वी वी पी शर्मा सर भेटले की मजा येते. भय्या आडनावाचा तेलुगू माणूस. नखशिखांत
पत्रकार. प्रचंड अनुभव. बारीक अभ्यास. खूप ओळखी. तरीही कायम जमिनीवर. प्रेमात
पडावी अशी पत्रकाराला शोभेशी बेपर्वाई. हे कमी म्हणून भरदार मिशा आणि पोरासारखी
माया करणारा स्वभाव. ईटीव्हीत असताना गुजरातचा भूकंप कवर करायला गेलो तेव्हा
पहिल्यांदा भेटलो. ते होते म्हणून दिल्लीला गेलो. टीवीकडे, पत्रकारितेकडे बघायची
नजर घडली.
सर दिल्लीत सीएनएन आयबीएनमध्ये कोणत्या तरी पदावर आहेत. ते मुंबईत येतात
कारण त्यांच्या पत्नी `द हिंदू`च्या मुंबई
एडिशनमधे आहेत. सर मुंबईत आले की फोन करतात. तिखटजाळ नॉनवेज कुठे मिळेल, हे मी
शोधून ठेवलेलं असतं. तिथे आमचा मोर्चा वळतो. यावेळेस फॉर अ चेंज, आम्ही त्यांच्या
घरी भेटलो. चर्चगेटला कस्तुरी बिल्डिंगमधे हिंदूचं ऑफिस आहे आणि गच्चीवर कंपनीने
मॅडमना दिलेलं घर. सोबत सरांनी त्यांच्या स्पेशल मसाल्यांनी बनवलेलं चिकन आणि
गप्पा. सर बोलत असतील की सगळं पटलं नाही तरी ऐकत राहावंसं वाटतं.
शर्मा सर सांगत होते. टाइम्सच्या जर्नालिझम स्कूलमधे ते पंचवीसेक जण शिकत
होते. सगळ्या पोरांना टाइम्सने मौसम विहारमधे एक दोन मोठे फ्लॅट दिले होते. तिथे
शेजारच्या कंपाऊंडमध्ये एक दाढीवाला बायको आणि भावासोबत राहायचा. पण या शिकाऊ
पत्रकार पोरांबरोबर पोर बनून राहायचा. एकत्र दारू प्यायचा. मस्तमौला मजा करायचा.
कोर्स संपला. इंटरव्यू दिला की टाइम्समधे चिटकता येणार होतं. फ्लॅटमधे
पाणी आलं नव्हतं. एरवी आंघोळ केली नसती तरी चाललं असतं. इंटरव्यूला तरी आंघोळ करून
जाणं भाग होतं. शेजारचा दाढीवाला बादल्या भरून भिंतीपलीकडे देत होता. मुलाखती सुरू
झाल्या. पहिली मुलगी मुलाखतीसाठी गेली. पुतळा बनून बाहेर आली. तेच एकामागून एक
सगळ्यांचं होत गेलं. शर्मा सरांना नंबर आला. आत जाऊन बघतात. तर समीर जैनच्या
बाजूला तोच शेजारच्या भिंतीपल्याडचा दाढीवाला सूटबुटात बसलेला. एस. पी. सिंग. सुरेंद्र
प्रताप सिंग. नवभारत टाइम्सचे कार्यकारी संपादक.
एसपींचं नाव काढलं की जुनी माणसं असे अफलातून अनुभव सांगतात. `शिला पर आखिरी
अभिलेख` या निर्मलेंदू
यांनी संपादित केलेल्या पुस्तकात अशा अनुभवांची रेलचेल आहे. २००० वगैरे साली
ईटीवीत असताना संजय निरुपम यांच्या मालाडमधल्या घरी बाइट घ्यायला गेलो होतो. त्यांच्या
कपाटात या पुस्तकाच्या दोन प्रती होत्या. नेमकं आठवत नाही, काय झालं होतं. मी एसपींविषयी
काही विचारलं होतं की इतर काही. निरुपमांनी पुस्तकाची एक प्रत दिली मला. त्या
पुस्तकाने, एसपींनी मला वेड लावलं. कितीदातरी वाचलंय ते उल्टंसुल्टं. दिल्लीत आम्ही
रूममेट असताना प्रमोद चुंचूवारने वाचलं ते पुस्तक. तो म्हणाला, या पुस्तकाचा खूप
प्रभाव आहे तुझ्यावर. मी म्हटलं, अरे हो, खरंच!
थँक्यू एसपी. कॉलेजमधे असताना तुम्हाला आज तक वर पाहायचो.
आणि हॅपी बड्डे एसपी.
एसपी तुम्ही असता तर आज २८ एप्रिलला ७० वर्षांचे असता. तुम्ही असता तर
तुम्हाला भेटलो नक्की असतो. आता तुम्ही नाही. तुमच्यावर गेल्या रविवारी दिव्य
मराठीच्या रसिक पुरवणीत लेख लिहिलाय. तो सोबत जोडलाय थोडा बदल करून.
शिवाय एसपींसोबत काम केलेल्या राजेश बादल यांनी राज्यसभा टीवीसाठी केलेला एका शोची लिंकदेखील लेखात आहे. बघा जमल्यास.
...
या २७ जूनला सुरेंद्र प्रताप सिंग गेले त्याला वीस वर्षं पूर्ण होतील.
सुरेंद्र प्रताप सिंग म्हणजे एसपी. तेव्हा ज्यांनी दूरदर्शनवर अर्ध्या तासाचं `आज तक` पाहिलंय त्यांना
हे नाव माहीत नसेल कदाचित, पण हा चेहरा माहीत आहे. वेदनेला आवाज देणारा दाढीवाला
चेहरा होता एसपी यांचा. `ये थी खबरें आज तक,
इंतजार किजिए कल तक`, म्हणणारे एसपी देशभर
सगळ्यांना माहीत होते. पण तेव्हा `आज तक` नावाचं स्वतंत्र
चॅनल नव्हतं. `आज तक` हे वीस मिनिटांचं
बुलेटिन दूरदर्शनच्या डीडी मेट्रो चॅनलवर यायचं. देशभरात त्याच्याइतक्या लोकप्रिय
बातम्या नव्हत्या, ना टीव्हीवर, ना पेपरांत ना रेडियोवर.
१९९७च्या १४ तारखेला दिल्लीतलं उपहार सिनेमा थिएटर शॉर्टसर्कीटमुळे
लागलेल्या आगीत खाक झालं. `बॉर्डर` सिनेमा बघायला
आलेली माणसंही मृत्यूमुखी पडली. थिएटरचे
मालक त्याला जबाबदार होतेच पण लोकांच्या सुरक्षेची काळजी न घेणारी व्यवस्थाही.
अस्वस्थ करणाऱ्या मृत्यूच्या कहाण्या येऊ लागल्या. एसपींनी इतर सगळ्या बातम्या
बाजुला सारून त्या दिवशीचं बुलेटिन फक्त याच अग्निकांडावर काढण्याचं ठरवलं. `आज तक`चं बुलेटिन सुरू
झालं. एसपी मृत्यूची एकेक गोष्ट उलगडून सांगत होते. त्यासोबत त्यांची अस्वस्थता
वाढत होती. सकाळी हसत हसत `बॉर्डर` सिनेमा बघायला
गेलेल्यांचा ना कोणती चिठ्ठी येणार आहे, ना कोणते संदेसे, ना ते स्वतः. एसपी त्यांच्या
पद्धतीने अपघाताची भीषणता सांगत होते. `कुछ भी हो, जिंदगी तो चलतीही रहेगी`, अशा आशयाचा बुलेटिनचा शेवट त्यांनी केला खरा. पण सारं काही संपलं होतं.
`एसपी त्या रात्री ९
वाजून १० मिनिटांनी अँकरिंग करून केबिनमध्ये परतले आणि स्फुंदून स्फुंदून रडू
लागले. आम्ही सगळे सहकारी त्यांच्या जवळ गोळा झालो. स्वतःला थोडं सावरून ते
म्हणाले, लोक तर म्हणतील किती छान कार्यक्रम बनवलाय! मृत्यू विकण्याचं आणि विकत घेण्याचं चक्र सगळ्या
समाजाला विकासाच्या नावावर विध्वंसक बाजारात बदलवतेय, त्यावर कुणीच विचार करत
नाही. पण दुःख हेच की आपण यापेक्षा जास्त काहीच करू शकत नाही.` पुढे चॅनेलांचे
संपादक आणि अँकर बनलेल्या पुण्यप्रसून वाजपेयींनी एका लेखात हा अनुभव सांगितलाय.
दुनियेला शिंगावर घेणारा आपला बाणेदार संपादक ओक्साबोक्शी रडताना बघून एसपींचे
सहकारी हादरलेच असतील. त्यांना मोठा धक्का बसला दुसऱ्या दिवशी सकाळी. एसपी रात्रभर
झोपू शकले नव्हते. पहाटे त्यांना ब्रेनहॅमरेज झालं आणि हॉस्पिटलात भर्ती करावं
लागलं. त्यांचे देशभरातले चाहते हॉस्पिटलबाहेर शेकडोंच्या संख्येने गोळा व्हायचे.
त्यांना फक्त एसपी बरे असल्याची बातमी ऐकायची होती. त्यांना कळली ती बातमी होती
एसपींच्या निधनाची.
आज एसपी असते तर ७० वर्षांचे असते. `शिला पर आखिरी अभिलेख` या त्यांच्यावरील स्मृतिलेखांच्या संग्रहात त्यांची जन्मतारीख २८ एप्रिल
१९४७ असल्याचं नोंदवलंय. पूर्व उत्तर प्रदेशातल्या गाजीपूर जिल्ह्यातल्या पातेपूर
गावात त्यांचा जन्म झाला. त्यांची जडणघडण झाली ती कोलकात्याचं उपनगर असलेल्या
गारुलिया या छोट्या शहरात. कोलकाता, मुंबई आणि दिल्लीत त्यांचं करियर घडलं. पण
त्यांच्या नाळेला लागलेली पातेपूरची ग्रामीण माती काही सुटली नाही. सुटबुटातही त्यांच्यातला
पूरबिया काही हरवला नाही. लहानपणापासून ते उत्तम वाचक होते. सामाजिक कामांत
त्यांना रस होता. कोलकाता युनिवर्सिटीत एआयएसएफचे कार्यकर्ते म्हणून प्रियरंजन
दासमुन्शींना छात्रसंघाच्या निवडणुकीत हरवण्यात ते आघाडीवर होते. प्राध्यापकाची
स्थिरस्थावर नोकरी सोडून ते पत्रकार बनले. त्यांच्या पत्रकारितेचा पहिला ठेपा होता
`धर्मयुग`. डॉ. धर्मवीर
भारतींच्या नेतृत्वात टाइम्स ग्रुपचं हे हिंदी साप्ताहिक निघत होतं. डॉ. भारती आणि
धर्मयुग या दोघांच्याही दर्जाचा तेव्हा देशभर प्रचंड दबदबा होता. एसपी आणि
त्यांच्या मित्रांनी टाइम्सच्या इमारतीत शिरून त्याला सुरुंग लावला होता.
गोपाल शर्मा हे मुंबईच्या हिंदी पत्रकारितेत फक्कडपणामुळे प्रसिद्ध नाव.
त्यांनी एक मस्त अनुभव लिहिलाय. तेव्हा डॉ. भारती आणि एसपी यांच्यात अबोला होता. एक
दिवस टाइम्स इमारतीतला सेंट्रल एसी बंद होता. खूप उकडत होतं. एसपींनी शर्ट काढून
खुर्चीवर लटकवला होता. फक्त बनियनवर ते लिहीत बसले होते. भारतींनी ते पाहिलं आणि
शर्ट घालण्याचा निरोप पाठवला. सोबत मेमो देण्याची धमकीही. एसपींचं उत्तर आलं,
जास्त बोलाल तर पँटपण काढून ठेवून देईन. माझ्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये शर्ट घालून
काम करा, असं कुठेच लिहिलेलं नाही. हेच डॉ. भारती एसपींच्या मृत्यूची बातमी ऐकून
हुमसून हुमसून रडले होते. इतर कुणासाठीच ते कधी रडले नव्हते.
एसपी ७१ साली धर्मयुगमध्ये उपसंपादक म्हणून लागले आणि पत्रकारितेत सहा
वर्षांचा अनुभव असताना २८ ऑगस्ट १९७७ला त्यांनी इतिहास घडवला. त्यांनी संस्थापक
संपादक म्हणून `आनंद बझार पत्रिके`चं प्रसिद्ध
साप्ताहिक `रविवार` सुरू केलं.
तिथल्या यशस्वी कारकीर्दीनंतर ते एप्रिल १९८५ मध्ये `नवभारत टाइम्स`च्या मुंबई
आवृत्तीचे संपादक बनले. तिथे ते १९९१ पर्यंत होते. संपादक म्हणून याजवळपास पंधरा
वर्षांच्या काळात त्यांनी हिंदी पत्रकारितेचं व्याकरणच बदलून टाकलं. त्यांनी हिंदी
पत्रकारितेतल्या विश्लेषणाला तळागाळात पोहोचवलं. त्याचबरोबर तिला तरुणही बनवलं. साहित्यिकी
वळणाच्या पत्रकारितेतून त्यांनी तिला बातमीदाराचं माध्यम बनवलं. त्यांच्या या
नव्या पत्रकारितेमुळे कित्येक मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही घरी बसावं लागलं. एसपींसोबत
काम केलेले आणि नंतर `नवभारत टाइम्स`चे संपादक राहिलेले
विश्वनाथ सचदेव यांनी लिहिलंय, `हिंदी पत्रकारितेला तुम्ही जी दिशा आणि स्वरूप दिलंत, त्यासाठी हिंदी आणि
पत्रकारिता तुमची कायम ऋणी आहे.`
एसपीचं सगळ्यात मोठं योगदान मात्र वेगळंच आहे, ते म्हणजे त्यांनी घडवलेली माणसं. आज हिंदी पत्रकारितेत
जे काही चांगलं चाललंय त्याचं बहुतांश श्रेय त्यांचं आहे. संतोष भारतीय हे `रविवार`चे बरेली येथील वार्ताहर. त्यांनी आपला अनुभव
लिहून ठेवलाय. `रविवार`मध्ये छापून आलेल्या
लेखामुळे त्यांच्या घरावर गुंडांनी हल्ला केला. त्यांनी एसपींना फोन केला. एसपींनी सांगितलं, 'घाबरला असशील तर राजीनामा
पाठव. आपल्या पेशाची ही किंमत
आहे. ती चुकवावी लागते. मी तुला लेखणी देऊ शकतो, बंदूक नाही. तुला अभिमान वाटायला
हवा की तुझ्या लेखणीचा सामना करण्यासाठी बंदूक उगारली गेली.'
एसपींना हिंदीतून पत्रकारिता करत असल्याबद्दल गौरव वाटायचा. ते इंग्रजी आणि बंगालीही छान लिहायचे. `इकॉनॉमिक टाइम्स`, `बिझनेस न्यूजलाइन` सारख्या मोठ्या इंग्रजी
पेपरात त्यांचे कॉलम यायचे.
इंग्रजीत जमत नाही
म्हणून भाषक पत्रकारिता करण्याचा बालिशपणा त्यांनी केला नाही. गौतम घोष यांच्या `पार` या सिनेमासाठी त्यांनी
संवाद लिहिले होते. त्याला मोठमोठे पुरस्कारही मिळाले होते. त्यांनंतर मृणाल
सेनपासून अनेकांनी त्यांना सिनेमासाठी लिहिण्याच्या ऑफर दिल्या होत्या. पण त्यांनी
त्या साऱ्या नाकारल्या. प्राध्यापकी असो, इंग्रजी पत्रकारिता किंवा सिनेमासाठीचं
लिखाण, तिथे अधिक प्रसिद्धी आणि पैसा असूनही एसपी हिंदी पत्रकारितेशी एकनिष्ठ
राहिले.
त्यांनी `आजतक`च्या संपादनाचं आव्हान
स्वीकारलं त्यामागचं एक कारण हिंदीला पत्रकारितेत नवीन उंची मिळवून देणं हेदेखील होतं. ती त्यांनी मिळवून
दिली. इंग्रजीचा विटाळ न मानता
त्यांनी हिंदीला इंग्रजीच्या सावलीतून बाहेर काढलं. हिंदीला टीव्ही पत्रकारितेची भाषा म्हणून विकसित केलं. हिंदीतल्या अनेक म्हणी, वाकप्रचारांना त्यांनी
पुनर्जन्म दिला. आज शेअर बजार इतने पर्सेंट
लुढका, असा तो खास एसपी टच
होता. त्याच्या
भाषेतल्या अस्सल भारतीयपणामुळे ते एक हिंदी बातमीपत्र देशभर लोकप्रिय करू शकले. एखादी भाषा नव्या
माध्यमात येताना नव्याने घडत असते. हिंदीला टीव्ही पत्रकारितेची भाषा म्हणून
एसपींनी घडवलं. मराठी टीव्हीची पत्रकारिता आता वीसेक वर्षं जुनी झाली, तरी अजून
त्याला तसं कुणी सापडलं नाही. ज्यांच्यात क्षमता होत्या, त्यांनी स्वतःच्या
रेघोट्या मारायचं साधन म्हणून मराठीत टीव्हीला वापरून घेतलं.
`आजतक` सुरू करण्याआधी प्रशिक्षण
देण्यासाठी ऑस्ट्रेलियातून आलेल्या टीमला एसपींचं अंकरिंग लाऊड वाटलं होतं. ही इज ऑलवेज क्राइंग,
असा त्यांचा आक्षेप होता.
त्यावर एसपींनी त्यांना
मोठं लेक्चरच दिलं. 'मशीनसाठी स्वतःला बदलवणं
योग्य नाही. आत जे शिजतंय ते लपवणं हा पत्रकारांसाठी गुन्हा आहे. आत आहे तसं दिसेल
तेव्हाच लोकांना ते आपलं वाटेल. नाहीतर ते नाकारतील. स्टार बघा. टेक्निकली अप्रतिम.
पण समाज आणि राजकारणापासून शेकडो कोस दूर.' एसपींनी खऱ्या भारतीय टीव्हीचा पाया रचला तो याच भूमिकेतून. शाहरुख खान त्यांच्या
अंकरिंगचा फॅन होता, 'एसपीसाहेब बातमीच्या
प्रत्येक वाक्य आणि शब्दाशी संपूर्णपणे जोडले जायचे. शब्द त्यांच्या अंतर्मनातूनच निघायचे.
म्हणूनच ते बातम्या वाचायचे नाहीत, तर प्रेक्षकांशी बोलायचे.'
गणपती दूध पित होता तेव्हा एसपींनी दिल्लीतल्या एका मोच्याची ऐरणही दूध पित
असल्याचं दाखवलं होतं. सत्तेच्या दबावाखाली
ते कधी आले नाहीत. त्यांनी बनवलेली बुलेटिन
दूरदर्शन सेन्सॉर करतं म्हणून ते संघर्ष करत. तरीही त्यांनी सरकारी चौकटीत बरंच काही करून दाखवलं. तेव्हाच्या अस्थिर राजकारणावर
थेट प्रभाव टाकला. `आजतक`चं २४ तासांचं चॅनल
येण्याआधीच त्यांचं निधन झालं. नाही तर भारतीय टीव्हीची पत्रकारिता आज आहे तशी नसती बहुधा.
सुंदर
ReplyDeleteखूप छान. सचिन धन्यवाद. अशासाठी, की नव्या पिढीला याची आठवण करून दिलीस.
ReplyDeleteअप्रतिम लेख. अाजच्या मीडियाच्या कंपनीकरणाच्या काळात एसपींनी काय भूमिका घेतली असती हे अनुभवणं फारच महत्त्वाचं ठरलं असतं.
ReplyDelete