Monday, 14 March 2011

या मारुतीचे बाप प्रबोधनकार!


प्रबोधनकारांवर लिहिण्यासाठी मी काहीना काही निमित्ताची वाटच बघत असतो. थोडा जरी चान्स मिळाला तरी सोडत नाही. कुठे कुठे भाषणाला बोलवतात, तेव्हा थोडीशी जरी जागा असेल तर प्रबोधनकार आपोआप घुसतातच. कारण एवढंच की हा डोंगराएवढा माणूस मला नेहमी आपला वाटत आलाय. कुठेच कुठल्या पठडीत अडकला नाही. प्रबोधनकारांच्या एकोणनव्वदाव्या वाढदिवसाला मोठा कार्यक्रम झाला होता. इतकी वर्षं झाली पण हा आंबा कधीच नसला नाही, धों. वि. देशपांडेंनी असं कौतूक केलं. बाळासाहेब कार्यक्रमाचं निवेदन करत होते. हा आंबा कधीच एकाच टोपलीत राहिला नाही, म्हणून नासला नाही, त्यांनी म्हटलं.

फक्त विचारधारेचंच नाही तर सगळं आयुष्यच ते विविध अंगांनी फुलून जगत राहिले. माडासारखं उंच वाढायचं की वटवृक्षासारखं बहरायचं, हे आपल्यालाच ठरवावं लागतं. प्रबोधनकारांसारखा शेकडो दिशांनी वाढलेला वटवृक्ष माझ्या परिचयाचा दुसरा नाही. प्रबोधनकारांवरची वेबसाईट prabodhankar.com बनवताना हा वटवृक्ष जवळून बघायची संधी मिळाली. त्याच्या पारंब्यांवर मनसोक्त हिंदकळलोही. पण तरीही हा माणूस फारसा काही कळलेला नाही. साईटचं अजून खूप काम उरलंय. सुरू आहे. लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर प्रबोधनकारांविषयी आणखी नवे प्रोजेक्टही हाती घ्यायचेत.

प्रबोधनकारांविषयी नवं लिहायचा चान्स मिळाला तो बीएमसीमुळे. बीएमसीने गोल देवळाला नोटीस लावली आणि शिवसेनेने तिथे महाआरती केली. निमित्त पुरेसं होतं. विषय आवडीचा होता. शनिवारच्या कॉलमात दुसरं काही लिहिणं शक्यच नव्हतं. नवशक्तित लेख छापून आला. दिवसभर फोन वाजत राहिले. त्यातली बरीचशी लोकं खूप म्हातारी होती. असंच लिहिल राहा, असा त्यांचा आशीर्वाद खूप सुखावून गेला. सोबत लेख जोडलाय. आशीर्वाद शुभेच्छा तुमच्याही हव्याच आहेत.

परवा आठ तारखेला दादरला मोठाच गहजब झाला. कबुतरखान्याच्या गोल मारुती मंदिराच्या खांबावर मुंबई महानगरपालिकेने नोटीस लावली होती. या मंदिराचं बांधकाम अधिकृत असल्याचे पुरावे तीन दिवसांत देण्याची ही नोटीस जी उत्तर वॉर्डाच्या ऑफिसातून लावण्यात आली होती. किमान सत्तर वर्षं जुनं असलेलं हे मंदिर. भाग श्रद्धेचा आहेच. त्यामुळे शिवसैनिकांनी त्या रात्री देवळाच्या बाजुला मोठा जमाव एकत्र केला. आणि नोटीस मागे घेण्यात आली.

शिवसैनिक भडकले कारण या मारुतीची स्थापना प्रबोधनकार ठाकरेंनी केलीय. ब्राम्हणेतर आंदोलनाचे अर्ध्वयू असणा-या प्रबोधनकारांच्या सामाजिक विचारांचा वारसा शिवसेना चालवते का? याचं उत्तर निश्चितपणे नाही असंच आहे. तरीही शिवसेनेला प्रबोधनकारांशी वेगळाच आदरभाव आहे. त्याचं कारण ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे वडिल आहेत एवढंच नाही. तर प्रबोधनकारांनी फक्त शिवसेनाप्रमुखांनाच नाही तर शिवसेनेलाही घडवलंय. त्यांनी आपली सामाजिक जीवनाच्या पन्नास वर्षांची पुण्याई मुलाच्या पदरात टाकून सेनेला उभं केलं. आणि त्यांनी वयात आलेल्या मुलाला स्वतःचा मार्ग शोधायला मोकळं सोडण्याइतका एका सुजाण पालकाचा प्रगल्भपणा निश्चित दाखवला. पुढे बाळासाहेबांनी स्वतःचा मार्ग घडवला.

त्यामुळे आज ठाकरे या नावाच्या करिश्म्यावर ज्यांच्या घरातली चूल पेटले, अशा प्रत्येकाने प्रबोधनकारांसमोर नतमस्तक होणं गरजेचं आहे. कारण प्रबोधनकार हे ठाकरे करिश्म्याचे मूळपुरुष आहेत. प्रबोधनकारांचं कर्तृत्व आणि विचार डोंगराएवढे आहेत. त्यामुळे त्यांच्यातून शिवसेना वजा केली, तर त्यांच्या मोठेपणात काहीच उणावत नाही. उलट शिवसेनेमधून प्रबोधनकार वजा केले तर फारसं काही कसदार उरत नाही. शिवसेना हे नाव. शिवसेनेला जन्म देणा-या मार्मिकचं नाव. छत्रपती शिवराय हे आराध्यदैवत, भगवा झेंडा, वाघाचं बोधचिन्ह, जय महाराष्ट्र ही घोषणा, ठाकरी भाषा, घणाघाती पत्रकारिता, मराठीपणाचा कडवा अभिमान, वेगळ्या धाटणीचं हिंदुत्व, अशा अनेक गोष्टी थेट प्रबोधनकारांनीच शिवसेनेला दिल्या आहेत. एवढंच नाही तर शिवसेनेला घडवणा-या दादरची कूस घडवण्यातही त्यांचं योगदान मोठं होतं.  

दादरमधेच प्रबोधनकारांनी महाराष्ट्राच्या इतिहासाला वळण लावणारे प्रयोग केलेत. इथेच खांडके बिल्डिंगीत आणि मिरांडाच्या चाळीत त्यांनी महाराष्ट्राच्या विचारांत परिवर्तन घडवणारं लेखन केलं. मधला पुणे आणि साता-याचा काही काळ वगळता प्रबोधनही इथूनच महाराष्ट्रभर गेला. इथल्या छबिलदास शाळेपाशी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवात एका पूर्वास्पृश्याकडून गणपतीचं पूजा होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत आंदोलन केलं. इथल्याच टिळक पुलाजवळ त्यांनी सार्वजनिक नवरात्रौत्सवाची सुरुवात केली. इथेच खांडके बिल्डिंगमधल्या स्वाध्याय आश्रमात कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या कामाची ब्ल्यू प्रिंट बनवली आणि महाराष्ट्र लिहावाचायला शिकला. त्याच दादरमधे प्रबोधनकारांनी एक छोटासा वेगळा प्रयोग केला, तो होता गोल मारुतीचा.

प्रबोधनकारांनी स्वतः मार्मिकच्या एका दिवाळी अंकात या मारुतीचा बाप मीच या धडाकेबाज शीर्षकाचा लेख लिहून गोल मारुतीची कथा सांगितली होती. पन्नास वर्षांच्या वाटचालीतले मार्मिकचे काही अंक आज गहाळ झालेत. त्यात गोल मारुतीची लिखित जन्मकथाही हरवलीय. पण या इतिहासाचे साक्षी असणारे काहीजण आजही जिवंत आहेत. त्यामुळे त्यातले बारिकसारीक तपशील मिळत नसले तरी एक कथा समोर येते. स्वतः बाळासाहेबही ही कथा अनेकदा सांगतात. मुलखावेगळा विचार करणा-या प्रबोधनकारांची यातून ओळख होते.

दादरची सगळी जडणघडण प्रबोधनकारांच्या डोळ्यासमोरच झालेली. त्यात त्यांचं योगदानही मोठंच. कबुतरखान्याच्या चौकही त्यांच्याच डोळ्यासमोर गर्दीचा बनला. एक तिथून दोन रस्ते स्टेशनाकडे, तिसरा पोर्तुगीज चर्चच्या दिशेने, चौथा डिसिल्वा शाळेकडून प्रभादेवीच्या दिशेने आणि पाचवा आताच्या प्लाझाकडे म्हणजे प्रबोधनकार राहत त्या मिरांडाच्या चाळीकडे. आजुबाजूला बाजारपेठ. शिवाय चर्च, मशीद आणि देरासरही हाकेच्या अंतरावर. सगळे रस्ते चांगलेच वाहते. त्यामुळे रहदारी तेव्हाही असायची. आणि रहदारी सांभाळण्यासाठी एक ट्राफिक पोलिस उभा असायचा. हा चौक रस्त्याच्या मधोमध. त्यामुळे पोलिसासाठी सावलीला आडोसाही नाही किंवा दोन मिनिटं टेकायलाही जागा नव्हती.

टळटळीत उन्हात पोलिसांची होणारी हेळसांड प्रबोधनकारांना अस्वस्थ करायची. ते नेहमी यावर विचार करायचे. एक दिवस एक अफलातून विचार त्यांच्या डोक्यात चमकला. मॉर्निंग वॉक घेऊन घरी परतताना त्यांनी कुणाला तरी सांगून चाळीजवळ पडलेला एक मोठा वाटोळा दगड मागवून घेतला. नंतर तो धुवून त्याच्यावर वारंवार तेल आणि शेंदूर लावण्यात आलं. बहुदा ही जबाबदारी शाळकरी वयातल्या बाळासाहेबांवरच होती. बाळासाहेबांची पणजी बयचाही यात सक्रिय सहभाग होता. हा दगड अगदी गुळगुळीत झाल्यानंतर एके दिवशी रात्री एका विश्वासातल्या माणसाकडून हा दगड कबुतरखान्याजवळच्या चौकात पुरून घेतला. दोन तीन दिवसांनी त्यांनीच या चौकात जमिनीखाली मारुतीची मूर्ती असल्याची भूमका उठवून दिली. आजवर अनेक हिकमती केलेल्या प्रबोधनकारांसाठी हा हातचा मळ होता.

लगेच ती जमीन खोदण्यात आली. तिथून मारुती निघाला. पूर्ण दादरभर चर्चा झाली. त्या तांदळ्याला हळदीकुंकू घालून लगेच पूजण्यात आले. या स्वयंभू मारुतीवर सगळ्या गिरणगावाची श्रद्धा बसली. लांबून लांबून लोक आले. छोटंसं मंदिर बांधण्यात आलं. या सगळ्यापासून प्रबोधनकार अगदी नामानिराळे राहिले. ज्याच्यासाठी हा खटाटोप होता. तो पोलिस आता देवळाच्या सावलीत विसावू लागला. दोन क्षण टेकू लागला. प्रबोधनकार मारुतीला पावले होते. यात तपशीलाच्या काही त्रुटी असतीलही पण कथा मात्र तीच आहे. आता तिथे मोठं देऊळ उभे राहिलेय. मारुतीच्या सोबतीला आणखीही देवाच्या मूर्त्या तिथे आल्यात. एक क्रूसही कुणाला न खटकता उभा आहे. बारा महिने तिथे लोकांचा राबता सुरू असतो.

कबुतरखान्यातल्या या मारुतीसमोर नतमस्तक होताना मात्र कुणालाच प्रबोधनकारांची आठवण नसते. प्रबोधनकारांनी लेख लिहिला नसता तर हे कुणाला कळलंही नसतं. आणि बाळासाहेब एवढे मोठे झाले नसते तर कुणी कदाचित आज याची दखलही घेतली नसती. कोण देव कुणाला पावला वगैरे पुराणातली वांगी सांगत जगभर देवळं उभी राहतात. पण असं देऊळ दुसरं नसावं. एखाद्याला होणारा त्रास पाहून निर्माण झालेल्या करुणेतून हे देऊळ उभं राहिलंय. ज्याला त्रास होतोय, तो कुणी सगासोयरा नाही, ओळखीचाही नाही. या कामातून काही मोबदलाही मिळणार नाही आणि कुणी त्याचं श्रेयही द्यायला येणारही नाही. असं असताना केवळ समोरच्याचं दुःख आपलं मानून निरपेक्षपणे केलेली कृती कोणत्याही भक्तीपेक्षा कमी नक्कीच नव्हती. म्हणून हे गोलदेऊळ इतर कोणत्याही तीर्थस्थळापेक्षा नक्कीच कमी मोलाचं नाही.

एका पोलिसाच्या भल्यासाठी असं लोकांच्या श्रद्धेला वापरून घेणं अजब आहे. ठरीव पठडीतल्या अध्यात्माला आणि धर्माला हे मानवणारंही नाही. महात्मा गांधींनीही हिंदू धर्मातली उपवासापासून रामराज्यापर्यंतची अनेक प्रतीकं वापरून समाजकारण आणि राजकारण केलं. पण त्यांच्या संयत अध्यात्मात अशा प्रकारच्या श्रद्धेच्या वापराला जागा मिळणं कठीण आहे. तसंच गायीला उपयुक्त पशू मानण्याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कोरडा उपयुक्ततावादही येथे नाही. प्रबोधनकारांचा गोल मारुती हा याच्या मधे कुठेतरी बसत असावा. प्रबोधनकाराचं सगळं तत्त्वज्ञानच असं स्वतंत्र प्रज्ञेचं आहे. त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे.

प्रबोधनकार आजच्या कोणत्याही बहुजनवाद्यापेक्षाही अधिक बहुजनवादी होते. पण ते हिंदुत्ववादीही होते. त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईला मैलाचा दगड म्हटलं आणि सार्वजनिक गणेशोत्सवातली मूर्ती फोडण्याची धमकीही दिली. पण त्याचवेळेस सार्वजनिक नवरात्रौत्सवाची स्थापना केली. त्यांनी सत्यनारायण, व्यंकटेशस्तोत्र, शनिमहात्म्य यांची जाहीर हजामत केली. पण मरेपर्यंत घरीही नवरात्रौत्सव साजरा केला. इतकंच नाही तर नातवांच्या आनंदासाठी घरी गणपतीही आणला. श्रद्धेची सालटी काढली पण कायम सश्रद्ध राहिले. महिलांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून जन्मभर धडपड केली. त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारणा-या पंडिता रमाबाईंचं चरित्र आदर्श म्हणून मांडलं. त्याचवेळेस त्यांनी हिंदू मिशनरी बनून धर्मांतरितांना पुन्हा हिंदूही बनवून घेतलं. ब्राम्हणांनी केलेल्या धार्मिक अत्याचाराची पुराव्यानिशी माहिती देणारे ग्रंथ एक सत्यशोधक इतिहासकार म्हणून लिहिले. त्याचवेळेस समर्थ रामदासांचंही इंग्रजी चरित्र लिहिलं. आक्रमण करणा-यातलंही चांगलं पचवून समृद्ध होणा-या भारतीय संस्कृतीची मांडणी त्यांनी हिंदवी नीळकण्ठीझम अशी केली. या सगळ्यातून बहुजनवादी हिंदुत्व अशा एका वेगळ्याच विचारधारेची मांडणी त्यांनी केली. त्यांचं एकूण साहित्य आणि जीवन याचा नीट विचार करून ती मांडणी नीट समजून घ्यायला हवीय. कारण हे विचार कोणत्याही एका पठडीत बसवणं निव्वळ अशक्य आहे.

गोल मारुती ही या प्रबोधनकारांच्या हिंदवी नीळकण्ठीझमची एक झलक आहे. म्हणून कुणाही थोर महात्म्याने बसवलेल्या दुस-या कोणत्याही मारुतीपेक्षा हा मारुती ख-या अर्थाने जागृत आहे. जागं करणारा आहे. पोर्तुगीज चर्चजवळच्या प्रबोधनकारांच्या पुतळ्यापेक्षाही हा गोलमारुतीच त्यांचं खरं स्मारक आहे. तिथे कुणी सरधोपट हिंदुत्वाच्या नावाने मतांची गणितं डोक्यात ठेवून भगवे झेंडे फडकवत महाआरती करणार असेल, तर तो प्रबोधनकारांच्या निरपेक्ष करुणेचा अपमान आहे. पण प्रबोधनकारांविषयीच्या आदरातून कुणी इथे जमा झालं असेल तर त्याचं स्वागत व्हायला हवं. 

8 comments:

  1. तुझे निमंत्रण मिळाले. पण त्याआधीच मी ब्लॉग वर येऊन गेलो होतो. मस्त चालले. लक्ष ठेवून आहे.

    ReplyDelete
  2. स्वर्गीय प्रबोधंकारांविषयी मला अनादर आहे असं नाही पण एक तक्रार किंवा खंत आहे. तसं तर ती जगातील सर्वच महापुरुषांविषयी/ महास्त्रीयांविषयी आहे. आपल्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा सच्चा वारसा चालवणारी मुलगी किंवा मुलगा यापैकी कुणालाही घडवता आला नाही. वाहतूक हवालदाराला होणार्‍या उन्हाच्या त्रासाचा विचार प्रबोधंकारांनी केला. गोल मारुती स्थापला. उत्तम. आता काळ बदलला. खूप बदलला. गर्दी वाढली, वाहतूक आणि पर्यायाने प्रदूषण वाढले. त्यात गोल देवळाने भर घातली आहे. मग एका हवालदाराला होणार्‍या त्रासाचे निराकरण करणार्‍याच्या सुपुत्राने किंवा सुनातवाने किंवा सुपणतवाने साधा एवढाही विचार करू नये की हजारो लोकांच्या त्रासाचे निवारण होत असेल तर गोल देऊळ त्वरित हटवले पाहिजे?

    ReplyDelete
  3. सुनील घुमे15 March 2011 at 16:12

    सचिन, हा इतिहास मला अजिबात माहित नव्हता. ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद.

    माझ्यापुरतं प्रामाणिकपणे सांगायचं तर ती जागा मला मंदिरापेक्षाही जास्त प्राणप्रिय असण्याचे कारण म्हणजे लव्हर्स स्पॉट म्हणून तिची असलेली उपयुक्तता... कुणालाही भेटायला बोलवायचे, तर त्यासारखा उत्तम स्पॉट नाही. तिथल्या देवांना हात जोडला की, समोरच्या विसावामध्ये नाही, तर तांबे आरोग्य भुवनमध्ये जायला मोकळे होता येते. आजही तिथून जेव्हा जेव्हा जातो, तेव्हा आपसूकच हात छातीवर जातो आणि लांबूनच (म्हणजे बाइकवरूनच) नमस्कार घडतोच.

    बाकी शशांकच्या मतांशी मी काही अंशी सहमत आहे, पूर्णतः नाही. मुंबईतील हजारो फुटपाथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केलेत. त्यांचे कुणी काही वाकडे करत नाही. मग बिच्चा-या गोल मारूती देवळावरच 'गदा' का?

    ReplyDelete
  4. देवळाविषयीच्या शशांकच्या मताशी मीही ब-याच अंशी सहमत आहे. यातून एक नवा अँगल मिळालाय. पालक म्हणून प्रबोधनकार कसे होते हा. समजून घ्यायला मजा येईल. आतापर्यंत भेटलेले पालक प्रबोधनकार मस्त आहेत. मुलांनी कसं व्हावं, हे नसतं फारसं पालकांच्या हातात. आपण सगळेच बाप आहोत. मुलांवरून आईबापाचं मूल्यांकन होऊ नये, असं वाटतं. विशेषतः मुलांना खूप मोकळीक देणा-या पालकांचं तरी नकोच.

    ReplyDelete
  5. @ सुनील. लै भारी. लवर्स स्पॉट जिंदाबाद. तुझा कॉलम झकासच होता. लिहित राहा प्लीज. मला मटात लिहिताना जितके रिस्पॉन्स मिळायचे नाहीत तितके त्याच लेखांना आता मिळताहेत. त्यामुळे ब्लॉग हा पर्याय उत्तम आहे. हक्काचं मटा ऑनलाईन आहेच.

    ReplyDelete
  6. सर, मी मुंबईत असतो तर कबुतर खाण्या जवळचा हा गोल्या मारुती जवळून बघता आला असता...असो पण तुमचा हा लेख वाचून डोक्यात एक मंदिर मात्र तयार झालंय....कोण्या एका ट्राफिक हवाल्दारासाठी प्रबोधन करांनी मंदिर थाठ्ल... मुंबई च्या बाहेर मोक्याची जागा मिळावी अथवा आपल्या जागे पुढचे अतिक्रमण कोणी ही काढू नये या साठी देवळ थाठ्ले तर कोणी चबुतरे बनवलेत

    ReplyDelete
  7. सर ,मला हेच समजत नाही.....( हे कोणत राजकारण ) बी एम् सी मध्हे कोणाची सत्ता ? कोण नोटिस देतात ? निवडणुका जवळ आल्या की आपल्याच घरात आपण आग लावायची आणि जमाव जमल्यावर ती आग आपणच विजवायला जायच ... या मारुतीची स्थापना प्रबोधनकार ठाकरेंनी केलीय.शिवसेनेला प्रबोधनकारांशी वेगळाच आदरभाव आहे.कारण ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे वडिल आहेत एवढंच नाही. तर प्रबोधनकारांनी फक्त शिवसेनाप्रमुखांनाच नाही तर शिवसेनेलाही घडवलंय. त्यांनी आपली सामाजिक जीवनाच्या पन्नास वर्षांची पुण्याई मुलाच्या पदरात टाकून सेनेला उभं केलं. आणि त्यांनी वयात आलेल्या मुलाला स्वतःचा मार्ग शोधायला मोकळं सोडण्याइतका एका सुजाण पालकाचा प्रगल्भपणा निश्चित दाखवला. पुढे बाळासाहेबांनी स्वतःचा मार्ग घडवला.मग बी एम् सी मध्हे शिवसेनेची सत्ता असताना... कशी हिमंत झाली नोटीस लावायची प्रभाग अधिकार्याची ....अनेक वर्षानंतर पोलिसाना उन लागायला लागल ? आज पर्यंत पोलिस मंदिराच्या खिडकीतुन वाहतुक सांभाळत होते का ? तात्पर्य :- फक्त आणि फक्त लवकरच येणाऱ्या बी एम् सी निवडणुका असाव !

    ReplyDelete
  8. माऊली, आपण सारे या प्रबोधन कीर्तनातले टाळकरी. या निमित्तानं तुकोबारायांचा अभंग आठवला. ''मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों।।..'' म्हणजे आमचे बाप आम्हीच. आम्ही स्वयंभू आहोत. आम्हीच आम्हाला घडवतो आहोत...

    ReplyDelete