द हिंदू वाचणाऱ्या
सगळ्यांना प्रकाश कामत हे नाव ओळखीचं आहे. हिंदूमध्ये गोव्यातल्या अभ्यासपूर्ण
बातम्या वाचणं, हे गोव्याचं वर्तमान समजून घेण्याचा उत्तम रस्ता आहे. त्यांनी काल
एका व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर केला. तो माझा एक मोठा सन्मान असल्याचं मला
वाटलं. थँक्स प्रकाशजी. तो मेसेज असा होता...
`कालच्या (१३एप्रिल)च्या दै. गोवन वार्तातील सतीश
वरील दैनिक गोवादूतचे माजी संपादक ह्यांचा लेख आपण सतीशच्या मार्गदर्शनाखाली घडलो
अशं वाटणाऱ्या प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचावा. पत्रकारिता करताना पत्रकाराची सामाजिक
बांधिलकी जपणारे, आपल्या पत्रकारितेवर विश्वास असणारे आत्मविश्वासी तरुण संपादक
सचिन हे नम्र व्यक्तिमत्त्व पण कमिटेड पत्रकार. सच्चा सामाजिक कार्यकर्ता आणि
सामाजिक कार्याचा आव आणणारे प्रसिद्धीलोलूप माणसं हाडाचे पत्रकार/संपादक कशी ओळखतात, ते या लेखातून समजेल. सतीश
मागे ठेऊन गेलेल्या फौजेमधील प्रत्येकाने हा लेख शब्दानशब्द वाचावा आणि मार्गदर्शक
मानावा.
सचिन, एक गंमत उघड
करतो. आपल्या त्या भाषणास मी खाली उपस्थित होतो. दुसऱ्या दिवशी सतीश नेहमीच्याच
मॅच्युरिटीने हसत म्हणाला. `सचिन एवढा आक्रमक का
बोलला?` `सिंपल, ही इज अ कमिटेड जर्नालिस्ट. हिज प्रोफेशन
वॉज अटॅक्टड आक्रमकपणे. ही डिफेंडेड इट आक्रमकपणे.` सतीश
दिलखुलास हसला. पण संवेदनशीलपणे म्हणाला. ताणे पर्सनल घेवना न्ही?... तो असो न्हीच, हाव म्हळे.
कन्स्ट्रक्टिव
कमिटेड सोशल वर्क अन् कन्स्ट्रक्टिव कमिटेड पत्रकारितेतील ती एक छोटीशी नोंक झोंक.
तुम्ही तुमचे काम करा. आम्ही आमचे करतो, असं समजावणारी. व्हेरी व्हेरी हेल्दी.`
या प्रतिक्रियेतले
सतीश म्हणजे अॅड.सतीश
सोनक. वय ६० फक्त. गोव्यातले ज्येष्ठ वकील, संवेदनशील समाज कार्यकर्ते, माहिती हक्क चळवळीचे पुढारी आणि
सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पुढाकार घेणारे लढवय्ये यांचं शुक्रवारी ७
एप्रिलला निधन झालं. पणजीच्या प्रथमवर्ग सेशन्स कोर्टात सकाळी सुनावणीसाठी गेले
असता तिथे हार्ट अटॅक येऊन ते खाली कोसळले. हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत त्यांचं निधन
झालं होतं.
शेवटच्या
क्षणापर्यंत ते लढत होते. कोर्टात गेलेले सोनक तिकडचं कामकाज आटोपून दुपारी मानवी
हक्क आयोगाकडे जाऊन राज्य सरकार विरोधात याचिका दाखल करणार होते. पर्यटनमंत्री
बाबू आजगावकर यांनी राज्यातील पर्यटन लमाणी फेरीवाल्यांमुळे बदनाम होत असल्याचं
विधान नुकतंच केलं होतं. त्याला आक्षेप घेत सोनक मानवी हक्क आयोगाकडे दाद
मागण्याच्या तयारीत होते. पण ते राहून गेलं.
विद्यार्थ्यांना
सार्वजनिक बस प्रवासात ५० टक्के सवलत मिळण्यावरून गोव्यात १९७९ साली सुरू झालेलं
विद्यार्थ्यांचं आंदोलन विद्यार्थ्यांशी संबंधित इतर अनेक महत्त्वाच्या
विषयांपर्यंत पोहोचलं होतं. या ऐतिहासिक राज्यव्यापी विद्यार्थी चळवळीचे सतीश सोनक
अग्रगण्य नेते होते. त्यानंतर ते साध्या साध्या माणसाच्या हक्कांसाठी लढत राहिले.
वकिलीच्या जोरावर अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी त्यांनी धडपड सुरू ठेवली.
नुकतंच फोंडा येथील वानरमारे समाजाची वस्ती पाडून टाकल्यावर त्यांनी चळवळ केली
होती. त्यातून त्यांनी या समाजाला घरं मिळवून दिली. अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं
गोव्यात नेतृत्व त्यांनी केलं. पण कोणतंही पद घेतलं नाही. आम आदमी पक्षाचंही
त्यांनी स्वागत केलं. पण पद किंवा निवडणुकीचं तिकीट न स्वीकारताच. पत्रकारांच्या
प्रश्नांवरही ते मार्गदर्शन करत.
सोनक
कुटुंब मूळचं नागपूरचं. त्यांचे वडील गोव्यात आले आणि त्यांनी इथेच वकिलीची
प्रॅक्टिक केली. त्यांनी इथे अनेक कार्यकर्त्यांना घडवलं. आई डॉ. विभावरी यांनी
गोव्याची आरोग्यव्यवस्था उभारण्यात आपलं योगदान दिलं. त्या आजही हयात आहेत.
त्यांच्या पत्नी हर्षदा केरकर या प्रसिद्ध आणि सृजनशील पत्रकार आहेत. त्यांचे भाऊ
महेश सोनक हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश आहेत. बहीण सुषमादेखील सामाजिक
कार्यकर्त्या आहेत. महाराष्ट्रातल्या मान्यवर सामाजिक कार्यकर्त्यांना गोव्यात
आणून त्यांचे कार्यक्रम घडवण्यासाठी सतीश सोनक यांचा पुढाकार असे. त्यातून गोव्यात
कार्यकर्ते घडावेत, अशी त्यांची इच्छा असे. ते महाराष्ट्र आणि गोव्यातले सामाजिक
दूत होते.
सतीश
सोनक यांच्याशी माझा परिचय झाला तो गोवादूतच्या संचालक ज्योती धोंड यांच्यामुळे.
त्यादेखील विद्यार्थी आंदोलनात सक्रीय होत्या आणि विविध सामाजिक कामांशी जोडलेल्या
आहेत. त्यांच्यामुळे मला गोव्यात अनेक चांगल्या माणसांशी परिचय झाला. त्या नसत्या
तर मी ना गोव्यात गेलो असतो ना गोव्यात राहिलो असतो.
सतीश
सोनकांच्या निधनानंतर गोवन वार्ता या वर्तमानपत्रात लिहिलेला लेख सोबत जोडतोय. ते
त्यांना लिहिलेलं पत्र होतं.
...
प्रिय सतीशबाब,
तुम्ही आता या जगात
नाहीत, यावर विश्वास बसत नाही. उगाचच वाटत राहतं गोव्याला येईन, तेव्हा भेट होईल.
नेहमीसारखा कुणाची तरी व्यथा सांगणारा तुमचा मेसेज व्हॉट्सअपवर येईल. अचानक
कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी तुमचा फोन येईल. कधीतरी लेख आवडल्याचं अगदी मनापासून
सांगाल. आता ते होणार नाही. कळतंय हे होणार नाही. वळत मात्र नाही काही केल्या.
सतीशबाब, तुम्हाला
आठवतंय? चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र परिचय केंद्रा#ने वाचन महोत्सव आयोजित केला होता. त्यातल्या एका
परिसंवादात तुम्ही आणि आम्ही दोनचार पेपरांचे संपादक वक्ते होतो. वाचकांच्या
अपेक्षा मांडताना तुम्ही वर्तमानपत्रांवर सडकून टीका केली. तुमचं ऐकून मी वैतागलो.
आमचं चुकतं. आमच्या मर्यादाही आहेत. पण आम्ही माध्यमातले लोक जे चांगलं घडवतो, ते
तुम्ही बघणार की नाही? माझी बोलण्याची पाळी येताच मी माझा राग काढला.
तुम्हाला असं सभेमध्ये खोडून काढणं, योग्य नव्हतंच. पत्रकाराने नेत्यांना,
अधिकाऱ्यांना आणि सत्तेच्या दलालांना झोडून काढावंच. पण त्याने कार्यकर्त्यांसमोर
नम्र असायला हवं. माझे मुद्दे बरोबर असतीलही, पण तुमच्यासारख्या भल्या माणसाला
दुखवायला नको होतं.
भर कार्यक्रमात
विरोधात बोलूनही तुम्ही रागावला नाहीत. गोव्यात मी सर्रास पाहिलं, लोक छोट्या
छोट्या गोष्टींवरून नाराज व्हायचे. त्यांचं काम काहीच नसायचं पण त्याचा गवगवा इतका
असायचा की ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असायचे. तुम्ही मात्र त्याला अपवाद
म्हणून वेगळे उठून दिसलात. केलेला विरोध तुम्ही मनात कधीच ठेवला नाही. उलट मी
कार्यक्रमांमधून लोकांसमोर जावं, यासाठी तुम्ही आग्रही राहिलात. माझ्या पुस्तकांवर
चर्चेचा कार्यक्रम व्हावा, यासाठी तुम्ही प्रयत्नच केले नाहीत तर त्यात प्रेमाने
भाषणही केलं. माझा गोव्यातला सर्वात शेवटचा जाहीर कार्यक्रम यूथ हॉस्टेलला झाला.
त्यात मी होतो ते तुमच्याच आग्रहाखातर.
माझ्यासारख्या
पत्रकारासाठी पेपर हे फक्त अभिव्यक्तीचं माध्यम असतं. तुमच्यासाठी ते अन्यायाविरुद्ध
लढायचं हत्यार होतं. गोव्यात संपादक म्हणून तीन वर्षं काम करताना किमान शंभर तरी
विषय घेऊन तुम्ही भेटला असाल. तुम्ही कागद घेऊन आलात की ते फारसे न चाळताच पुढे
रिपोर्टरला कामाला लावायचं, हे ठरलेलं होतं. तुम्ही प्रकरण घेऊन आलात की ते छोटं
किंवा मोठं असेल, पण जेन्युइन असणार याची सगळ्यांनाच खात्री होती. तुम्ही म्हणजे
मूर्तिमंत संवेदनशीलता. तुम्हाला निवांतपणा नव्हताच कधी. संध्याकाळच्या वेळेस `दोन मिन्टं` असं म्हणत तुम्ही
केबिनमध्ये शिरायचात. नावापुरतं समोर टेकून दुसऱ्या पेपराच्या ऑफिसात जायची घाई.
कधी तुम्ही कुठल्या आयोगातून निकाल मिळवून आलेले असायचात किंवा कोर्टात याचिका
दाखल केलेली असायची, कधी कुणा सामाजिक कार्यकर्त्याचा कार्यक्रम आयोजित करायचा
असायचा किंवा कुणा पीडिताला सोबत घेऊन फिरत असायचात. `किसी का दर्द मिल सके तो ले उधार`, हेच तुमचं ब्रीद.
छोट्याशा स्कूटरवरून
सांतिनेझच्या दिशेने जाताना दिसायचात अनेकदा. तुमच्यासोबतचे कितीतरी मित्र आलिशान
गाड्यांमधून फिरायचे. त्याचं तुम्हाला काहीच नव्हतं. कधी शर्ट इन केलंय किंवा
गोव्याला शोभेशा रसिक पद्धतीने छान तयार होऊन आलात, असं तुम्हाला कितीही मोठा
कार्यक्रम असला तरी पाहिलं नाही. अनेकदा तर स्कूटरही नसायची. पायीच चालत तुम्ही
घामाघूम होऊन प्रेस नोट वाटत फिरायचात. तुम्ही कायम अस्वस्थ तरीही शांत. सगळ्यांना
समजावून सोबत घेणारे. कधीतरी चुकून रागावायचातही कुणावर. तो सात्विक संताप लोभस
असायचा. कॅसिनो*, डेवलपमेंट प्लान, पर्यावरणाचे प्रश्न,
अपंगांच्या अडचणी, जीएमसी**तला गोंधळ, आदिवासींचे हक्क असे मुद्दे हातात
घ्यायचे आणि ते धसास लागेपर्यंत त्याचा पाठलाग करायचा, ही धावपळ तुम्हाला मनापासून
आवडायची.
ज्याची हाक ऐकणारा
कुणी नाही, तो तुम्हाला शोधत शोधत यायचा. तुम्ही कधी त्याची जात पाहिली नाही की
धर्म. तो आपल्या विचारधारेचा किंवा पक्षाचा नाही, असा विचारही तुमच्या डोक्यात कधी
येत नसे. `ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती` ही तुमची पठडी. तसंच तुम्ही अन्याय
करणाऱ्यांच्या विरोधात आक्रोशून उभं राहतानाही त्याची जात, धर्म, पक्ष, विचारधारा
किंवा सत्ताही तुम्ही पाहिली नाही. त्याचवेळेस सत्तेतल्या प्रामाणिक माणसांचाही
वापर तुम्ही चांगल्यासाठी करून घेतलात. सत्तेत न्याय मिळवण्यासाठी जिथे कुठे
शक्यता आहेत, तिथले दरवाजे तुम्ही ठोठावले. मानवी हक्क आयोग, महिला आणि बाल आयोग,
माहिती आयुक्त, प्रदूषण नियामक मंडळ, कामगार आयुक्त, असे सगळे दरवाजे. तुमची `पीपल ऑफ गोवा` नावाची संस्था होती
म्हणे. मला माहीत नाही. तुम्ही एकटेच माझ्यासाठी एक संस्था होता. कला अकादमी,
इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागंझा@, राजभाषा संचलनालय
ते अगदी लायन्स क्लब, या प्रत्येक संस्थेचा मंच चांगल्यासाठी वापरण्यासाठी तुमची
धडपड असायची. चांगली माणसं एकत्र करून चांगले कार्यक्रम घडवून आणण्याची योजकता
तुमच्याशिवाय दुसरीकडे कुठेच नाही दिसली गोव्यात. चित्रं, गाणं, सिनेमा, नाटक या
सगळ्यांत तुम्हाला रस होता. पण त्याला सामाजिक आशय जोडलेला असेल तर तुमची कळी खुलायची.
विद्यार्थी चळवळीत
असताना धावणाऱ्या बससमोर तुम्ही जिवाची पर्वा न करता निदर्शनासाठी उभे राहिला
होतात. आपल्या कामासमोर जिवाची पर्वा नसावी, हे चांगलंच. पण म्हणून तुम्हाला दोन
हार्ट अटॅक येऊन गेलेत, हे तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर कळावं, इतकी बेपर्वाई चांगली
नाही. तुम्ही अन्यायग्रस्ताची केस कोर्टात लढवताना एखाद्या योद्ध्यासारखा देह
ठेवलात. जिना इसी का नाम हैं. लेख लिहिण्याआधी सहज व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवलेले
जुने मेसेज बघत होतो. त्यात अचानक एक शेर दिसला. `मैं
क्यूं परवाह करूं कि जमाना क्या कहता हैं. मुझे सकून बस इक बात का हैं वो मुझे
अपना कहता हैं.` हे
सुकून, समाधान तुम्ही पुरेपूर मिळवलं होतं. ज्यांना कुणीच आपलं म्हणत नाहीत, अशा
हजारो जणांचे तुम्ही आप्त झालेले आहात. म्हणून तुम्ही गेलात तरी आहात, हे कळतं पण
वळत नाही.
तुमचा,
सचिन
# महाराष्ट्र परिचय केंद्रः यशवंतराव चव्हाणांनी
गोवा आणि दिल्ली येथे महाराष्ट्र परिचय केंद्र उभारली होती. कधीकाळी दोन्हीकडच्या
सांस्कृतिक क्षेत्रांत अग्रेसर असणारी ही केंद्र आता मृतप्राय झालीत.
*कॅसिनोः गोवा हा जुगाराचा अड्डा बनू नये
यासाठीच्या लढ्यात सोनक आघाडीवर होते.
**जीएमसीः म्हणजो गोवा मेडिकल कॉलेज. मराठीत
गोमेकॉ. आशियातलं हे सगळ्यात जुनं मेडिकल कॉलेज मानलं जातं.
@इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागंझाः प्रामुख्याने
सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी एक जुनी सरकारी संस्था.
No comments:
Post a Comment