Tuesday, 23 August 2011

मीडियाचं काय चुकलं?


अण्णा हजारे आगे बढो. वंदे मातरम. भारतमाता की जय. अशा आरोळ्या आमच्या घराबाहेर ऐकू आल्या. आमच्या वाडीत असे आवाज येतील असं वाटलं नव्हतो. कारण वाडीत जवळपास सगळ्यांना ओळखतो. इथे अण्णा कोणाला भावला? आमच्या वाडीतलीच पंधरा वीस पोरं. कुणीही बारा तेरा वर्षांपेक्षा जास्त नाही. मी तोंडात बोट घालायचंच बाकी होतं.

रुद्र. माझा पाच वर्षांचा मुलगा. पहिलीत आहे. अजून स्वतःचं ढुंगण धुता येत नाही. परवा खेळता खेळता भारतमाता की जय ओरडला. अण्णा हजारे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, हे ऐकून मला धक्काच बसला. अण्णा हजारेंचं आंदोलन सुरूय तेव्हापासून त्याचे भाईआजोबा रोज न्यूज चॅनल लावून बसतात. त्याचा परिणाम असावा. तुला अण्णा हजारे माहिती आहेत का, मी विचारलं. रुद्र हो म्हणाला. कसे दिसतात, मला अजूनही शंका होती. टोपी घालतात, तो म्हणाला. कोणत्या रंगाची, माझा प्रश्न. सफेद त्याचं उत्तर. माझा पुढचा प्रश्न येण्याआधी त्याने टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारे अण्णा दाखवले.

हे घडायच्या आधी लिहिलेला एक लेख ब्ल़ॉगवर टाकतोय.


त्या दिवशी सुरुवातीला मुंबई पुणे हायवेवर शेतक-यांवर गोळीबार झालाय एवढीच बातमी आली होती. विधिमंडळात गृहमंत्री आर. आर. पाटील पोलिसांची बाजू घ्यायला सरसावले होते. पोलिस अधिका-यांनी फिरवलेल्या चावीवर जणू पोपट बोलत होता. पोलिसांनी काय फक्त दगडधोंडे खायचे काय?  

आबांचा प्रश्न चुकीचा नव्हताच. पोलिसांची त्यांनीच केलेली दयनीय स्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. पण काही तासांतच सगळं चित्र पालटलं. टीव्हीवर पोलिसांचा भयानक चेहरा दिसू लागला. हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेला मावळातला शेतकरी. पाढरी टोपी, धुवट लेंगा झब्बा आणि मायाळू चेह-याचा हा शेतकरी महाराष्ट्राची ओळख असलेला. त्यालाच चिरडायला पोलिस उतावीळ झाले होते. पोटं सांभाळता येत नाहीत. पण हातात पिस्तुलं घेऊन धावत होते. नीट नेम धरून कबुतरासारखे टिपून मारत होते. त्यात निर्दय क्रूरता होती. सिनेमातल्या पोलिसांपेक्षा राक्षसी कृत्य होती ती.

हे कमी होतं म्हणून गोळीबाराचं समर्थन करण्यासाठी शेतक-यांनी केलेल्या हिंसाचाराचे पुरावे उभे केले जात होते. गाड्या फोडल्या जात होत्या. टू व्हिलर चिरडल्या जात होत्या. कायदा उरला असेल तर त्या कायद्याचे रक्षकच तो पायदळी तुडवत होते. सगळं धक्कादायक होतं. आपल्या माणसांवर होणारे ते घाव आतून पिळून टाकत होते. वर पुण्यातली गावं साभाळणारा पोलिसांचा म्होरक्या संदीप कर्णिक आणि राज्याची धुरा दिलेला पोलिसांचा मोठा म्होरक्या अजित पारसनिस दोघांच्याही जिभेला हाड नव्हतं. मातीचं इमान विसरलेल्या या भाडोत्री वर्दीवाल्यांची जीभ हासडून हातात देण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. पण हे दोघे जावई सासरे नेत्यांच्या छत्राखाली आरामात मजा मारत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक काय सांगावं? त्यांचं या विषयावरची भाषणं तर महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवायला पाहिजेत. मराठी माणसाच्या नावाने चालवलेली ही मोगलाई कुठवर चालणार आहे? ज्या मावळात जैन, बौद्ध, नाथ, महानुभावांनी नांगरण केली. जिथे ज्ञानोबा तुकोबांनी भक्तीचा हिमालय उभा केला. महाराष्ट्र कुठल्या देवाच्या पायाशी जाणार नाही, पण ताठ कण्याचा महाराष्ट्र ज्याच्यासमोर नेहमी साष्टांग नमस्कार घालतो त्या छत्रपती शिवरायाच्या तेजाने इथली माती अजूनही तळपून उठते. मराठी माणसाचा म्हणून आज जो काही थोडाबहुत अभिमान वाटावा असा इतिहास आहे, तो इथल्या बारा मावळाच्या साध्या शेतक-यांनीच घडवलाय. तोच बारा मावळ खणून बाजारात विकायला काढला आहे. विकासाच्या नावाने इथले पुढारी आपल्या माणसांनाच मंडयांत कधीपर्यंत मांडणार आहेत?

प्रश्न आज हा आहे की, या सगळ्यांचं पाप त्यांच्या झोळीत आपण देणार आहोत की नाही? ती जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या मोठमोठ्या पेपरांनी मोर्चातली हिंसा पूर्वनियोजित असल्याच्या हेडलायनी दिल्या. सरकारची बाजू कशी बरोबर याचे मोठमोठ्या विचारवंतांनी लेख लिहिले. अशावेळेस ही आपली साधीभोळी माणसं कशी पेटून उठतात, अशी साधी कळकळही त्यांच्या विवेकाला बोचली नाही का? अशावेळेस टीव्हीवर आपल्याला पोलिसांचा नीचपणा दिसलाच नसता तर काय झालं असतं, असं वाटणं स्वाभाविक होतं. म्हणूनच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मावळसाठी मीडियाला दोष देतात, त्यामुळे त्याची ताकद अधोरेखित होते.

आज टीव्हीवर गोळ्या मारताना पोलिसांना बघून लोकांना त्या बंदुकांच्या टप्प्याची मर्यादा समजलीय, हे बरं झालं. टीव्ही नसता तर पोलिसांचा हा नंगानाच आपल्यासमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात आलाच नसता. इंडिकातून गोळीबार झाल्याच्या बिनबुडाच्या कहाण्या राज्याचे गृहमंत्रीच सांगत आहेत. अशावेळेस सत्य कधीच समोर येणार नव्हतं. पण जे हजार शब्द सांगू शकत नाहीत ते एक फोटो सांगतो, असं म्हणतात. इथे तर जिवंत दृश्यच आहेत. टीव्ही या माध्यमाची ताकद इथे स्पष्टपणे दिसली. यापूर्वी आपण तहेलकासारख्या भ्रष्टाचारात टीव्हीची ताकद बघितली होतीच. पण आज मावळात कुठलं स्टिंग ऑपरेशन नाही. तरीही इथे टीव्ही आपली ताकद दाखवून देतेय.

वर्तमानपत्रांचं महत्त्व आहेच. ते राहणारच आहे. आजवर वर्तमानपत्रांनीच क्रांत्या घडवल्या आहेत. खींचो न कमान को न तलवार निकालो, जब तोप हो मुकाबिल तो अखबार निकालो. हे आजही आऊटडेटेड झालेलं नाही. पण कुणी मानो अथवा न मानो, काही अपवाद वगळता वर्तमानत्रपत्रातली पत्रकारिता व्यवस्थेत जिरून चालली आहे. त्यामुळे जगभरात क्रांती आज इंटरनेट आणि टीव्हीतून येतेय. इजिप्तचं उदाहरण तर सूर्यप्रकाशापेक्षाही स्पष्ट आहे. आपल्याकडे आज अण्णांचं आंदोलन तरुणांपर्यंत पोहोचलं याचं एक कारण इंटरनेट आहेच. पण टीव्हीचा प्रभाव त्यापेक्षाही खूप मोठा आहे. राजकारणी टीव्ही चॅनल्सवरच्या बातम्या मॅनेज करतच नाहीत, असं नाही. इथे वर्तमानपत्री पत्रकारितेतले सगळे दुर्गुण आहेतच आहेत. तरीही वर्तमानपत्रांपेक्षा टीव्हीची गणितं थोडी वेगळी आहेत. इथे गळेकापू स्पर्धा आहे. इथे तुमचे ब्रांड काही कामाचे नाहीत. जो आत्ता चांगलं दाखवतोय त्याच्याकडे प्रेक्षक वळतात. त्यामुळे इथल्या टीआरपीच्या स्पर्धेत जसं नागोबा आणि भूताटकी धावते. पण त्याचवेळेस तिथे सत्य दडवणं कठीण आहे, हेदेखील तितकंच सत्य आहे.   

दोनशे वर्षांचा तरी इतिहास असलेल्या वर्तमानपत्रासमोर टीव्ही अजून नवा आहे. त्यात उथळपणा आहे. तसं पाहायला गेल्यास तो पौंगडावस्थेतच आहे. त्यामुळे तो कधी सचिन तेंडुलकरच्या मागे तर कधी अण्णा हजारेंच्याही मागे भुरळ घातल्यासारखा जातो. एवढंच नाही तर रामदेव बाबा आणि आर. आर. पाटीलही टीव्ही मीडियाला मोहवून टाकतात. पण हाच टीव्ही उलटला की मग रामदेव बाबांनाच आपण काल क्रांतीचा अग्रदूत बनवला होता हे सहज विसरून जातो. तो आहे त्या स्थितीत त्याला जमेल तितकं सत्य उकरायला मागेपुढे पाहत नाही. आज अण्णा हजारेंच्या पाठिशी कोणताही राजकीय पक्ष नाही. तरीही हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळीकडे याचं लोण पसरतं. याचं एक मोठं कारण टीव्हीवरच्या बातम्या हे आहेच.

म्हणूनच तर देशाचे गृहमंत्री पी. चिदंबरम अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनासाठी मीडियाला जबाबदार ठरवत आहेत. हे लोकांचं नाही तर मीडियाने चालवलेलं आंदोलन आहे, असं ते म्हणताहेत. ब-याच अंशी हे खरंही आहे. एप्रिल महिन्यात दिल्लीच्या जंतरमंतरमधे अण्णांचं उपोषण झालं होतं. त्यानंतर टीव्हीवाल्यांनी अण्णांना विचारलं होतं की तुम्ही आता जनलोकपालचा संदेश घेऊन गावोगाव जाणार का? त्यावर अण्णांचं उत्तर होतं की माझं म्हणणं मीडिया पोहोचवतेच आहे. अण्णांचं आंदोलन मीडियावर अवलंबून आहेच. विशेषतः टीव्हीवर. जर टीव्हीवर चोवीस तास अण्णापुराण चाललं नसतं तर खरंच एवढी गर्दी झाली असती का, हा प्रश्न आहेच. पण ते फक्त मीडियाचं आंदोलन नाही, हेदेखील तेवढंच खरं आहे. लोकांच्या मनातील भ्रष्टाचारविरोधातल्या ठिणगीला अण्णांनी हवा दिली आहे. आतापर्यंत टीव्हीवरच्या बातम्यांना उथळ, चमचमीत आणि गुळगुळीत म्हणणारेच तिच्यातून पेटणारा वणवा बघत आहेत.

आणि यात मीडियाचं चुकलंय तरी काय? त्यांनी मनीष तिवारी नावाच्या काँग्रेसच्या बिनडोक पोपटाने केलेली अण्णांवरची टीका दाखवली, हे चुकलं? अण्णा आणि त्यांच्या टीमने मांडलेली जन लोकपाल विधेयकाविषयी भूमिका लोकांपर्यंत पोहचवली, हे चुकलं? गावागावात अण्णांना समर्थन मिळतंय, ते धावपळ करून दाखवलं, हे चुकलं? लोकसभेत या विषयावर जी चर्चा केली तीही दाखवली आणि अण्णांची धरपकड करण्यातला सरकारचा उत्साहही दाखवला. सांगा यात काय चुकलं? त्यामुळे ही आंदोलनं मीडियाने घडवलेली असतील. तर असो द्यावीत. ती मीडियाने घडवायलाच पाहिजेत. आणि हे खरं मानलं तर मीडियाला दोष द्यायचा तो फक्त यासाठीच की त्यांनी आतापर्यंत अशी आंदोलनं का घडवली नाहीत

No comments:

Post a Comment