Thursday, 16 February 2012

एल्गार येत आहे

आज महापालिका निवडणुकांचा दिवस. निवडणुका कव्हर करणं हा माझ्यासाठी आनंदाचा भाग होता आणि आहे. आपल्या आसपासचे लोक नेमका काय आणि कसा विचार करतात, ते आपल्याला कळू शकतं का, हे समजून घ्यायला मिळतं. आपण किती जमिनीवर आहोत, त्याचाही ताळा लागतो. याच संदर्भात मी महिनाभरापूर्वी लेख लिहिला होता. तो कटपेस्ट करतोय.




निवडणुका आल्या की त्यातल्या गैरप्रकारांवर आणि लोकशाहीच्या दोषांवर चर्चा होते. सारं बरोबरच असेलही. पण या निवडणुकांमध्ये  जगण्याचं बळ मिळण्याची ताकद असते. निवडणुका घोषित होतात. सगळीकडे एकच धावाधाव सुरू होते. जागावाटपाच्या चर्चा. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. सभा प्रचारयात्रांचा धुरळा. बातम्याच बातम्या. उंच डोंगरात ढगातून चालतात, तसं आम्ही राजकीय बातमीदारी करणारे पत्रकार निवडणुकांतून चालू लागतो. आजुबाजूला बस्स फक्त निवडणुका आणि निवडणुकाच.

***
साल 1999. मी पत्रकारितेत नवानवाच. पहिलीच निवडणूक. भाजप सेना युतीची पाच वर्षांची सत्ता झाली होती. रस्ते, फ्लायओव्हर, एक्स्प्रेसवे. युतीने डोळ्यात भरतील अशी कामं केली होती. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा नवा पक्ष काढून काँग्रेसला हादरा दिला होता. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांत उभी फूट पडणार हे स्पष्ट दिसत होतं. युती आनंदात होती, काँग्रेस राष्ट्रवादीलाच टेन्शन जास्त होतं. अबकी बारी अटलबिहारी म्हणून देशभरात भगव्याची लाट होती. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्र घेण्यात आल्या. एकाच वेळी एकाच बूथमध्ये जाऊन दोन वेगवेगळ्या मतपत्रिकेवर शिक्के मारायचे होते. लोकांनी चमत्कार केला. केंद्रात भाजप सेनेला मतदान केलं. राज्यात मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या नावाने कौल दिला. सेनेने भाजपच्या आणि भाजपने सेनेच्या पायात पाय घालून दोघंही तोंडघशी पडले होते. पण युतीच्या नेत्यांना सत्ता पचलेली नव्हती, तेही दिसत होतं. गावागावात लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे कार्यकर्ते अचानक नेते बनले होते. लोकांनी एका फटक्यात सगळ्यांची मग्रुरी उतरवली होती.
* * *
साल 2002. जम्मू काश्मिरात अनेक वर्षांनी निवडणुका होत होत्या. मी जवळपास पन्नास दिवस निवडणुकीसाठी काश्मीर खोर्यात होतो. ओमर अब्दुल्ला हे अब्दुल्ला खानदानाची तिसरी पिढी पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावत होती. त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे की काश्मीरला दहशतवादाच्या अंधारातून थोडासा उजेडाचा कवडसा दिसत होता. कुणी प्रचारासाठी बाहेर पडेल का अशा शंका होत्या. पण हजारो गोरीपान काश्मिरी माणसं प्रचारसभांना गर्दी करू लागली होती. एखादी सभा असली की माणसं भरून आणणा-या गाडय़ांच्या लांबच लांब रांगा लागायच्या. कधी कुठे सकाळी गोळीबार झालेला असायचा. कुठे काही तासांपूर्वीच हँडग्रेनेड टाकून स्फोट करण्यात आलेला असायचा. तरीही लोक जिवावर उदार होऊन टिच्चून गर्दी करायचेच.

मतदानाचा दिवस आला. बूथ कॅप्चरिंग होऊ नये म्हणून साधेसुधे लोक स्वतः रस्त्यावर उतरले होते. मतमोजणी झाली. गांदरबलमध्ये दिवाळी ईद एकाच दिवशी साजरी झाली. गांदरबल हा अब्दुल्ला घराण्याचा गड. तिन्ही पिढय़ा इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या. देशभर नेहरू गांधी घरण्याचविषयी जितकं आकर्षण. काश्मिरात अब्दुल्ला घराण्याची ऐट त्यापेक्षाही अधिक. हे घराणं तर अनेक ख-याखोटय़ा आख्यायिकांचाच विषय बनलेलं. तरणाबांड ओमर गांदरबलमध्ये निवडणूक लढवत होता. पण आज आक्रित झालं होतं. एका छोटय़ा गावातल्या काझी मोहंमद अफझल नावाच्या एका छोटय़ा शेतक-यानं अब्दुल्लांची मिजास उतरवली होती. ओमर हरला होता. साध्या माणसांच्या मतांमधल्या ताकदीने अद्भूत पराक्रम करून दाखवला होता. लोक जिंकले होते. नेते हरले होते. कालपर्यंत आजादीच्या नावाने रक्त वाहणारे वेगळीच आजादी अनुभवत होते.
* * *
साल 2004. सगळीकडे फिल गुड होतं. इंडिया शायनिंग होती. काँग्रेस एकामागून एक निवडणूक हरत होती. भाजप दिवसेंदिवस फुगत होता. सोनिया गांधी निस्तेज वाटत होत्या. सगळे सर्वेही सांगत होते की काँग्रेस आता पूर्वीसारखी उरली नाही. आता सत्ता पुन्हा आमचीच याविषयी सगळे भाजपवाले निश्चिंत होते. टीव्हीवर अटलजी बोलायचे. रेडियोवर अटलजी बोलायचे. इंटरनेटवर अटलजी बोलायचे. लँडलाईनवर अटलजी बोलायचे. मोबाईलवर अटलजी बोलायचे. प्रमोद महाजनांचा निवडणुक वॉर रूम जणू देशाला चालवत होता. पण झालं सगळंच उलटं पालटं.

मतदानयंत्रांमधून आम आदमीची भाषा बोलणारा अस्थिपंजर झालेला काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. बडे बडे दिग्गज आडवे झाले. उत्तर मुंबईत केंद्रीय मंत्री राम नाईकांना गोविंदा हरवेल असं कुणी सांगितलं असतं तर त्याला वेडय़ात काढण्यात आलं असतं. त्याहीपेक्षा जबरदस्तीने मैदानात उरवलेले एकनाथ गायकवाड लोकसभेचे अध्यक्ष बनून करियरच्या सर्वाधिक उंचीवर असणा-या मनोहर जोशींना हरवतील, अशी शंकाही कुणाला आली नव्हती. पण भलभल्या राजकीय अभ्यासकांना कळत नाही ते साध्या मतदाराला कळत असतं. तो बरोबर माज उतरवतो. नाहीतर इतक्या वर्षांचा राजकारणाचा अनुभव असणारे राम नाईक मतमोजणीच्या दिवशी गोरेगावात आपल्या घरी ढोलताशे, मिठायांची तयारी करून बसले नसते. मनोहर जोशी राष्ट्रपती उपराष्ट्रपतीपदाची स्वप्न पाहत बसले नसते. जमिनीशी नातं उरलं नाही की पाठ जमिनीला लागतेच लागते.
* * *
गेली 2007 सालची मुंबई महापालिकेची निवडणूक. नारायण राणेंचं बंड झालेलं. उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रत्येक आरोपाला टाळ्या आणि शिटय़ा वाजायच्या. तुफान गर्दीत सभा पार पडायच्या. त्यात राज ठाकरेंचं बंड झालं. बडव्यांच्या विरोधात विठ्ठलाच्या या भक्ताला शिवसेनेचे नेहमीचेच वारकरी डोक्यावर घेऊन नाचत होते. शिवाजी पार्कवरची अवाढव्य सभा. जीन्सवाला शेतकरी. ब्ल्यू प्रिंट. वगैरे वगैरे. तरुण मनसेवर फिदा होता. त्यांची पहिलीच निवडणूक. महापालिकेचं ओळखीचं रणमैदान. शिवसेना हतबल दिसत होती. शांतपणे प्रचार सुरू होता. पण टीव्ही किंवा पेपरवाले त्यांचं फार मनावर घेत नव्हते. विधानसभा निवडणुकांत फारसं काही हाती लागलेलं नव्हतं. पण आक्रीत झालं. मराठी माणूस भडकला, भगवा झेंडा फडकला. आश्चर्य, युतीची सत्ता पुन्हा आली.
* * *
साधा मतदार कधी काय करेल कुणीही सांगू शकत नाही. तो त्याला योग्य वाटतं ते करत असतो. कोणी म्हणतं त्याला काय कळतं? कुणी सांगत सगळे विकलेले आहेत. शंभर शंभर रुपयांत मतं विकली जातात. कोणाला खात्री असते या साध्या भोळ्या लोकांना काय डोकं नाही. पण  तोच साधा मतदार सगळ्यांना पुरून उरतो. त्या त्या काळाला योग्य असा निकाल तो आपल्या पोतडीतून काढून देतो. त्याला कुणी सांगायची गरज नसते. मीडियावाले आपल्याला सगळं कळतं अशा आविर्भावात फिरत असतात. तो त्यांचं ऐकतो आणि मग गालातल्या गालात हसत स्वतःला हवं तेच करतो. जगात क्रांती करण्यासाठी रक्त वाहावं लागतं. भारतात झोपडीत राहणारा साधा माणूस प्रत्येक निवडणुकीत आपल्या मतदानातून क्रांती करत असतो. हुकुमशाही हवी म्हणून हुरळणारे खूप आहेत. पण हुकुमशाही झाल्यावर काय होतं ते फक्त शेजारी पाकिस्तानात एकदा डोकावलं की सारं समजतं. त्यामुळे प्रत्येक निवडणूक साध्या माणसांच्या ताकदीची ओळख करून देते. ती ताकद खूप ऊब देणारी असते. उमेदीने जगण्याचं एक पाऊल निवडणुकीत पुढे पडत असतं. निवडणुकांच्या लोकशाहीच्या दोषांची चर्चा खूप होते. ती खूप करताही येते. पण जाऊदे. त्यात कशाला पडायच?  सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर दांभिकांचा गांडू जमाव नाही. प्रत्येक निवडणुकीत हा एल्गार असतो. आता निवडणुका आल्यात. शोधायला हवा तो.

1 comment: