इन्कम टॅक्सची धाड पडले की भलभले सरळ होतात. जयराज फाटकांसारख्यांचाही बुरखा टराटरा फाटतो. कलमाडी, ए. राजा, हसन अलीसारखे मोठे माशेही गळपटतात. पण या सगळ्यांपेक्षाही पंढरपूरच्या बडव्यांवर पडलेल्या इन्कम टॅक्सच्या धाडी धक्कादायक आहेत. या सगळ्या घपल्यांपेक्षा पंढरपूरच्या बडव्यांचा फ्रॉड मोठा आहे. आता या धाडींमुळे ते वठणीवर आलेत. त्यांनी म्हणजे बडवेसमाजानं मिटिंग घेऊन भाविकांकडून पैसे न मागण्याचा निर्णय घेतलाय. पण त्याचं काय खरं नाही.
माझं घर वारकरी स्वाध्यायी. देव्हा-यात विठ्ठल रखुमाईची फोल्डरची पितळी मूर्ती. आजीची कार्तिकी वारी. आजीनंतर ती आईपप्पांनी चालवली. त्यामुळे जातीचा, धर्माचा, गावाचा, कुळाचा कुठलाच फारसा ठळक असा वारसा नसतानाही किमान सातआठशे वर्षांचा सलग धागा नाळेला चिटकून आलाय. आईच्या पोटात असल्यापासून याच्यावरच मन पोसलं गेलंय. कळत नसल्यापासून पंढरपूरला जातोय. जिथपासून पांडुरंगाला भेटतोय, तेव्हापासून बडवे माहित्येत.
बडवे कसे काठीने मारायचे. बडव्यांच्या घरी राहताना कसा त्रास सहन करावा लागयचा. अशा अनेक कहाण्या लहानपणापासून ऐकलेल्या. महाराष्ट्र टाइम्सने पहिला सांस्कृतिक विशेषांक काढला. बहुदा पाच वर्षांपूर्वीच्या गुढीपाडव्याला. जयंत पवारांनी त्याचं संपादन केलं होतं. आपण ज्यांच्यासोबत काम केलं असं अभिमानानं सांगावं इतका हा मोठा माणूस. त्यांनी काढलेला एक विषय बडव्यांवर होता. तो विषय माझ्याकडे आला. हायकोर्टाने बडव्यांना विठ्ठल मंदिरातून तडिपाराचा आदेश दिला होता. त्यासंदर्भात लिहायचं होतं.
दोन दिवस पंढरपूरला गेलो. सुनील दिवाण मटाचे पंढरपूरचे वार्ताहर. ते आणि त्यांचे मित्र डॉ. महेश कुलकर्णी हे दोन्ही दिवस सोबत होते. बरीच माहिती जमवली. सविस्तर लेख लिहिला. त्यातला बराच कापावा लागला. लेख छापून आला. अंकाची आधीपासून जोरदार हवा होती. अंक स्टॉलवर आल्या आल्या संपला. ब-याच मित्रांनी फोन करून कौतूक केलं. विशेषतः अभिजीत ताम्हणेंनी केलेलं कौतूक आठवतंय. ही डॉक्युमेंट्री फॉर्ममधे लिहिल्यासारखं वाटतंय, ते म्हणाले. मी बरीच वर्षं टीवीत काम केलेलं. त्याचा प्रभाव मलाच कळला. आजवर तशा बातम्याच प्रामुख्याने लिहिल्या होत्या. त्यामुळे लेखासाठी ओळख नव्हती. या लेखाने ती मिळाली.