Wednesday 8 February 2012

पुन्हा पुन्हा 'राडा'


मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर. त्यांचा अचानक फोन आला. सोबत शब्द प्रकाशनचे येशू पाटील होते. शब्द समग्र भाऊ पाध्ये काढताहेत. मी येशू पाटलांना सांगितलं याचा सगळ्यात जास्त आनंद सचिनला होईल. म्हणून फोन लावून दिल. बोला त्यांच्याशी... मी बोललो. मला खूप आनंद झाला. पार्टी करावी. पेढे वाटावेत. आनंद साजरा करावा असं वाटलं.

समग्रमधलं पहिलं पुस्तक राडा आल्याचं कळलं. एका रविवार पुरवणीत राडाच्या दुस-या आवृत्तीतली नेमाडेंची प्रस्तावना छापून आली होती. पुस्तक विकत घेतलं. पुन्हा वाचून काढलं. दोन बैठकीत अधाशासारखं वाचून काढलं. याआधीही कितीदातरी असंच अधाशासारखं वाचून काढलंय. त्यावर लिहिलं. माझ्या आठव़ड्याच्या कॉलमात.

एक राजकीय बातमीदार म्हणून शिवसेना हा माझ्या आवडीचा विषय. मी त्यावरचं बरंच वाचून काढलंय. मराठी, इंग्लिश, हिंदीतली सेनेवरची जवळपास सगळीच पुस्तकं वाचलीत. त्यात राडा मला सरस वाटते. त्याचा विषय शिवसेना नाही तरीही. ती एक राजकीय कादंबरी आहे, असं मला वाटतं. त्यादृष्टीने एक त्याकाळाचा दस्तावेज म्हणून राडा खूपच मोठी आहे. सगळ्यांनी वाचायलाच पायजे.

नवी आवृत्ती आली. म्हणून माझ्याच सांगण्यावरून माझ्या एका मित्राने राडा विकत घेतली. वाचली. त्याचा फोन आला. अरे राडा वाचली रे. ताप आलाय दोन दिवस. तो हसला. मीही हसलो मनापासून. राडा ताप देतेच. त्यावर लिहिलंय. त्यावर लिहिण्याची माझी औकात नाही. तरीही लिहिलंय. मनापासून. राडाचा एक फॅन म्हणून.


भाऊ पाध्ये. अशोक शहाणे. तुळसी परब. वसंत दत्तात्रेय गुर्जर. हे सगळे लेखक खरे. पण ही नावं शाळेच्या पुस्तकांमधे नसतात कधीच. आणि शाळेनंतर मराठी पुस्तकांशी संबंध येतो कितीजणांचा? शिवाय त्यांच्यावर फार कुणी भाषणं करत नाही. त्यांना किंवा त्यांच्या नावाने कुणी पुरस्कार देण्याच्या भानगडीतही पडत नाही. त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत नाहीत. त्यांच्यावर पुस्तकं लिहिणं, छापणं तर दूरच. असं करायला दोघाचौघांना एकत्र यावं लागतं. संस्था बिंस्था बांधाव्या लागतात. यांच्यासाठी ते कोण करणार? त्यावर एक उपाय आलाय. इंटरनेट नावाचा. इथे एखादा सोंडक्याही आपल्याला हवे ते उपद्व्याप करू शकतो. त्यामुळेच या चौघांवरही उत्तम ब्लॉग बनवलेले आहेत. या चार लिटल मॅगझिनवाल्यांसोबत श्री. दा. पानवलकर आणि कमल देसाई या वेगळ्या वाटेवरच्या दोघांवरही ब्लॉग आहेत. त्यात त्यांच्याविषयीचे लेख, मुलाखती, त्यांचे स्वतःचे भूमिका मांडणारे लेख, फोटो, साहित्याची यादी, पुस्तकांची कवर असं भरपूर. हे कुणी केलंय ते कळत नाही. फक्त पोस्टखाली अपलोड करणा-याचं नाव अवधूत दिसतं तेवढंच. या निर्गुण अवधुताला सलामच. कुणाकुणाच्या फाल्तू चारोळ्या आणि जोक नावावर खपवण्यासाठी धावपळ असते इथे. अशा श्रेयासाठी वखवखलेल्या वर्च्युअल दुनियेत ही कमालच.

भाऊ पाध्ये या अवधूतचं पहिलं प्रेम असावं. तोच ब्लॉग सगळ्यात आधी बनवलेला असावासा वाटतोय. त्यात एक फोटो आहे. देविदास बागूल यांनी काढलेला आणि `रुची’त आधी छापून आलेला. लांबलचक मिशीतला भाऊ खुर्चीत रेलून बसलाय. हातात जुन्या जमान्यातला काळा फोन. पाय मस्तपैकी टेबलावर ठेवलेले. त्यामुळे पायातली प्लास्टिकची चप्पल चेह-यापेक्षा ठसठशीत दिसणारी. आनंदाची गोष्ट ही की हा फोटो `नवशक्ति’च्या ऑफिसात काढलेला आहे. भाऊ `नवशक्ति’त अकरा वर्षं कामाला होता. पु. रा. बेहेरे संपादक असताना त्यांनी भाऊला स्वतः बोलावून नोकरीवर ठेवलं. त्याच्यासारख्या फटिंग माणसाला इतकी वर्षं सांभाळलं. फारच मोठी गोष्ट. इथेच भाऊने सिनेमा बीट सांभाळलं. हिंदी सिनेमांवर, त्याच्यातल्या नटनटय़ांवर भरपूर लिहिलं. `सजती हैं यूं ही महफिल’ नावाचं पुस्तक आणि जुन्या लायब्र-यांमधली त्याच्या `झूम’ मासिकाची जीर्ण पानं आजही त्याची साक्ष आहेत. बाकी आज रोज आपण मराठीत सिनेमावरचं चवीचवीनं वाचतो. ते सगळं भाऊच्या लिखाणाची पाचवी सहावी कॉर्बन कॉपी करणारं.

आता भाऊ नाही. त्याने हे जग सोडलेल्यालाही वर्षं उलटून गेली. त्यापूर्वी खूप आधीच त्याने `नवशक्ति’ सोडलं होतं. तो होता तेव्हा `नवशक्ति’चं ऑफिस कसं असेल? तो कुठे बसत असेल? कुठे बसून लिहित असेल? खूप शोधलं. पण कुणालाच सांगता येत नाही. आता सगळंच बदललंय. का शोधलं? माहीत नाही. तो कुठे बसायचा वगैरे गोष्टी फारच झूट आहेत. त्याचा शोध कसला घ्यायचा? शोध भाऊचाच घ्यायला पायजे. त्यालाच शोधावं लागतं. कारण नाहीच भेटत त्याच्यासारखा दुसरा. नंतरही आणि आधीही. त्याचं लिखाणही शोधावंच लागतं. एखाद्या दर्दी वाचकाच्या कपाटात. लायब्र-यांमधेही तो अख्खा सापडत नाही. एखाद दुसरं पुस्तक कसबसं. तसं `लोकवाङ्मय’ने त्याच्या निवडक कथा आणल्यात. दि. पु. चित्रेंनी त्याचं संपादन केलंय. ते बाजारात आहे आणि `वासूनाका’चंही नवं प्रिटिंग `पॉप्युलर’ने आणलं आहे. बस्स परवापर्यंत बे दुणे दोन पुढे यादी जात नव्हती. त्यात नुकतीच `राडा’ची भर पडलीय. `शब्द’ प्रकाशननं त्याची तिसरी आवृत्ती आणलीय. त्यांचं सगळं साहित्य आणण्याची जाहिरातही केलीय. व्वा क्या बात हैं!

भाऊ एका ठिकाणी म्हणतो त्याची `वणवा’ कादंबरी सगळ्यात चांगली आहे. पण सालं `राडा’ला पर्याय नाही. भाऊ `राडा’ला एका बेछूट तरुणाची कहाणी म्हणतो. महानगरीय औद्योगिक जगात नैसर्गिकता हरवून बसलेल्या तरुण माणसाची लघुकादंबरी, असं भालचंद्र नेमाडे त्याचं वर्णन करतात. भाषा, शैली आणि मांडणी म्हणून `राडा’ मोठीच आहे. भाऊ कादंबरी लिहितच नाही. तो आपल्याला सिनेमाच दाखवतो. कोणताही आव न आणता तो तुमच्या आमच्या जगण्यातले शब्द सहजी वापरतो. तुमच्या आमच्या जगण्यात भेटणारी माणसं तो डोळ्यासमोर उभी करतो. त्यातला सेक्स मराठी साहित्याचं सोवळं बेडरपणे बिघडवतो. त्यातली गोष्टही हादरवून टाकते. आजही तितकीच मनाला भावते.

हे सगळं असलं तरी `राडा’ ही अस्सल राजकीय कादंबरी आहे. शिवसेना सुरुवातीच्या दिवसात कशी होती, हे जाणून घ्यायचं असेल तर `राडा’ वाचायलाच लागेल. आजवर शिवसेनेवर कित्येक पुस्तकं आली. पण जे `राडा’त वाचायला मिळतं ते कुठेच नाही. भाऊला इथे इतिहास मांडायचाच नाहीय. त्याला दिसलेली गोष्ट तो मांडत जातो. पण तो त्याच्या लाडक्या मुंबईचा दस्तावेजच तयार करतो. भाऊच्या पुस्तकातून भेटणारी मुंबई बाकी क्वचितच कुठे भेटतो. मुंबई म्हणजे आजही लिहिणा-यांची नजर गिरगाव, दादर, पार्ल्याच्या पुढे जात नाही. अशावेळेस `राडा’ गोरेगावात घडते. समाजवादी, कम्युनिस्ट प्रभावाच्या या उपनगरात शिवसेना कशी आली, कशी वाढली, याचे नानारंगी पदर भाऊ मोठय़ा ताकदीने मांडतो. शिवसेनेच्या सुरुवातीच्या दिवसातले `उपक्रम’ तर यात वाचायला मिळतातच. पण त्याहीपेक्षा साध्या साध्या शिवसैनिकांवरचे प्रभाव इथे भेटतात. साधे शिवसैनिक समाजाच्या कोणत्या स्तरातून आले होते, त्याचीही नेमकी झलक वाचायला मिळते. पण शिवसेनेने समाजवाद्यांची केलेली शिकारही कथेच्या समांतर सापडत राहते.

शिवसेनेचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्वच मान्य नसणा-या पिढीने आणि विचारांच्या लोकांनी `राडा’ वाचली. त्याविषयी लिहिलं. पण आज शिवसेनेचं महत्त्व अधोरेखित झालंय. शिवसेनेने फक्त राजकारणच नाही तर सामाजिक, सांस्कृतिक सगळ्याच बाबतीत आपला चांगलावाईट ठसा उमटवलाय. तीन चार पिढय़ांवर हा प्रभाव शाबूत आहे. दुर्दैवाने हा प्रभाव आपल्या आसपासच्या लिखाणात फारसा भेटत नाही. म्हणून `राडा’ महत्त्वाची आहे. शिवसेनेनेच `राडा’च्या पहिल्या आवृत्तीचा गर्भपात केला होता. त्यातले बाळासाहेबांविषयी, प्रमोद नवलकरांविषयीचे सगळे संदर्भ शिवसैनिकांना पटणारे नव्हतेच. पण आता कदाचित तेव्हाचा आणि आताचा शिवसैनिक आता `राडा’कडे तटस्थपणे बघू शकेल. त्याने `राडा’ वाचायला हवी.

फक्त शिवसैनिकांनीच नाही तर सगळ्यांनीच `राडा’ वाचायला हवीय. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आपण सगळेच मनसेचा प्रभाव आपल्यावर करून घ्यायला लागलोय. शिवसेनेचीच ही नवी कॉपी. फक्त वागण्याबोलण्यातली नाही तर सगळीच. आता त्यांची सुरुवातच आहे. ती सुरुवातीच्या शिवसेनेशी ताडून बघायला हवी. आज तो ताळा करायचा तर `राडा’ शिवाय आधाराला काही अस्सल सापडत नाही. शिवसेनेची नवी आवृत्ती आलीय आणि `राडा’चीही. पुढचं काम आपल्या सगळ्यांचं आहे

3 comments:

  1. punha ekda vachun baghto RADA.
    prashant.

    ReplyDelete
  2. अनेक संदर्भ बदलत जातील, पण तरीही भाऊंसारखा लेखक समकालीन राहील, असं वाटतं. आपल्या प्रदेशात, माणसांत, भाषेत भाऊ प्रचंड मिसळून गेलेले होते, हे याचं एक कारण असेल बहुतेक. त्यांनी त्यांना जमत होतं तेवढं केलं, पण आपण त्यांच्यासाठी फार काहीच करू शकलेलो नाही. ठिकाय म्हणा.

    ReplyDelete
  3. छाल सर, तुम्ही होमसिकब्रिगेड सांगितलं होतं. त्यानंतर मी राडापण स्वतःघेऊन वाचलं. अजून बरंच वाचायचं आहे.

    ReplyDelete