Wednesday 9 March 2011

एका पाच वर्षं जुन्या बातमीची बातमी


आज त्याला पाच वर्षं झाली. तो नऊ मार्च मला चांगलाच आठवतोय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या मोठ्या हॉलमधे राज ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स होती. त्यात मनसेचा झेंडा प्रकट झाला आणि नावही. तेव्हा शिवराजसेना वगैरे नाव चर्चेत होती. पण हे गृहनिर्माण सोसायटीसारखं वाटणारं नाव अजब वाटलं होतं. पण पुढे मनसे या त्याच्या तुकड्याने मजा आणली.  

राज ठाकरेंनी नऊचा मुहूर्त पुन्हा पाळला होता. ९ मार्च. त्याआधी आणि त्यानंतरची त्यांची प्रत्येक महत्त्वाची गोष्ट त्यांनी नऊचा मुहूर्त धरून केली. त्यावर मी नऊनिर्माण अशी बातमीही केली होती. ती गाजलीही. त्यातलं एक वाक्य कापण्यात आलं होतं, ते होतं, प्रबोधनकारांच्या नातवाने हे करावं हे आश्चर्यच!


यशवंतरावच्या मंचावर राज ठाकरेंसोबत शिशिर शिंदे होते. त्यांना तिथे बघून धक्काच बसला होता. कारण राज यांच्या घरासमोर पहिली उत्स्फूर्त सभा झाली तेव्हा तेव्हाच्या विद्यार्थी सेनेच्या पोरांनी शिंदेना केलेली धक्काबुक्की पाहिली होती. पोरांनी नंतर सांगितलंही, मारायलाच पायजे, संपर्कप्रमुख असताना आपल्या पोरांना ओळख पण दाखवायचा नाय, वगैरे. हे एवढ्याचसाठी की आज याचा कोणी विचारपण करू शकत नाही. राजकारण बदललं की संदर्भ कसे बदलतात फटाफट.

मी चुकत नसेन तर, तो दिवस २७ नोव्हेंबर होता. कृष्णकुंजसमोर ही गर्दी उसळली होती. राज ठाकरेंच्या प्रत्येक शब्दागणिक तिथला प्रत्येक कार्यकर्ता हेलकावत होता. बडवे आणि विठोबाची ती प्रसिद्ध पंचलाईनही तेव्हाच मारलेली. मी प्रसाद काथेच्या लग्नाला नाशकात जाण्यासाठी निघालेलो तो इथे आलेलो. कपड्यांची बॅगही सोबत हातात होती. प्रसाद आजही शिव्या घालतो तुझ्यामुळे माझ्या लग्नाला कुणी येऊ शकलं नाही.

प्रसाद म्हणतो ते खरंच. राज ठाकरे यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र, ही २७ नोव्हेंबरची मटाची हेडलाईन माझीच होती. आदल्याच दिवशी संदीप प्रधानांनी लोकसत्तेत बातमी दिली होती. मालवणच्या पराभवानंतर राज गटात कशी धुसफूस सुरू आहे याची मस्त बातमी होती. ती बातमी खरीच होती. मालवणची निवडणूक कवर करत असतानाच ही धुसफूस आम्ही सगळ्यांनीच प्रत्यक्ष पाहिली होती. मीही काही दिवस त्याच्या मागावर होतो. पण ठोस काही हाताला लागत नव्हतं. ते संदीपजींच्या बातमीमुळे लागलं. बातमी मिस झाली म्हणून ऑफिसातून चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या होत्या. नेहमीप्रमाणे मंत्रालय परिसरात फिरताना शिवालयात चक्कर टाकली. तिथे राज यांच्या जवळचा एक सेनेचा खंदा वीर तिथे भेटला. तो बरंच काही बोलला. जवळपास दीडदोन तास. तो, मी आणि विठोबा सावंत असे तिघेच होतो. त्याचं बोलणं धक्का देणारं होतं. माझ्यासारख्या त्याच्या दोस्तीखात्यात नसलेल्या पत्रकाराशी असं बोलणं, हे प्रकरण किती टोकाला पोहोचलंय हे दाखवून देणारं होतं. मी त्यावर एक छोटीशी बातमीही फाईल केली. पण प्रकरण त्याच्यापेक्षा मोठं आहे, हे कळत होतं.

रात्री ड्युटी संपवून मी ऑफिसातून घरी जायला निघालोही. वाटेत धक्का. राज ठाकरे शिवसेना सोडणार. राजना फोन केला. तुम्ही शिवसेना सोडणार का, असं विचारलं. ते नाही म्हणाले नाहीत. या विषयावर नंतर बोलू, असं उत्तर आलं. म्हटलं बातमी गावली. तसाच ऑफिसात परत निघालो. डेडलाईन कधीच संपली होती. मुंबईबाहेरची एडिशन गेलेली होती. पण मुंबईच्या एडिशनला बातमी लागली. मुकेश माचकर तेव्हा पहिलं पान लावायचे. इनपुट माझे होते. बातमी जवळपास त्यांनीच लिहिलीय. प्रशांत केण्या पहिल्या पानाच्या डिझाइनवर बसला होता. आम्ही इथे बातमी लिहिपर्यंत स्वतःहून खालच्या बातम्या बाजूला करून, छोट्या करून वर आठ कॉलम जागा केली. राज ठाकरेचा फोटो कटआऊट करून लावला. हेडलाईन दिली, राज ठाकरे यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र! माचकर आणि केण्या दोन्ही जिनियस माणसं. बातमी माझी होती तरी टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार अंबरिष मिश्र, शिवसेनेची बितंबातमी असणारे आमचे संपादक भारतकुमार राऊत आणि तेव्हा तरुण भारतात काम करणारा माझा मित्र अमेय गोगटे यांच्यामुळे ती बातमी माझ्याकडून झाली. माझं श्रेय खूपच कमी त्यात.  

आपण काही एक्स्क्लुझिव बातमी देतोय, ब्रेक करतोयअसं मला वाटतंच नव्हतं. मला वाटलं होतं, सगळ्यांकडेच ही बातमी असणार. कारण टाइम्समधे अंबरिषजींनीही ही बातमी दिली होती. त्यामुळे बायलाईनही दिली नव्हती. रात्री घरी परतायला बक्कळ उशीर झाला होता. फोननेचं उठलो. मटाच्या ऑफिसावर मोर्चा आला होता. मटा अनेक ठिकाणी जाळला जात होता. मटा, टाइम्स सोडून बाकी कुठेच बातमी नव्हती. त्यामुळे बातमी खरी होतेय की नाही, यासाठी पोटात बाकबुक होत होतं. दात घासायच्या आधीच लगेच आपल्या सेनेतल्या सोर्सना फोन केले. तो नुकताच मोर्चा काढून आला होता. त्याने पहिल्यांदाच मला शिवी दिली. तूच बातमी दिली असणार, म्हणून सांगितलं. मी परिस्थिती काय म्हणून विचारलं. तर उत्तर आलं. राज्यभरातून कार्यकर्ते कृष्णकुंजच्या दिशेने निघाल्याचं सांगितलं. आपली बातमी खरी होती. टेन्शन संपलं.

टीवीवर बातम्या सुरू ठेवल्या होत्या. नाश्ता करणं, तयार होणं सुरू होतं. पण फोन कानावरून निघाला नव्हता. तेवढ्यात प्रताप आसबेसाहेबांचा फोन आला. ते इमिजिएट बॉस. कुठे आहेस म्हणून विचारलं. काळजी घे, सांभाळ. फार कुठे बाहेर जाऊ नकोस म्हणून सांगितलं. नेहमी करडा असणारा त्यांचा आवाज अशावेळेस अगदी ओला असायचा. अजून आठवतो तो नेहमी.

आपल्या बातमीने एवढी धावाधाव सुरूय हे बघून होणारा आनंद खूप मोठा होता. घरातून बाहेर निघालो तो नाशिकला जाण्यासाठीच. मी प्रसादच्या लग्नाला नाशिकला जाणार होतो, म्हणून सुटी घेतली होती. बोरिवलीला जावं आणि तिथून बसने नाशिक असा प्लान होता. पण बोरिवलीहून दादरलाच आलो. मुंबई, नाशिक, कोकण, पुणे इथली विद्यार्थी सेना तिथे जमा झाली होती. उभं राहायलाही जागा नव्हती. रात्रभरात पोस्टर तयार होऊन लागले होते.

बाकी पुढचा पाच वर्षांचा इतिहास आहे...

राज ठाकरे यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र!

मुंबई (म. टा. प्रतिनिधी) : मालवण पोटनिवडणुकीतील प्रचारापासूनच विकोपाला गेलेला शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते राज ठाकरे यांच्यातील बेबनाव आता समेटापलीकडे गेला आहे, असे खात्रीलायकरित्या समजते. त्यामुळे आता राज हे शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करतात की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्यावर 'शिस्तभंगाची कारवाई' करतात, एवढाच प्रश्न उरला आहे, असे सेनेच्या वरिष्ठ वर्तुळात मानले जात आहे. 

शिवसेनाप्रमुखांनी मालवणच्या प्रचारसभेत, राज यांच्या अनुपस्थितीत 'राज असो की उद्धव; पक्षहिताआड येणाऱ्याची गय केली जाणार नाही' असे उद्गार काढले होते; त्यांचा 'अन्वयार्थ' आता स्पष्ट होऊ लागला आहे, असे जाणकार मानतात. स्वत: राज यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातील चर्चेत तथ्य आहे का, असे विचारले असता, त्यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत या 'वावडी'चा इन्कार केला नाही. 'या विषयावर नंतर बोलू' एवढेच सांगून त्यांनी फोन कट केला. पुढेही वारंवार संपर्क साधला असता ते 'मीटिंगमध्ये बिझी' होते. 

मालवणातच एका वार्ताहर बैठकीत शिवसेनाप्रमुखांनी, 'आता आपण फक्त सल्ल्यापुरते उरलो असल्याचे' घोषित केले आणि आता उद्धव यांच्यावरच पक्षाची सर्व जबाबदारी सोपवत असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानंतर राज यांच्या गोटात कमालीची नाराजी पसरली होती. शिवसेनेची पिछेहाट ही उद्धव यांच्या निष्प्रभ नेतृत्त्वाचीच परिणती असल्याचे सेनेचे जहाल वीर मानत होते. एवढे सगळे होऊनही राजसाहेब उसळून का उठत नाहीत, असा त्यांचा सवाल होता. आता त्याला उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शिवसेनाप्रमुखांनी उद्धव आणि राज यांच्यात दिलजमाईचे अनेक प्रयत्न केले होते. ते सर्व प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळासाहेबांच्या मालवणातील सभेत पाठदुखीचे कारण सांगत राज उपस्थित नव्हते. तेव्हाच अनेक वितर्कांना तोंड फुटले होते. मालवणात दहा दिवस मुक्काम ठोकून प्रचार करू, असे सांगणाऱ्या राज यांनी प्रत्यक्षात मालवणात एकच सभा घेतली आणि ते इतर प्रचारात सहभागी झालेच नाहीत. त्या सभेतही राज यांचा नेहमीचा जोश नव्हता, असे सांगितले जाते. 

राज यांच्या विश्वासातील नेते सांगतात की, शिवसेनाप्रमुखांनी राज यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते कल्याण-डोंबिवलीच्या प्रचारात जोमाने सामील झाले होते. पण निवडणुकीनंतर अपक्ष नगरसेवकांच्या, तसेच महापौर उमेदवार निवडीच्या बैठकांत त्यांना बोलावणे नव्हते. मालवणमधील प्रचाराच्या तयारीतही उद्धव गटाने त्यांना सहभागी केले नाही. रंगशारदा येथील बैठकीतही त्यांना डावलले. यानंतर त्यांनी मालवणात 'जोश' दाखवण्याची अपेक्षा फजूल होती, असे राजसमर्थकांचे म्हणणे आहे.
 

4 comments:

  1. राज ठाकरेंनी आपला स्वतंत्र पक्ष जेंव्हा स्थापन केला तेंव्हांच पुण्य नगरीतील माझ्या ("गांधीगिरी") स्तंभात मी लिहिले होते. ही सेना बळकट बनविण्यासाठीची, सेना वाचविण्यासाठीची राजकीय खेळी आहे. असो! पाण्यात काठ्या मारल्याविना राजकारण आणि ....... चालूच राहू शकत नाही. वाईट फक्त इतकंच वाटतं की या सगळ्या प्रकारात इथला साधा आणि गरजू नागरिक कायम लोंबकाळता रहातो. त्याला आत्मविश्वासच कधी बाळगता येत नाही. पत्रकार म्हणून आपणही कुठेतरी खूप कमी पडतो. वास्तव माहिती असून.

    ReplyDelete
  2. ग्रेट सचिन।। मला आजच समजल कि हि तुजी बातमी होति।। मी नेहामि सर्वना संगयचो मटा ने दिलेली राज ठाकरे शिवसेना सोडणार हि खरया अर्थाने BREAKING NEWS आहे। हि बातमी तु केली होतिस हे ऐकुन खूप आनन्द झाला। उठ सुठ BREAKING NEWS चि शेखी मिरवणा-यानि यापसुन शिकल पाहिजे।
    keep it up.. तुज्या कडून अपेक्षा वाढलया आहेत।शिवसेनेत अजुन खुप् लोक आहेत। पुढचि BREAKING NEWS केव्हा मिलेल...??

    ReplyDelete
  3. phakhachi sagli natak ahe.lok kadhi samjnar mahit nahi........nice

    ReplyDelete