं. त्याचं लाईफ आपल्याला खूप आवडलं. त्याचं लेखनही. आता त्याच्या एका लेखावर मी लिहिलंय. त्याचा लेखच मराठीत अनुवाद करून टाकलाय. बघा वाचून. 

काही लोकांचं जगणं हे कादंबरीच असते. आतिश तासिरचं तसंच काहीतरी. त्याच्या आई इंग्रजीतल्या ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका तवलीन सिंग. वडील पाकिस्तानातले ज्येष्ठ राजकीय नेते सलमान तासिर. आई भारतातली तर वडील पाकिस्तानातले. पण आतिशचा जन्म लंडनचा. प्राथमिक शिक्षण आईबरोबर दिल्लीत. पण लेखक पत्रकार म्हणून करियर इंग्लंडमधलं. त्याने सादत हसन मंटोच्या कथा उर्दूतून इंग्रजीत आणल्यात. पुढे टाइम मॅगझिनमधलं त्याचं लिखाण गाजलं. त्याची इंग्लंडच्या राजघराण्यातली गर्लफ्रेण्डही चर्चेत होती. पण त्या सगळ्यापेक्षा त्याचं पुस्तक गाजलं. स्ट्रेंजर टू हिस्टरीः अ सन्स जर्नी टू इस्लामिक लँड्स. त्यात पाकिस्तानात राहणा-या त्याच्या वडिलांच्या शोधाचा प्रवास होता. त्याहीपेक्षा त्यात होता तो या शोधादरम्यान त्याच्या स्वतःच्या मानसिकतेचाही प्रवास.


हा प्रवास भारत पाकिस्तानातल्या नात्याचाही आहे. भारताला स्वतःचा देश मानणा-या मुलाने घेतलेला एका पाकिस्तानी बापाच्या हा शोध. त्यामुळे त्यात एक वेगळाच दृष्टिकोन आहे. एक वेगळाच आपलेपणा आणि त्याचवेळेस एक वेगळीच तटस्थताही यात आहे. सारखा भूतकाळ असलेले हे दोन देश एकमेकांचे जानी दुश्मन का बनलेत, याचा हा शोधच आहे. आज जवळपास आतिशच्याच वयाची हिना रबानी खार पाकिस्तानची परराष्ट्र मंत्री बनून भारतात आली. तिच्या सौंदर्याची चर्चा झाली. आजही सुरूच आहेच. फोटोत आणि विडियोत आपले परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा सदैव हिनाबाईंकडेच कौतुकाने बघत असताना दिसले. ते कौतुक जुन्या लोकांचं नव्याकडे बघायचंही असावं. या सगळ्यात, नव्या लोकांत, बदललेल्या नव्या परिस्थितीत भारत पाकिस्तानातले संबंध नव्या दृष्टिकोनातून पाहायला हवेत. अशावेळेस आतिशचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतोय.

आतिशचा नवा लेख सध्या गाजतोय. नवा म्हणजे त्याला आता वीस दिवस झाले. द वॉल स्ट्रीट जर्नल या जगातल्या एका सर्वात मोठ्या पेपरात १६ जुलैला हा लेख आला होता. व्हाय माय फादर हेटेड इंडिया हा तो लेख. त्यावर वेगळं भाष्य करण्यापेक्षा हा लेख मराठीतून मांडायला हवाय. म्हणून हे त्याचं संक्षिप्त भाषांतर

अवकाश तंत्रज्ञानात कडमडून भारत स्वतःलाच का गंडवतोय? त्यापेक्षा त्यांनी बॉलीवूडमधेच रमावं, ट्विटरवरून जगभर गेलेलं हे वाक्य आहे, माझे वडील सलमान तासिर यांचं. ते पाकिस्तानचा सगळ्यात मोठा प्रांत असलेल्या पंजाबचे गवर्नर होते. त्यांचा खून झाला त्याच्या आधी अवघे दहा दिवस हे ट्विट आलं होतं. भारताचं एक अवकाशयानाचं उड्डाण अपयशी ठरलं आणि बंगालच्या उपसागरात बुडालं. त्याविषयी त्यांनी लिहिलं होतं. यामुळे त्यांच्या हजारो अनुयायांना उकळ्या फुटल्या असतील. पण या टोमण्यातून पाकिस्तानची भारताविषयची कटू असूया अधोरेखित होते, ते महत्त्वाचं आहे.
माझ्या वडिलांच्या याच भूमिकेमुळे आमचं कधी पटलं नाही. त्यांच्या मृत्युआधी जवळपास तीन वर्षं आम्ही दोघे बोलत नव्हतो.

भारत, त्याची संस्कृती आणि भूतकाळ नाकारण्यातच पाकिस्तानचं अस्तित्व आहे. त्याचा जन्मही त्यातूनच झालाय. हे समजून घेतल्याशिवाय पाकिस्तान भारताचा करत असलेला द्वेष नाही कळणार. पुस्तकं चाळून हा द्वेष कळणारही नाही. पण ते समजून घेणं खूप आवश्यकही आहे. टोकाच्या इस्लामी कट्टरवादाचा विरोध करण्यात पाकिस्तान टाळाटाळ का करतं आणि जुना दोस्त असलेल्या अमेरिकेच्या हेतूबद्दल पाकिस्तान आता साशंक का असतं, या दोन्ही प्रश्नांचं उत्तरही भारताच्या द्वेषातच दडलेली आहेत.

पाकिस्तानची कल्पना पहिल्यांदा गंभीरपणे मांडली, ती कुणा मौलवीने किंवा पुढा-याने नाही तर एका कवीने. महम्मद इक्बाल यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या अधिवेशनात १९३० साली ही कल्पना मांडली. ज्यावर भारतीय मुस्लिम आपलं राजकीय आणि नैतिक सार अनुभवू शकेल, अशी एक जमीन त्यांना अपेक्षित होती. त्यांना काय हवं ते धूसरच होतं. पण वैविध्य असलेला भारतीय समाज नको तर एकसाची संस्कृती हवी, ही एक गोष्ट त्यांना स्पष्ट होती.

ही कविकल्पना ऑगस्ट १९४७ मधे भारताच्या पाळणीबरोबर वास्तवात आली. तेव्हा खरं तर लोक जिथल्या तिथे राहावेत असं अपेक्षित होतं. पण उद्भवलेल्या हिंसाचाराने मुस्लिमांशिवाय कुणालाही पाकिस्तानात जागा असणार नाही, हे स्पष्ट केलं. भारत आणि पाकिस्तान ही नवी राष्ट्र निर्माण झाली त्याचा पायात लाखो जणांचं रक्त आणि इतिहासातलं सगळ्यात मोठं विस्थापन होतं. त्यामळे या दोन राष्ट्रांमधे निकोप संबंध निर्माण होण्याची शक्यताच दुरावली. माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाकिस्तानी वडील आणि भारतीय आई यांनी या हिंसेच्या गोष्टी ऐकतच मोठे झालेत.

पण पाकिस्तानात याचा संदर्भ अधिक गहिरा होता. इथे प्रश्न होता तो संस्कृती आणि सामाजिकतेचा. आपण भारतापेक्षा नेमके वेगळे कुठे असणार आहोत, हा प्रश्न महत्त्वाचा होता. ख-या राष्ट्रीयतेच्या अभावामुळे पाकिस्तानात भारतविरोधच अस्तित्वाच्या केंद्रभागी राहिला. फाळणीपूर्वी इथल्या हिंदू आणि मुस्लिमांमधे असलेला सामायिक भूतकाळ आणि वर्तमानही त्यांनी नाकारलं होतं. प्रत्येक गोष्ट संशयाच्या फे-यात होती. भारताशी नाळ जोडणारं सगळं कापून काढायाचं होतं. त्यात आपली स्वतःची नैसर्गिक ओळख पुसून परकीय कृत्रिम गोष्टींचं रोपण करायचं होतं. अरबी इस्लामी ओळख मिरवणारा हा पाकिस्तान स्वतःमुळेच जखमी होता. हा पाकिस्तान भारताकडे पाठ करत होता, पण ही पाठ स्वतःकडेच होती. त्याच्या या सगळ्या प्रयत्नांत एक मोठीच अडचण होती. भारत तर फक्त एका सीमेपल्याड उभा होता. भारतात तीच जुनी संस्कृती सगळी वैविध्यांसह होती. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानाइतकेच मुस्लिम तिथे राहत होते. पाकिस्तानला जे खोडून टाकायचं होतं त्याचीच भारत रोज आठवण करून देत होता.

याच गोंधळामुळे पाकिस्तानातलं राजकारणातलं विधायकपण मुळापासून उद्ध्वस्त झालं. तरीही ऐंशीच्या दशकात माझे वडील फाळणीला चूक मानत नव्हतेच. कारण भारतात लोकशाही आणि वैविध्य असलं तरी आर्थिकदृष्ट्या बट्ट्याबोळ होता. पाकिस्तानात चांगले रस्ते, चांगल्या मोटारी, उत्तम उद्योगधंदे होते. उलट समाजवादी भारतात होती ती भुकेकंगाल गरिबी. पण नव्वदच्या दशकाच्या आरंभापासून दोन्ही देशांच्या नशिबांत जणू अदलाबदल झाली. भारतीय ओळख नाकारण्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागली. तिथे भयानक इस्लामचा नवा चेहरा समोर आला होता. आर्थिक खुलेपणाने नव्या भारताचा उदय होत होता. आणि सीमेपलीकडे एक कविकल्पना धुळीत मिळत होती.

पाकिस्तानच्या अधःपनाचं प्राथमिक कारण होतं ते तिथलं लष्कर. अमेरिकेकडून मिळालेली प्रचंड मदत त्यांनी भारताशी लढण्यासाठीची शस्त्रास्त्र उभी करण्यासाठी वापरली होती. अफगाणिस्तानात दहशतवादाचा भस्मासूर उभा राहिला. दहशतवादाच्या नावाखाली अमेरिकन पैसा पाकिस्तानात वेगाने येत होता. पण त्याचवेळेस भारतातल्या दहशतवादी हल्ल्यांना तेच पाकिस्तानी लष्कर मदत करत होतं. यावर्षी मे महिन्यात हा पर्दाफाश झाला. पाकिस्तानात लपलेला ओसामा बिन लादेन मारला गेल्यामुळे तालिबानची निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाला खतपाणी घालण्यापासून आण्विक गुपितांच्या खरेदीविक्रीपर्यंत अनेक गोष्टी चव्हाट्यावर आल्या. आतापर्यंत हे लष्कर भारताची भीती घालत असे. पण तेच लष्कर पाकिस्तानसाठी इतर कुणाहीपेक्षा जास्त धोकादायक बनलं होतं. ते दरवर्षी त्यांच्या देशाची पाव संपत्ती आणि निवडणुकीतून जिंकून आलेली अनेक सरकारं खात होतं.

इथे दोन देशांची बदलेलेली नशीबं जास्त खुपू लागली होती. माझ्या वडिलांच्या ट्विटमधे तिच कटुता दिसून येते. जी संस्कृती ते वर्षानुवर्षं नाकारत होते, तीच बॉलीवूडच्या मार्गाने पाकिस्तानातल्या घरोघर पोहचताना ते बघत होते. याच असूयेमुळे काश्मीर प्रश्न सुटणं अवघड बनलंय. १९४७च्या जखमा ब-या होत नाहीत, तोपर्यंत तो सुटणंही शक्य नाही. पाकिस्तानच्या प्रत्येक आव्हानाच्या आणि आक्रमणाच्या भाषेत एक वेदना आणि दुःख भरलेलं आहे. म्हणूनच त्यात भारताने आनंद साजरा करण्यासारखंही काही नाही.

No comments:

Post a Comment