Wednesday 15 February 2012

गझलनवाझ


गेल्या महिन्यात गोव्यात अखिल भारतीय गझल संमेलन पार पडलं. हे सहावं संमेलन. याआधीची पाचही माझी चुकली होती. त्यामुळे काही झालं तरी हे चुकवायचं नाही ठरलं होतं. म्हणून गेलोच. समृद्ध होण्याचे अनेक क्षण अनुभवले. त्या रविवारची आमची नवशक्तिची पुरवणी आम्ही गझल संमेलन विशेषांकच केला होता. त्यात माझ्या कॉलमात मी गझलनवाज भीमराव पांचाळेंवर लेख लिहिला होता. तो कटपेस्ट करतोय.


गेल्या वर्षी गुढीपाडव्याला गझलनवाज भीमराव पांचाळेंच्या साठीचा कार्यक्रम झाला. प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात त्यांची सहा तासांची मैफल झाली. दादरच्या आयडियल बुक डेपोत त्याचे पास मिळणार होते. लांबच लांब रांग लागली. अर्ध्या तासात पास संपले. त्यात एक जण रक्ताने माखलेला उभा होता. कपाळावर खोक पडलेली. हात सुजलेला. अंगभर खरचटलेलं. कपडे खराब. `काय झालं’, आयडियलच्या मंदार नेरुरकरांनी विचारलं. `इथेच यायला निघालो. गाडीनं उडवलं. दवाखान्यात जाणार आहे. पण त्यापेक्षा पास जास्त महत्त्वाचा,’ उत्तर आलं.


प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी रवींद्र नाटय़मंदिराबाहेरही अशीच लांब रांग. त्यात एक माजी आयएएस ऑफिसरही सहकुटुंब उभे. आयोजकांना कळलं. त्यांना खुर्ची मिळाली. पण हे सगळ्यांच्या नशिबी नव्हतं. कारण हॉल खचाखच भरला होता. सिटांच्या मधल्या भागात पायर्याही हाऊसफुल्ल. अनेक मान्यवर खाली जाजमावरच बसलेले. तिथूनच जोरदार दाद दिली जात होती. फर्मायशी होत होत्या.


भीमरावांचा चाहता असाच आहे. तो फॅन्स क्लब काढत नाही. बोंबाबोंब करत नाही. खुद्द भीमरावांनाही तो चाहता असल्याचं कळत नाही. परवा नाताळाच्या दिवशी भीमरावांना अटलबिहारी वाजपेयींच्या नावे दिला जाणारा अटल पुरस्कार वांद्रय़ात देण्यात आला. मुंबईतल्या हिंदी भाषक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांच्या गर्दीत बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्टेजवर बसलेल्या भाजपच्या मराठी अमराठी नेत्यांच्या फर्मायशी होत्या म्हणून भीमरावांनी उत्तरादाखल दोन गझला गुणगुणल्याही. कोणत्याही साथसंगतीशिवाय सहज समा बांधला. शेवटी शत्रुघ्न सिन्हा उभे राहिले. त्यांनी बॉम्बच टाकला. मी भीमरावांच्या गझला अनेकदा ऐकल्या आहेत, हे त्यांनी गझलांची उदाहरणं देऊन सांगितलं. सगळे श्रोते आश्चर्यचकीत झाले.


राष्ट्रपती प्रतिभा पाटील, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचं अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ अशी आज सत्तेच्या शिखरावर असलेली सगळी मराठी माणसं एका कलावंताची बेहद्द फॅन आहेत, ते म्हणजे भीमराव पांचाळे. यापैकी एकाही नेत्याचं प्रेम असेल तर कलावंत हवेत चालू लागतात, याचे कितीतरी अनुभव. पण भीमराव कायम जमिनीवर. एकदम साधे आणि नम्र. बोलायला येणार्या प्रत्येकाला तेवढाच आदर देणार. तो मग कुणीही असो आणि कितीही फाटका असो. ही त्यांच्यातल्या कलाकराची ताकद आणि चांगल्या माणसाचीही. म्हणूनच तर त्यांच्या उमेदीच्या काळात पु. ल. देशपांडेंसारखं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व त्यांच्या पाठिशी ठाम उभं राहिलं त्यांना मानाची व्यासपीठं मिळवून देण्यात पुलंनी पुढाकार घेतला. त्याहून आश्चर्य म्हणजे त्यांच्या दोन मैफिलींना निवेदन केलं. व.पु. काळेंनी भीमरावांना एक पत्र लिहिलंय, `एका अत्यंत एकाकी आणि उदास संध्याकाळी तुमचं प्रसन्न गाणं ऐकायला मिळालं आणि उदासीनतेतही उत्सव साजरा करायला शिकलो.’ `या गझलकारांचा मला हेवा वाटतो, की मी असे शब्द लिहू शकत नाही जे भीमरावांच्या गळ्यातून गायले जातील,’ ही शाबासकीची थाप आहे, शं.ना. नवरे यांची. भीमरावांचे असे अनेक मान्यवर चाहते. त्याची यादी सिनेतार्यांपासून सरकारी अधिकार्यांपर्यंत कितीतरी मोठी. पण त्याचा कधीच बभ्रा नाही.


भीमरावजींच्या स्वतःच्या जगण्याचा संघर्ष खूप मोठा आहे. गावकुसाबाहेर अशिक्षित आईबापाच्या झोपडीत जन्म. शिक्षणासाठी वणवण. घरगडय़ाचंही काम. शून्यातून उभं केलेलं विश्व. अंगावर शहारे यावेत अशा अनेकानेक अडचणींचे डोंगर. पण तरीही चेहर्यावर कधीही आठी किंवा सुरकुती नाही. फक्त निर्व्याज आनंद. कारण त्या वेदनेला भिडण्याची ताकद जगण्याने दिलीय आणि गझलेनेही. गझलेत वेदनांची आर्तता आणि जगण्यातला नितळपणा पुरेपूर उतरलेला. जगणं, वेदना आणि गझल इथे वेगवेगळी करून नाहीच बघता येत. मग सगळ्यांना ते जगणं, ती वेदना आणि ती गझल आपली वाटू लागते. म्हणून तर आपण नावंही न ऐकलेल्या गावागावात त्यांचे फक्त चाहतेच नसतात तर तिथे त्यांचे अनेक एकलव्य गझला लिहित असतात. त्यांची एकच इच्छा असते, भीमरावांनी आपली गझल गायला हवी. म्हणून तर यवतमाळातल्या सवना या छोटय़ाशा गावातला दारोदार फिरून बांगडय़ा विकणारा आबेद शेख लिहून जातो, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे हे ध्येय काय आहे, थांबायचे बहाणे तर वर्ध्याच्या छोटय़ाशा शेतकरी घरातला गणेश धामोडकर आपल्या जगण्यातला विरोधाभास सहजपणे मांडताना म्हणतो, बांधतो येथे बुटाचे बंद मी फाटक्या चपलेत आई चालली मुंबईतल्या एका हॉटेलात ग्लासं विसळणारा दीपक अंगेवार मोठय़ा ताकदीने आपल्या दुःखाला भिडतो आणि नव्या पिढीतला उत्तम गझलकार म्हणून पुढे येतो. अशी गावोगावच्या मराठी शायरांची यादी तीनशेहून अधिक झालीय.


हे भीमरावांचं मोठं योगदान आहे. कवितेची एक विधा ही चळवळ होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिलंय. साध्या साध्या माणसांनी आपलं दुःख मांडायला व्यासपीठ मिळतंय ही वाटते तितकी छोटी गोष्ट नाही. आणि तीदेखील अशा माणसांना ज्यांना व्यक्त व्हायला दुसरी हक्काची जागाच नाही. स्टार माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणूनच नेहमी म्हणतात, भीमरावांइतकी चाहत्यांची आणि अनुयायांची मोठी संख्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात कुणाकडेही नसेल. त्यात अतिशयोक्ती कुठेच नाही. भीमरावांच्या मैफिलींना पंचवीस वर्षं झाली, तेव्हा कार्यक्रमात माजी मंत्री दादासाहेब रुपवते म्हणाले होते, की भीमराव कुलकर्णी किंवा देशपांडे असता तर जगाने डोक्यावर उचलून घेतलं असतं. दादासाहेब म्हणाले ते शंभर टक्के खरंच. पण भीमराव अशा सगळ्या वाटण्याच्या पलीकडे गेले आहेत. गझलेनं त्यांना खूप मोठं करून ठेवलंय. पण सामाजिक भान एका पैशानेही चुकलेलं नाही. त्यामुळेच हात आकाशाला गवसणी घालत असले 

No comments:

Post a Comment