Wednesday, 3 August 2011

मनसे + भाजप = ?


सध्या राज ठाकरे गुजरातेत पोहोचलेत. नरेंद्र मोदींचे ते सरकारी पाहुणेही आहेत. मनसे आणि भाजप या नात्यावर जितकं लिहावं तितकं कमीच. एक लेख दोन आठवड्यांपूर्वीचा.

कधी, कुठे आणि कसं बातम्यांत राहायचं ते राज ठाकरेंना बरोबर कळतं. आणि त्यातून शिवसेनेची खोडी काढायची असेल तर मग पाहायलाच नको. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी केलेला विकास समजून घेण्यासाठी आखलेला आगामी दौरा असो, किंवा नाशकात राजनाथ सिंग यांच्याबरोबर एका व्यासपीठावरून भाषण देणं असो. गुजरातच्या दौ-याच्या बातम्या ब-याच बनत आहेत. पण राजनाथ सिंग यांच्यासोबतचा कार्यक्रम एकूण राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.


राज आणि भाजप यांच्या पुन्हा एकदा जवळ येण्याला गोपीनाथ मुंडे यांच्या नाराजीनाट्याची पार्श्वभूमी आहे. आजवर शिवसेनेतल्या अंतर्गत वादात भाजप नेहमी आवडीने हस्तक्षेप करत आलंय. पण यंदा पहिल्यांदाच मुंडेंच्या नाराजीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अंतर्गत वादात डोकं खुपसलं होतं. शिवसेनाप्रमुखांनीही मुंडेंविषयी आपली सडेतोड मतं मांडली होती. त्यांनी भाजप सोडलं तरी भेटण्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे राहतील, असंही ते सांगून गेले होते. हे भाजपला, विशेषतः नितीन गडकरींना झोंबलं असण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज आणि भाजप यांच्यातल्या वाढत्या जवळकीचा विचार करायला हवा.

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी शिवसेना भाजपची स्थिती आहेच. एकमेकांना शिव्या देत का होईना पण दोघे एकत्र राहतच आहेत. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख यांची जादू जेव्हा अगदी जोरात होती तेव्हा भाजपपासून काडीमोड घेणं सेनेला फायद्याचं ठरलं असतं. तेच भाजपच्याही बाबतीत आहे. आता हा काडीमोड प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूपच कमी आहे. आता मुंबई, ठाण्यासह अन्य महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका तोंडावर असताना तर हे शक्यच दिसत नाही. कारण या निवडणुका सेनेसाठी अस्तित्वाची लढाई आहेच. पण भाजपसाठीही याचं महत्त्व काही कमी नाही.

असं असलं तरी हे दोन्ही पक्ष एकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. कदाचित निवडणुकांतील जागावाटपाच्या चर्चेत या रुसव्या फुगव्याचं मूळ असू शकतं. याच चर्चेत आपापल्या बेटकुळ्या दाखवून जास्तीत जास्त आणि हव्या त्या जागा आपल्या पदरात पाडायच्या असतात. तेव्हा हा पाच वर्षांचा मानापमान मानसिक दबावाच्या राजकारणासाठी उपयोगी पडतही असावा. कारण काहीही असो हेच दोन काय किंवा बाकीचे युती आघाड्यातले अन्य पक्षही एकमेकांना असेच अधून मधून बोचकारत असतात. त्यात भाजपच्या हातात राज ठाकरे हे अस्त्र आल्यापासून तर या बोचकारण्यात त्यांनी आजवर कोणतीही कुचराई केलेली नाही.

स्थानिक पक्षांशी युती करून त्या पक्षांना संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला. पण सुरुवातीच्या यशस्वी प्रयत्नांनतर प्रादेशिक पक्ष त्यांना फशी पडले नाहीत. नीतिश कुमार, ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडू, नवीन पटनाईक अशा नेत्यांनी भाजपला आपापल्या राज्यात दुय्यम ठेवले. पण या पक्षांशी भाजपचे मुळात वैचारिक मतभेद होते. शिवसेना, अकाली दल आणि आसाम गण परिषद यांच्याबाबत मात्र मतभेदांपेक्षा वैचारिक समानता अधिक होती. शिवसेना तर हिंदुत्व घेऊन उभी होती. त्यामुळे सेनेची ताकद संघपरिवारात विसर्जित करणं सोपं वाटत होतं. पण झालं उलटंच. शिवसेनेने विशेषतः उद्धव ठाकरेंनी भाजपची वारंवार अवहेलना केली. आणि इच्छा असूनही भाजपला सेनेची साथ सोडता आलेली नाही.

पण राष्ट्रीय पातळीवर आक्रमक हिंदुत्वामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाबरोबरच शिवसेनेची गणना होत असे. सेना भाजप युतीच्या सुरुवातीच्या काळात तर प्रमोद महाजन हे बाळासाहेब ठाकरेंचे मानसपुत्र आहेत आणि तेच शिवसेनेचं राजकारण पुढे चालवतील, अशा चर्चा संघ परिवाराने उत्तरेत नेहमीच्या पद्धतीने घडवल्या होत्या. आज जवळपास पंचवीस वर्षांच्या प्रयत्नांनंतरही महाराष्ट्रात भाजप शिवसेनेवर मात करू शकलेली नाही. आजवर अनेक वर्षं लोकसभेत सेनेचे खासदार भाजपपेक्षा अधिक जात राहिले. आज विधिमंडळात भाजपचे आमदार सेनेपेक्षा अधिक आहेत. तरीही सेनेची ताकद भाजपच्या तुलनेच अधिक आहे, हे कोणीही नाकारत नाही.

तेव्हापासूनच म्हणजे राज ठाकरे सेनेत असल्यापासूनच त्यांचा भाजपच्या अनेक नेत्यांशी  दोस्ताना होता. राज वेगळे झाले, मनसेची म्हस पाण्यात बसली आणि उठली. या काळात दोघांपैकी कुणीही ही दोस्ती लपवलेलीही नाही. २००४च्या निवडणुकांमधे उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर तर प्रमोद महाजनही उद्धव यांच्यापेक्षाही राज यांच्या अधिक जवळ होते. राजा शिवाजी विद्यालयात झालेल्या महाजनांच्या श्रद्धांजली सभेलाही ठाकरे घराण्यातून एकटे राज ठाकरेच उपस्थित होते, हे लक्षात ठेवायला हवं. गोपीनाथ मुंडेंनी तर भाजप, सेना, मनसे अशा युतीची मागणी करत हे प्रेम उघडपणे मांडलंही. नीतिन गडकरी यांनी तर राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरही राज यांच्याविषयीचा सॉफ्ट कॉर्नर लपवलेला नाही. विनोद तावडे, आशिष शेलार अशा नेत्यांशी राज यांची असलेली मैत्री दोन्ही बाजूंनी राजकारणातदेखील जपली गेली. विशेषतः भाजपच्या प्रदेश कार्यालयातल्या राज यांच्या चहापानापासून भाजप मनसे युतीची चर्चा वारंवार झाली. त्यामुळे हे नवं राजकारण आज राज आणि तावडे यांच्या राजकारणाची एक ओळखच बनली आहे.  

बाळासाहेबांच्या आक्रमक राजकारणाचं भाजपमधील अनेकांना अप्रुप होतं आणि आहे. आक्रमक हिंदुत्व आणि मराठीचा अहंगंड यावर पोसल्या गेलेल्या महाराष्ट्र भाजपमधील नेत्यांना इच्छा असूनही उघडपणे तसं राजकारण करता येत नाही. त्याचवेळेस अशांना असूया वाटावं असं राजकारण आणि बिनधास्त विधानं बाळासाहेब नेहमीच करत आले. त्या तुलनेत उद्धव यांचं संयत राजकारण भाजपसाठी आकर्षक नाही आणि भाजपच्या दृष्टीने उपयुक्त तर बिल्कूल नाही. मात्र राज यांचा आक्रमक मराठी बाणा भाजपसाठी आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे भाजपची, विशेषतः संघाची उच्चवर्णीय शहरी मतं मनसेने लढवलेल्या सगळ्या निवडणुकांमधे राज ठाकरेंच्या बाजूने गेल्याचं स्पष्ट दिसत आहे. डोंबिवली हे त्याचं एकच उदाहरण पुरेसं आहे. त्यामुळे राज ठाकरेंची गुजरात भेट या राजकारणात चपखल बसते.

पण राज आणि राजनाथ सिंग यांचं एका कार्यक्रमात येणं अधिक धक्कादायक आहे. कारण उत्तर भारतीय राजकारणामुळेच मनसे भाजपच्या जवळ येण्याची शक्यता दुरावलेली आहे. राज यांनी उत्तर भारतीयविरोधी भूमिका घेतली नसती, तर भाजप मनसे युती आजपावेतो झालीही असती कदाचित. राज यांना जवळ घेणं म्हणजे उत्तर भारतात स्वतःच्या पायावर कु-हाड घालून घेण्यासारखं आहे, हे भाजपचे नेते ओळखून आहेत. त्याचवेळेस राज हे सेनेसारखी स्पष्ट हिंदुत्वाची लाईनही घ्यायला तयार नाहीत. मनसेने हिंदुत्व सोडू नये, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांचीच इच्छा आहे. तसं राज यांनीच आपल्याला सांगितल्याचं ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी त्यांच्या एका पुस्तक प्रकाशनप्रसंगी जाहिररित्या नुकतंच सांगितलं होतं.

खरं पाहिल्यास राज यांनी हिंदुत्व सोडलेलंही नाही आणि पकडलेलंही नाही. पक्षाच्या सुरुवातीच्या काळात राज यांच्या झेंड्यात हिरवा रंगही आला आणि ते राज स्वतः दर्ग्यांमधे दर्शनही घेऊन आले. पण उत्तर भारतीय राड्यानंतर त्या सेक्युलर घाटणीची मनसे उरली नाही. तरीही ते हिंदुत्वापासून उघडपणे दूरच आहेत. ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणार नाहीत आणि सेक्युलरही म्हणवून घेणार नाहीत. हिंदुत्वाचं राजकारण केल्यानंतर येणारी अस्पृश्यता त्यांनी सेनेत असताना अनुभवली आहेच. त्यामुळे ते हिंदुत्वाच्या फंदाच पडतील असं वाटतही नाही. त्यामुळे भाजपशी मनसेशी युतीही इतक्यात शक्य दिसत नाही. तोपर्यंत प्रेमात पडूनही लग्न न करणा-या प्रेमी युगुलाप्रमाणे त्यांचा गुप्त आणि उघडपणाच्या सीमारेषेवर वावरणारा प्रेमालाप सुरूच राहिल. आणि त्याच्या बातम्या बनतच राहतील. 

1 comment:

  1. his trip to Gujrat is a ploy to attract gujrati voters in mumbai. but i wonder why electronic media giving out of proportionate coverage to this visit.

    ReplyDelete