Thursday, 3 March 2011

इम्प्लिमेण्टिंग मराठी बाणा


एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन. त्यादिवशी माझा मित्र शैलेश निपुणगेचा वाढदिवस असतो. कॉलेजात असताना त्याला जागतिक एड्स दिनाच्या शुभेच्छा असं लिहिलेलं ग्रिटिंग दिलं होतं. त्यामुळे हा एक दिवस सोडला, तर बाकीचे असे जागतिक वगैरे दिनही लक्षात नसतात आणि कुणाच्या वाढदिवसाच्या तारखाही.

आता लग्न झाल्यामुळे बायकोचा, मुलाचा आणि लग्नाचा वाढदिवस वगैरे लक्षात ठेवावा लागतो. बाकी स्वतःचा वाढदिवसही लक्षात नाही, अशीही वर्षं गेली. तारखा किंवा एकूणच आकड्यांशी आपला आकडा तसा छत्तीसचाच. त्यामुळे विशेष दिवसांचं वगैरे कौतूक असायचा प्रश्नच नाही. आता मराठी भाषा दिनाचंही तसंच. मला वाटतं मराठी बाणा जपण्यासाठी आपण कोणत्याही दिवशी थोडसं जरी पाऊल उचललं, तर तो आपल्यासाठी मराठी भाषा दिनच.


महाराष्ट्र दिनानिमित्त दोन वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता. इम्प्लिमेण्टिंग मराठी बाणा म्हणून. नावापासून त्यातल्या मतांपर्यंत काहितरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न होता. नेहमीप्रमाणंची थोडी बंडखोरी होतीच त्यात. खूप चांगला रिस्पॉन्स आला. विशेषतः तरुणांनी आणि नव्या विचारांच्या लोकांनी खूप कौतूक केलं. दिवसभर एसेमेस येत राहिले. कधी नाही ती पोष्टकार्डंही आली. पत्रलेखकांना लेख आवडला होता. पण त्यातले इंग्रजी शब्द वाचून खूप वैतागलेले होते. पण त्यांच्या वैतागाला कशाला भीक घालायला हवी?  मराठीत इंग्रजी येणारच. त्याचा बाऊ कशाला? त्यामुळे काही मराठी बाणा वगैरे जपला जात नाही.

मराठी भाषा दिनानिमित्त, दोन चार दिवस लेट असेल, तरीही लेख कटपेस्ट केलाय. बघा पटतोय का?

यंदाचा महाराष्ट्र दिन खास महत्त्वाचा. आजपासून आपल्या महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू झालं. म्हणजेच आज आपल्या महाराष्ट्राचा पन्नासावं लागलं. आज महाराष्ट्राचा ४९वा वाढदिवस. आपल्या वाढदिवशी संकल्प करतो, तसाच संकल्प महाराष्ट्राच्या वाढदिवसालाही करायला काय हरकत आहे? आणि हा संकल्प मराठी बाणा जपण्याचाच असायला हवा.

मराठी बाणा म्हणजे नेमकं काय? भय्यांच्या टॅक्स्या फोडणं? भगवे टिळे लावणं? की मराठी असल्याचं सांगत दादागिरी करणं? नाही. मग मराठी बाणा म्हणजे नेमकं करायचं तरी काय? मराठी बाण्याचा इतिहास,  विचारधारा,  भवितव्य,  अभ्यास याविषयी बरीच चर्चा यापूर्वीही झालीय. म्हणून आता हा मराठी बाणा प्रत्यक्ष व्यवहारात कसा उतरवायचा, याचा विचार व्हायला हवा. 'मराठी बाण्याचं इम्प्लिमेण्टेशन' बहुधा असं असू शकेल...

न्यूनगंड सोडूया सारे
सगळे परप्रांतीय आपल्या पुढे आहेत, मराठी माणसाला उद्योगधंदेच जमत नाहीत. दिल्लीच्या राजकारणात मराठी माणसाला जागाच नाही. असे अनेक न्यूनगंड आपल्या धुरिणांनी आपल्यात रुजवलेत. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. पण त्याची पॉझिटिव्ह बाजूही मोठी आहे. सचिन तेंडुलकरपासून अनिल काकोडकरांपर्यंत मराठी माणूस जग जिंकतोय. पंजाबराव देशमुखांपासून शरद पवारांपर्यंत दिल्लीतल्या मराठी नेत्यांनी देशासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. गेल्या वर्षी आएएएसमध्ये महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत दुस-या नंबरवर होता. मग अशा गोष्टींचा विचार करून पुढे जायचं, की कुढत बसायचं. हे आपण सगळ्यांनी ठरवावं लागेल एकदा.

चला ग्लोबल होऊया
संतांची मांदियाळी असो की छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक की बाबासाहेब आंबेडकर. ही माणसं ग्लोबल होती,  म्हणून इतिहास बदलू शकली. त्यानंतर मात्र आपण जात,  धर्म आणि प्रांताच्या दळणात अडकून बसलो. आता तर फक्त आपल्या विभागाचे आणि जिल्ह्याचे बनत चाललोय. पण ही बंधनं झुगारत नाही, तोवर आपलं काही खरं नाही. 'विश्वस्वधर्मसूर्य'  हे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान हा मराठी बाणा असेल, तर 'थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली', हे त्याचं आजचं भाषांतर आहे. जगातलं सारं नवं जाणून घ्यायची उर्मी हवी त्यासाठी.

परंपरा समजून घेऊया
फक्त नवं किंवा फक्त जुनं  जग नाही जिंकू शकत. जग जिंकायचं तर नवं आणि जुन्याचं फ्युजन हवं. पुढे जाताना मुळंही तेवढीच मजबूत हवीत. जीन्स घालूनही पंढरीच्या वारीत चार पावलं चालता येतात. जेजुरीच्या भंडा-यात पिवळंधम्मक होता येतं. भगवा फडकवताना शिवरायांचं सेक्युलॅरिझम समजून घ्यायला हवं. इण्टरनेटवरून जगभर जाताना तुकडोजींची ग्रामगीताही वाचायला हवी. आपली परंपरा डोळसपणे अनुभवायला हवी. असं झालं तर बावनकशी मराठी बाणा उभा राहिल. मग भय्यांचा नाहीतर गुजरात्यांचा द्वेष करायची गरज उरणार नाही.

शिव्या देऊया, पण मराठीत
मराठीचा आग्रही वापर हवाच. ज्यांना मराठी कळत नाही, तिथे दुराग्रह नको. पण दोन मराठी माणसांनी एकमेकांशी मराठीतच बोलायला हवं. तिथं स्टेटसचा बाऊ कशाला? मराठी घरात मराठीच हवी. बसमधे कंडक्टरशी नाहीतर लोकलमधे मराठीच हवं. मुंबईतल्या सगळ्या दुकानदारांना, रस्त्यावरच्या भय्यांना मराठी समजतंच. त्यांच्याशी मराठी बोलूया. आपल्याला लोनसाठी, मोबाइलसाठी, क्रेडिट कार्डसाठी कॉलसेण्टरवाल्यांचे फोन येत असतात. त्यांना सांगू या, आमच्याशी मराठीतून बोला. त्यांना मराठी शिकावं लागेल. नाहीतर चार मराठी मुलांचं भलं होईल.

इंग्रजीचा तिरस्कार नको
राज ठाकरे किंवा मुलायम सिंग, सगळ्या नेत्यांची मुलं इंग्रजी कॉन्वेंटमधेच शिकतात. तुम्हाला वाटतं मुलांनी इंग्रजी मीडियममधे शिकायला हवं, काही हरकत नाही, पण त्यांना मराठीपासून तोडू नका. मराठीवर प्रेम म्हणजे इंग्रजीचा द्वेष नाही. उलट इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून पुढे जाऊया. नवे विषय मराठीत आणुया. मराठीला ज्ञानभाषा बनवुया. आणि इंग्रजी येत नसेल,  तरीही पुढे जाऊया.

टॉपला पोहचूया, मराठी जपूया
न्यूझीलंडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन तेंडुलकरला मराठीतून प्रश्न विचारला. त्याने मराठीतून उत्तर दिलं. असं हवं. मराठीची लाज कशाला? टॉपला पोहोचायला हवं. मोठी स्वप्नं पाहायलाच हवीत. मध्यमवर्गीय संकुचितपणाच्या पेकाटात लाथ घालायलाच हवी. एकदा टॉपला पोहोचल्यावर तिथे मराठीचा ठसा उमटवायला हवा.

शुद्ध-अशुद्ध चिंता कशाला?
आपण हिंदी बोलताना शुद्ध की अशुद्ध आहे त्याचा विचार करतो का? मग हा विचार मराठी बोलतानाच का? आपण बोलतो तीच खरी मराठी आहे. त्यात गावाकडचे शब्द आले. भलते ऍक्सेण्ट आले,  इंग्रजी घुसलं,  हिंदी फसलं. काळजी कशाला? या सगळ्याला पचवून मराठी ताकदीने पुढे जाईल. तेच लिहितानाही. वेलांटी, उकारांच्या भीतीने मराठीपासून लांब नका जाऊ. मोबाइल, कम्प्युटरवर अगदी इंग्रजी अक्षरांत मराठी लिहावं लागली, तरी बेहत्तर. पण लिहिणार मराठीच.

उत्पादक बनूया
हे सगळ्यात महत्त्वाचं. बिझनेस मराठीतूनच चालायला हवा. मराठीतून बिझनेस मिळायला हवा. पैशाचं सोंग घेता येत नाही. पैसा आणि भाषा हातात हात घालून जायला हवेत. मराठी माणसांनेही उत्पादक बनायला हवं. कॉर्पोरेटी तंत्रं समजून घ्यायला हवीत. नव्या आयडिया यायला हव्यात. एमबीए आणि कम्प्युटरसारखेच सगळे कोर्स मराठीत हवेत. छोट्या मराठी कारागिरांना नवं तंत्रज्ञान समजावून द्यायला हवं.

श्रमाला प्रतिष्ठा देऊया
मायावती इकडे येऊन बहुजनवाद शिकवतात. अडवाणी हिंदुत्ववाद शिकवतात. करात कम्युनिझम सांगतात. मुलायम समाजवादाचे गोडवे गातात. यापेक्षा मोठं दु:ख कोणतं? गांधीवादासह या सगळ्या विचारधारांची जोपासना या देशात महाराष्ट्रानेच केली. पण या पोपटपंचीचं इम्प्लिमेण्टेशन क्वचितच केलं. बाकी सगळ्यांनी आज त्यावर याच विचारांवर साम्राज्य उभी केलीत. प्लानिंग श्रेष्ठ आणि त्याचं इम्प्लिमेण्टेशन कनिष्ठ असं सामाजरचनेनं टाकलेल्या ओझ्यात महाराष्ट्र मागे पडला. म्हणूनच श्रमाला प्रतिष्ठा हवी. काम करण्यात कमीपणा नकोच. मग भय्यांची भीती कशाला उरेल आणि उभा राहिल नवा महाराष्ट्र!

1 comment:

  1. छान!
    माझा एक लेख पाठवत आहे तुमच्या gmail वर. मला वाटतं तो तुम्ही म्हणता तसा मराठीबाणा दर्शवतो आहे का बघा.

    ReplyDelete