Wednesday 8 February 2012

एक साधीशी समस्या


जवळपास तीन महिने झाले याआधीचा ब्लॉग लिहून. काम नवीन आहे. त्यात नेहमीप्रमाणे बुडालोय. काय काय नवीन प्रयोग सुरू आहेत. मजा येतेय. त्यात ब्लॉग लिहिणं राहून गेलंय. गेले दोनेक महिने तरी सतत कुणा ओळखी अनोळखी मित्रांचे मेल, मॅसेज सुरू आहेत. बरेच दिवस काही लिहिलं नाही. काही मित्र भेटल्यावरही सांगतात. गेल्या चारपाच दिवसात हे अतीच झालं. रोज दिवसातून तीनचारदा कुणी ना कुणी ब्लॉगची आठवण करून देतोय. म्हटलं आता आळस खूप झाला. ब्लॉग टाकायलाच हवा.


२८ जानेवारीच्या संध्याकाळी माहीमला एक घटना घडली. सार्वजनिक संडासातून बाहेर यायला वेळ लागला म्हणून एकाचा खून झाला. २९ला बातम्याही छापून आल्या. मी हादरलो. सार्वजनिक संडास काय असतात हे मुंबईतल्या साठ सत्तर टक्के लोकांनी अनुभवलेली गोष्ट आहे. मीही त्यातलाच एक. यापूर्वीही याच विषयावर शी या नावाने मटात मी लेख लिहिला होता. त्याचा पूनर्जन्म हगायचं आणि जगायचं या ब्लॉगच्या रूपाने झालेला आहे.



नवशक्तित दर रविवारच्या ऐसी अक्षरे रसिके या पुरवणीत माझा कॉलम सुरू झालाय. त्यात हा लेख छापून आलाय. बघा वाचून. नेहमीप्रमाणेच कटपेस्ट.


गेल्या शनिवारचीच गोष्ट. माहीममधली कॉजवे झोपडपट्टी. मधु मंगेश कर्णिकांच्या `माहीमची खाडी’ म्हणून आपण ओळखतो त्याच झोपडपट्टीचा हा पुढचा भाग. संध्याकाळचे सात- आठ वाजले असतील. एकाला एक लागून असलेल्या घरांमधून कुठे कुकरच्या शिटय़ा ऐकू येत असतील. कुठे संध्याकाळच्या पुजेची घंटी. अशावेळेस संतोष करगुटकर गल्लीमधून धावपळ करत हातातलं टमरेल घेऊन सार्वजनिक संडासात पोहोचले असतील. चाळीस वर्षांचा घरदार असलेला हा माणूस कुरियर कंपनीत काम करायचा. दिवसभर धावाधाव करून वेळ मिळाला असेल न असेल. कळ आलेली असेल. पण संडासाचा दरवाजा बंदच. ठोठावल्यानंतरही बराच वेळ उत्तर नाही. आत बसलेला माणूस बराच वेळ बाहेर येत नाही. वैताग सुरू असेल. पण काहीच करता येत नसेल.


बराच वेळ वाट पाहिल्यावर सिमोन लिंगेरी बाहेर आला असेल. वय वर्षं २६. चिडलेले करगुटकर वचकन ओरडले असतील. सिमोनने लगेच उत्तर दिलं असेल. त्याचं तरी काय चुकलं होतं? बाचाबाची वाढत राहिली असेल. शिवीगाळ झाली असेल. एकमेकांच्या आयाबहिणींचा उद्धार झाला असेल. त्यातून हाणामारीला सुरुवात झाली असेल. पोलिस सांगतात त्यानुसार आधी हात करगुटकरांनी उचलला होता. मारामारीत ते लिंगेरीला भारीच होते. त्यांचा फटका लिंगेरीच्या डोक्यावर कुठल्या तरी नाजूक भागावरच बसला. तो तिथल्या तिथे कळवळत कोलमडला असेल. बेशुद्ध झालेल्या लिंगेरीला लगेच जवळच्या भाभा हॉस्पिटलमधे हलवण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तो मेलेला असल्याचं घोषित केलं. घटनेला साक्षीदार असलेल्यांची दखल घेत पोलिसांनी करगुटकरला काही तासांतच ताब्यात घेतलं.


झालेली घटना खरीच आहे. पेपरात छापून आलेल्या बातम्या, पोलिसांनी दिलेली माहिती आणि स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी यावरून या घटनेत काय झालं असेल याचा बांधलेला हा अंदाज आहे. पण खरं तर असा अंदाज बांधायची फार गरज नाहीच. मुंबईतल्या कोणत्याही गच्च झोपडपट्टीत डोकावून बघितलं तर सार्वजनिक संडासांमधे अशी हमरीतुमरी सहज दिसू शकते. या दोघांच्या मोहल्ल्यात म्हणजे माहीम कॉजवे झोपडपट्टीतल्या चाळीत राहणा-या राजेश पासवान नावाच्या विद्यार्थ्याचं वक्तव्य एका पेपरात छापून आलं आहे. `आमच्या भागात शौचालयांची व्यवस्था जवळपास नाहीच. अशावेळेस मूलभूत गरजा भागल्या नाहीत की एखाद्याचं तारताम्य विस्कटू शकतं. तसंच झालं आणि दोन आयुष्य कायमची उद्ध्वस्त झाली. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यायला हवं.’ पण खरंच कोण लक्ष देणार आहे का? कुणी याला समस्या मानणार आहे का?


मुंबईत अर्ध्याहून अधिक माणसं झोपडपट्टीत राहतात. आता त्यातल्या अनेक झोपडय़ांना एसआरए योजनांमुळे उंच वाढण्याची स्वप्नं दिसत आहेत. काही उंच झाल्याही आहेत. पण अगदीच गेल्या पाच दहा वर्षांत उभ्या राहिलेल्या झोपडपट्टय़ा सोडल्या तर बाकीच्या आता पूर्वीसारख्या गलिच्छ राहिलेल्या नाहीत. लांबून तिथे गजगज दिसली तरी आत ब-यापैकी स्वच्छता दिसू लागली आहे. झोपडपट्टीवासियांच्या दुस-या तिस-या पिढय़ा आता मुंबईत आहेत. नव्या पिढय़ा थोडंबहुत शिकल्या आहेत. छोटामोठा नोकरीधंदा मिळवून आहेत. घरात मुलं सुना कमावत्या आहेत. त्यामुळे घराघरात पूर्वीसारखी अगदीच हलाखी दिसत नाही. घरात जागा फार नाही. पण वर माळे चढवलेले आहेत. झोपडय़ामधल्या नव्या पिढय़ा पूर्वी बिल्डिंगांमधे घरं विकत घ्यायच्या. आता महागाईमुळे ते शक्यतेच्या पार पलीकडे गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याच चाळींत झोपडय़ांत नीटनेटकं राहायची तयारी केलेली दिसते. टीव्ही, फ्रीज, बाईक घराघरात दिसतात. नीट लाद्या, टाइल्स, रंग दिसतात. आता गल्ल्यांमधे लादीकरणामुळे पूर्वीसारखा चिखल, घाण दिसत नाही. गटारंही झाकली गेलीत. फक्त नाल्यांशेजारच्या झोपडपट्टयांचं काही झालेलं नाही. नळ तर घराघरांत पोहोचलेत. त्यामुळे सार्वजनिक नळ आणि सार्वजनिक मो-यांमधली भांडणं आता कमी झालीत. रोज सकाळी घंटागाडय़ा चौकात येतात. त्यामुळे पूर्वीसारखा कचरापेटय़ांजवळ साचलेला कचराही नाही. हे सगळं झालं असलं तरी एक गोष्ट होऊ शकलेली नाही आणि होऊ शकतही नाही, ती म्हणजे संडास घरात आलेले नाहीत. ते येतील अशी शक्यताही नाही.


हे फक्त झोपडपट्टय़ांचंच रडगाणं नाही. त्यातल्या फक्त अनधिकृत झोपडपट्टय़ांचंच रडणं नाही तर टॉवरांची मायही व्याली नव्हती तेव्हापासून मुंबईत असणार्या झोपडय़ांची त-हा हीच आहे. तर जुन्या वाडय़ांमधल्या बैठय़ा चाळींचंही गा-हाणं तेच आहे. जुन्या चाळक-यांनाही माळ्यावरच्या कॉमन संडासात जावं लागतं. चाळीस पन्नास वर्षं जुन्या बिल्डिंगांमधेही तसंच होतं. घरात संडास नसणं ही मुंबईतल्या किमान साठ टक्क्यांहून अधिक माणसांची समस्या आहे. एका अभ्यासानुसार मुंबईतल्या झोपडय़ा आणि चाळींसाठी १ लाख २५  हजार ५५  संडासांची गरज आहे. पण आज उपलब्ध आहेत फक्त ८५ हजार संडास. म्हणजेच मुंबईकरांचे हाल होऊ नयेत यासाठी अजून ६० हजार संडास हवे आहेत. पण त्याची कोणाला पडली आहे?


याचा त्रास काय असतो ते घरात संडास असणा-यांना कळणं कठीणच आहे. घरात चार पाहुणे आले असतील तरीही अनेकजण संडासात जात नाहीत. अशावेळेस हातात टमरेल घेऊन सगळ्या दुनियेसमोरून पसराकडे जाणं किती लाजिरवाणं असेल याची कल्पना करता येऊ शकते. पण सवयीनं त्याचं काहीही वाटेनासं होतं. घरात संडास नाही या केवळ एका कारणावरून अनेक चांगल्या मुलांची लग्न होत नाहीत. हा विनोदाचा नाही, तर गंभीर मुद्दा आहे. त्याहीपेक्षा वाईट स्थिती संडास नसलेल्या ज्या घरात म्हातारे कोतारे, आजारी, अपंग, गतिमंद, मतिमंद असतात, तिथे असते. तिथले हाल नाही पाहवत. सार्वजनिक संडासांतल्या गर्दीला कंटाळून उघडय़ावर विधी आटोपणा-यांची संख्या एकूण झोपडपट्टीवाल्यांच्या तुलनेत १५ ते १८ टक्के आहे. उघडय़ावर संडास करणा-यांना पाहून सभ्य जनांच्या डोक्यात तिडीक जाते. पण कुणी ते आनंदाने नाही करत. पूर्वी मुंबईत यासाठी मोकळी मैदानं, झाडंझुडुपं, नाले, बिनकामाचे रेल्वेरूळ होते तरी. आता तेदेखील कमी होत चालले आहेत.


निवडणुका आल्या की मुंबईतल्या समस्यांची चर्चा होते. त्यात मोठमोठय़ा गोष्टी असतात. पण बहुसंख्य मुंबईकरांच्या समस्या खूप साध्या आहेत. एक, प्रेम करायला जागा नाही. दोन, मुलांना अभ्यास करायला जागा नाही आणि तीन, संडास करायला जागा नाही. पण या समस्यांसाठी कुणी मोर्चे काढत नाही. कोणत्या जाहिरनाम्यांमधे याला जागा नसते. म्हणून याला कुणी समस्या म्हणत नाही. तरीही झोपडय़ांमधे डोकावून पाहा. संडास नाहीत किंवा अपुरे आहेत, अशा झोपडपट्टय़ांमधे हा आजही निवडणुकीचा मुद्दा असतोच असतो. आताही माहीम कॉजवेच्या झोपडपट्टीत हाच प्रचाराचा मुद्दा असणार. नव्या सार्वजनिक संडासांची आश्वासनं दिली जात असणार. त्यामुळे आता नवे संडास बांधून मिळतील आणि सिमोन लिंगेरीचं मरण थोडंफार सार्थकी लागेल.

3 comments:

  1. Chaan Ahe lekh...!
    Adyatma madhe lihilela "daag achhe hai" lekh punha vachyacha hota vachayla milel ka?

    ReplyDelete
  2. फारचं छान वर्मावर बोट ठेवणारा लेख

    ReplyDelete