ट्रॉम्बेतल्या दंग्याचा बळी ठरलेली पोलिस वॅन |
चुकत नसेन तर १६
मार्चच्या रविवारी हा लेख दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत छापून आला होता. त्याच्या
आदल्याच रविवारी ट्रॉम्बेमध्ये छोटा दंगा झाला होता. फेसबूकवरच्या पोस्टमुळे दीडदोनशे
जणांच्या जमावाने पोलिस स्टेशनावर हल्ला केला होता. मला एकदम धक्का बसला. हे छोटे
दंगे मोठ्या दंगलींपेक्षाही भयानक असतात. त्यातले स्थानिक संदर्भ रुतून बसतात आणि
जातीधर्मावरून दीर्घकाळ विष भिनत जातं. ही सारी निरीक्षणं सविस्तर नोंदवणारा हा
लेख. बघा पटतोय का?
...
पुस्तकांत
नोंदवण्यासारखा नाही, पण प्रत्येक गावाचा एक इतिहास असतो छोटासा. ऐतिहासिक वगैरे
घटना तिकडे झालेल्या नसतात. तरीही या गावांतली स्थित्यंतरं इतिहासाचा भाग बनतात.
ट्रॉम्बे असंच एक गाव. आताआतापर्यंत मुंबईत असूनही मुंबईत नसल्यासारखं. हे खरं तर
एक बेटच. खाडीचा खारा वास. कोळ्या आगऱ्यांची ऐसपैस बैठी घरं. पारंपरिक देवळं. नाक्यांवर
उभे असलेले क्रूस. एक खूप जुनी मशिद. भाभा ऑटोमिक रिसर्च इन्स्टिट्यूटने आपल्या
आवारात ओढून घेतलेलं गावच्या टेकडीवरचं पोर्तुगीजकालीन चर्च आणि त्या बदल्यात
गावाला दिलेल्या दाक्षिणात्यांनी वसवलेला चिता कॅम्प.
पुढे गावाच्या शिवेवर
नवी मुंबई आली. गावाचं मूळ नाव तुर्भे. दुसरं एक तुर्भे मोठं झालं. म्हणून लोक
याला ट्रॉम्बेच म्हणू लागले. ट्रॉम्बे हा तुर्भेचा पोर्तुगीजांनी केलेला अपभ्रंश बेस्ट
बसवरच्या पाट्यांनीही स्वीकारण्याइतपत मराठी झाला. चकचकीत नव्या मुंबईच्या गरजा
पुरवण्यासाठी शेजारचं मानखुर्द गाव सुजू लागलं. त्याच्या गच्च झोपड्यांनी
ट्रॉम्बेला गिळून टाकलं. आता दोन्ही गावातल्या सीमारेषा दोन्ही गावांनाही कळत
नाहीत. म्हणूनच ट्रॉम्बेत गेल्या शनिवारी रात्री पोलिस ठाण्यावर हल्ला झाला तेव्हा
काही पेपरांत मानखुर्द छापून आलं होतं.
दंगल म्हणावी असंही
फार मोठं काही घडलं नाही. वीस वर्षांच्या एका स्थानिक मुलाने एका मुस्लिम
धर्मस्थळाचा मॉर्फिंग केलेला फोटो फेसबूकवर टाकला. काही मुसलमान रागावले. पेपरातल्या
बातम्या खऱ्या मानायच्या तर एमआयएमच्या स्थानिक नगरसेवकाने त्यात तेल ओतलं.
भडकलेला जमाव पोलिस ठाण्यावर चालून आला. काही बातम्यांनुसार हिंदू आणि मुसलमानांच्या
गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. फेसबूकवर पोस्ट टाकणाऱ्याला अटक झाली होती. पोलिस
तयार होते. तरीही पोलिस ठाण्याच्या सगळ्या खिडक्या फुटल्यात. गाड्या जळाल्यात.
काही जण जखमी झालेत. पोलिसांनी त्या रात्रीच नगरसेवकाला ताब्यात घेतलं.
त्याच्यासोबत पोलिसांनी ताब्यात घेतलेली दोन पोरं अवघ्या सोळा वर्षांची आहेत.
रात्रीचा तणाव ओसरल्यानंतर
रविवारी ट्रॉम्बेची सकाळ नेहमीसारखीच सुरळीत झाली. मुंबईत असंच होतं. धर्म कोणताही
असो, एखाद्या फेसबूक पोस्टने तो बुडणार नाही, इतकं शहाणपण प्रत्येक माणसात असतं.
मग तो मुसलमान असो की हिंदू. पण त्यांच्या भावनांशी खेळतात ते राजकीय पुढारीच.
मुंबई महापालिका निवडणुकीत एमआयएमला मतदारांनी थारा दिला नाही. त्यामुळे आपला
जनाधार मजबूत करण्याची संधी एमआयएमचा
नगरसेवक न सोडण्याचीच शक्यता जास्त. ही केवळ एक शक्यता आहे. इतर कोणताही राजकीय
पक्ष यामागे असू शकतो. असणार राजकीय पक्षच.
दंगलीत उत्स्फूर्त
असं काहीच नसतं. सगळं असतं ते पूर्वनियोजित. दंगलींत राजकारण असतंच, तेही
निवडणुकांच. निवडणुकांसाठीच दंगली होतात, असं वाटण्याइतपत परिस्थिती नेहमीच असते. गेली
अनेक दशकं हे घडत आलंय. आताही घडतंय. खोटं वाटत असेल तर ताजा अनुभव घेतलेल्या
पिंपरी चिंचवडकरांना विचारा. कत्तलखाना हलवण्याच्या मुद्द्यावरून हे आधुनिक शहर
वर्षभरापूर्वी तणावात होतं. देहू रोडवरही भयंकर वॉट्सअप पोस्ट फिरवून असाच तणाव
निर्माण केला गेला. या सगळ्या तणावाचं फारसं रिपोर्टिंग कुठे झालं नाही. आता महापालिकेच्या
निकालांमध्ये त्याचं स्पष्ट प्रतिबिंब दिसून आलंय.
ट्रॉम्बेच्या घटनेसोबतच
योगी आदित्यनाथांचा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून झालेला शपथविधीही बातम्यांत
होता. ट्रॉम्बेत झाले तसे छोटे धार्मिक तणाव देशात सर्वाधिक उत्तर प्रदेशातच
घडतात. `हिंदुस्थान टाइम्स` या
आघाडीच्या इंग्रजी वर्तमानपत्राने गेल्या वर्षी एक विशेष शोधमोहीम हाती घेतली
होती. उत्तर प्रदेशातल्या सर्व ७५ जिल्ह्यांच्या पोलिस नोंदी तपासून त्यांनी
जानेवारी २०१० ते एप्रिल २०१६ या काळात घडलेल्या धार्मिक तणावाच्या घटनांची
आकडेवारी मांडली होती. या सहा वर्षांत उत्तर प्रदेशात धार्मिक तणावाच्या घडलेल्या
घटना होत्या तब्बल १२ हजार.
या १२ हजार
घटनांमध्ये एकच मोठी दंगल आहे, मुझफ्फरनगरची. यात ६० हून अधिक मारले गेले आणि ५०
हजारांहून जास्त जणांना आपलं घर सोडावं लागलं होतं. या दंगलीतले एक प्रमुख आरोपी
असलेले भाजप नेते सुरेश राणा यांना आता आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळात मानाचं स्थान
मिळालंय. फक्त भाजपला दोष देण्यात काही मतलब नाही. कारण २०११-१२ मध्ये छोट्या
दंग्यांची संख्या अचानक तिपटीने वाढली. त्याच वर्षी समाजवादी पार्टी विधानसभेत
पूर्ण बहुमताने जिंकली होती. सपाने खोदलेल्या खड्ड्यात भाजपने त्यांनाच पाच
वर्षांनी अलगद ढकलून दिलं. मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणापासून हिंदू मतांच्या
ध्रुवीकरणाचा प्रवास धार्मिक संघर्षाच्या आधारेच होऊ शकतो.
गुजरात दंगलींनंतर
राजकीय पक्षांच्या लक्षात आलंय की मोठ्या दंगली खूप महागात पडतात. गोध्रा
जळीतकांडानंतर झालेली दंगल गुजरातभर पसरली नसती तर तेव्हा गुजरातेत मुख्यमंत्री
असणारे नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी होती, असा निष्कर्ष अनेक
राजकीय अभ्यासकांनी आजवर मांडलाय. तो डाग पुसण्यासाठी मोदींना गुजरात दंगलीनंतर
जन्मलेली पिढी तरुण होईपर्यंत थांबावं लागलं. मोठी दंगल घडवण्यासाठी नियोजनही मोठं
करावं लागतं. जगभरातल्या माध्यमांमध्ये बातम्या येऊन बदनामी होते. चौकशी आणि
कोर्टाचा ससेमिरा मागे लागल्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यांचं करियर बरबाद होतं.
त्यावर चहुबाजूंनी टीका होते. त्यामुळे पापभिरू मध्यममार्गी मतदार लांब राहतात.
त्यापेक्षा छोटे धार्मिक तणाव घडवून आणण्याचा फॉर्म्युला राजकारण्यांना सोयीचा ठरू
लागलाय. मोठ्या दंगलीमुळे प्रकाशात आलेले मोदी ते छोट्या तणावांना खतपाणी घालणारे
आदित्यनाथ हा ट्रेंड लक्षात घ्यायला हवा.
मोठ्या दंगलींची
जागा आता ट्रॉम्बेसारख्या छोट्या तणावांनी घेतलीय. त्याची माध्यमांमध्ये फारशी
चर्चा होत नाही. पण स्थानिक पातळीवर त्याचा परिणाम दीर्घकाळ जाणवतो. सोशल
नेटवर्किंगमुळे अफवा पसरवून विखार निर्माण करणं आता सोपं आणि सुरक्षित झालंय.
त्यात घरोघर पोहोचणाऱ्या धार्मिक संघटनांच्या प्रचारकांची साथ असेल तर निवडणुकांत
अनपेक्षित निकाल लागतात. त्या निकालांची कारणं मग एक्झिट पोलना समजत नाहीत आणि
टीव्हीवर डोक्याला हात लावून बसलेल्या विश्लेषकांनाही. १२ हजार छोट्या धार्मिक
दंग्यांमुळे उत्तर प्रदेशात जातीची गणितं कोलमडून जाणं स्वाभाविकच मानायला हवं. अयोध्येचा
धुमाकूळ सुरू असताना झालेल्या ध्रुवीकरणापेक्षा किती तरी पट प्रभाव या छोट्या
दंग्यांच्या फॉर्म्युल्याने घडवलाय.
दंगलींचा
निवडणुकांसाठी वापर नवा नाही. काँग्रेस, कम्युनिस्ट, प्रादेशिक पक्ष, यापैकी
कुणीही यात सोवळं नाही. आज भाजप त्याचा काळाला अनुरूप स्मार्ट उपयोग करतंय एवढंच.
तो फार चिंतेचा विषय नाही. मात्र अशा दंग्यांमुळे कलुषित होणाऱ्या साध्या
माणसांच्या विवेकाला हाक घालू शकणारी भली माणसं आजवर आपल्या समाजात होती. आज ती
भली माणसं आणि त्यांची ताकद कमी होत चाललीय, ते वाईट आहे.
No comments:
Post a Comment