उभ्या असलेल्या एकाच्या मोबाइलवर `जन गण मन` वाजायला लागतं.
जवळच बसलेला राष्ट्रगीताला मान द्यायचा म्हणून उभा राहतो.
चटकन तो मोबाईलवाला त्याच्या जागेवर बसतो.
जागा गेलेला म्हणतो. `अरे ये तो मोदी से भी चालू निकला`.
असा एक मस्त जोक वॉट्सअपवर फिरत होता. तो आठवायचं कारण माझा एक लेख. यावर्षी वॅलंटाइन डे
ला सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला. त्यात त्यांनी सिनेमाचा भाग म्हणून राष्ट्रगीत
आलं तर उभं राहणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा दिला होता. तेव्हा एक लेख `गोवन वार्ता` या गोव्यातल्या
पेपरात लिहिला होता. उशीर झालाय. निमित्त हरवलंय. पण कालच एका मित्राशी बोलताना हा
लेख आठवला. पुन्हा वाचला. मजा आली. म्हटलं तो ब्लॉगवर टाकायला हवा. म्हणून टाकतोय.
नेहमीसारखा कटपेस्ट.
...
मुंबईतल्या
गोरेगावमधील टोपीवाला थिएटरमधे १८ जानेवारीला `दंगल` सिनेमा सुरू होता. त्यातल्या अमीर खानची मुलगी
सुवर्णपदक मिळवते. त्यामुळे राष्ट्रगीत वाजू लागतं. ते ऐकताच काहीजण उभे राहतात.
काही बसून राहतात. उभं राहिलेला एक `देशभक्त` बोंबाबोंब करू लागतो. बसून राहिलेल्या एका
जोडप्याकडे त्याचं लक्ष जातं. सिनेमा सुरू होताना थिएटरमध्ये फारसं कुणी असताना ते
राष्ट्रगीताला उभे राहिले होते. आता सिनेमा सुरू असताना तसं उभं राहण्याची त्यांना
गरज वाटत नाही. ५९ वर्षाचे अमलराज पीटर दास काही बोलायच्या आतच तो `देशभक्त` येतो आणि त्यांच्या
चेहऱ्यावर ठोसे लगावतो. इतर कुणीही घाबरेल तसंच तेही घाबरतात. थिएटरचे कर्मचारी
त्या `देशभक्ता`ला पोलिसांच्या
हवाली करतात. शिरीष मधुकर असं त्या ५२ वर्षांच्या मध्यमवयीन `देशभक्ता`चं नाव असतं.
पोलिसांच्या समोर तो कबूल करतो की तो दारू प्याला होता. सिनेमातल्या देशभक्तीच्या
दृश्यांमुळे उत्तेजित झाल्याने त्याने असं कृत्य केलं. पोलिस त्याच्यावर केस दाखल
करतात. पण अमलराज मोठ्या मनाने या वेड्या देशभक्ताला माफ करतात. त्याच्यावर पुढे काही कारवाई होऊ देत नाहीत.
खरं तर त्या आधीच
केंद्रीय गृहखात्याने पत्रक काढून सिनेमाच्या कथेचा भाग म्हणून राष्ट्रगीत वाजलं,
तर उभं राहण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आता सुप्रीम कोर्टानेही त्यावर
शिक्कामोर्तब केलंय. ३० नोव्हेंबर २०१६ला सुप्रीम कोर्टाने याविषयीचा प्रसिद्ध
निकाल दिला होता. त्यानुसार प्रत्येक थिएटरला सिनेमाआधी राष्ट्रगीत वाजवणं सक्तीचं
झालं. तसंच राष्ट्रगीत वाजताना थिएटरात हजर असणाऱ्यांना उभं राहणंही बांधील करण्यात
आलं. त्यानंतर ९ डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने खुलासा करून अपंगांना त्यात अपवाद
केला. आता १४ फेब्रुवारीला दुसरा खुलासा आलाय. त्यात सिनेमाच्या कथेचा भाग
असलेल्या राष्ट्रगीताला उभं राहणं आवश्यक नाही. त्यामुळे निदान आता तरी इतर
अमलराजना काहीच त्रास होणार नसल्याची आशा बाळगता येईल.
अमलराज कुटुंबाच्या
बाबतीत घडलेली घटना काही अपवाद नाही. `मुंबई मिरर` या टाइम्स समूहाच्या वृत्तसमूहाने अमलराज यांना
मारहाणीची बातमी प्रकाशित केल्यानंतर त्यांच्याकडे अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यात
सिनेमातल्या राष्ट्रगीताला उभं न राहिल्यामुळे जाणीवपूर्वक त्रास दिल्याच्या इतरही
अनेक घटना घडल्याचं उघड झालं होतं. वेड्या देशभक्तांचा त्रास भोगावे लागलेले सगळेच
अल्पसंख्यक नव्हते. तर त्यातले बहुसंख्य धर्माने हिंदूच होते.
आज कुणाला आठवतही
नाही, पण सिनेमाच्या आधी राष्ट्रगीत वाजवण्याची कल्पना कोणत्याही हिंदुत्ववादी
नेत्याची नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे प्रमुख असताना नरेंद्र
वर्मा यांनी २६ जानेवारी २००३ला याची सुरुवात केली. एम. एफ. हुसेनपासून हृतिक
रोशनपर्यंत विविध मान्यवरांना घेऊन त्यांचा एक विडियोही बनवला. मुंबईतल्या थिएटर
मालकांच्या संघटनेशी त्यांच्या अनेक बैठका झाल्या. त्याआधी वीसेक वर्षांपूर्वी
सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत वाजवण्याची पद्धत काही ठिकाणी होती. त्याला काहीच
अर्थ नसल्यामुळे काही थिएटरमालक तयार नव्हते. सतत चर्चेनंतर मुंबईत काही थिएटरमधे
सिनेमा सुरू होण्याआधी `जन गन मन` वाजू लागलं. नरेंद्र
वर्मांचाच पक्ष सत्तेत असल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने
महाराष्ट्रातल्या सर्वच थिएटरमधे राष्ट्रगीत सक्तीचं केलं. वर्मा तेव्हा
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही निवेदन घेऊन भेटले होते. ते देशभर झालं नव्हतं.
चार महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निकालाने मात्र संपूर्ण देशातच सिनेमाच्या
आधी राष्ट्रगीत वाजणं बंधनकारक झालंय.
राष्ट्रगीतात एक
अनोखं चैतन्य आहे आणि ते नव्या पिढीने अनुभवावं, म्हणून आपण प्रयत्न केल्याचं
नरेंद्र वर्मा सांगतात. पण ही सारी धडपड करत असताना वर्मांच्या हे डोक्यातही नसेल
की उद्या यातून इतकं महाभारत होईल आणि काही वेडे आपल्या डोक्यातली देशभक्ती
इतरांवर थोपण्यासाठी याचा वापर करतील. पण `जन गन मन`साठी वाद काही नवे नाहीत. रवींद्रनाथ टागोरांनी
१९०५मधेच हे गीत लिहिलं होतं. १९११च्या कोलकाता काँग्रेस अधिवेशनात त्यांनीच याचं
पहिल्यांदा सार्वजनिक गायन केलं. त्याच्या तीन दिवस नंतर ब्रिटिश साम्राज्याचे
राजे पंचम जॉर्ज भारतात येणार होते. हे गीत त्यांच्या स्वागतासाठीच असल्याचा दावा
नंतर काही कथित राष्ट्रवाद्यांनी केला. त्याच अधिवेशनात राजाच्या स्वागतासाठी
दुसरंच गीत गायलं गेलं होतं. इंग्रजी वार्ताहरांना ही बंगाली गाणी कळू शकली नव्हती.
त्यामुळे तो घोळ झाला. त्याचा आधार घेऊन हिंदुत्ववाद्यांच्या मुखपत्रांतून आणि
प्रचारसाहित्यांतून जन गन मनला विरोध केला गेला. त्याचा प्रभाव म्हणून भाजप नेते
कल्याण सिंग यांनी राजस्थानचे राज्यपाल असताना राष्ट्रगीतातला अधिनायक हा शब्द
काढून टाकावा, अशी मागणीही केली होती. असं करण्याधी त्यांनी `जन गण मन` असा साधा सर्च जरी
गुगलवर केला असता तरी कोणती शंका उरण्याचं कारण नव्हतं.
१९३९ साली
टागोरांनीच लिहून ठेवलंय की अशा मूर्खपणाविषयी खुलासा केला तर मी माझा अपमान करून
घेईन. दुसऱ्या एका पत्रात ते लिहितात की `जन गन मन` म्हणजे भारताची सामूहिक मानसिकता हीच भारत
भाग्यविधाता आहे. तिनेच हजारो वर्षं सर्व चढउतारांमधे देशाचा गाडा ओढला आहे. मी
केवळ तिचाच जयजयकार करेन. पाचव्या, सहाव्या किंवा कितव्याही जॉर्जला ती जागा मी
देणार नाही. गुरुदेव टागोरांसारख्या जगद्वंद्य महापुरुषावर विश्वास ठेवायचा की कल्याण
सिंगांवर? याचं उत्तर सोपं आहे. `जन गन मन` हे भारतातल्या
विविधतेतील एकतेचं जयगान आहे. त्यामुळेच ते सर्वच कट्टर धर्मवाद्यांना नको असतं.
त्यांना फक्त आपलीच संस्कृती इतरांवर लादली जावी असं वाटतं. कट्टर मुस्लिमांच्या
संघटना असोत किंवा कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या संघटना, दोघेही राष्ट्रगीताला
शक्यतोवर लांब ठेवतात. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक वंदे
मातरम आणि तेही पूर्णच म्हणण्याचा आग्रह असतो. त्यांना वंदे मातरमच्या
लोकप्रियतेमधील टागोरांचं योगदान माहीत नसतं. `आनंदमठ` या बंकिमचंद्र चटर्जी या एका सरकारी अधिकाऱ्याने
लिहिलेल्या कादंबरीतलं सन्याशांच्या तोंडचं `वंदे मातरम` हे गाणं राजकीय संदर्भात पहिल्यांदा गायलं ते
रवींद्रनाथांनीच. तेही १८९६ साली आणि काँग्रेसच्या मंचावर.
`जन गन मन` असो की `वंदे मातरम्`, ही गाणी गात लाखो
भारतीयांनी स्वातंत्र्याचा संग्राम लढला. तेव्हा या संघर्षापासून दूर राहणाऱ्या राष्ट्रीय
स्वयंसेवक संघासारख्या हिंदुत्ववादी संघटना आता स्वतःला देशभक्त म्हणवून घेत आहेत.
देशभक्तीच्या प्रतीकांच्या सन्मानाच्या गोष्टी सांगत आहेत. त्यांचं किती ऐकायचं,
हे प्रत्येकाने ठरवायला हवं. आणि प्रतीकांमधेच राहून देशभक्ती नाही होऊ शकत. देश
म्हणजे काही नकाशा नाही. या देशातल्या माणसांना एकत्र जोडणं म्हणजे देशभक्ती. `दंगल` पाहत असताना
राष्ट्रगीताला उभं न राहिल्यामुळे मार खाल्लेल्या अमलराज यांनी ती देशभक्ती दाखवून
दिलीय. हल्लेखोराला माफ करणं, ही ती देशभक्ती आहे, हे कळायला शहाणपण लागतं. ते
शहाणपण, ते `जन गण मन`, हीच आपल्या देशाची
सगळ्यात मोठी ताकद आहे. जय जय जय जय हे!
सलाम तुमच्या [लेखन]कार्याला ..... !!
ReplyDeleteSporting 100: Sports toto - Sporting 100
ReplyDeleteSporting 100. 메이저 토토 사이트 Soccer 100 is your new benchmark fallout 76 black titanium for 2019 ford fusion hybrid titanium an online sports betting website. With Sporting 100, you can bet online gold titanium alloy with titanium rings 100's of statistics,