Tuesday 8 February 2011

गणपती टॉप टेन


गणपतीबाप्पा वर मी लिहिलेला हा आणखी एक लेख. यात बाप्पाच्या गाण्यांवर लिहिलंय. मुंबई टाइम्स ऑन सॅटर्डे म्हणजेच मॉसची ही कवरस्टोरी होती. लिहिताना खूप लोकांशी बोललो होतो. छान गंमत आली. नवीन माहिती मिळाली.

यातही माझी बायलाइन दिली नव्हती. तरीही लेख आवडल्याचे दोन चार एसेमेस आले होते. काल माघी गणपती म्हणजे गणेशजयंती झाली. मुंबई कोकणात अनेक ठिकाणी घरात आणि सार्वजनिक गणपती आलेत. ते निमित्त हा लेख अपलोड करण्याचं.


ऋचांपासून रिमिक्सपर्यंत गणपतीबाप्पाने कायम संगीतकारांना मोहवून टाकलंय. गीतकार, गायक, वादक सगळ्यांनाच त्याने नादावलंय. मंदिरातल्या भूपाळीपासून तमाशातल्या नांदीपर्यंत बाप्पा सर्वत्र असतो. गणेशोत्सवात मंडपाबाहेरच्या स्पीकर्सपासून मोबाइलच्या कॉलरट्यूनपर्यंत बाप्पाची गाणी ऐकू येतात. अशा गणपतीसमोर सर्वाधिक वाजणा-या मराठी टॉप टेन गाण्यांची ही लिस्ट. गणरायाची सर्वोत्कृष्ट भक्तीगीतं यापेक्षा वेगळी असू शकतील. पण सर्वात लोकप्रिय गाणी यापेक्षा फार निराळी असण्याची शक्यता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि साऊंड सर्विसवाल्यांशी बोलून ही यादी बनवलीय. लक्षात घ्या, ही गाणी क्रमानुसार नाहीत, सारख्याच तोलामोलाची आहेत.

मोरया मोरया
संगीत - अजय अतुल
गीत - जगदीश खेबुडकर
गायक - अजय
आज घडीला बाप्पाचं सर्वाधिक वाजणारं गाणं हेच. मराठीत नव्या दमाचं रसरशीत संगीत आणणारे अजय-अतुल यांचं हे सर्वाधिक लोकप्रिय गाणं म्हणायला हवं. मूळ 'उलाढाल' सिनेमातलं हे गाणं. त्याचं चांगल्यापैकी झालेलं पिक्चरायझेशन फारसं कुणाच्या लक्षात नाही. जगदीश खेबुडकर यांनी तयार चालीवरही हे मस्त गाणं लिहिलंय. झीवर गाजलेल्या अजय-अतुल नाइटची भैरवी या गाण्याने झाली. त्यानंतर प्रत्येक मराठी इव्हेण्टमध्ये हे गाणं वाजतंच. अप्रतिम ऑर्केस्ट्रा हे या गाण्याचं वैशिष्ट्य. अजयने हे गाणं वेगळ्याच आर्त जोशात गायलंय. हे ऐकताना नकळत डोळ्यांत पाणी येतं, असं सांगणारे अनेक फोन अजय अतुलला येत असतात.

ओंकार स्वरूपा
संगीत - श्रीधर फडके
गीत - संत एकनाथ
गायक - सुरेश वाडकर
ज्ञानेश्वर माऊलींचं 'ओम नमोजी आद्या' आपण लतादीदींचं गाणं म्हणून ऐकलंय. तेच संतश्रेष्ठ तुकारामांच्या 'ओंकार प्रधान रूप गणेशाचे' या अभंगाचंही. पण संत एकनाथांच्या 'ओंकार स्वरूपा'ने या सगळ्यांवर कडी केली. श्रीधर फडकेंचं धीरगंभीर संगीत आणि सुरेश वाडकरांचा प्रसन्न स्वर याने हे गाणं अप्रतिम रंगलंय. त्याचं क्लासपासून मासपर्यंतचं अपील तर अफलातून. अगदी शाळाकॉलेजांच्या गॅदरिंगमध्येही तुज नमोच्या चालीवरचं नृत्य हमखास असतंच. आणि अजूनही अनेक मंडपांत सकाळी पहिलं गाणं हेच वाजतं.

बाप्पा मोरया रे
गीत हरेंद्र जाधव
संगीत - मधुकर पाठक
गायक - प्रल्हाद शिंदे
'तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता' हे गणपतीवरचं रेकॉर्डब्रेक गाणं. याला पर्याय नाही. 'पाहा झाले पुरे एक वर्ष, पु-या वर्षानं एकदा हर्ष' असं उडत्या चालीवर दु:ख सांगण्याची लोकगीताची रीत या गाण्यात पुरेपूर आलीय. यात लाल गव्हाचे मोदक, रताळ्या केळ्याचा प्रसादही आला. गरिबांची व्यथा यात हरेंद्र जाधवांचे शब्द, मधुकर पाठकांची चाल आणि प्रल्हाद शिंदेचा पहाडी आवाज यातून अचूक आलीय. या गाण्यासोबत गाजलेली प्रल्हाद शिंदेंची गाणी 'ऐका सत्यनारायणाची कथा' असो की 'हळू हळू हलवा गं सोनियाचा पाळणा' अशी सिच्युएशनल गाणी आजही वाजतात आणि मराठी भाषा जिवंत असेपर्यंत वाजत राहणार.

प्रथम तुला वंदितो
गीत - शांतराम नांदगावकर
संगीत - अनिल-अरुण
गायक - पं. वसंतराव देशपांडे, अनुराधा पौंडवाल

तू सूखकर्ता तू दुखहर्ता
गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - अनिल अरुण
गायक - पं. वसंतराव देशपांडे, राणी वर्मा
'अष्टविनायक' सिनेमातली ही दोन गाणी. हा सिनेमा तसा बराच जुना. ७९ सालातला. सचिन पिळगांवकरला विग घालायची गरज नव्हती तेव्हाचा. पण यातली 'तू सुखकर्ता, तू दुखहर्ता', 'प्रथम तुला वंदितो', 'अष्टविनायका तुझा महिमा कसा' ही गणपतीवरची तिन्ही गाणी आजही हिट आहेत. तसा सो सो सिनेमा. पण संगीताने त्याला अजरामर केलं. दिग्गज गायक पं. वसंतराव देशपांडेंनी यात छोटी भूमिकाही केली होती. आणि त्यांच्या स्वराने यातल्या गाण्यांत प्राण फुंकलेत. अनिल मोहिले आणि अरुण पौंडवाल या जोडगोळीने यानंतरही अनेक अप्रतिम गाणी दिली. पण अष्टविनायक हा माइलस्टोन ठरला. यातली गाणी वेगवेगळ्या गीतकारांनी लिहिलीत. 'अष्टविनायका तुझा महिमा कसा' हे तर मराठी सिनेमातलं लांबीने सगळ्यात मोठं गाणं.


चिकमोत्याची माळ
गीत - शाहिर विलास जैतापकर
संगीत - निर्मल-अरविंद
गायक - जयश्री शिवराम, श्रीनिवास केशाळकर
एक वेळ अशी होती, की नवी मराठी गाणी मंडपांमध्ये वाजतच नसत. अशावेळेस 'चिकमोत्याची माळ'ने धुमाकूळ घातला. आजही मंडपांमध्ये हे गाणं मस्ट. शाहीर विलास जैतापकरांनी शहरी लोकांना अपरिचित लोकसाहित्यातले संदर्भ घेत हे गाणं लिहिलं. दोनेक वर्षांपूर्वी या वेगळ्या पद्धतीने लिहिणा-या तरुण गीतकारांचं निधन झालं. निर्मल- अरविंद या संगीतकार जोडगोळीने गरब्याच्या तालावरची अत्यंत सोपी चाल दिली. यातले अरविंद म्हणजे संगीतकार अमर हळदीपुरांचे भाऊ. मूळ गाणं गायलंय जयश्री शिवराम यांनी. पण नंतर पाच वेगवेगळ्या अल्बममध्ये उत्तरा केळकरांनी हे गाणं गायलं. त्यामुळे ते त्यांचंच बनलं. पुरुष आवाजात हे गाणं श्रीनिवास कशाळकर यांनी मस्तच गायलं होतं. याच सीडीतलं 'सनईचा सूर', 'बंधू येईल माहेरी न्यायला' ही गणपतीची गाणीही तितकीच गोड आणि हीट आहेत.

उठ महागणपती  
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - स्नेहल भाटकर
गायक - सूमन कल्याणपूर
इतकं अवघड गाणं या हिटलिस्टमध्ये असल्याने आश्चर्य वाटतं. कदाचित स्नेहल भाटकरांच्या अवीट चालीमुळे हे इथं असावं. 'अन्नपूर्णा' या सिनेमातली तुझ्या कांतिसम रक्तपताका ही भूपाळी सूमन कल्याणपूरांनी गायलीय. भूपाळीची सगळी वैषिष्ट्य घेऊन हे गाणं येतं. आणि यातली 'उठ महागणपती' ही हाक तर मनात रुतते. 'उठा उठा हो सकाळीक, वाचे स्मरा गजमुख' आणि 'उठी उठी बा मोरेश्वरा' या बाप्पाच्याच अन्य भूपाळ्याही खरं तर तेवढ्याच लोकप्रिय आहेत. पण या गाण्यातल्या रक्तपताकाने आपली मोहोर कायमची उमटवली आहे.

आधी वंदू तुज मोरया
गीत - शांता शेळके
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक - लता मंगेशकर

गणराज रंगी नाचतो
गीत वसंत बापट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक - लता मंगेशकर
हृदयनाथांचं संगीत, लतादीदींचा आवाज, शांताबाई शेळके - वसंत बापटांची लेखणी याचा स्वर्गीय स्पर्श झालेली गाणी तेव्हाच्या एचएमव्हीने एकत्र आणली. मग साध्या गणपतीच्या आरतीलाही चाल मिळाली आणि मंत्रपुष्पांजलीही सुरात गायला येऊ झाली. या अल्बममधली सगळीच गाणी सुरेल होती. नाचणारा गणपती मराठी मातीला नवीन नाही. तो दशावतारी खेळांपासून लोकपरंपरेत भेटत आलाय. पण याला नागर रूप दिलं ते 'गणराज रंगी नाचतो'ने. आणि 'आधी वंदू तुज मोरया' हे गणपतीच्या संदर्भात वापरायचा वाक्प्रचारच बनला. या अल्बमला खरंच आजही तोड नाही.

पार्वतीच्या बाळा
गीत - सोपान म्हात्रे
संगीत - विठ्ठल शिंदे
गायक - आनंद शिंदे
'पोपट' ते 'कोंबडी' अशी धम्माल गाणी गाणाऱ्या आनंद शिंदेंचं हे पहिलं भक्तीगीत. तेही नवं म्हणता म्हणता बरंच जुनं आहे. ८८- ८९ सालातलं. विठ्ठल शिंदे म्हटलं की म्हणजे गाणं हीट होणारच, इतका त्यांचा परिसस्पर्श होता. आनंद यांनीही तुकड्या तुकड्यात न गाता एका फटक्यात हे गाणं रेकॉर्ड केलं. 'ताशाचा आवाज तरररा झाला' हे गावं तर त्यानेच. अगदी साधंसं वाटणारं हे गाणं. पार्वतीच्या बाळा म्हणत बाप्पाला अगदी आपल्या घरातलं इन्फॉर्मल बनवलं, हे कवी सोपान म्हात्रेंचं वैशिष्ट्य. त्यानंतर या गाण्याची अनेक तशीच्या तशी व्हर्जन निघाली. आश्चर्य म्हणजे या भक्तीगीताचं एक अश्लील द्वयथीर् व्हर्जनही आलंय.

3 comments:

  1. सहज बघितलं तर बाप्पा वरच्या माझ्या Comments ने १००० visitors चा आकडा पूर्ण झालाय.
    अभिनंदन !!!
    : महेश यशराज.

    ReplyDelete
  2. मित्रा, फक्त दोनच शब्द खटकले. बाकी अप्रतिम !

    ReplyDelete