आज गणपती बाप्पाचा हॅप्पी बर्थ डे. आपण आस्तिक असो, वा नास्तिक. सगळ्यांनी तो सेलिब्रेट करायलाच हवा. कारण बाप्पा हा फक्त देव कुठेय? तो आपल्याला रोजच जगताना कुठे कुठे भेटत असतो. कम्प्युटर वॉलपेपरांपासून पेपरांच्या मास्टहेडपर्यंत कुठेही.
खुदा नहीं न सही, आदमी का ख्वाब सही,
कोई हसीन नज़ारा तो हो, नज़र के लिए
असं दुष्यन्त कुमारनं लिहून ठेवलंय. ते मला बाप्पाच्या बाबतीत खूप खरं वाटतं. दरवर्षी तो घरी येतो. आठवडाभर पाहुण्यासारखा थांबतो. आवडीने पाहुणचार घेतो. जन्मभराचा सोबती होऊन जातो.
आज सकाळीच उशिरा उठलो. संडासला बसून पेपर वाचताना माघी गणपतीची एक बातमी वाचली. विचार आला एवढा आपला बाप्पा, पण गणेशोत्सवाच्या चार दोन बातम्या वगळता बाप्पाविषयी फारसं काही लिहायला आम्हा पत्रकारांना वाव नसतो. पण थोडा विचार केला, माझे चार लेख आठवले.
पहिला लेख मुंबई टाइम्सच्या प्रगती फास्ट साठी लिहिला होता. मी तेव्हा मुंटाचा संपादक होतो. गेल्याच्या गेल्या वर्षी गणपतीत ब-याच जणांना सुटी दिली होती. करियरवरचं पान भरायचं होतं. आता मी त्या विषयावर काय लिहिणार? तरिही लिहून टाकला एक लेख. गणपती बाप्पा आणि लीडरशिपचे फण्डे. त्यात माझं फारसं काही नव्हतं. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या संस्कृती पूजन या पुस्तकातल्या गणेश चतुर्थीवरच्या प्रकरणातून यातले बहुतांश फण्डे उचलले आहेत. पण त्यात माझीही ठिगळ असल्यामुळे या संदर्भाचं नाव मूळ लेखात दिलेलं नव्हतं. लेखाला कुणाचीच बायलाईन नव्हती. लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट.
महादेवाने गणपतीचे डोकं उडवलं. त्याजागी हत्तीचे डोकं लावलं. असं असेल, तर मग बाप्पाचे ओरिजिनल डोकंच चिटकवायला हवं होतं. मग असं का? बाप्पाचं रूप अनेक प्रतीकांचा समुदाय आहे. ती प्रतीकं आजच्या मॅनेजमेण्ट आणि कॉपोर्रेटच्या जमान्यातही तितकीच रिलेव्हण्ट आहेत. विशेषत: लीडरशिपच्या संबंधांत.
गणपती म्हणजे बॉर्न लीडर
गण म्हणजे लोकांचा समूह किंवा ग्रुप. पती म्हणजे लीडर त्यामुळे मास लीडर म्हणूनही किंवा साधा ऑफिसातला टीम लीडर म्हणूनही आपण बाप्पाकडून प्रेरणा घेऊ शकतो. त्याचं रूप आपल्याला चांगला लीडर बनण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात ते सांगत असतं. थोडक्यात नेतृत्वगुण समजून घ्यायचे असतील तर दर्शन करताना बाप्पाकडे नुसतं निरखूनही पाहिलं तरी पुरे.
फिलॉसॉफर लीडर
पुराणं आपल्याला सांगतात, की गणेश ही तत्त्वज्ञानाची देवता. तसंच समाजाचा नेताही तत्त्वज्ञानी असायला हवा. इतरांना मार्ग दाखवण्यासाठी आधी त्याचे स्वतःचे जगण्याचे आणि वागण्याचे फण्डे क्लीअर असायला पाहिजेत. प्लेटोने याच संदर्भात 'फिलॉसॉफर किंग'ची कल्पना मांडली होती. आपल्याकडे चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, बादशाह अकबर, छत्रपती शिवराय असे राजे किंवा महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, जयप्रकाश नारायण असे नेते, यांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत.
रिझन फर्स्ट
बाप्पाने हत्तीचं मस्तक धारण केलं कारण हत्ती हा प्राण्यांत सर्वात बुद्धिमान मानला जातो. बाप्पा हे बुद्धीचं दैवत. म्हणूनच कोणत्याही कामाची सुरुवात गणेशपूजनाने होते. याचा अर्थ हाच, की कोणतंही काम करण्याआधी ते बुद्धीवर घासून घ्यायला हवं. त्यावर नीट विचार करायला हवा. आधी आपण स्वतः कन्विन्स व्हायला हवं. तर ते आपण नीट करू शकू आणि इतरांना कन्विन्स करू शकू.
आर्ट ऑफ लिसनिंग
बाप्पाचे कान सुपासारखे. धान्य पाखडणा-या सुपाचं काम सालं बाहेर टाकून स्वच्छ धान्य आपल्याकडे ठेवण्याचं. ऐकतानाही योग्य अयोग्याची अशीच पारख करता यायला हवी. नाहीतर हलके कान लीडरला संपवू शकतात.
सूक्ष्मदृष्टी आणि दूरदर्शी
हत्ती बारीक सुईही जमिनीवरून उचलू शकतो. इतकी सूक्ष्मदृष्टी स्वत:विषयी असायला हवी. स्वत:वर बारीक लक्ष हवं. कोणतेही दुर्गुण आपल्यात शिरू नयेत, यासाठी जागरूक असायला हवं. पूर्वी एखादा राजा बेवारस मेला, तर हत्तिणीच्या सोंडेत माळ देऊन त्याला फिरवत. ती ज्याच्या गळ्यात हार घालेल, तो राजा. कारण हत्ती हा भविष्य वाचू शकतो, असा विश्वास होता. लीडरशिपसाठी अशा दूरदृष्टीची गरज असते.
चार हातांची किमया
आपण आपल्या टीमला कसं हॅण्डल करावं, ते बाप्पाचे चार हात सांगतात. एका हातात अंकुश. म्हणजे आपली टीम आपल्या पूर्ण कण्ट्रोलमध्ये हवी. दुस-या हातात पाश म्हणजे शिक्षा करण्याचं साधन. कुणी चुकलंच तर त्याला शिक्षाही करायला हवी. तिस-या हातात मोदक म्हणजे मोद अर्थात आनंद देणारा. म्हणजे लीडरचं साधं अस्तित्वही टीमसाठी आनंददायी असायला हवं. चौथा हात आशीर्वादाचा. म्हणजे प्रत्येक टीम मेम्बरच्या प्रगतीचा विचार लीडरने करायला हवा. एखाद्याला एखादी गोष्ट पटली नाही, तरी त्याला बॉस सांगतोय, म्हणजे ती आपल्या हिताचीच आहे, असा विश्वास हवा.
विश्वास हवा
इतरांनी विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी बाहेर कुठेही जाणार नाहीत, इतकं मोठं पोट हवं. बाप्पासारखंच लंबोदर. तेवढंच महत्त्वाचं हे की आपणही असा संवाद वाढवायला हवा, संपायला नको. इतरांच्या चुका पोटात घेण्याइतका मोठेपणा हवा.
इम्प्लिमेण्टेशन मस्ट
बाप्पाचे छोटेसे पाय हे बुद्धिमंतांचं लक्षण. बुद्धिमान स्वत: धावत नाही, इतरांना योग्य दिशेने धावायला लावतात. अशावेळेस तो उतावळा असूनही चालत नाही. फक्त प्लान करून कामाचं नाही त्याचं इम्प्लिमेंटेशनही मस्टच.
वेलकम द रेवोल्युशन
बाप्पाचा आवडता रंग लाल. लाल हा क्रांतीचा रंग. नेत्याला क्रांती आवडते. बदलांसाठी तो तयार असतो आणि बंडखोरांना तो दाबत नाही, त्यांचं त्याला कौतुक असतं.
प्रत्येकजण महत्त्वाचा
बाप्पाला दुर्वा आवडतात म्हणून आता आपण दुर्वांचे औषधी वगैरे गुण आपण नावाजतो. नाहीतर त्याला गवत म्हणून झिडकारतच असतो. अशा दुर्लक्षितांमधल्या टॅलेण्टला महत्त्व द्यायला हवं.
उंदीरमामा की जय
गरूड, नंदी ही विशालकाय वाहनं घराघरांत जाऊ शकत नाहीत. बाप्पाच्या उंदराला मात्र घराघरातल्या वाटाही ठावूकअसतात. याचाच अर्थ सर्व सहकाऱ्यांशी कुटुंबासारखे संबंध असायला हवेत. आपली टीम हे आपलं कुटुंबच वाटायला हवं. आणखी एक महत्त्वाचं, उंदीरमामा फुंकर घालून चावतो. त्यामुळे तो चावला हे कोणाला कळत नाही. तसंच कुणाला काही कटू सांगायची वेळ आली, कान पकडायची वेळ आली, तरी ती इतक्या गोडपणे सांगावी की ऐकणा-याला वाईट वाटू नये आणि आपलंही काम व्हावं.
सचिनराव या लेखाचं प्रयोजन काय?
ReplyDeleteशॉलेट बावा,
ReplyDeleteलई भारी
- श्री व सुवर्णा
khupach chhan
ReplyDelete@ नितीन, काल गणेश जयंती होती. माघी गणपती सुरू झाले काल. तेच निमित्त. तेच प्रयोजन.
ReplyDeleteAPRATIM SIR...VACHUN CHAN VATALA
ReplyDelete