Friday 14 April 2017

धर्म जागो कबीराचा

पंढरपूरच्या कबीर मठातली ही कबीरांची समाधी
आज १४ एप्रिल. बाबासाहेबांची जयंती. हा दिवस आमच्या वाडीत मोठ्या उत्साहात साजरा होताना लहानपणापासून बघतोय. घोषणा देत निघणारी प्रभातफेरी. कव्वाली आणि भीमगीतांचा जलसा. बुद्धविहारापासून मेन रोडपर्यंतची लायटिंग आणि कमानी. चौकात बाबासाहेबांचा मोठा फोटो. यंदाही आमची वाडी सजलीय. बाबासाहेबांच्या मोठ्या फोटोखाली आणखी चार फोटो आहेत. बुद्ध, कबीर, शिवराय आणि फुले. बाबासाहेबांना कबीर, शिवराय आणि फुले यांच्यापासून तोडण्याचं षडयंत्र एकीकडे सुरू असताना, आमच्या वाडीत समावेशकतेचे विचार अजून शाबूत असल्याचं बघून बरं वाटलं.

बाबासाहेब जन्मले कबीरपंथी घरात. संत कबीराच्या संप्रदायाचा आजही प्रभाव असलेल्या परिसरात त्यांचा जन्म झालाय. त्यांचे वडील कबीराचे दोहे गायचे. बाबासाहेबांनी कबीरांना आपलं गुरू मानलंय, हे सगळ्यांनाच माहीत आहे. कबीरांचा हा प्रभाव फक्त बाबासाहेबांवरचा नाही तर तुकोबा ते जोतिबा या महाराष्ट्रीय क्रांतिकारकांवरही त्यांचा तितकाच प्रभाव आहे. पण हे फक्त एकतर्फी नाही. तर कबीरांवरही महाराष्ट्राचा त्यातही संत नामदेवांचा पक्का प्रभाव असल्याचं सहज आढळून येतं.


ज्ञानाचा एका, नामाचा तुका आणि कबीराचा शेखा अशी वारकरी परंपरा सांगितली जाते. युवा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून बोलताना मी त्यात चोख्याचा भीमा अशी जोड सूचवली होती. ब्राह्मण, बहुजन, अल्पसंख्याक यांच्याबरोबरच दलितांचं योगदानही महाराष्ट्रात आणि वारकऱ्यांतही महत्त्वाचं आहे. ते यामुळे अधोरेखित होऊ शकेल आणि वारकरी परंपरा पुन्हा एकदा आपल्या बंडखोर स्वभावाशी नातं सांगण्याची शक्यता वाढेल. पण तसं करण्याची हिंमत आताचे वारकरी संप्रदायाचे धुरीण करू शकतील असं वाटत नाही. जाऊ दे. 

बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माईसाहेबांचं माहेरचं आडनाव कबीर होतं. कबीरांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातल्या अनेकांची आडनावं कबीर आहेत. ही देखील नोंद ठेवायला हवी. पुण्याचे चांद शेख यांनी गस्त या दिवाळी अंकाचा कबीर विशेषांक दोन वर्षांपूर्वी काढला होता. त्यात कबीर आणि वारकरी परंपरेच्या परस्परप्रभावावरचा एक लेख लिहिला होता. त्यात संतपरंपरेच्या पलीकडचा महाराष्ट्रावरचा कबीरांचा प्रभाव लिहिलेला नाही. तो बराच मोठा आहे. 

लेख इथे टाकतोय नेहमीप्रमाणे.
...

`खेळ मांडियेला वाळवंटी घाई...` हा तुकोबारायांचा एक अफलातून अभंग आहे. याला गाताना वारकरी स्वतःला विसरून जातो. कीर्तनकारांनी कितीही सोडवला तरी पुरून उरतो. अभ्यासकाला वारकरी परंपरेची महती सांगता सर्वाधिक मदतीला धावतो. त्यामुळे जिथे कुठे वारकरी परंपरा, तिथे हा अभंग असतोच असतो. चंद्रभागेच्या तीरावर क्रांतीची पताका गगनाशी मिळाली, त्याचं एवढं साधंसोपं, हसतखेळत पण नेमकं वर्णन इतर कुठे सापडणं कठीणच. वर्णाचा अभिमान विसरून एकमेकांना लोटांगण घातल्यानेच भवसागर उतरण्यासाठीची पायवाट सोपी होते आणि मातलेल्या वारकरी वीरांनी ती करून दाखवलेली आहे, हे तुकाराम महाराज ठामपणे सांगतात.

हा अभंग संत तुकारामांच्या गाथेत १८९ नंबरवर `टिपरी` या मथळ्याखाली येणाऱ्या सात अभंगांपैकी पहिला आहे. त्यापाठोपाठ येणारा अभंग तितक्याच ताकदीचा आहे, `एके घाई खेळता न पडसी डाई...` वारकरी परंपरेचा हा खेळ मांडणारे आपले चार पूर्वसुरी तुकोबारायांनी या अभंगात सांगितले आहेत. संत नामदेव, ज्ञानेश्वर माऊली, संत कबीर आणि संत एकनाथ हे त्यांनी सांगितलेलं खेळियांचं चतुष्टय आपली या अभंगात गळाभेट घेतं. इतरही खेळिये होऊन गेलेत पण त्यातले हे चार महत्त्वाचे, असं तुकोबा या चौघांशी आपली ओळख करून देतात. कबीरांविषयी ते सांगतात,
रामा बसवंत कबिर खेळिया जोडा बरवा मिळाला रे।
पांचा सवंगडियां एक चि घाई तेथे नाद बरवा उमटला रे।
ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनी तो ही खेळ निवडिला रे।।

नामदेव, ज्ञानेश्वर आणि एकनाथ यांचं ऋण तुकोबारायांनी व्यक्त करणं अत्यंत स्वाभाविकच आहे. त्यात पंढरपूरपासून हजारो किलोमीटर अंतरावरच्या संत कबीरांचा उल्लेख पाहून अनेक जण चाट पडू शकत नाही. पण खुद्द तुकारामच कबीरांना थेट वारकरी परंपरेचा एक भाग असल्याचं सांगत असल्यामुळे त्यात काही शंकाकुशंकांनाही थारा उरत नाही. विशेष म्हणजे या अभंगांतला क्रमही महत्त्वाचा आहे. नामदेव, ज्ञानेश्वर यांच्या पाठोपाठ कबीर आहेत आणि नंतर एकनाथ महाराज. बहुधा ऐतिहासिक कालानुक्रमानुसार हा क्रम असावा. शिवाय कबीरांचा हा उल्लेख म्हणजे काही अपवाद नाही. संतांच्या मांदियाळीचा उल्लेख तुकोबाराय करतात, त्या जवळपास प्रत्येक ठिकाणी कबीर आहेतच आहेत.

कबीरांचा तुकोबारायांवरचा प्रभाव स्पष्ट आहे. तुकारामांवरचा प्रभाव याचाच अर्थ म्हणजे महाराष्ट्रावरचा प्रभाव. कारण तुकोबारायांइतका महाराष्ट्रावर प्रभाव टाकणारा दुसरा कुणी नाही. अभ्यासकांनी या दोन संतांमधला ऋणानुबंध अनेक ठिकाणी मांडला आहे. पण आजच्या संदर्भात संतपरंपरेकडे पाहणाऱ्यांना याचं आश्चर्य वाटतं. वारकऱ्यांसाठी तर यात काहीच नवीन नाही. तुकारामांनी सांगितलेल्या पूर्वसुरींच्या संतचतुष्टयात तुकाराम महाराजांची भर टाकून वारकऱ्यांनी प्रमुख संतांचं जे पंचक बनवलं त्यात नामदेव, ज्ञानेश्वर, कबीर, एकनाथ आणि तुकाराम आहे. वारकरी परंपरेत कीर्तन किंवा प्रवचन करताना परंपरेबाहेरच्या कुणाचाही उल्लेख न करण्याचा दंडक आहे. त्यामुळेच कबीरांच्या हिंदी दोह्यांना कीर्तनात आवर्जून स्थान देण्यात आलं आहे. हा नियमाला असलेला अपवाद नाही, उलट कबीर हे वारकरीच असल्याचा ठाम विश्वास आहे. उत्तरेतल्या अन्य कोणत्याही संताच्या रचना जशा कीर्तनात नसतात तशाच परंपरेच्या बाहेरच्या महाराष्ट्रातल्याच समर्थ रामदासांना कीर्तनात स्थान दिलं जात नाही. कबीरांचं वारकरी परंपरेतलं स्थान आहेच इतकं घट्ट.

आज आपल्याला आश्चर्य वाटेल पण न्यायमूर्ती रानडेंच्या काळापर्यंत संत कबीरांची पालखी काशीहून पंढरपुरात येत होती. आज आळंदीहून माऊलींची, देहूहून तुकोबांची, पैठणहून नाथमहाराजांची पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरहून येते, तशी वाराणशीहून कबीरांची पालखी पंढरपुराला येत असे. `श्री विठोबा रखुमाई देवस्थान समिती, देहू` यांनी `श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा उगम व विकास` ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. संतपरंपरेचे निष्णात जाणकार श्रीधरबुवा मोरे यांनी याचं लेखन केलं आहे. त्यात रानडेंचा संदर्भ देऊन कबीरांच्या पालखीचा संदर्भ थोडक्यात नोंदवला आहे. न्यायमूर्तींनी पुण्याच्या नगर वाचन मंदिराजवळून पालखी सोहळा जाताना पाहिला. त्यातले नामगजरात देहभान विसरून नाचणारे हजारो वारकरी पाहून त्यांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. त्यातून त्यांचं पालखी सोहळ्याविषयी कुतूहल जागं झालं. महाराष्ट्राचा एकोपा टिकवणारी ही परंपरा समाजशास्त्रीय अंगाने समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे आधुनिक अभ्यासपद्धतीतून वारकरी परंपरा पहिल्यांदाच अभ्यासली गेली. त्यांनी ज्ञानेश्वर – तुकाराम पालखी सोहळ्यांमधील फडांच्या आणि दिंड्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. त्यांची नावं, जाती आणि व्यवसायाच्या नोंदी त्यांनी केल्या. त्यातून वारकरी परंपरेच्या व्यापकतेची आणि सर्वसमावेशकतेची ओळख त्यांना झाली. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्यामागील खरी प्रेरणा संतपरंपरेची होती हा सिद्धांत त्यांनी पहिल्यांदा मांडला. त्यामागे हेच चिंतन असावं. रानडेंनी केलेल्या पालखी सोहळ्याच्या अभ्यासात अन्य संतांच्या पालख्यांबरोबरच कबीरांच्या काशीहून येणाऱ्या पालखी सोहळ्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. त्याशिवाय १९२० साली लिहिल्या गेलेल्या एका पंढरीवर्णनात उत्तर हिंदुस्थानातून कबीरांची पालखी पंढरपुराला येत असे, असा दाखलाही श्रीधरबुवांच्या पुस्तकात दिलेला आहे.

योगायोग आहे, पण यातलं १९२० हे वर्षं अनेक दृष्टींनी महत्त्वाचं आहे. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय आवाका असलेलं सर्वमान्य नेतृत्व महाराष्ट्रात विकसित झालेलं नाही. त्यामुळे त्यापूर्वीच्या इतिहासात कायम देशभर प्रभाव असलेला आणि देशाचा विचार करणारा मराठी बाणा संकुचित होत गेला. इतर प्रांतीयांना तुच्छ मानण्यात महाराष्ट्राची अस्मिता धन्य मानू लागली. कबीरांना आपलं मानण्याची व्यापकता त्यात उरली नाही. नेमक्या त्याच काळात वारकरी संप्रदायाची ताकद ओळखलेल्या जातिभिमानी मानसिकतेच्या मंडळींनी योजनापूर्वक त्यात शिरकाव करत आपला प्रभाव निर्माण करण्यात काही प्रमाणात यश मिळवले होतं. कारणं नेमकेपणानं सांगणं कठीणच आहेत. पण आज कबीरांच्या पालखीची परंपरा खंडित झालेली आहे. आज प्रत्येक छोट्या मोठ्या संतांच्या पालख्या नव्याने सुरू होत असताना कबीरांची ही पालखी मात्र आढळत नाही. तिच्या कोणत्याही सविस्तर नोंदी आपल्याकडे नाहीत. अभ्यासकांनी त्याचा माग काढायला हवा. त्यातून उत्तर भारताशी महाराष्ट्राचा वेगळा ऋणानुबंध समोर येऊ शकेल.

पंढरपुरातल्या कबीर मठाची दर्शनी बाजू
या पालखीचा शोध घेत फार तर पंढरपुरातल्या कबीर मठापर्यंत जाता येतं. दत्त घाटावर दिंडीरवनापासून हाकेच्या अंतरावर कबीर मठ उभा आहे. विटांचं हे एकमजली बांधकाम बरंच जुनं असावं. आज ते जीर्ण वाटतं पण चंद्रभागेच्या किनाऱ्यावर पुरांचे वार झेलत इतकी वर्षं उभं राहणं, सोपं काम नाहीच. या इमारतीच्या मागेच मठाची नवी इमारत उभी राहते आहे. विष्णुमहाराज कबीर हे आज या कबीरमठाचे प्रमुख आहेत. त्यांनी फडाच्या नव्या जुन्या अनुयायांना एकत्र आणून मठाचा जीर्णोद्धार केलाय. विविध उपक्रम राबवून कबीरमठाला नव्याने ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. कबीरांची पालखी वाराणशीहून पंढरपुरात येत होती यावर ते शिक्कामोर्तब करतात पण त्याविषयी ते फार काही सांगू शकत नाहीत. अशी पालखी येत होती, या पालखीमध्ये प्रामुख्याने कबीरपंथी साधूंचा समावेश होता. वाराणसी ते पंढरपूर असा पालखी सोहळ्यासाठीचा पायी प्रवास हा त्यांच्या वार्षिक वेळापत्रकामधला एक भाग होता. विसाव्या शतकात कबीरपंथी संन्याशांची संख्या कमी होत गेल्यामुळे या पालखी सोहळ्याचं अस्तित्व संपलं, असा तर्क विष्णूमहाराज सांगतात. या पालखीचा कोणत्याही लेखी नोंदी त्यांच्यापाशी नाहीत.

मात्र कबीरपंथी साधूंचा महाराष्ट्रात गेल्या शतकाच्या पूर्वार्धात चांगलाच संचार होता असे अनेक संदर्भ गावागाड्याच्या जुन्या वर्णनांमध्ये आढळतात. `तुकाराम` या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित सिनेमात कबीरांचे दोहे गात फिरणाऱ्या कबीरपंथी साधूंचे दर्शन घडतं, ते त्यामुळेच. मुंबईसारख्या शहरातदेखील कबीरपंथी साधू येत होतेच. जुन्या मुंबईचं डॉक्युमेंटेशन दाखवणाऱ्या राणीच्या बागेतील भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये वेगवेगळ्या भिक्षेकरी साधूंच्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. त्यात कबीरपंथी साधू लक्ष वेधून घेतो. वेगवेगळ्या उपपंथांशीं संबंधित कबीरपंथी कुटुंबे महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये आहेत. त्यापैकी काही जणांची आडनावे कबीर अशीच आहेत. कबीरपंथीयांचे मठही राज्याच्या विविध भागात आहेत. पण त्यांपैकी काही मठ सक्रिय नाहीत तर बहुतांश मठ वारकरी संप्रदायाचा भाग बनलेले आहे. आळंदीतील कबीरमठही प्रसिद्ध आहे. या साऱ्या मठांमधून कबीर आणि महाराष्ट्र हा समृद्ध ऋणानुबंध जाणते अजाणतेपणे दृढ करण्याचे काम सुरू आहे.

पंढरपुरातल्या कबीरमठाला मोठा इतिहास आहे. कबीरांचे लाडके सुपुत्र कमाल महाराज यांनी या परंपरेची सुरुवात केली असं मानलं जातं. कबीरांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी कसा करावा यावरून त्यांच्या हिंदू आणि मुसलमान अनुयायांमध्ये भांडण झालं. अनुयायांनी त्यांच्या मृतदेहावरची चादर काढली तेव्हा त्यांना तिथे सब्जा आणि तुळस मिळाली. पैकी सब्जा घेऊन मुसलमानांनी वाराणशीत कबर बांधली तर हिंदूंनी तुळस पंढरपुरात आणून त्यांची समाधी बांधली, अशी कथा आहे. ती समाधी या मठात असल्याचं मानलं जातं. कबीर अविवाहित असल्याची धारणा असलेल्यांनी कमालांना कबीरांचे शिष्य ठरवलं आहे. पण कबीरांनीच कमालांचा उल्लेख पूत असा केलेला आहे. कबीरांच्या अनेक कथा कमालांभोवती फिरतात. त्यामुळे कमाल हे कबीरांचे लाडके पुत्र होते, याबद्दल शंका उरत नाही. कमाल हे पित्यासारखेच कर्तृत्ववान होते. त्यांनी कबीरांची प्रबोधनाची परंपरा पुढे नेली. कबीरांच्या निधनानंतर वाराणशीत होणाऱ्या सनातन्यांच्या त्रासाला कंटाळून कमाल पंढरपुरात आले. मृत्यूपर्यंत ते इथेच राहिले. त्यांची समाधीदेखील पंढरपुरातल्या कबीरमठात आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

एका समाधीवजा चौथऱ्यावर असलेली संत कबीरांची एक प्राचीन अर्धमूर्ती हे या मठातील प्रमुख आराध्यस्थान आहे. त्याला `श्रीरामस्वरूप कबीर` असं म्हटलं जातं. देव्हाऱ्यात असतात तशा धातूच्या अनेक देवमूर्तीही कबीरांच्या मूर्तीजवळ ठेवलेल्या आहेत. कबीर महाराजांची गादीही मठाला भेट देणाऱ्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे. तिथे कमाल महाराजांच्या पादुका ठेवून विश्वस्तभावनेने या गादीची परंपरा टिकवली जाते. त्यासोबत तिथे कबीरांचं तरुणपणातलं चित्र आहे. हे चित्र मठातल्या मूर्तीशी जवळीक साधणारं आणि कबीरांच्या नेहमीच्या दाढीतल्या चित्रापेक्षा वेगळं आहे. याशिवाय तिथे पांढरा ध्वजही आहे. वारकरी संप्रदायाचा एक भाग असूनही परंपरा म्हणून पांढरा ध्वज मठाची ओळख बनलेला आहे. मठाच्या दर्शनी शिरोभागावरदेखील कबीरांचा हा ध्वज फडकत असतो. कबीरांचे गुरू रामानंदांपासून आजच्या विष्णूमहाराजांपर्यंत गुरुपरंपरेचा आलेख असलेलं एक चित्रही या मठात आहे. त्यातील कडूमहाराज आणि रघुनाथमहाराज यांच्याही समाध्या मठात आहेत. सुरुवातीला अनेक पिढ्या संन्यासी अनुयायीच मठाधीश होते. पण काही शतकांनंतर गादीचे उत्तराधिकारी वंशपरंपरागत ठरवले जाऊ लागले.

१८४५ साली या परंपरेला स्थिरता आली आणि मठाला `श्रीरामकबीर मठ` असं नाव मिळालं तसेच वारकरी परंपरेत त्याला `श्री कबीर महाराजांचा फड` अशी ओळख मिळाली. या मठाचा संप्रदाय रामानंदी वारकरी संप्रदाय या नावाने ओळखला जातो. `सत साहेब सत कबीर, जय जय राम रघुवीर` असं कबीरांचं परंपरागत भजन इथे गायलं जातं, अशी माहिती भागवत कबीर यांनी `श्रीसंत कबीरलीलामृत` या ग्रंथाच्या सुरुवातीला दिली आहे. मठात वर्षभर विविध कार्यक्रम केले जातात. आषाढी - कार्तिकी एकादशीला भिक्षा मागण्यासाठी परंपरागत वेशात होणारी पंढरपूर प्रदक्षिणा, अश्विन वद्य त्रयोदशी या कमाल महाराजांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्यात संत नामदेवांचे वंशज नामदास महाराजांचे कीर्तन आणि संत गोरा कुंभार यांच्या समाधी सोहळ्यासाठी चैत्र महिन्यात पंढरपूर ते तेर अशी दिंडी या गोष्टी या वार्षिक उपचारांमधल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत.

विष्णूमहाराजांच्याच प्रयत्नांतून `श्रीसंत कबीरलीलामृत` नावाचा ग्रंथ प्रकाशित कऱण्यात आला आहे. कबीरांच्या रचना हिंदीत असल्याने त्यांचं महात्म्य मराठी वारकऱ्यांना कळावं, यासाठी आधुनिक संतचरित्रकार दासगणू महाराजांच्या वंशज गौरी चंद्रशेखर आठवले यांनी हा ओवीबद्ध ग्रंथ रचला आहे. त्यात कबीरांचं चरित्र, विशेषतः त्यांचे चमत्कार यांचं रसाळ वर्णन आढळतं. कबीरांनी सनातन धर्म जागवण्याचं तसंच आर्यधर्माचा प्रसार करण्याचं काम केलं असा दावा या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे सामाजिक बंडखोरी, वर्णवर्चस्वाविरोधातील त्यांचा विद्रोह आणि कर्मकांड पाखंडांचा जळजळीत निषेध, हे कबीरांच्या शिकवणुकीचं प्रमुख सार भाविकांपर्यंत पोहोचू नये याची पुरेपूर काळजी यात घेतली गेली आहे. कबीर किंवा कबीरांचे आईवडील मुस्लिम होते की नव्हते, कबीर हे यवनी नाव त्यांना कसे मिळाले इथपासून ते कबीरांना आदरस्थानी असलेल्या शेख तकी यांना व्हिलन ठरवेपर्यंत कवयित्रीला खूप कसरत करावी लागली आहे. कबीरांना हिंदू ठरवण्यासाठी आपल्याला सोयीचे जुने संदर्भ घेऊन लिहिलेली ही पोथी आहे. इतिहासाची आपल्याला हवी तशी जोडतोड करण्याचं आधुनिक उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल.

कबीर मठातले सध्याचे प्रमुख विष्णुमहाराज कबीर 
या ग्रंथाच्या निर्मितीची कथा विष्णूमहाराजांनी प्रकाशकीयात सांगितली आहे. त्यातून समोर येणारी वैचारिक प्रेरणा स्वयंस्पष्ट आहे. ते लिहितात, `साधारणतः १९८४-८५ साली श्री शेखरअण्णांची (चंद्रशेखर महाराज आठवले) आणि माझी प्रथम भेट चंद्रभागेच्या वाळवंटात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सायंशाखेच्या होणाऱ्या संचलनाच्या पूर्वतयारी दरम्यान झाली. जेव्हा आमचे लक्ष एकमेकांकडे गेले, त्यावेळी आमच्या दोघांचा एकमेकांना कसलाच परिचय नव्हता. आम्ही एकमेकांकडे वादननिमित्ताने आकर्षित झालो असू तरी अंतरातली मूळ ओढ समानशिलेषु व्यसनेषु सख्यम् अशी काही वेगळीच होती. आमच्या मनाच्या तारा जुळल्या. या ऋणानुबंधातूनच लेखिकेला ह्या लीलामृताची प्रेरणा मिळून काही संकेत प्राप्त होऊन या ग्रंथाची निर्मिती झाली.`

फक्त `श्रीसंत कबीरलीलामृता`तूनच नाही तर कबीरांचं चरित्र सांगणाऱ्या सर्वच प्रमुख पारंपरिक ग्रंथांमधून कबीरांचा बंडखोर विचार पुढे येत नाही. वारकऱ्यांना वंदनीय असलेल्या महिपतीबुवा कांबळे ताहराबादकर यांच्या `भक्तविजय` ग्रंथाचाही आपल्याला अपवाद करता येत नाही. नाभाजी या हिंदीतील आद्य संतचरित्रकाराच्या `भक्तमाले`ची प्रेरणा आणि आधार `भक्तविजया`ला असल्यामुळे संत कबीरांच्या चरित्राला यात मोठी जागा मिळालेली आहे. अध्याय पाच, सहा, सात यांत कबीरांच्या विविध चमत्कारांविषय़ी सलग लिहिलं आहे. अकराव्या अध्यायात संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊली यांनी वाराणशीत जाऊन कबीरांची भेट घेतल्याचं वर्णन आहे. तेव्हा माऊलींनी कबीरांना पंढरपूरभेटीचं आमंत्रणही दिलेलं आहे. एकविसाव्या अध्यायात संत जनाबाईंची थोरवी गाताना कबीरांच्या पंढरपूर भेटीचं रसाळ वर्णन आहे. य़ाशिवाय चोविसाव्या अध्यायातही अचानक कबीरांची एक कथा भेटीला येते. आधुनिक अभ्यासकांच्या मतानुसार कबीर हे ज्ञानेश्वर, नामदेव आणि जनाबाई या समकालींनांच्या नंतरचे आहेत. पण ते एकाच काळातील असल्याची भाविकांची श्रद्धा आहे आणि त्याला धरून अनेक कथा आजही सांगितल्या जातात. त्यात कबीर आणि जनाबाईंच्या भेटीची कहाणी सर्वाधिक लोकप्रिय आहे. प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार डॉ. रंगनाथ तिवारी यांनी `रिंगण` वार्षिकाच्या संत जनाबाई विशेषांकात ती सांगितली आहे. ती अशी...
`भक्तीचा सोहळा सोडून वाराणसीला कशाला जावं? म्हणे तिथं गेल्यावर मुक्ती मिळते. ती मुक्ती तर माझ्या पंढरीत पावलोपावली आहे. शिखर दर्शन झालं की भीमातीरी मोक्ष. पुंडलिकाच्या पायी लागताच मुक्तीची महत्ता वाया जाते. मुक्ती तर इथे घरोघर दासी म्हणून वावरते आणि मोक्ष पाठीमागे सतत उभा असतो. मोक्ष मुक्ती तर पायदळी लोळतात इथे. कसं आहे, समर्थांच्या, श्रीमंतांच्या दारावर भीक म्हणून थोडंबहुत काहीबाही वाढतातच. पण पंचपक्वान्न सोडून भिकेचे डोहाळे कशाला धरावे? इथे तर साम्राज्याचे सुख आहे मोक्ष मुक्तीच्या पलिकडले. आम्हाला नको वाराणसी.

पण वाराणसीचा कबीर आला ना पंढरीला. भीमेला पूर. लोक काठावर थांबलेले. कबीर म्हणाला चला. संसार सागर पार करण्याचं साधन विठू. तो कमरेवर हात ठेवून म्हणतोय पाणी फार नाही. कबीर विठ्ठल विठ्ठल म्हणत पैलतीरी गेले. पंढरीत गवगवा झाला. भीमेला पूर असताना वाराणसीचा कबीर विठ्ठलनाम घेत विठ्ठलाच्या दर्शनाला आला. कबीराच्या दर्शनाला पंढरी लोटली. जनीला पण जायचं होतं पण वाळलेल्या गोवऱ्या गोळा करण्यावरून तिचा दुसऱ्या गोवऱ्या गोळा करणाऱ्या बाईशी झाला वाद.
`अहो महाराज, आमचा वाद मिटवा.`
`मी वाद कसा मिटवणार? मला काय माहीत तुमच्या गोवऱ्या कोणत्या? मग मी कसं ओळखणार?`
`महाराज, माझ्या गोवऱ्या कानाशी धरल्या की त्यातून विठ्ठल विठ्ठल नाद ऐकू येतो. कानाशी धरून ऐका ना.`
कबीराने गोवरी कानाशी लावली. त्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येऊ लागला. `आवाज तर येतोय.`
`तर त्या गोवऱ्या माझ्या. ज्यातून असा आवाज येत नाही त्या तिच्या, त्या माझ्या नाहीत.` कबीर विचार करू लागला. गोवऱ्या थापणाऱ्या हातांनी निर्जीव गोवऱ्यांना चैतन्य प्रदान केलं. ही कसली साधना? तो विचार करत बसला आणि गोवऱ्यांसाठी भांडणाऱ्या बाया गेल्या. `या कोण?`, कबीराने भोवती उभारलेल्या लोकांना विचारलं. `ह्या होय – ही तर जनी, नामयाची जनी.`  जनी कबीराचा नक्षा उतरून निघून गेली.
कबीरा कबीरा क्या करे, जा भीमा के तीर
इक जनी की भक्ती में, बह गए लाख कबीर
कबीराच्या नावावर वर्षानुवर्षे लोक कहे कबीर म्हणून रचना करत आहेत. मग आपण का करू नये?`

सनावळ्यांच्या हिशेबात ही भेट मान्य होत नाही. पण साडेसातशे वर्षांपूर्वी एक महिला. तीदेखील दासी भक्तीच्या बळावर पुरोहितशाहीला धक्का देते. जातिभेद, वर्णवर्चस्व आणि कर्मकांड यांना छेद देत अनेक दशकं वारकरी चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या जनाबाईंचं कर्तृत्व आणि विचार काय आहेत, हे समजून घेण्यासाठी कबीर पंढरपुरात आले असतील, तर नवल ते काय? आता ते जनाबाईंच्या हयातीत घडलं की मृत्यूनंतर हाच तपशिलाचा भाग उरतो. पण कबीर श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी नाही तर जनाबाईंना भेटण्यासाठी येतात, त्यात कबीरांचं वेगळेपण ठसठशीतपणे दिसून येतं. पंढरपुरात आल्यानंतर कबीर संतमेळ्यात हरखून गेले असंही वर्णन परंपरा करत आलेली आहे. त्याचं वर्णन करणारा एक अद्भूत अभंगही जनाबाईंच्या नावावर आहे,
नामदेव कीर्तन करी । पुढे देव नाचे पांडुरंग।।....
नाचता नाचता देवाचा गळला पितांबर । सावध होई देवा ऐसे बोले कबीर।।

खुद्द कबीरांनीही जनाबाईंविषयी काही दोहे लिहिल्याची नोंद आहे. तसंच कमरेवर हात ठेवणाऱ्या विठ्ठलाचं वर्णन करणारे त्यांचे दोहे प्रसिद्ध आहेत.
ग्रिहु तजि बनखंड जाइऐ चुनि लाइऐ कंदा।
अजहु विकास छोडई पापी मनु मंदा।।
कि छटउ कैसे तरउ भव जल निधी भारी।
राखु राखउ मेरे बीठुला जनु सरनि तुम्हारी।।

आपल्या ज्ञानदीपाच्या प्रभावाने उत्तर भारत जिंकणाऱ्या संत नामदेवांचा प्रभाव कबीरांवर होता हे स्वयंस्पष्ट आहे. त्यांनी नामदेवांचा उल्लेख आपल्या काव्यात केलेला आहे. नामदेवांनी कबीरांच्या आधी अनेक वर्षं हिंदी संतकाव्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यामुळे नवे अभ्यासक कबीरांच्या जागी नामदेवांना हिंदीचे आद्यकवी म्हणून सन्मान करत आहेत. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी तर कबीरांवर रामानंदांपेक्षाही अधिक प्रभाव नामदेवांचाच होता, अशी साधार आणि सविस्तर मांडणी केली आहे. ते म्हणतात, `नामदेव आणि कबीर यांच्या काळांत जरी दोनशे वर्षांचे अंतर असले, तरी त्यांचा पारस्परिक अनुबंध सुस्पष्ट आहे. नामदेवांच्या हिंदी पदसाहित्याचा भरपूर प्रभाव कबीरवाणीवर आढळतो. कबीरवाणीवर अशा आणि एवढा प्रभाव अन्य कुणा पूर्वकालीन वा समकालीन व्यक्तीचा असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून कबीरांना रामानंदांपेक्षा संत नामदेवांचे पूर्वरचित वाङ्मय प्रभावित व प्रेरित करणारे होते, असे म्हणावे लागते.`

कबीर नामदेवांचे समकालीन होते का? त्यांनी पंढरपुराला खरंच भेट दिली होती का? खरंच कमालांनी पंढरपुरात दीर्घकाल वास्तव्य केलं होतं का? या साऱ्या प्रश्नांची कोडी आहेत खऱी. अभ्यास करून त्यावर अधिक प्रकाश टाकणं जरुरीचं आहे. पण विचारांच्या दृष्टीने कबीरांची जवळीक वारकरी संतांशी जितकी आहे तितकी इतर कुणाशीही नाही, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळेच वारकरी परंपरा कोणताही किंतु मनात न ठेवता कबीरांना आपला मानत आली आहे. य़ाच अद्वैतातून कीर्तनकारांनी पुढे कथा रचल्या असाव्यात. या कथा महाराष्ट्राच्या लोकमानसाशी इतक्या एकरूप झाल्या आहेत की त्यातून सत्य शोधणं अवघड बनलं आहे. डॉ. सदानंद मोरे यांनी `तुकाराम दर्शन` या महाग्रंथात याचं मर्म अगदी नेमकेपणाने मांडलं आहे. ते असं, `भक्त हा व्यक्तिवादी असतो तर संत हा सामाजिकतेने भारलेला असतो. स्वतःचा मोक्ष ही बाब त्याच्या दृष्टीने गौण असते. उत्तर भारतातील अनेक सत्पुरुषांपैकी वारकरी परंपरेने केवळ कबीरांना स्वीकारले याचे कारण कबीर हे संत होते, बाकीचे भक्त होते.`

`ज्ञानाचा एका, नामाचा तुका आणि कबीराचा शेखा` अशी महाराष्ट्रीय संतांची परंपरा आजचा वारकरी संप्रदायही मानतो. ज्ञानेश्वर – एकनाथ, नामदेव – तुकाराम आणि कबीर – शेख महंमद अशी ही परंपरा आहे. ब्राह्मण आणि बहुजन समाजाबरोबर अल्पसंख्याक मुसलमानांनाही वारकरी परंपरेनं मानाचं स्थान दिलेलं आहे. कबीर आणि शेख महंमदांना परंपरेत मोठा मान आहे. इतर कोणताही संप्रदाय मुस्लिमांना स्वीकारू शकला नाही इतक्या सहजतेने वारकऱ्यांनी मुसलमानांना सामावून घेतले आहे. उत्तर भारताला जवळून ओळखणाऱ्या नामदेवांनी वारकरी परंपरेचा संघटनात्मक आणि वैचारिक पाया रचतानाच या सर्वधर्मसमन्वयासाठी स्कोप तयार ठेवला होता. कबीरांनी त्याला मूर्त स्वरूप दिलं. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याच्या शेख महंमदांनी वारकऱ्यांसमोर त्याचा आदर्श उभा केला. शेख महंमदांना कबीरांचा अवतार मानलं जातं. त्याच प्रेरणेतून आज जैतूनबी, राजूबाबा शेख, यू. म. पठाणांपर्यंत वारकरी संप्रदायाशी जोडलेल्या शेकडो मुस्लिमांची परंपरा सशक्तपणे उभी आहे. मुस्लिम असले तरी हिंदू संप्रदायांशी संबंधित रचना करणाऱ्या महाराष्ट्र भूमीतल्या किमान चाळीस तरी संतकवींची नोंद आज आपल्यापाशी आहे. कबीर मुसलमान असले तरी वारकरी म्हणून स्वीकारणं महाराष्ट्रासाठी त्यामुळेच सोपं होतं. या पार्श्वभूमीवर आजच्या संदर्भात कबीर, शेख महंमद आणि साईबाबा या महाराष्ट्रावर प्रभाव टाकणाऱ्या तीन मुस्लिम संतांचा अनुबंध कुणी अभ्यासकाने सविस्तर मांडला तर ते आपल्यावर उपकार होतील.

ज्ञानेश्वर माऊलींनी `धर्म जागो निवृत्तीचा` असं मागणं केलं होतं. त्याच धर्तीवर शेख महंमदांचे शिष्य मुधा पांगुळ यांनी आपल्या गुरुविषयी `धर्म जागो महंमदाचा। त्याच्या दाना अगणित रुचा।` असं लिहिलं आहे. आज आपल्याला `धर्म जागो कबीराचा` म्हणायची गरज येऊन ठेपली आहे. खरं तर धर्म निवृतीचा असो शेख महंमदांचा किंवा कबीराचा, आहे तर एकच. हा जगाला प्रेम अर्पावे सांगत माणुसकीचं मूळ असणारा धर्म आहे. आज हा धर्म प्रभावी नाही म्हणून तर आपल्या समृद्ध वारशाची वीण उसवत चाललेली आहे.

गायीचं मास खाल्लं म्हणून एका माणसाला ठेचून मारणाऱ्यांचा द्वेषाचा धर्म हवेत दाटलेला असताना आज कबीरांच्या धर्माची गरज आहे. त्यासाठी कबीरांच्या धर्माची पताका खांद्यावर घेऊन नाचायला हवंय. कारण समाजपुरुषाच्या चिघळलेल्या अनेक जखमा बऱ्या करण्याचं सामर्थ्य या धर्मात आहे. हिंदू आणि मुसलमानांमध्ये द्वेषाचा विखार तर आहेच. राजकारण्यांनी स्वतःच्या पक्षीय स्वार्थासाठी मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये द्वेष पेरलेला आहे. त्यामुळे आज वाराणशीहून पंढरपुराला जाणारी कबीरांची पालखी पुन्हा सुरू व्हायला हवी आहे. इंटरनेटवर शोधल्यास वाराणसी आणि पंढरपुरातलं अंतर १४३३ किलोमीटर आहे. तंत्रज्ञानाच्या युगात हे अंतर कापणं कठीण नाही. पण विचारांचं काय? पण तो वारसा पेलू शकणारं कुणी आहे का? कबीरांच्या धर्माची पालखी घेऊन वाराणसी ते पंढरपूर हे अंतर पार करावंच लागेल. कारण फक्त त्यातूनच नरेंद्र मोदींच्या वाराणशीतून संत कबीरांच्या वाराणशीपर्यंत परत जाण्याचा रस्ता सापडण्याची शक्यता आहे.



5 comments:

  1. Mast and analytical too. 👍👍👍

    ReplyDelete
  2. Conclusion is really 'Marmik'..!

    ReplyDelete
  3. कबीरांच्या धर्माची पताका खांद्यावर घेऊन नाचायला हवंय. या व्यतिरिक्त मी काही लिहूच शकत नाही. जबरदस्त.. धन्यवाद सर.

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर आणि जतन करून ठेवावा असा लेख

    ReplyDelete