Thursday 10 March 2011

मनसे रे!


काल संध्याकाळपासून आपल्या या ब्लॉगचा टीआरपी तेजीत आहे. ठाकरे या नावाला ती क्रेझ आहेच. म्हणूनच राज ठाकरेंचा नवा पक्ष आला, येणार होता, नवा होता, राडा करत होता. तेव्हा आम्ही मीडियावाल्यांनी त्यात पोटभर हात धुवून घेतले. जणू आकाशातून कुणी देवदूत आलाय आणि तो जग बदलवून टाकणार आहे, अशा थाटात मोठमोठे विचारवंत म्हणवले जाणारे ज्येष्ठ पत्रकार लिहित, बोलत, वावरत होते.

मनसे घडत असताना या सगळ्यात काहीच दम नाहीय, हे माझ्यासाऱख्या छोट्या पत्रकारालाही कळत होतं. तर मोठमोठ्यांना नक्की कळत असणार. तरीही शिसारी येईपर्यंत राज यांचं गुणगाण सुरू होतं. राजसत्ता, राज माझा, राज काळ अशी पेपर आणि चॅनलांची नावं बदलल्यात जमा होती. विशेष म्हणजे मटाची सोनिया टाइम्स आणि जय महाराष्ट्र टाइम्स अशी यापूर्वी हेटाळणी करणारे त्याकाळात शांत होते. उलट लाळघोटेपणा करण्यात आघाडीवर होते. राज शब्दांच्या बुडबुड्यावर स्वप्न विकत आहेत, हे त्या सगळ्यांना निश्चित कळत असणारच. पण तरीही कुणी बोलत नव्हतं, लिहित नव्हतं.

मराठी पेपरांत मनसेच्या विरोधात बातम्या आजही क्वचितच दिसतात. लेख तर अत्यंत दुर्मीळच. विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी म्हणजे दोन वर्षांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या उपद्व्यापांच्या बातम्या एकामागून एक येत होत्या. पण त्यावरही कुणी लिहित नव्हतं. पण राज या गुंड कार्यकर्त्यांचं अप्रत्यक्ष समर्थन करायला उतरले, तेव्हा तरी कुणी लिहिल, असं मला वाटलं. पण तेव्हाही सगळे चूप. मी माझ्या आजुबाजूला बघत होतो. पक्षाचा चेहरा असणारे लोक सुशिक्षित, तरुण, गोरेगोमटे असले, तरी एरियातले सगळे गुंड या नव्या पार्टीत शिरले होते. अशावेळेस त्याविरुद्ध लिहायला हवं असं मला वाटलं. मी लिहिलं.

पण मी लेख लिहिला, त्या आठवड्यात माझ्या कॉलमात हा लेख छापूनच आला नाही. तेव्हा संपादकांनी मला हा लेख छापता येणार नाही म्हणून सांगितलं. मी माझी बाजू सांगितली. यातली एकही गोष्ट अतिशयोक्त नाही, असंही सांगितलं. अशा लेखनातून केस होतात. त्याचा खूप त्रास होतो. आधीच केस खूप झाल्यात, असा युक्तिवाद समोरून झाला. मी वैतागलो होतो. दोन आठवणे फणफणत होतो. मी वारंवार त्यांच्याकडे गेलो. लेख बराच माइल्ड केला. विनंत्या केल्या. तेव्हा कुठे दोन आठवड्याने लेख लागला. पण आता ति-हाईताच्या नजरेतून मागे वळून बघताना वाटतं, त्यांचीही बाजू बरोबर होती. एकतर नव्यानेच संपादकीय जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. पद नाही पण उगाच केसचा त्रास सुरू होता. आपण उगाच राग डोक्यात घालून घेतला होता. होताय.

प्रिंटमधे लेख येत नाही म्हटल्यावर तो मटाच्याच वेबसाईटवर ऑनलाईनही टाकायला दिला. फडके सरांनी लावून घेतला. पेपरात येण्याआधीच दोन आठवडे हा लेख ऑनलाईन दिसला होता. मनसैनिकांनी नेहमीप्रमाणे जोरदार हल्लाही केला होता. लेख पेपरात छापून आल्यावर मला मनसेच्या दोन मोठ्या पदाधिका-याचे फोन आले. त्यांनी फोननंबर शोधून काढला आणि फोन केला. कुणीतरी हे लिहायला हवं होतं, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. मला त्यांच्याबद्दल आदर वाटला. तो आजही कायम आहे. बाकी कुणी थेट उलटसुलट प्रतिक्रिया दिली नाही. पूर्वी मनसेची बातमीदारी करताना दोनदा धमक्या मिळाल्या होत्या. पण तसा काही अनुभव आता आला नाही. वरिष्ठांकडे काही तक्रारी आल्या असतील तरी त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवल्या नव्हत्या. कदाचित मी त्या काळात कुणाचं काही ऐकण्याच्याही मनस्थितीत नसेनही.

या काळात मला विचारले जाणारे दोन प्रश्न. एक. तू मनसेच्याच मागे का लागतोस? माझे काही वैयक्तिक रागलोभ असण्याचं कारणच नव्हतं. तरीही मी आवर्जून मनसेच्या विरोधात लिहिलं आणि पुढेही लिहितच राहणार. शिवसेनेने मराठी माणसांसाठी बरंच काही केलंय. साध्या माणसांमधून नेते कार्यकर्ते घडवलेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण लावलंय. हे सगळं मान्य. पण मी माझ्या वाडीत, चाळींत, घरात शिवसेनेच्या नावावर बरबाद झालेली एक पिढी बघितलीय. जवळून अनुभवलीय. तुम्हीही आठवून पहा. तुम्हालाही असे उदास झालेले दहा बारा चेहरे तरी नक्की आठवतील. त्यामुळे शिवसेना दादागिरीचं वळण सोडून शेतकरी आंदोलन वगैरे करायला लागल्यावर मला खूप बरं वाटलं होतं. शिवाय राज ठाकरेही सुरुवातीच्या काळात ब्ल्यू प्रिंट, नवनिर्माण वगैरे बोलत होते. खूप आनंद होता. पण अचानक काहीही कारण घडलेलं नसताना फक्त आपल्या आणि इतरांच्या राजकारणाच्या सोयीने मनसेवाले भय्यांशी राडे करू लागले. इतिहास पुन्हा तेच गिरवत होता. तेच राडे, तेच केसेस, तीच व्यसनं आणि तीच उद्ध्वस्त झालेली करियर. पुन्हा एकदा एक पिढी स्वप्न बघत, केसेस अंगावर घेत, दादागिरी करत संपणार, हे स्पष्ट दिसत होतं. त्याविरुद्ध लिहिलं नसतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. मला वाटलेलं मी नेहमीच लिहित आलोय. मग ते कोणाविरुद्ध याचा विचार फारसा केला नाही. इतरांवर लिहिणारे खूप होते. मनसेविरोधात कुणीच नाही. म्हणूनही लिहिलं.

नेहमी येणारा दुसरा प्रश्न. तुला भीती वाटत नाही का? खोटं कशाला बोलायचं. असे पंगे घेताना भीती नक्कीच वाटते. आम्हाला काही कळत नाही यातलं, पण जरा सांभाळून लिही, असं आई काळजीच्या सूरात सांगते, तेव्हा आपल्यालाही चिंता वाटतेच. पण हे सगळं लिहिल्यानंतर. लिहिताना मी माझ्याच मस्तीत असतो. तेव्हा मी माझाही विचार करत नाही तर इतरांचा काय करणार? आता ब्लॉगवर किंवा कॉलमवर माझा फोटो असतो. त्यामुळे ठीक. पण पूर्वी एक प्रतिक्रिया नेहमी यायची. तुमचे लेख वाचताना वाटायचात, त्यापेक्षा प्रत्यक्षात खूप वेगळे आहात. मलाही असंच वाटतं, लिहितानाचा मी आणि बाकीचा मी खूप वेगळा आहे. पण बहुतेक यात काही वेगळं नसावं. सगळ्या लिहिणा-यांचाच हा अनुभव असेल.

आता मनसे रे! या हेडिंगविषयी. ते मुकेश माचकरांचं. खरं तर हा लेख छापून आला त्याच्या खूप आधीच ते प्रहारमधे गेले होते. पण त्याच्याही फार आधी त्यांनी मी मटाच्या दिवाळी अंकासाठी मनसेवर लेख लिहावा, असं सूचवलं होतं. त्याचं हे हेडिंग होतं. पण तो विषय पुढे बारगळला आणि लेखही. 

जाऊ दे ते सगळं. लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट केलाय. हा लेख लिहिल्यावर मला खूप आनंद मिळाला होता. तो कुणाची तरी वाजवल्यामुळे मिळाल्याचा तामसिक आनंदही नव्हता. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर.

लेखाचा इण्ट्रोः मनसे नेहमीच चर्चेत असते. पण आजकाल त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपद्व्यापांची चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंसाठी ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे. कारण मराठी माणूस त्यांच्याकडे आस लावून बसलाय. लेख पुढे सुरू.  

मुंबईतल्या म्हाडाच्या कॉलनींसारखाच नाशिकचा सिडको भाग. एक जूनची गोष्ट. मध्यरात्री कोणीतरी चाळीसच्या जवळपास 'टू व्हीलर्स' जाळल्या. काही 'फोर व्हीलर्स'ही. सिडकोवाले हादरले. पोलिसांनी टीपर गँगला पकडलं. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, अण्णाच्या सांगण्यावरून ३५ हजारांच्या मोबदल्यात त्यांनी हे काम केलं. अण्णा म्हणजे सुहास कांदे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष. शिवाय मनसेच्या युनियनचेही पदाधिकारी. पोलिस सांगताहेत, त्यांच्या तडीपारीकडे दुर्लक्ष व्हावं, म्हणून ही जाळपोळ झाली. आता कांदे फरार आहेत. त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिलाय. त्यांना पक्षातून काढलेलं नाही. अजूनही त्यांच्या ऑफिसवर मनसेचा चौरंगी झेंडा फडकतोय.

२३ जुलैची गोष्ट. पोलिसांचं खरं मानलं, तर ज्योत्स्ना खंडागळे नावाच्या बाई आपण महिला आघाडी उपाध्यक्ष असल्याचं सांगत पुण्याच्या भोसरी, चाकण, इंदायणी नगर,मोर्शी भागात शिक्षणसंस्थांना ब्लॅकमेल करत फिरत होत्या. बाबा हरगोविंदसिंग एज्युकेशन सोसायटीने स्टिंग ऑपरेशन करून त्यांना पकडून दिलं. ऑन कॅमेरा पर्दाफाश टीव्हीवर दिसलाही. त्यांनी खंडणी म्हणून मागितलेली रक्कमही डोळे पांढरे करणारी होती. ज्योत्स्नाबाईंची आधीच हकालपट्टी करण्यात आल्याचं पक्षातून सांगण्यात आलं.

या सगळ्यावर वरताण म्हणून, २५ जुलैला अंधेरीत तेरा वर्षांच्या एक गरीब मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. आरोपी पकडले गेले,  गणेश भटकल,  गणेश काळे,  उमेश बोराडे आणि नरेंद्र साळुंखे. पैकी भटकल तर मनसेच्या जनहित कक्षाचे स्थानिक शाखाध्यक्ष. टीव्हीवाल्यांनी दोघांची नावं मनसेच्या होडिर्ंगवर झळकताना दाखवलं. नंतर पक्षप्रवक्त्यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं सांगितलं. पण त्यानंतरच्या गुरुवारी केसची तारीख असताना अंधेरीच्या कोर्टात मनसेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. अगदी आरोपींना गाडीतून घेऊन जाताना टाटा करणं आणि बिस्लेरी देणं वगैरे सोपस्कार करेपर्यंत.

आता ठाण्यात झालेला किस्सा. एका मॉलमधे रेडिमेड उपम्याच्या पॅकमध्ये अळी सापडली. मनसेने मोर्चा काढला. गुन्हा दाखल झाला नाही, तर मोठं आंदोलन करू, असं सांगितलं. त्याला दोन महिने झाले. गुन्हाही दाखल झाला नाही आणि आंदोलनही नाही. मनसेचा एक मोठा नेताच सांगतोय, की मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी मनसेच्या एका नेत्याच्या मुलाने 'होम थिएटर' घरी नेलं.

हे सगळं गेल्या दोनेक महिनाभरातलंच. इतरही उदाहरणं आहेत,  मनसेचे अंधेरीचे विभागाध्यक्ष मनीष धुरी यांच्याविरुद्ध एक्स्टॉर्शनच्या दोन केस. उपाध्यक्ष हाजी अराफतविरुद्ध कुर्ल्यात चोरी आणि मारहाणीची केस वगैरे. बिल्डरांच्या पिंपात उंदीर बरेच मेलेले. आधी राज यांनी आपल्या कामगार युनियनची कार्यकारिणी बरखास्त केली, तेव्हा या बजबजपुरीची अप्रत्यक्ष कबुलीच दिली. नंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी असलेलं संपर्कप्रमुखपद तडकाफडकी रद्द केलं, तेव्हा त्यावर शिक्कामोर्तबच झालं.

हे फक्त मनसेतच असं होत नाही. अन्य पक्षांतही हेच होतं. तिथेही गुन्हेगार आहेतच. त्यांचीही यापेक्षाही मोठी यादी काढता येईल. त्यामुळे फक्त मनसेवर आक्षेप घेण्यात अर्थ नाही, हे खरंच. पण मनसेवर सर्वसामान्य मराठी माणसाचा भरोसा असल्याचं लोकसभा निकालांत कळलंय. आणि या सगळ्यावर पांघरूण घालणारी प्रतिक्रिया राज यांनी दिलीय. त्यावर आक्षेप घ्यायलाच हवा. हे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलाय. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला जाणूनबुजून बदनाम केलं जात आहे, असं ते म्हणताहेत. अंधेरी बलात्कारप्रकरणी ते म्हणाले,  'बलात्कार करा,  असा मी काही पक्षादेश काढलेला नाही. एखाद्या कार्यर्कत्याचे डोकं फिरलं आणि त्याने बलात्कार केला,  तर कुठलाच पक्ष काहीच करू शकत नाही'. सुहास कांदेंचा तर त्यांनी जवळपास बचावच केला. खरंतर त्यांच्याकडून या बदमाशांना फाशीवर चढवा, असं ठाकरेष्टायलीत म्हणणं अपेक्षित होतं. असे कार्यकर्ते सगळ्याच पक्षात असतात,  असं लोकांनी म्हणायचं असतं,  नेत्यांनी नाही.

तुम्ही माझ्यासोबत आहात,  याचा तुमच्या आईवडिलांना अभिमान वाटला पाहिजे,  असं राज सुरुवातीच्या दिवसांत नेहमी म्हणायचे. वरची बटणं बंद ठेवा, लोकांना नम्रपणे भेटा, रोज दोनतरी पेपर वाचा असं प्रबोधन करत ते नवनिर्माणाची गाठ बांधत होते. पण पालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर त्यांनी लोकप्रियतेसाठी शॉर्टकटने जाणं पसंत केलं. इतरांसाठी खड्डा खणण्याच्या घाईतून हा भस्मासूर उभा राहिलाय. फक्त पदाधिकारीच नाही,  तर त्यांचे जवळचे मित्रही लक्तरं काढत दुरावत चाललेत. लोकसभेतल्या मोठ्या यशानंतरही कोणताच ठोस कार्यक्रम नाही, काय करायचं कार्यकर्त्यांनी?

तरीही राज ठाकरेंचा करिश्मा सगळं बदलवून टाकेल. निवडणुकीच्या तोंडावर ते व्यवस्थित पुन्हा चर्चेत येऊ लागतील. त्यांचे दौरे सगळं वातावरण बदलून टाकतील. सुशिक्षित, गोरेगोमटे उमेदवार नम्रपणे लोकांसमोर जातील. आपण मराठी माणसं राज यांच्या नावावर पुन्हा एकदा लॉयल्ट्या विसरून धो धो मतं देऊ. पण पुढच्या अॅडमिशनच्या मोसमात खंडणीचा दर दुप्पट झाला असेल.


5 comments:

  1. sagle phakha ekach ahe.apli hava nirman karatat.baki vikas kahi karat nahi.mansechi blue print kay ahe mahit nahi.raj thakrena pan mahit nahi.phakha kon chalvat ahe.te ki dusaree.

    ReplyDelete
  2. uttam ahe...agdi satya paristhiti....dar veli cha hyanchi natka ani rade...konta kaam shantatene kadhich nahi jamnar asa distay..pan ashwasana nehmich....deshat shantata anu...kuthun annar?

    ReplyDelete
  3. ekdm khr ahe mitra...........
    100% true

    ReplyDelete
  4. sagala manya pan ghadila aamhi aasha-apeksha tari kunavar thevayachya je uplabdha aahe tyatalech bare vaatnaare javal karnaar na, sarvanchi naataka kalataat ho pan tar dekhil hatbalte poti nav-nave paryay ubhe raahatat shevat sarvancha swarth ekach asalyach lakshat yete pan...............karnaar kay.......?

    ReplyDelete
  5. मला लेखच कळला नाही . मनसे मध्ये गुंड आहेत हे सांगयचं असेल तर सर्व पश्यात गुंड आहेत. जे वाईट दाखले दिलेत त्यांना ते करण्यासाठी राजने सांगितले नसणार.जर एखद्या गुंडाला पार्टीत यावयाचे आसेल तर त्याला मनसे कडे application करून ते राज कडून verify करून प्रवेश दिला जात नाही . मी दलित आहे . शिवसेना दलित विरोधक आहे . राज जेव्हा सेनेत होता तेवा तो सुधा दलित विरोधक आसेल . परंतु आज मराठी तरुणांना नोकऱ्या नाहीत . त्यावर परप्रांतीयाचे आक्रमण झाले आहे. त्यांना हठवून मराठी तरुणांना रोजगार मनसे देईल आशी आस त्यांना आहे.यावर कोणीच बोलत नाही कमीत कमी राज तर बोलतो हि तरुणांची भावना आहे.राज जो पर्यंत मराठी टक्का चालेल हे बोलत राहील तो पर्यंत मरठी माणूस मनसे ला साथ देत राहील मग ते कोणाला आवडो या न आवडो. जय महाराष्ट्र.

    ReplyDelete