Monday 28 February 2011

सामाजिक कार्यकर्ते आहेत तरी कुठे ?


आजचा लेख वाचलाय का तुम्ही, शनिवारी रात्री घरी परतल्यावर बायकोनं विचारलं.
आता लग्नाला सात वर्षं झालीत. त्यामुळे या प्रश्नाचा अर्थ मुक्ताला लेख आवडला नाही
असा ऐकणं स्वाभाविक होतं.
का आवडला नाही लेख, मी विचारलं.
अहो, हे पुस्तकाचं परीक्षण वाटलं, म्हणून विचारलं, ती म्हणाली. लेखाचं हेडिंग वेगळं आणि लेखात मात्र भलतंच, हे तिला खटकलं होतं.
बरोबर आहे गं, गेले चार पाच दिवस चंदूभाऊंच्या पुस्तकाशिवाय दुसरं डोक्यात काही नाही, म्हणून त्यावरच लिहिलं, मी म्हणालो. चार दिवस आधी लोकप्रभेत परीक्षण लिहिलं होतं. आता आणखी काय लिहायचं, म्हणून हे लिहिलं. या उत्तरावर तिचं समाधान झाल्यासारखं वाटलं.

खरंच होतं ते. शनिवारच्या कॉलमसाठी लिहायचं होतंच. डोक्यात चंद्रकांत वानखडेंच्या
आपुला चि वाद आपणासी शिवाय दुसरं काहीच नव्हतं. त्यामुळे त्यावरच लिहिलं. आज सामाजिक कार्यकर्ते कुठे आहेत, .या हेडिंगवर थेट लिहिणं बाजूल राहिलं. पण ठिकाय. लेख वाचून लोक कार्यक्रमाला यावेत आणि या प्रश्नाचं उत्तर शोधावं, अशी मला वाटलं होतं. तसे चार फोन एसेमेस आले. बस्स.

बघा वाचून तुम्हालाही कार्यक्रमाला यावसं वाटतंय का? लेख वाचून कार्यक्रमाला यावंसं वाटलं तर उत्तमच. पण यावसं वाटलं नाही, तर मात्र प्लीज तो विचार टाळा. कारण चंद्रकांत वानखडेंचं मुंबईत ऐकायला मिळणं हा दुर्मीळच योग. आज २८ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमधे प्रतिमाताई जोशी त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. तर डॉ. रवी बापट पुस्तकावर बोलणार आहेत.

पुन्हा एकदा लेख कॉपी पेस्ट आणि कार्यक्रमाचं निमंत्रण.

गोष्ट सत्तरच्या दशकातल्या शेवटातली. गोष्ट देवकुमार बाचिकवार यांची. त्यांचे वडिल गवंडीकाम करणारे. पण मुलगा पांढरपेशांसारखा चळवळीत आला. राष्ट्र सेवा दलात सुरुवात झाली. तिथे ते पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. तिथलं ब्राम्हणी मध्यवर्गीय वळण बोचणारं होतं. पुण्यात जेवायला गेलं की आपलं काम स्वतः करावं असं तत्त्वज्ञान सागून ताट धुवून घेणारे बेरकी नेते त्यांना खुपायचे. त्यातून रस्ता मिळाला जयप्रकाश नारायणांनी उभ्या केलेल्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचा. वाहिनी हा ध्येयवादी रसरशीत तरुणाईचा अविष्कार होता.

आणीबाणीच्या आंदोलनानंतर चंद्रकांत वानखडेंसोबत देवकुमार मेटीखेडा या यवतमाळ जिल्ह्यातल्या छोट्याशा खेड्यात रमले. शेतमजुरांचं संघटनापासून गावच्या विकासासाठीच्या अनेक कामात त्यांनी झोकून दिलं. पुढे शेतकरी संघटनेतही काम केलं. पण स्वतःला सर्वोदयी म्हणवणा-या, गांधी विनोबांचं नाव घेणा-यांनीच वानखडे कुटुंबाच्या केलेल्या जाचाला ते कंटाळले. त्यांना धक्का बसला. अशा लोकांचा अन्याय सहन करणारी तत्त्वनिष्ठा आणि ध्येयनिष्ठा काय कामाची, असे सवाल वानखडेंना विचारत ते सामाजिक कामातून बाहेर आले. त्यांचा सामाजिक कामावरचा विश्वास उडाला.

देवकुमारनी थेट मारेगावला हॉटेल काढलं. त्यात दारूही विकायला सुरुवात केली. वानखडे त्या हॉटेलात गेले की त्यांना अपराधी वाटायचं. लाज वाटायची. बालमजुरांकडून दारू वाढतो, यासाठी मन खायचं. म्हणून ते वानखडेंना हात धरून हॉटेलातून बाहेर काढायचे. त्यांनी हॉटेल बंद करून चहाची टपरी काढायचाही प्रयत्न करून बघितला. पण अतिक्रमणात ही टपरी बंद पडली. याच ओढाताणीतून ते दारूच्या आहारी गेले. पुढे देवकुमार वणी नगरपरिषदेचे नगरसेवक झाले. बांधकाम समितीचे सभापतीही बनले. पण तिथे भ्रष्टाचार केला नाही. जिथे नगरसेवक आहे तिथे प्रामाणिकपणे नगराची सेवा केली. दारूची पाटी लावली, तिथे दारू विकली, अशं स्पष्ट होतं.

बाबरी मशिद पाडली गेली तेव्हा हिंदू मुस्लिम द्वेषाचा फायदा उचलत दोन नंबरच्या धंद्यातील प्रतिस्पर्ध्याने देवकुमार यांच्यावर हल्ला केला. तो प्रतिस्पर्धी मुसलमान होता. एका मुस्लिम तरुणाने पाठीमागून त्यांच्यावर तलवारीने वार केला. डोक्यात वार होऊनही त्यांनी हल्लेखोराचा हात करकचून पकडला. त्याला रिक्षात बसवून त्याला सुरक्षित पोचवले. मगच हॉस्पिटलमधे दाखल झाले. बारा टाके पडले. मुस्लिम तरुणाने अण्णावर हल्ला केल्याची बातमी पसरली. लाठ्याकाठ्या घेऊन दोन तीन हजारांचा जमाव एकत्र आला. अशाही स्थितीत देवकुमार गर्दीला सामोरे गेले. इथे कुणी हिंदू नाही. कुणी मुसलमान नाही. दोन नंबरच्या भांडणातून झालंय, असं सांगितलं. दंगल होऊ दिली नाही. पुढे आजारपणात त्यांचा मृत्यू झाला. कुणीही त्याची दखल घेतली नाही.

चंद्रकांत वानखडे यांनी लिहिलेल्या मनोविकास प्रकाशनच्या आपुलाचि वाद आपणांसी या पुस्तकात ही एका कार्यकर्त्याची ससेहोलपट सविस्तर आलीय. मुळात हे पुस्तक कार्यकर्त्याचच मनोगत आहे. वानखडे हे सत्तरच्या दशकातल्या जेपी मूवमेंटमधलं एक आघाडीचं नाव. त्यांच्यासारख्याच तरुण कार्यकर्त्यांच्या लढ्याने आणीबाणी लादणारी हुकूमशाही सत्ता उलथली गेली. पुढे संपूर्ण क्रांतीचं ध्येय समोर ठेवून छात्र युवा संघर्ष वाहिनीत भाग घेतला. स्वतः क्रांतीचं ध्येय समोर ठेवून स्वतःला घडवलं. सोबत शिबिरांमधून कार्यकर्त्यांची एक पिढी घडवली. ती आजही काम करतेय. एका छोट्या गावात जाऊन निरपेक्षपणे गाव उभं करण्यासाठी धडपड केली. शेतमजुरांचं संघटन केलं. पुढे नामांतराच्या लढ्यात भाग घेतला. शेतकरी संघटनेत स्वतःला झोकून दिलं. शेतक-यांना प्रशिक्षण देऊन त्यातून आंदोलनाचं नेतृत्व करणारे नेते कार्यकर्ते पुढे आणले. लोकसभेंची निवडणूकही लढवली. पुढे शरद जोशींच्या विरोधात बंड केलं.

पुढे हाच साक्षेपी कार्यकर्ता आग्रही पत्रकाराच्या भूमिकेत समोर आला. सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे ते संपादक बनले. शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रश्न त्यांनी मोठ्या ताकदीनं हाताळला. ही समस्या आहे, हे लोकांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यात वानखडेंचा हात मोठा आहे. शेतक-यांच्या समस्यांवर त्यांनी लिहिलेले लेख एका साध्या सत्यासाठी या पुस्तकातून एकत्र आले आहेत. आपुला चि वाद आपणासी हे चंद्रकांत वानखडेंचं नवं पुस्तक. ऑक्टोबरच्या अखेरीस हे पुस्तक आलं. तीन महिन्यातच याची पहिली आवृत्ती संपलीय. आता दुस-या आवृत्तीचं पुण्यात प्रकाशन होतंय. त्यानिमित्त मुंबईत त्यांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय. २८ तारखेला सोमवारी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमधे ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत आणि डॉ. रवी बापट पुस्तकावर बोलणार आहेत.

या पुस्तकाचं उपशीर्षक एका कार्यकर्त्याचं आत्मकथन असं आहे. हे काही रूढ अर्थानं आत्मचरित्र नाही. या खरंतर आठवणींच्या नोंदी आहेत. यात वानखडेंनी आपल्या आयुष्याचं तारिखवार किंवा तपशीलवार वर्णन केलेंल नाही. पण त्यांच्या लिखाणातून किमान महाराष्ट्रातील आंदोलनांचा गेल्या तीस चाळीस वर्षांचा लेखाजोखा समोर आलाय. त्यातून महाराष्ट्रातील धडाडीच्या कार्यकर्त्यांचा एक प्रातिनिधिक प्रवासही अधोरेखित झालाय. या कार्यकर्त्यांच्या एका पिढीने केलेला त्याग यातून समोर येतो. त्यांचे झालेले हाल यातून कळतात. हा सगळा प्रवास अस्वस्थ करणारा आहे. म्हणून महत्त्वाचाही आहे. आज सगळ्याच प्रश्नांनी आणि समस्यांनी उग्र रूप धारण केलेलं असताना हा प्रवास अधिक अस्वस्थ करतो. एकच प्रश्न यातून पुढे येतो, आज कार्यकर्ते कुठे आहेत?

गांधीजींनी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हटलं होतं. गांधीजींच्या आणि गांधीवादी आंदोलनाला महाराष्ट्राने भरभरून प्रतिसाद दिला. कम्युनिझम असो वा हिंदुत्ववाद, समाजवाद असो वा आंबेडकरवाद, इथे सर्वस्व झोकून दिलेल्या कार्यकर्त्यांची कमतरता कुणालाच कधीच भासली नाही. पण आता चित्र बदललंय. कारण जग बदललंय. चाळीत किंवा कॉलनीत गणपतीच्या आदल्या दिवशी देखावे बनवायला कार्यकर्ते येत नाहीत, तर जग बदलायच्या आंदोलनात ते कुठून येणार? अर्थात याला अपवाद आहेतच. पण ते नियम सिद्ध करण्यापुरते. फक्त सामाजिक आंदोलनं नाहीत तर राजकीय पक्षांनाही कार्यकर्त्याची वानवा आहे. काँग्रेसी कार्यकर्त्याच्या पांढ-या शर्टावरची इस्त्री आता उतरत नाही. समाजवादी विचारसरणीचे पक्ष आणि कम्युनिस्ट यांच्याकडचा कार्यकर्त्याचा ओढा कधीच आटलाय. संघाच्या शाखेत मुलं येत नाही, म्हणून आरएसएसवालेही बोंबा मारत आहेत. वीस वर्षांपूर्वीपर्यंत शिवसेनेत जो रस्त्यावरचा कार्यकर्ता दिसायचा तो आज सेनेत उरलेला नाही आणि मनसेच्या नव्या जनरेशनकडेही नाही. पूर्वी नाक्यावर एक फलक लागला की गर्दी जमायची. आता सगळ्यांनाच बस भरून सभांना गर्दी जमवावी लागते. कुणीही त्याला अपवाद नाही.

आज सामाजिक कार्यकर्ता ही प्रजाती संपुष्टात आलीय का? नाही की त्याचा चेहरा बदललाय याचा विचार करायला हवा. आताचा सामाजिक कार्यकर्ता बदललेला आहे. तो फाटका उरलेला नाही. त्याने समाजसेवा हे प्रोफेशन म्हणून निवडलं आहे. त्यात त्याने करियर केलंय. तो एनजीओंमधे रितसर नोकरी करतो. तसं नसेल तरी तो आपली आपल्या कुटुंबाची व्यवस्था करून लष्कराच्या भाक-या भाजायला येतो. त्याग वगैरे त्याला फारसं माहीत नाही. तो जगभर फिरून कॉन्फरन्सेसमधे पेपर वाचतो. अगदी पंचवीस वर्षांपूर्वीही हे कुणाला मान्य झालं नसतं. पण आज हे वास्तव आहे. अशाच पांढरपेशा कार्यकर्त्यांनीच इजिप्तमधे क्रांती घडवलीय. संघटना नाही तर फेसबूक या क्रातीचा गाभा आहे. चार शहरांत नव्वद टक्के लोकसंख्या असलेल्या इजिप्तसारख्या देशात हे शक्य होतं. पण आजही जिथली पासष्ट टक्के जनता गावात राहते, तिथे हे शक्य आहे का? भारत बदलायचा असेल तर नवा कार्यकर्ता कसा असायला हवा?  प्रश्न विचार करायला लावणारा आणि अडचणीत आणणारा आहे?

उत्तरासाठी २८ तारखेला वानखडेंच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला जावं लागेल बहुदा. 

3 comments:

  1. सचिनदादा, मुलाखत खुप छान झाली.. तुझ्यामुळे एका थोर कार्यकर्त्याबद्दल माहिती मिळाली.

    ReplyDelete
  2. आपण सध्या सर्वच पक्ष व संस्थाना भेडसावत असलेला प्रश्न मांडलेला आहे. अगदी ८० च्या दशकापर्यंत ध्येयवादी,तत्वनिष्ठ व त्यागास सिद्ध असलेल्या कार्यकर्त्यांची वानवा नव्हती.परन्तु त्यानंतर,असे कार्यकर्तेही परिस्थितीचे चटके सोसून नंतर नाईलाजाने तडजोडी करू लागले व नव्या पिढीतील काही अपवाद वगलता,कार्यकर्त्यानी ध्येयवाद,त्याग वगैरे बाजूला ठेवून महत्वाकांक्षी मार्ग स्वीकारला. या बद्दल त्याना दोषही देऊन चालणार नाही. विविध पक्षांच्या आणि संस्थांच्या नेतृत्वाने त्यांच्यासमोर ठेवलेले 'आदर्श' याला कारणीभूत ठरले.समाजानेही ध्येयवादी कार्यकर्त्यांची केलेली उपेक्षा हेही एक महत्वाचे कारण असावे. तथापि,कार्यकर्त्यांअभावी संस्था जरी ओस पडत नसल्या तरी व्यावसायिक दृष्टिकोण बालगनारया 'सेवकांमुले' संस्थांचे व पक्शान्चेही स्वरुप बाजारू होत चालले आहे. उद्दिश्तान्मधे व विचारसरनीमध्ये प्रचंड ताकत असलेल्या संस्थांचे व पक्षांचे अस्तित्व क्षीण होत चालले आहे ही चिंतेची बाब आहे हे मात्र खरे

    ReplyDelete
  3. थँक्स अजितजी. आपली प्रतिक्रिया आवडली. अशा विषयावर लिहिताना तुम्ही तुमच्या वडिलांवर लोकसत्तेत लिहिलेल्या लेखाची नेहमी आठवण होते.

    ReplyDelete