Sunday, 9 April 2017

गाहे तव जय गाथा

लोकलमधे गर्दी असते. 
उभ्या असलेल्या एकाच्या मोबाइलवर `जन गण मन` वाजायला लागतं. 
जवळच बसलेला राष्ट्रगीताला मान द्यायचा म्हणून उभा राहतो. 
चटकन तो मोबाईलवाला त्याच्या जागेवर बसतो. 
जागा गेलेला म्हणतो. `अरे ये तो मोदी से भी चालू निकला`.
असा एक मस्त जोक वॉट्सअपवर फिरत होता. तो आठवायचं कारण माझा एक लेख. यावर्षी वॅलंटाइन डे ला सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला. त्यात त्यांनी सिनेमाचा भाग म्हणून राष्ट्रगीत आलं तर उभं राहणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा दिला होता. तेव्हा एक लेख `गोवन वार्ता` या गोव्यातल्या पेपरात लिहिला होता. उशीर झालाय. निमित्त हरवलंय. पण कालच एका मित्राशी बोलताना हा लेख आठवला. पुन्हा वाचला. मजा आली. म्हटलं तो ब्लॉगवर टाकायला हवा. म्हणून टाकतोय. नेहमीसारखा कटपेस्ट.
...

सुरेल संचित `पुरुषार्था`चं

द हिंदूचे कार्टूनिस्ट केशव यांनी चितारलेली ही किशोरीताईंची मैफल 
पाकिस्तानात सुफी दर्ग्यांवर होत असलेल्या हल्ल्यांविषयी लिहायचं होतं खरं तर. पण किशोरीताई गेल्या आणि म्हटलं लिहायचंच. त्यांच्या गाण्याबद्दल मी काही लिहू शकत नाही. या निमित्ताने एकेकाळी देवदासी समाज म्हणून ओळखला जाणाऱ्या गोमंतक मराठा समाजाच्या संघर्षाविषयी लिहायला घेतलं. वामन राधाकृष्ण यांनी या विषयावर लिहिलेलं पुरुषार्थ हे पुस्तक शोधत होतो. ते सापडलंच नाही. त्यामुळे लेख लिहायला उशीर लागला. अनेक हवे ते संदर्भ त्यात होते. त्यामुळे बहुतांशी स्मरणशक्तीवर अवलंबून राहावं लागलं. पराग परबांचं पुस्तक ऐनवेळेस हाताशी आलं. त्याचा फायदा झाला. बरेच दिवस लिहायचं होतं. लिहिलं, पण अजून समाधान नाही झालंय. खरं तर स्वतंत्र पुस्तक होईल, इतका मोठा हा संघर्ष आहे. कुणीतरी ते सविस्तर लिहायला हवं.

कलावंताची जात बघायची असते का? आणि किशोरीताईंसारख्या या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या कलाकाराच्या जातीविषयी चर्चा करणं कितपत योग्य आहे?  या प्रश्नांमागची भावना अभिनंदनीयच आहे. त्याचा सन्मान करायलाच हवा. पण दुर्दैवाने आपल्याकडे सामाजिक पार्श्वभूमी समजली तरच कलावंतांच्या साधनेचं मोल अधिक समजून घेता येतं. म्हणून ती पार्श्वभूमी सरळ मांडायला हवी. त्याचीही चर्चा व्हायला हवी. भारतरत्न एम एस सुब्बलक्ष्मी आणि लता मंगेशकर यांच्या संघर्षाकडेही या दृष्टीने पाहायला हवं.

गोव्यात `आप` का हरली?

गोवन वार्तामध्ये भाजपविषय़ी लेख लिहिला तेव्हाच खरं तर आपविषयी लिहायचं होतं. गोव्याच्या राजकारणाचा मूळ पिंड हा बहुजनवादाचा आहे. जमिनीसह सर्व समृद्धीची साधनं हातात असणारे उच्चवर्णीय आणि त्यामुळे गुलामीच्या गर्तेत पिळून निघणारे बहुजन हे गोव्याच्या ताज्या इतिहासाचा भाग असलेलं समाजवास्तव आता नाही. परिस्थिती बदलली, पिढ्या गेल्या तरी त्याचा पीळ अद्याप गेलेला नाही. फक्त हिंदूंमधेच नाही तर ख्रिश्चनांमधेही ही विभागणी आहे.

इंटरनॅशनल हायफाय रॅपरमधे गुंडाळलेल्या गोव्यात जात सहसा दिसत नाही. पर्यटकांना तर ती दिसण्याची शक्यताच नाही. माझं निरीक्षण आहे की महाराष्ट्रापेक्षाही गोव्याच्या राजकारण, समाजकारणात जात जास्त आहे. हे मी गोव्यात असताना अनेकदा गप्पांत मांडलंय. पण ते कुणाही गोंयकार मित्राला आवडत नाही. धर्माच्या झगड्यात जातीचे संघर्ष लपून राहतात. तसं काहीसं गोव्यात झालंय.

पर्रीकरांच्या पराभवाची प्रश्नचिन्ह

मी गोव्यात तीन वर्षं काम केलं. गोवेकर वाचक भेटल्यावर भरभरून बोलतो. पण फोन करून बोलणं त्याला फारसं रूचत नसावं, असा माझा अनुभव. पण १६ मार्चला माझ्या गोवन वार्ता पेपरातल्या पाक्षिक कॉलमाने माझा आजवरचा अनुभव खोटा ठरवला. तो मनोहर पर्रीकरांच्या शपथविधीचा दिवस होता. त्यांनी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यासारख्या छोट्या राज्याचा मुख्यमंत्री बनणं, याचा मला खरंच राग आला होता. त्या रागाच्या तिडकीतच लेख उतरला.

तो राग माझ्या एकट्याचा नव्हता. सगळ्या गोव्याचाच राग होता तो. हा लेख सोशल मीडियावर प्रचंड फिरला. मी चार गोव्यातल्या चार ग्रुपचा मेंबर आहे. त्यातच तो पुन्हा पुन्हा शेअर होत राहिला. लोकांच्या मनातलं या लेखात होतं जणू. विशेषतः त्यातला भाजपवरच्या बहुजनांच्या रोषाचं विश्लेषण लोकांचा आवडलं असावं. केप्याच्या माजी सैनिकापासून मडगावच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकापर्यंत लोक फोन करत राहिले. व्हॉट्सअपवर व्यक्त होत राहिले. मजा आली.

Friday, 24 March 2017

तळवलकर मला भेटले


मटात छापून आलेलं तळवलकरांचं देखणं ग्राफिक्स रेखाटन
गोव्यातलं एक आघाडीचं वर्तमानपत्र असलेल्या नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांच्यामुळे मी गोविंद तळवळकरांवर लेख लिहिला. त्या लेखात बरीच भर घालून ही पोस्ट तयार केलीय.
..........

छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्र टाइम्समधल्या नव्या प्रथेप्रमाणे गेस्ट एडिटर होते. तेव्हा भारतकुमार राऊत मटाचे संपादक होते. एका दिवसाचं संपादकपद भूषवण्यामध्ये भुजबळांना खूपच रस होता. त्यांचं स्वागत झालं. ते संपादकांच्या केबिनमध्ये पोहोचले. खूप सन्मानाने त्यांना संपादकाच्या खुर्चीवर बसवण्यात आलं. तिथे बसताच नेहमीच्या खुशखुशीत शैलीत ते म्हणाले, ही महाराष्ट्राची नंबर दोनची खुर्ची आहे. पहिली मुख्यमंत्र्यांची. त्यावर तर मला बसता येणार नाही. या खुर्चीत तरी बसायला मिळालंय. सगळे हसले. त्याच केबिनमध्ये असणारा मीही हसलो. महाराष्ट्र राज्याचा दोन नंबरचा नेता असणारा उपमुख्यमंत्री असं म्हणत होता. गोविंदराव तळवळकरांना प्रत्यक्षात मी कधी भेटलो नाही. तसं पाहिलंही नाही. पण त्याक्षणी मला वाटलं, मला तळवळकर भेटले. या खुर्चीत ही ताकद आहे, कारण यावर सत्तावीस वर्षं तळवळकर बसले होते.

Friday, 10 March 2017

दिल हैं हिंदुस्तानी


अविनाश दुधे माझा मित्र आहे, याचा मला अभिमान आहे. ताकदीने लिहिणारा. लिहिलंय त्यासाठी लढणारा. लढाईसाठी त्याग करून किंमत चुकवणारा असा आजघडीला माझ्या पिढीतला मला माहीत असणारा एकमेव संपादक. विचारांच्या बाबतीत टोक टाळणारा. तरीही स्वतःची भूमिका असणारा. त्यासाठी काहीही करायला तयार असणारा अविनाश मी जवळून बघितलाय. अनेकदा ही तात्त्विक वगैरे माणसं खूप कोरडी असतात. आमचा अविनाश तसा नाही. उलट तो आहे खूप हळवा आणि लाघवी. त्याने अफाट माणसं जोडलीत. त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार मित्रांचा गोतावळा खूप मोठा आहे.

टोकाच्या उजवेपणाकडून मध्याच्या डावीकडे पोहोचण्याचा त्याचा प्रवास अद्भूत आहे. तो त्याचा स्वतःचा संघर्ष आहे. पत्रकारितेत येताना विचारांच्या टोकांना असणाऱ्यांना विचारांच्या प्रवासाची संधी असते. कारण आमच्या या धंद्यात संवाद सगळ्यांशी करावाच लागतो. झापडं लावायचं निक्षून टाळायचं असेल तर विचारांचा प्रवास आनंदाने करता येतो. किंबहुना पत्रकारितेच्या मैदानात असेपर्यंत असा प्रवास सुरुच असतो. त्यासाठी स्वतःला तपासून घ्यावं लागतं सतत. बदलण्याची तयारी ठेवावी लागते. अविनाश या विचारांच्या प्रवासाचा आनंदयात्री आहे. त्याचा विचार त्याला बौद्धिकांमधून किंवा पुस्तकांमधून रेडिमेड मिळालेला नाही. तो त्याने स्वतः कमावलेला आहे. म्हणून त्याला त्याची किंमत माहीत आहे. तो त्याच्या विचारांसाठी बभ्रा न करता त्याग करू शकतो.

सुरुवात नागपूर तरुण भारत. नंतर चित्रलेखा. तिथून लोकमत. शेवटी पुण्यनगरी. हा अविनाशचा प्रवास नाही, तो त्याच्या करियरचा प्रवास आहे. पाचवीला पुजलेल्या आजारपणामुळे अमरावती सोडायची नव्हती म्हणून तो अडकून राहिला. नाहीतर आज मुंबई किंवा नागपूरला आणखी मोठ्या बॅनरमध्ये तो संपादक असता. आजवर प्रत्येक ठिकाणी त्याला लिखाणामुळे नोकरी सोडावी लागलीय. असं करावं लागणं हा एका पत्रकाराच्या लेखणीचा खूपच मोठा सन्मान असतो. अविनाशला घडवणारे संपादक ज्ञानेश महाराव यांच्यामुळे त्याचा चित्रलेखातला निरोप सुखद झाला. नियम सिद्ध करणारा हा एकमेव अपवाद सोडला तर प्रत्येक ठिकाणी तो हसत हसत सक्तीच्या राजीनाम्याचा सन्मान भोगून आलाय. आता त्याचा आणि त्याच्या करियरचा प्रवास `मीडिया वॉच`पर्यंत येऊन थांबलाय. मीडिया वॉच हे त्याचं गाजलेलं सदर. त्याच नावाचा त्याचा दिवाळी अंकही गाजला. आता गेल्याच महिन्यात त्याचं त्रैमासिक बनलंय. पहिल्याच अंकात त्याने मला विषय दिला होता, `आपण भारतीय कट्टर होत आहोत का?` मला त्यावर जे काही किडुकमिडुक वाटलं ते लिहिलंय.

Sunday, 5 February 2017

आघाड्यांचा राजकारणाचा शेवट?

गोव्यात लिहिताना एक गडबड नेहमी व्हायची. विषय समजावून सांगण्याच्या नादात मांडायची मूळ गोष्ट राहूनच जायची. ते मग शेवटच्या पॅरेग्राफमधे उरायचं. आता `गोवन वार्ता`साठी लिहितानाही तसंच होतंय. पण लिहायलाच हवं. गोव्यातल्या वाचकांशी एक वेगळं नातं बनलंय. फोन करून प्रतिसाद देण्याचा त्यांचा फारसा स्वभाव नाही, तरीही.

उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीसाठी भाजपशी असलेली युती तोडली. त्याविषयी महाराष्ट्राबाहेरच्या वाचकांशी कसं बोलता येईल, याचा प्रयत्न केलाय. देशाच्या पातळीवर महापालिका आणि युतीचं महत्त्व सापडतंय का ते पाहिलंय. फारसं जमलेलं नाही. पण हात अगदीच काही रिकामा राहणार नाही. 

भाषाव्रती

यंदा जवळ असूनही साहित्य संमेलनाला गेलो नाही. जायला हवं होतं. निदान पुस्तकं विकत घ्यायला तरी. त्यातल्या त्यात साहित्य संमेलनाशी संबंध उरला तो एका लेखापुरता. ग्रंथालीचं रूची नावाचं मासिक आहे. प्रल्हाद जाधवांनी त्याचा मराठी भाषा विशेषांक संपादित केलाय. त्यात माझा छोटा लेख आहे, यास्मिन शेखांवरचा.

यास्मिन शेखांचा हिरव्या रंगाचा `मराठी शब्दलेखनकोश` मी भरपूर वापरलाय. कितीतरी जणांना विकत घ्यायला लावलाय. आता त्याच्या विस्तारित आवृत्त्याही येऊन संपल्यात. मराठी भाषा विकास संस्थेची `मराठी लेखन मार्गदर्शिका`ही तशीच मोलाची. लिहिणाऱ्या हातांनी ही दोन्ही पुस्तकं नेहमी हाताशी ठेवावीत अशीच. आजवर लिहिताना या दोन पुस्तकांनी खूप आधार दिला. हा लेख त्यासाठीचीच कृतज्ञता आहे.

कपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे

आज रविवार ५ फेब्रुवारीच्या टाइम्स ऑफ इंडिया मधे मालिनी अय्यर यांचा लेख वाचला, व्हाय ब्रा पँटीज आर नॉट बॉम्ब्ज? महाराष्ट्र टाइम्समधे स्पृहा जोशीने फेसबूकवर अपलोड केलेल्या बोल्ड फोटोची बातमी वाचली. म्हटलं लिहिलेला लेख ब्लॉगवर टाकण्याचं सत्कृत्य आज करायलाच हवं. एसएनडीटी युनिवर्सिटीतल्या मुलींसाठी ड्रेस कोडचा फतवा निघाला. त्यावर लिहिलेला लेख गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या अघळपघळ कॉलमात छापून आला होता. त्याचा मथळा होता, संकुचितांची बोंबाबोंब.

Friday, 27 January 2017

मजबुरी का नाम नरेंद्र मोदी


गोव्यातली तीन वर्षं मजेतच गेली. नवे मित्र भेटले. खूप नवं समजून घेता आलं. खूप नवं शिकता आलं. तिथल्यासाठी लिहिताना शैलीही मुळातून बदलावी लागली होती. एकतर आक्रमकता आवरायला लागली. तसा गोव्याचा स्वभावच नाही. मी ज्या पेपरचा संपादक होतो, त्या गोवादूतचा स्वभावही माझ्या आजवरच्या लिखाणापेक्षा वेगळा होता. मुंबईत लिहिताना वाचक अगदी ओळखीचा होता. गोव्यात तसं नव्हतं. विषय समजावून सांगण्यातच लेखाची शब्दसंख्या संपून जायची. भूमिका कशीबशी शेवटच्या पॅराग्राफमधे मांडावी लागायची. शिवाय नियमित अग्रलेख लिहिणं थकवणारंच होतं. आमचे कार्यकारी संपादक सुनील डोळे यांनी त्याचा भार फार येऊ दिला नाही. तरीही अनेकदा माहीत नसलेल्या विषयांवरही लिहावं लागायचं. पर्याय नव्हता.