Saturday 23 July 2011

टिळक, माय फादर


माझी जीवनगाथा या आत्मचरित्रातून मला प्रबोधनकार भेटले. मला एक खजिनाच भेटला. त्यात प्रबोधनकारांनी आपल्या अनेक दोस्तांचीही गाठ घालून दिलीय. श्रीधरपंत टिळकही त्यातलेच एक. लोकमान्यांचा हा बंडखोर मुलगा अवघ्या वयाच्या बत्तिसाव्या वर्षी ट्रेनखाली आत्महत्या करतो, हे वाचून धक्का बसला. यात वैचारिक, भावनिक मोठाच संघर्ष. पण कधी त्यावर कुणी कादंबरी लिहिली नाही, कधी कुणी नाटक लिहिलं नाही. का?

मटाच्या वेबसाईटमधे आम्ही सगळ्यांनी बहुदा १ ऑगस्ट २००७ ग्लोबल टिळक हे सेग्मेंट केलं होतं. तेव्हा हरिलाल गांधींवरच्या गांधी, माय फादर नावाचा सिनेमा येऊ घातला होता. त्या धर्तीवर आम्ही श्रीधरपंतांविषयी टिळक, माय फादर या नावाने काही लेख मांडले होते. त्याला जोरदार रिस्पॉन्स मिळाला. त्यात मी श्रीधरपंतांची ओळख करून देणारा लेख लिहिला होता. 'ओळख सिंहाच्या छाव्याची'. तो कटपेस्ट करतोय. आज टिळकांची जयंती आहे. त्यानिमित्त.


तुम्हाला हरिलाल गांधी माहितेय? महात्मा गांधींचे थोरले चिरंजीव. माहीत असणारच. त्यांच्याविषयी बरंच लिहिलं गेलंय. पुढच्याच आठवड्यात ' गांधी , माय फादर ' नावाचा बिगबजेट सिनेमाही येतोय त्यावर.

आणि श्रीधरपंत टिळक?... हो , लोकमान्यांचे धाकटे चिरंजीव. या बापलेकांमधला संघर्षही तितकाच कटू आणि नाट्यपूर्ण. पण हे अहंकारासाठीचं नाही, तर तत्त्वांसाठीचं भांडण होतं. शिवाय हा संघर्ष आपल्या आजच्या जगण्याशीही अधिक निगडीत असलेला होता. तरीही का कोण जाणे,  टिळकवादी म्हणवून घेणा-यांच्या छळाला कंटाळून वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी ट्रेनखाली जीव देणा-या या लोकमान्यपुत्राविषयी महाराष्ट्र आजपर्यंत तसं मौनच बाळगूनच आहे.

अख्ख्या हिंदुस्थानाला आपल्याबरोबर खेचण्याची धमक असणा-या आपल्या हिमालयाएवढ्या बापाच्या प्रभावातून बाहेर पडणं, ही काही साधीसुधी गोष्ट नाही. अभ्यासात कमजोर म्हणून हिणवल्या गेलेल्या श्रीधरपंतांनी टिळकांच्या हयातीतच हे करून दाखवलं होतं. आम्हाला ' लोकमान्य ' व्हायचे नाही, असे खुद्द लोकमान्यांना ऐकवण्याची छाती श्रीधरपंतांकडे होती. त्याच छातीने ते हरेपर्यंत टिळकवाद्यांशी निकरानं लढत राहिले.

टिळक-आगरकर वादापासूनच लोकमान्य सुधारकांच्या विरुद्ध सनातनी ब्राह्मणांचे नेते बनले. लोकमताचा आदर करण्याचा मुद्दा मांडत ते सनातन्यांच्या पाठिशी आणि सनातनी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. पुढे राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणात ही प्रतिमा दृढ झाली. असं असलं तरी टिळक बदलत होते. स्वत: बदलण्याची हिंमत त्यांच्यात होती. त्यामुळेच त्यांचा प्रवास ब्राम्हणी पुढा-यांपासून तेल्या तांबोळ्यांच्या नेत्यापर्यंत आणि हिंदुत्ववादापासून मुस्लिमांना देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात आणण्यापर्यंत झाला. त्यांनीच काँग्रेसला मुस्लिम लीगशी जुळवून घ्यायला लावलं. त्यांनीच खिलाफत चळवळीला समर्थन दिलं. सिंधच्या दौ-यात सर्व जातींच्या पंक्तीत जेवण्याची हिंमत दाखवली. ' जातीभेद सांगणारा देव मला मान्य नाही', अशी गर्जना केली. रशियातल्या बोल्शविक क्रांतीविषयी त्यांना कुतूहल होतं. मृत्यू झाला म्हणून अन्यथा इंटकचे पहिले अध्यक्ष तेच बनले असते. या मंडालेनंतरच्या टिळकांचा वारसा श्रीधरपंतांनी चालवला. पण लोकमान्यांच्या अनुयायांना हे टिळक कळलेच नाहीत. मग लोकमान्य आणि टिळक यांच्यातला संघर्ष उभा राहिला.

त्याचा पहिला खटका श्रीधरपंतांच्या लग्नातच उडाला. सनातन्यांच्या आग्रहावरून टिळकांनी प्रायश्चित्त म्हणून पंचगव्यप्राशनाची तयारी केली. श्रीधरपंतांनी त्याला विरोध केला, ' माझ्या लग्नासाठी जर प्रायश्चित्त घेणे, तर ते लग्नच न झालेले बरे.' हा विरोध फार काळ चालला नाही. पण पुढे श्रीधरपंतांनी टिळकांच्या गायकवाडवाड्यात अस्पृश्यांसोबत सहभोजन घडवून त्याचेही प्रायश्चित्त घेतले. समाजसुधारणेची त्यांची कळकळ फक्त बोलघेवडी नव्हती. गायकवाडवाड्यातलं सहभोजन , समतासंघाची स्थापना तसंच गणेशोत्सवात बहुजनमेळ्याचा कार्यक्रम घेणे ही पुण्यासाठी क्रांतीच होती. पण सामाजिक चळवळी करणा-यांनी राजकीय चळवळींत अडथळे बनू नये , असा परखड सल्लाही ते सुधारणावाद्यांना देण्यास कचरत नसत. त्यांची भूमिका कायम सुधारणांसाठी आग्रही पण समन्वयवादी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  प्रबोधनकार ठाकरे,  केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर असे ब्राम्हणेतर चळवळीचे अनेक अर्ध्वयू त्यांचे जवळचे मित्र होते.

टिळकवादी आणि श्रीधरपंतांच्या संघर्षाचे कारण केसरीवरचा ताबा होता. केसरीच्या ताब्यावरूनच कोर्टकज्जे झाले. ' केसरी ताब्यात आला की महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवून देईन', अशी श्रीधरपंतांची मनिषा होती. तर न. चिं. केळकर आणि केसरीच्या अन्य ट्रस्टींना हा टिळकद्रोह वाटत होता. त्यामुळे चांगला व्यासंग आणि तर्कशुद्ध लेखनशैली असूनही त्यांचं लेखन कधी केसरीत छापून आलं नाही. त्यांच्या मृत्युचीही बातमी फक्त सिंगल कॉलम होती. त्या सिंगल कॉलमात मात्र त्यांच्या लेखनशैलीचं कौतुक होतं.

श्रीधरपंतांचा लोकमान्यांवर राग नव्हता. उलट त्यांच्याविषयी असणारा आदर , प्रेम अनेक ठिकाणी लेखनातून दिसून येतो. लोकमान्यांची बदनामी केल्याबद्दल त्यांनी जेधे -जवळकांना कोर्टात खेचले होते. सामाजिक चळवळींसंबंधी लोकमान्यांपेक्षा पूर्णपणे भिन्न मतं असूनही लोकमान्यांचे वारस बनण्याची क्षमता त्यांच्यात होती. आकर्षक लेखनशैली , वक्तृत्त्व, सामाजिक स्थित्यंतराची समज, व्यासंग, लोकसंग्रह असे अनेक गुण त्यांच्यात होते. पण ' काय करू , कर्ती माणसंच मिळत नाहीत', असं शेवटच्या दिवसांत वारंवार म्हणणा-या लोकमान्यांनी श्रीधरपंतांवर विश्वास टाकला नाही. त्यांचा बापू त्यांच्यासाठी लहानच होता. ' श्रीधरपंतच खरे लोकमान्य ' असल्याचा आंबेडकरांचा दावा यासंदर्भात महत्त्वाचा आहे.

श्रीधरपंतांनी २५ मे १९२५ रोजी भांबुर्डा (आजचे शिवाजीनगर) येथे मुंबई-पुणे एक्स्प्रेसखाली जीव दिला. त्यांनी आत्महत्येआधी तीन पत्रं लिहिली , एक पुण्याच्या कलेक्टरला, दुसरं विविधवृत्त साप्ताहिकाला आणि तिसरं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना. कलेक्टरला लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्या मृत्युचे कारण सांगितले आहे , '... मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची , माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता... एखाद्या गरीब अपरिचित शेतक-याच्या झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो, अशी मी आशा बाळगतो. '

अशा त-हेने तळमळत आत्महत्या करण्यापेक्षा आपली तत्त्वे बाजुला ठेवून टिळकवाद्यांशी जमवून घेणं श्रीधरपंतांसाठी सोपं होतं. त्यात व्यावहारिक हीतही होतंच शिवाय काँग्रेसमधली टिळकांचा राजकीय वारशाची वस्त्रेही सहज त्यांच्यापर्यंत पोहोचली असती. पण या सिंहाच्या छाव्याने कठीण मार्ग पत्करला. आपल्या तत्त्वांसाठी तळमळत आपला जीव दिला.

महाराष्ट्रातील सनातनी ब्राम्हणांना सुधारणेची संथा देण्याचं मोठं काम श्रीधरपंत करू शकले असते. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं. पण त्याकाळच्या महाराष्ट्राला तसं वाटलंच नाही आणि आताच्या महाराष्ट्राला त्याचा पत्ताच नाही.

श्रीधरपंतांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी जवळचा स्नेह. त्यांनी आत्महत्येआधी शेवटचं पत्र आंबेडकरांना पाठवलं होतं. श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर ' दुनिया ' या मामा वरेरकर यांच्या साप्ताहिकाने खास 'टिळक अंक' प्रसिद्ध केला होता. त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी एक अप्रतिम लेख लिहिला होता. दोन असामान्य व्यक्तिमत्त्वांतील अकृत्रिम स्नेहाचा धागा येथे दिसतो. डॉ. अनंत देशमुख यांच्यामुळे हा लेख आम्हाला मिळू शकला होता. श्रीधरपंतच खरे लोकमान्य या नावाने तो आजही मटा ऑनलाईनवर वाचता येईल. तो पुढे कटपेस्ट करतोय.

मी, ता. २६ मेला जळगाव येथे बहिष्कृत वर्गाच्या सभेला गेलो होतो. आदल्या दिवशी जेव्हा मुंबईहून निघालो त्याच दिवशी रा. श्रीधर बळवंत टिळक यांचे एक पत्र मला आले होते. त्यात आपल्याला दापोलीच्या सभेला येता आले नाही, याबद्दल वाईट वाटते वगैरे मजकूर होता. त्या आत्महत्या करण्यासारखा प्रसंग ओढवला आहे असा ध्वनी. उमटण्यासारखा काहीच मजकूर नव्हता.

दुपारी फार उन्हं असल्यामुळे रा. लखाचंद यांच्या अध्यक्षतेखाली सभा संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली. या सभेस पाच हजार लोक आले असल्यामुळे सभेचे कामकाज फार उत्साहाने चालले होते. हिंदुमहासभेच्या कामापेक्षा समाज समता संघाचा कार्यक्रम कसा परिणामकारक आहे, या आशयाचे थोडेसे कडाक्याचे भाषण संपवून नुकताच मी खाली बसलो होतो. इतक्यात एक तार आली. तार येण्याचे काही कारण नसताना तार आली यामुळे मला थोडा धक्का बसला.

वाचून पाहातो तो ज्या समता संघाच्या कार्याची महती गाऊन मी खाली बसलो होतो त्याच समता संघाच्या पुणे येथील शाखेचे उपाध्यक्ष माझे मित्र रा. श्रीधर बळवंत टिळक वारले म्हणून बातमी! मी अगदी गांगरून गेलो, आधी हे खरेच वाटेना. परंतु तार संघाच्या सेक्रेटरीने केली असल्यामुळे ती खोटी म्हणता येईना. अशा परिस्थितीत एक दुखवट्याचा ठराव मांडून मी सभा सोडून तसाच तडक मुंबईस आलो.

गाडीत श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी अनेक तर्क माझ्या मनात आले व आपण आरंभिलेल्या कार्यातील धडाडीचा एक मोठा जोडीदार नाहीसा झाला हे जाणून माझे मन फार उद्विग्न झाले. श्रीधरपंताला कोणीतरी दुष्टाने विषप्रयोग केला असावा असा माझा प्रबळ तर्क झाला. तारेत मरणाचे कारण काहीच दिलेले नव्हते. तेव्हा मरणाचे हेच कारण हेच की दुसरे कोणते, हे जाणण्यासाठी गाडी मुंबईस केव्हा पोहोचेल असे मला झाले होते. गाडी दादरला पोहोचल्याबरोबर मी माझ्या ऑफिसात गेलो. 'टाइम्स' हातात धरतो तोच श्रीधरपंतांचे हातचे मरणापूर्वी तीन तास अगोदर मला लिहिलेले एक पत्र टेबलावर पडलेले दिसले. तेव्हा 'टाईम्स' टाकून ते हाती घेतले. वाचतो तो आत्महत्त्या हेच मरणाचे कारण होय,  हे अगदी स्पष्ट झाले.

मग तर अगदीच कष्टी झालो. श्रीधरपंताला मी थोडासा दोषही दिला. आत्महत्त्या हा मरणाचा भेसूर प्रकार आहे. परंतु ज्या कारणामुळे ही आत्महत्त्या घडली जी कारणे ध्यानात घेतली म्हणजे श्रीधरपंताची आत्महत्त्या मोठी हृदयदावक होती असे म्हणणे भाग पडते. आपले आयुष्य ' केसरी ' कंपूशी भांडण्यात जाणार, आपल्यालाविधायक काम करण्यास अवसर रहाणार नाही, यास्तव जगण्यात हशील नसून आत्महत्त्या करणे बरे,  असे म्हणण्याची पाळी श्रीधरपंतांवर यावी यासारखी दुसरी अनिष्ट गोष्ट ती कोणती?

माझ्या मते श्रीधरपंतांना 'केसरी' त जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता. 'केसरी' पत्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची मोठी महत्त्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर त्यांच्या हाती 'केसरी' गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीने 'केसरी' च्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे, तर भारदस्त लेखक या दृष्टीने 'केसरी' च्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता.

राजकीयदृष्ट्या ते काही मवाळ नव्हते. जहाल, सुताळ आणि बेताल या सर्वांच्यापेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने 'केसरी' ला काही धोका नव्हता, असे असताना त्यांना 'केसरी' त जागा मिळाली नाही. यांचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. 'केसरी' त जागा मिळाली असती तरीही 'केसरी' कंपूचा भंड लागून जे व्हावयाचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील. कसेही असो एवढी गोष्ट खास की निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्टडीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज 'केसरी' कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण 'केसरी' कंपूला असती तर बरे झाले असते.

मला त्यांच्यासंबंधी काय वाटते हे मी त्यांच्या निधनासंबंधीचा लेख लिहिण्यास उद्युक्त झालो आहे यावरून सर्वांना जाणता येण्यासारखे आहे. कै. श्रीधरपंत टिळक हे एका ब्राह्माण्याभिमानी गृहस्थाचे चिरंजीव. त्यांचे वडील लो. टिळक यांना १६१६ साली जेव्हा मी 'मूकनायक' पत्र चालवीत असे त्यावेळी दर अंकात जरी नसले , तरी अंकाआड शिव्याशापांची लाखोली वाहात असे. ब्राह्माण्याशी अहर्निश लढणा-या माझ्यासारख्या अस्पृश्य ज्ञातीतील एका व्यक्तीने ब्राह्माण्याभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधरपंतांचे मरणाने दु:खित व्हावे हा योगायोग तर त्यांच्याहीपेक्षा विलक्षण आहे हे कोणीही कबूल करील. परंतु हा योगायोगच मोठेपणाची एक मोठी साक्ष आहे.

कोणी काहीही म्हणो, श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली, तांबोळी म्हणून बहुजनसमाजाचा उपहास करणा-या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे, असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतासच होय. टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील नव्हे हिंदुस्तानावरील मोठीच आपत्ती आहे, असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छू माणसास कबूल करणे भाग आहे.

मंडालेआधीचे आणि मंडालेनंतरचे टिळक वेगळे होते, अशी मांडणी पहिल्यांदा प्रबोधनकार ठाकरेंनीच केली. लोकमान्य ते महात्मा मधे सदानंद मोरेंनी या मांडणीला एका सिद्धांताचं रूप दिलं. प्रबोधनकारांच्या या मांडणीच्या प्रकाशात श्रीधरपंतांचं महत्त्व अधिकच उजळून निघतं. प्रबोधनकारांच्याच ' माझी जीवनगाथा' या रसाळ आत्मचरित्रात भेटणारे श्रीधरपंत असे आहेत.

मी पुण्यात पाऊल टाकल्यापासून (सन १९२५) कर्मठ बामण मंडळी माझ्याकडे जरी दु:स्वासाने पाहू लागली. तरी काय योगायोग असेल तो असो! अगदी पहिल्याच दिवशी बापू (श्रीधरपंत) टिळक आपणहून मला येऊन भेटला. मागास बहुजन समाज आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाज यांच्या उत्कर्षाविषयी त्याने आपली कळकळ मनमोकळी व्यक्त केली. त्याच क्षणाला बापूचा आणि माझा आत्यंतिक जिव्हाळ्याचा जो संबंध जुळला तो त्याच्या दुर्दैवी अंतापर्यंत!

त्यावेळी ट्रस्टी आणि टिळक बंधू यांच्यात तीव्र स्वरूपाची वादावादी, बाचाबाची आणि प्रसंगी धक्काबुक्कीपर्यंत प्रकरणे चालली होती. अरसपरस फिर्यादींचे सत्र चालू होते. वाड्यातल्या राजकारणामुळे बापू नेहमी वैतागलेला असायचा. काही संतापजनक घटना घडली का तडक तो माझ्या घरापर्यंत धुसफुसत यायचा. खरे म्हणजे तो उसळला म्हणजे रामभाऊच त्याला , 'जा जाऊन बस ठाक-याकडे', म्हणून पिटाळायचा. पुष्कळ वेळा सकाळीच आला तर दिवे लागणीनंतर घरी जायचा. माझ्याकडेच जेवायचा आणि ग्रंथ वाचन करीत पडायचा. अर्थात वाड्यातल्या भानगडींची चर्चा माझ्याजवळ व्हायचीच. वारंवार तो म्हणे, 'केसरी माझ्या हातात आला तर पुन्हा महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दखवीन'. बापूचा स्वभाव त्रासिक असला तरी फार सोशिक होता. पण रामभाऊचा स्वभाव वरवर जरी धिम्मा वाटला तरी ऊठ सोट्या तुझं राज्य हा प्रकार फार.

काय टिळकांच्या वाड्यात अस्पृश्यांचा मेळा? अब्रम्हण्यम्!

टिळक बंधू यंदा अस्पृश्यांचा मेळा गायकवाड वाड्यात घेऊन येणार अशी भूमिका पुण्यात पसरली. आणि ती खरीही होती. एकीकडे दंगलबाज छत्रपती मेळ्याची दहशत आणि त्यातच टिळक बंधुंचा हा उपद्व्याप! ट्रस्टीमंडळी भेदरून गेली. बामणेतर मंडळींच्या पाठिंब्याने रामभाऊ आणि बापू मनात आणतील ते करतील ही त्यांची खात्री असल्यामुळे त्यांनी दोन मार्ग पत्करले. पहिला अस्पृश्य मेळा वाड्यात आणू नये असा मनाई हुकूम बजावून घेतला. पण टिळक बंधूंनी असे हुकूम बेधडक झुगारून फेटाळण्याचा आणि परिणामांना तोंड देण्याचा धीटपणा अनेक वेळा दाखविला होता. तो अनुभव लक्षात घेऊन ट्रस्टींनी दुसरी एक शक्कल काढली. फौजदारी प्रतिबंधाला ठोकरुन त्या पोरांनी मेळा आत घुसवलाच, तर निदान गणपतीबाप्पाला अस्पृश्यांच्या स्पर्श तरी होऊ नये, एवढ्यासाठी वाड्यातल्या गणपतीच्या मखराभोवती लोखंडी पिंजरा उभारुन त्याला भलेभक्कम टाळे ठोकले. पण हे टाळेही फोडले तर?  त्याचाही एक मनाई हुकूम ट्रस्टींनी मिळवून तो टिळक बंधूंवर बजावण्यासाठी बेलिफाला वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला.

लोकमान्यांचा गणपती ट्रस्टींच्या तुरुंगात !

सकाळी एकदोन वेळा वाड्यात येऊन बेलिफाने रामभाऊ नि बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली. दोघांनीही बाहेर बस, आत वाड्यात पाऊल टाकलंस तर याद राखून ठेव, असं धमकावून त्याला बाहेर घालवला. एकदा तर रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेला. सामोपचाराने बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही, असे दिसताच,  ट्रस्टींपैकी एकाने कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द नाझरलाच वाड्यात आणले. त्यांनी टिळकबंधूंशी शक्य तितक्या सभ्यतेने आणि शांततेने चर्चा केली. हा प्रकार गणपतीच्या पिंज-याजवळच चालला होता. रामभाऊंनी एक मोठा हातोडा सद-याखाली लपवून आणला होता. नाझरसाहेबांचा कायदेबाजीचा सगळा वेदान्त ऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाला - अहो नाझर साहेब , आमच्या थोर वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारने तुरुंगातच खतम केली ना? आता सहन होणार नाही,  तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात. आमचे काम हेच. असे म्हणून रामभाऊने ताडकन हातोड्याचा प्रहार करून पिंज-याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर भिरकावून दिला. बिचारा नाझर काय करणार?  आला तसा निमूट परत गेला.

याच दिवशी संध्याकाळी पांडोबा राजभोज यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यात जाणार होता. वरील प्रकार झाल्यानंतर मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस. मी आहे येथे खबरदार,  असे बजावून रामभाऊने बापूला माझ्याकडे जाऊन बसायला पिटाळले. घडल्या प्रकाराची साग्रसंगीत हकिकत बापूने सांगितली. सबंध दिवस तो माझ्याकडे होता.

संध्याकाळी दिवेलागणी होताच तो पुणे कँपात भोकर वाडीला गेला. रात्री ८ वाजता मेळ्याला घेऊन तो प्रबोधन कचेरीवर आला. तेथे सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला. सदाशिव पेठेसारख्या बामणी अड्डयात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती. आजूबाजूला बघ्यांची खूप गर्दी जमली. मेळा तेथून गायकवाडवाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता.

इकडे गायकवाडवाड्याच्या दरवाजावर दोन गो-या सार्जंटांच्या अधिपत्याखाली एक पोलिसपार्टी अडसरासारखी उभी होती. रामभाऊ वाड्याबाहेर दरवाजासमोर एकटाच शतपावली घालीत फिरत होता. आमच्याकडून एक सायकलस्वार ५-५ , १०-१० मिनिटांनी तिकडे फे-या घालून रामभाऊच्या सूचना आणीत होता. खुशाल या, असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला. रस्त्यात बघ्यांची गर्दी उसळली. छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती.

मेळा गात गर्जत वाड्याजवळ येताच बापू आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले. दरवाजाजवळ येताच पोलीसपार्टीने दरवाजाला आपले कूस घातले. एका सार्जण्टाने दोन्ही हात पसरून ' यू कॅनॉट एण्टर द वाडा ' असा दम भरला. रामभाऊने एक मुसंडी मारून त्याला बाजूला सारले आणि पोलिसांची फळी फोडून तो आत घुसताच बरीच मंडळीही घुसली. त्या प्रचंड जनप्रवाहाला पाहून पोलिस नि सार्जंट बाजूला झाले. मेळा गणपतीसमोर जाऊन थांबताच पद्य-गायनाला जोरात सुरूवात झाली. सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर,  गुलाल प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि शांतपणे आला तसा बाहेर गेला. कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलीफ दोन तीन वेळा नोटिसीचा कागद हालवीत बापूजवळ आला. त्याने त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितले. मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा बापूजवळ आला. वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालेच होते. बापूने नोटिसीचा कागद हातात घेतला आणि टरटर फाडून टाकला.

मेळा गेल्यावर बापू आणि इतर ५-६ मंडळी प्रबोधन कचेरीत आली. हा शुक्रवारचा दिवस होता. मी चालू केलेल्या लोकहितवादी साप्ताहिकाचा अंक दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता. मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे आठवे पान राखून ठेवण्याचे बापूने सांगितले होते. मंडळी छापखान्यात येताच बापूने झाल्या हकीकतीचा वृत्तान्त सांगितला आणि तो श्रीपतराव शिंद्यांच्या चिरंजीवाने (माधवरावने) लिहून काढला. कंपोझिटर्स तयार होतेच. मजकूर कंपोझ होऊन, ' गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी',  या मथळ्याखाली सबंध पानभर हकिकत लोकहितवादी साप्ताहिकात छापून वक्तशीर बाहेर पडली.

बापूने आत्महत्या का केली ?

मनातली खळबळ,  संताप आणि चीड सगळे गाठोडे विश्वासाने आणि मनमोकळेपणाने आणून ओतण्याचे,  बापू टिळकाला अवघ्या पुण्यात मी आणि माझे बि-हाड हे एकच ठिकाण होते. वाड्यात ट्रस्टी लोकांशी काही गरमागरम बोलाचाली,  तंटाभांडण किंवा रामभाऊंबरोबर हातघाईचे प्रकरण झाले का बापू तडाड उठून माझ्याकडे यायचा. मध्यरात्रीसुद्धा. पुणेरी राजकारणाच्या कंकासाला कंटाळून पुण्याला रामराम ठोकून मी दादरला आलो नसतो,  तर माझी खात्री आहे,  बापूने आत्महत्या केलीच नसती.

असत्य, अन्याय, अप्रामाणिकपणा त्याला बिलकूल सहन होत नसे. तो एकदम उखडायचा. त्याच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या, तरी पुष्कळशा अगदी क्षुल्लक असत. त्यांचा पाढा तावातावाने त्याने माझ्यापुढे ओकला का धीराच्या नि विवेकाच्या चातर उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून मी त्याला शांत करीत असे. हरएक ब-यावाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनस्वी विचार करणा-यामंडळीना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेहीसोबती आप्त जवळपास नसला, म्हणजे ते लोक मनांतल्या मनांत कूढू लागतात. असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच बापू टिळकाची आत्महत्या ही दुदैवी घटना घडली!

एसएनडीटी युनिवर्सिटीतील प्राध्यापक डॉ. अनंत देशमुखांचं श्रीधरपंतांवरील पुस्तक तेव्हा तयार होतं. पण त्याचं प्रकाशन झालेलं नव्हतं. पुढे मला वाटतं पद्मगंधा प्रकाशनाने श्रीधर बळवंत टिळक या नावाने हे पुस्तक बाजारात आणलं. त्यातला एक महत्त्वाचा भाग आम्ही उचलून तेव्हा वेबसाईटवर टाकला होता. पुढच्या लिंकवर क्लिक केलात की तो वाचता येईल.


तसंच आणखी एक पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर होतं. टिळक गेले त्यावेळची गोष्ट. माझे खूप ज्येष्ठ मित्र नारायण बांदेकर यांनी संपादित केलेलं हे पुस्तक. त्यात लोकमान्यांवरचे मृत्युलेख एकत्र केलेले आहेत. त्यातला श्रीधरपंतांचा लेख आम्ही या सेग्मेंटमधे घेतला होता. तो पुढच्या लिंकवर क्लिक करून वाचता येईल. पुढे हे पुस्तक आलं. त्याचं अगदी बारीकसं परीक्षणही मी मटात लिहिलं. त्याचा शेवट मी मंडालेनंतरचे टिळक कसे वेगळे होते आणि त्याची दखल या कोणत्याच मृत्युलेखांत घेण्यात आलेली नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव कसे आहे, असं लिहिलं होतं. ते वाचून ज्योत्स्ना प्रकाशनचे विकास परांजपे यांनी मला त्यावर भाषण करायला बोलावलं होतं. मंडालेनंतरचे टिळक या विषयावर गिरगावच्या चित्पावन ब्राम्हण संघात माझं भाषण झालं. त्यात टिळकांनी मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेलं राजकारण. त्यांच्या शेवटच्या दिवसांतला त्यांनी जातिप्रथेला आणि कर्मकांडांना केलेला विरोध. त्यामुळे हुतात्मा दामोदरपंत चापेकर आणि बाबाराव सावरकर यांनी लोकमान्यांवर केलेली टीका. कम्युनिस्ट चळवळीकडचा त्यांचा ओढा. महात्मा गांधीजींशी त्यांचे जवळचे संबंध. त्या दोघांच्या राजकारणातलं साम्य यापैकी मला जे काही माहीत होतं, ते नम्रपणे सांगितलं होतं. मंडालेतला राजबंदी सांगण्यापेक्षा मंडालेनंतरचे लोकमान्य सांगणं आज जास्त रिलेवंट आहे. 


11 comments:

  1. रात्रीचे दीड वाजलेत आणि मी टिळक कंपनी वाचत बसलोय...थोडंस एडिट करत जावं...वाचताना दम लागला...माहितीये...मस्त...आजच कॉलेजात केसरी वर तन्ना सरांनी भाषण दिलं...महाराष्ट्रातील पत्रकारीता अभ्यासायची आहे त्यात...सॉलिड वाटलं वाचून...'मजबूत'

    ReplyDelete
  2. khup chhan mhiti aahe ....abhar manushi watatat ..tyamule ha chhan lihilya baddl aabhar

    ReplyDelete
  3. फार जबरदस्त लेख . धन्यवाद

    ReplyDelete
  4. खुपच छान माहिती.

    ReplyDelete
  5. या लेखामुळे वरील माहिती पहिल्यांदा समजली ...धन्यवाद !!

    ReplyDelete
  6. महत्वाची माहिती प्रथमच वाचनात आली

    ReplyDelete
  7. महत्वाची माहिती प्रथमच वाचनात आली

    ReplyDelete
  8. बोगस व निराधार माहीती.

    ReplyDelete
  9. Sachin ji had read it long back.rereading it too was interesting. U did great work. Write another piece on Tilak before mandale and after mandale. Keep it up. Make sure u r not tagged intellectual. All the best.

    ReplyDelete
  10. खूप सुंदर व माहितीपूर्ण लेख आहे सचिन जी, तुम्ही चित्रलेखात दिलीप मस्के यांची जी कव्हर स्टोरी लिहिली खूप छान आहे.

    ReplyDelete
  11. सकस...! टिळक आणि त्यापेक्षाही विवेकानंद नव्याने, लुच्च्या प्रचारापासून वेगळे उलगडून दाखवले पाहिजेत

    ReplyDelete